'प्रहार' रविवार, दि.१४ जुलै २०१९ समारंभातील ध्वनीप्रदूषणामुळे वैचारिक आदान-प्रदान थांबले....! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) लग्न असो अथवा इतर कोणताही कार्यक्रम असो, तो ठरल्यावेळी पार कसा पडेल, शांततेने पार कसा पडेल याची काळजी आयोजकांनी घ्यायला हवी. अलीकडे तसे होत नसल्याचे दिसते. विशेषत: लग्न समारंभात अनावश्यक गोंधळच अधिक दिसून येतो. संवाद साधता येत नाही, शांततेने कुणाशी बोलता येत नाही, लग्नाची वेळ पाळली जात नाही. ध्वनीप्रदूषण हा तर मुद्दा आहेच; परंतु त्यासोबतच अपेक्षित वैचारिक देवाण-घेवाणीला जो अडथळा निर्माण होतो, तो अधिक काळजीचा विषय ठरतो. वैचारिक आदान-प्रदानातून सामाजिक बदल होत असतात, क्रांती होत असते. नवे विचार समाजात नव्या बाबी रूजवत असतात. हे वैचारिक आदान-प्रदान वेगवेगळ्या स्तरांवर होत असते. बहुजन समाजात कौटुंबिक आणि सामाजिक कार्यक्रमांची अगदी रेलचेल असते. अशा कार्यक्रमांमध्ये लोक एकमेकांना भेटत असतात, विचारांचे आदान-प्रदान होते. कार्यक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाचा हेतू कदाचित ½वेगवेगळा असेल; परंतु संवाद स...