' प्रहार' रविवार, दि.15 एप्रिल 2018 बंद करा हा दौलतजादा...! हे खरे आहे की देशातील गरिबांची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे आणि या गरीब, वंचितांपर्यंत सगळ्या सोईसुविधा घेऊन जाण्यासाठी सरकारला 'आहे रे' वर्गातील लोकांकडून अधिक कर वसूल करावा लागतो; परंतु ही व्यवस्था कायमस्वरूपी असू शकत नाही. पायात ताकद निर्माण होईल, चालण्याचा सराव होईल तोपर्यंत पांगूळगाडे दिले पाहिजे, अशी ताकद निर्माण झाल्यावर पांगूळगाडे काढून घेणे गरजेचे आहे, परंतु सध्या हे होत आहे, की या पांगूळगाड्यांनाच लोक पाय समजत आहेत आणि त्यांचा तो भ्रम कायम ठेवण्यात सरकार स्वत:ला धन्य मानत आहे. नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. एअर इंडिया या सरकारी मालकीच्या विमान कंपनीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आपल्या विमान प्रवास भाड्यात अर्धी कपात केली आहे. याचा अर्थ ज्येष्ठ नागरिक अर्ध्या पैशातच विमान प्रवास करू शकतील. आधीच तोट्यात चालणाऱ्या या विमान कंपनीला अशा सवलती देणे कसे काय परवडते? प्रवासी आणि मालवाहतुक भाड्यात या विमान कंपनीने वाढ केली असती, कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि इतर भत्त्यांमध्ये कपात केली असती, भारतातल्या भार...