' प्रहार ' रविवार, दि.२० ऑक्टोबर २०१९ रासायनिक शेतीचे अनुदान जैविक शेतीला द्यावे! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै.देशोन्नती) भारतात १९६० ते १९७० च्या दशकात अन्न धान्याची चणचण होती. त्यामुळे त्या काळात मजूर शेतात काम केल्यानंतर पैशाच्या रूपात मजूरी घेण्याऐवजी अन्नधान्याच्या स्वरूपात घेत होते . एक क्विंटल ज्वारी विकल्यानंतर साधारणत: एक तोळा म्हणजे १२ ग्रॅम आणि एक क्विंटल कापूस विकल्यानंतर दोन तोळे म्हणजे २४ ग्राम सोने मिळायचे. त्यावेळेला तोळा हा १२ ग्रॅम चा होता, दशमान पद्धती लागली नव्हती. शेतीमध्ये लागणाऱ्या जवळपास सर्वच निविष्ठा जसे बियाणे, शेण खते, बैल वगैरेमध्ये शेतकरी स्वयंपूर्ण होता. *बारा बलुतेदारीमुळे गावगाडा हा सुरळीत चालत होता.* १९७० नंतर हरीतक्रांती आली. परंपरागत बियाणे जावून हायब्रिड बियाणे आले, रासायनिक खते आली, त्यापाठोपाठ कीड आली आणि कीड नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशके आली. देशातील शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीमध्ये आपला पुरुषार्थ गाजवला. पेव संस्कृती जाऊन धान्याची गोदामे...