'प्रहार' रविवार, दि.६ ऑक्टोबर २०१९

काँग्रेस हे धाडस करेल काय?
(लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै.देशोन्नती)

आता अन्न उगवणे हे गरजेचे राहिले नाही तर प्रक्रिया करणे ही गरज झाली आहे, हे शेतकऱ्यांना स्पष्टपणे कुणीतरी सांगितलेच पाहिजे. म्हणजे ते भविष्यात वेगळा विचार सुरू करू शकतात आणि वेळीच सावरू शकतात. सध्या विरोधात असलेली काँग्रेस जर प्रामाणिकपणे पुढे येऊन लोकांना वस्तुनिष्ठपणे भविष्यात ते काय करू शकतात याबाबत ‘ब्लु प्रिंट’ देऊ शकली तर हे होऊही शकते, मात्र त्या ताकदीचा कुणीच नेता त्यांच्याकडे नाही. शरद पवार हे करू शकले असते, मात्र त्यांच्या संदर्भात सातत्याने जाणीवपूर्वक जी प्रतिमा उभी केल्या गेली; त्याची किंमत आता काँग्रेस मोजत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, मात्र वस्तुनिष्ठ विचार करून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पुढे येऊन पवारांच्या खांद्यावर नेतृत्व देण्याचे हे धाडस करेल काय? ह्यावरच देशाचे आणि काँग्रेसचे भवितव्य सध्यातरी अवलंबून आहे.

                    Oxfam च्या २०१७ च्या सर्वेक्षणानुसार १ टक्के लोकांकडे देशातला ७३ टक्के पैसा आहे, म्हणजेच ९९ टक्के लोकांकडे केवळ २७ टक्के पैसा आहे. याचाच अर्थ असा की, बाजारात खर्च करायला पैसाच नाही, कारण ज्यांच्याकडे ७३ टक्के पैसा आहे; असे १ टक्के लोक बाजारात वस्तू विकत घेण्यासाठी जातच नाहीत आणि जे ९९ टक्के लोक आहेत त्यांच्याकडे खरेदी करण्यासाठी पैसा नाही; म्हणूनच उद्योग बंद पडत आहेत आणि बेरोजगारी वाढत आहे. तसेच ७३ टक्के पैसा असणारे हे तेच १ टक्के लोक आहेत की ज्यांच्याकडे बँकांचे करोडो रुपये थकित आहेत, म्हणजेच बँकांच्या NPA ला हेच लोक कारणीभूत आहेत.
                 आज भारतामधील जर शहरी आणि ग्रामीण भागातील तफावत आणि जीवन , तेथील सोयी-सुविधा एकीकडे, तर दुसरीकडे दिल्लीमध्ये T ३ टर्मिनल किंवा मुंबईचे T २ टर्मिनल पाहिल्यानंतर या देशामध्ये दररोज दहा ते पंधरा शेतकरी आत्महत्या करतात याच्यावर कुणाचा विश्वास बसू शकणार नाही.
                   एकीकडे कॅलरीजचा overflow आहे आणि मग तो जाळायला जिम तर दुसरीकडे कुपोषण, एकीकडे जीवन जगण्यासाठी मरणाचा संघर्ष तर दुसरीकडे सुविधांचा ओव्हरफ्लो. मरणानंतर स्वर्ग किंवा नरक या संकल्पनेला छेद देणारी अवस्था आज देशात दिसत आहे. ग्रामीण भाग म्हणजे नरक आणि शहरी भाग किंवा मेट्रो किंवा सरकारी भाषेत सांगायचे झाल्यास स्मार्ट शहरे म्हणजे स्वर्ग हीच नवी संकल्पना आज अधोरेखित होते आहे.
                       हे लक्षात येऊ नये म्हणून गरिबांकरिता धार्मिक कार्यक्रम आयोजित होत आहेत. तरुण आणि उत्पादक लोक पूजा-अर्चा, वारी, भंडारे ह्यामध्ये शक्ती आणि वेळ वाया गमावत आहेत. काम करणारे हात आता मंदिरात देवासमोर जोडले जात आहेत. आता तर किमान महिनाभर निवडणुकांमध्ये तरुणाई अजून कुणाच्यातरी झेंड्याला भलताच दांडा लावून खांद्यावर घेऊन बेहोष होऊन नाचणार आहेत.
                खरेतर राज्यकर्त्यांनी किंवा प्रशासनाने प्रामाणिकपणे आणि उघडपणे बदलणाऱ्या किंवा बदललेल्या जगाबाबत कल्पना दिली तर ग्रामीण भागातील लोकांना हा जीवन मरणाचा संघर्ष करावाच लागणार नाही किंवा त्याचे प्रमाण तरी नक्कीच कमी होईल. मात्र, त्याकरिता तुम्हाला त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. मोदींना ही संधी होती मात्र ती त्यांनी गमावली. आता हे होणे नाही, कारण एवढी एक हाती सत्ता यानंतर कुणालाही मिळेल अशी शाश्वती नाहीच.
                          नुकतेच मोदी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्पच्या निवडणूक प्रचारार्थ जाऊन आलेत. 'हाउडी मोदी' कार्यक्रमात त्यांनी ५० हजार धरून आणि बांधून आणलेल्या भारतीयांना संबोधित केले. मात्र, स्टेडियमच्या बाहेर त्यापेक्षा कितीतरी पटीने मोदींच्या विरोधात लोक जमा झाले होते हे कुठल्याही चॅनलने दाखवले नाही. थोडक्यात मोदी नावाची जादू आता ओसरू लागली आहे. असे म्हटले जाते की तुम्ही काही काळ काही लोकांना मूर्ख बनवू शकता, मात्र तुम्ही सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही; हे आता सिद्ध होत आहे.
             मोदी आणि त्यांच्या चेलेचपाट्यानी संघाच्या माध्यमातून २०१४ पूर्वी ज्या प्रमाणे मोदींची एक प्रतिमा उभी केली आणि एकहाती सत्ता मिळविली त्याच्या अगदी विपरित त्याकाळी काँग्रेस पक्षामधील परिस्थिती होती. ग्राउंड रियालिटी माहिती असणारे आणि जनतेच्या मनात घर केलेले माधवराव शिंदे, शरद पवार, विलासराव देशमुख किंवा जगदीश टायटलरसारखे अनेक जण काँग्रेसकडे होते. मात्र, गांधी घराण्याची आरती ओवाळण्यात धन्यता मानणाऱ्या सुमार बुद्धीमत्तेच्या नेत्यामुळे काँग्रेस ती संधी गमावून बसली.
            देशातील ही परिस्थिती आज केवळ प्रामाणिक मनुष्यच बदलू शकतो. राजकीय पक्ष हे केवळ गेम चेंजर म्हणून मग फक्त असंतोष वाढविण्यासाठी नौटंकी करत असतात. मला खुर्चीत कसे बसता येईल हाच एकमेव अजेंडा प्रत्येक पक्षाच्या अजेंड्यावर आहे.
               आज देशातील महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या दोन्ही राज्यांमध्ये समोर कोणी प्रतिस्पर्धी विरोधी पक्षच दिसत नाही, त्यामुळे देशामध्ये आज कधी नव्हे एवढी गंभीर स्थिती आहे. मी मागील लेखांमध्ये लिहिल्याप्रमाणे "निंदकाचे घर असावे शेजारी" म्हणजे काँग्रेस ज्यावेळी सत्तेमध्ये होती त्यावेळेला आजचा सत्ताधारी भाजपा पक्ष हा अत्यंत कडवी टीका अगदी प्रत्येक गोष्टींमध्ये त्यांनी टांग अडवलीच पाहिजे, अशी परिस्थिती होती. अशा अवस्थेतसुद्धा देशामध्ये फार चांगली परिस्थिती नव्हती आणि आता तर देशामध्ये विरोधी पक्ष हा गेल्या पाच वर्षांमध्ये जवळपास नामशेष झाला आहे. त्यामुळे चुका दाखवणारे कुणी उरलेलेच नाहीत आणि ही अवस्था देशाकरिता अतिशय धोकादायक आहे.
                      आता अन्न उगवणे हे गरजेचे राहिले नाही तर प्रक्रिया करणे ही गरज झाली आहे, हे शेतकऱ्यांना स्पष्टपणे कुणीतरी सांगितलेच पाहिजे. म्हणजे ते भविष्यात वेगळा विचार सुरू करू शकतात आणि वेळीच सावरू शकतात. सध्या विरोधात असलेली काँग्रेस जर प्रामाणिकपणे पुढे येऊन लोकांना वस्तुनिष्ठपणे भविष्यात ते काय करू शकतात याबाबत ‘ब्लु प्रिंट’ देऊ शकली तर हे होऊही शकते, मात्र त्या ताकदीचा कुणीच नेता त्यांच्याकडे नाही. शरद पवार हे करू शकले असते, मात्र त्यांच्या संदर्भात सातत्याने जाणीवपूर्वक जी प्रतिमा उभी केल्या गेली; त्याची किंमत आता काँग्रेस मोजत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, मात्र वस्तुनिष्ठ विचार करून काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व पुढे येऊन पवारांच्या खांद्यावर नेतृत्व देण्याचे हे धाडस करेल काय? ह्यावरच देशाचे आणि काँग्रेसचे भवितव्य सध्यातरी अवलंबून आहे.

पेसबूकवर प्रहार वाचण्यासाठी: PraharbyPrakashPohare आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com,
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017