सगळा शहाणपणा शेतकऱ्यांनाच शिकवा,इतरांचे काय.....? प्रहार रविवार, दि.16 एप्रिल 2017
प्रहार रविवार , दि .16 एप्रिल 2017 सगळा शहाणपणा शेतकऱ्यांनाच शिकवा , इतरांचे काय .....? सरकार आणि त्यांच्या पाळलेल्या पोपटांनी शेतकऱ्यांना शहाणपणा शिकवण्याऐवजी आपण म्हणजे सरकारने काय करायला हवे आणि शेतकरी नसलेल्या इतर समाजघटकांनी शेतमालाच्या किमती थोड्याबहुत वाढल्यास गलबलाट करणे बंद करावे , एवढे जरी प्रबोधन केले , तरी शेतकऱ्यांचे हित आपोआप साधले जाईल , त्याला सल्ला वगैरे देण्याची गरजच उरणार नाही . शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली तर अनिष्ट पायंडा पडेल , बँकिंग व्यवस्था धोक्यात येईल असा सूर आता सगळीकडूनच आळवला जात आहे . मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी तर सभागृहात आणि बाहेरही कर्जमाफी हा शेतकऱ्यांच्या समस्यांचा उपाय नाही , कर्ज फेडण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण करणे ही खरी गरज आहे असे वारंवार सांगितले . स्टेट बँकेच्या प्रमुख अरूंधती भट्टाचार्य यांनीदेखील शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे चुकीचे असल्याचे म्हटले होते . त्यापाठोपाठ रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी...