खिसेकापू सरकारला धडा शिकवायला हवा!प्रहार रविवार, दि.16 जुलै 2017
प्रहार रविवार, दि.16 जुलै 2017 सरकारी कर्मचारी आता सातव्या वेतन आयोगानुसार वेतन घेत आहेत. शेतकऱ्यांनी किमान आपला पहिला आयोग, स्वामीनाथन आयोग लागू करण्यासाठी संघर्ष करायला हवा. लवकरच देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा होणार आहे; परंतु हा राजकीय स्वातंत्र्यदिन आहे. त्या दिवशी भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले; पण त्या स्वातंत्र्याचा शेतकऱ्यांना काहीही लाभ झालेला नाही. तो अजूनही गुलामीतच जगत आहे. पूर्वी तो ब्रिटिशांच्या गुलामीत होता; आता आपल्याच लोकांनी त्याच्यावर गुलामी लादली आहे. गुलामीच्या या बेड्या तोडायच्या असतील, तर येत्या स्वातंत्र्यदिनी हजारो नव्हे, लाखोंच्या संख्येने शेतकऱ्यांनी 'जेलभरो आंदोलना'त सहभागी व्हायला हवे. आता लढा निर्णायकच हवा. फडणवीस सरकारने त्यांच्या दाव्यानुसार देशातील आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी केल्याची घोषणा करून महिना उलटत आला तरी अजूनही या कर्जमाफीचे केवळ कवित्त्वच सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मी दोन-तीन गावांमध्ये सभा घेतल्या. त्या सभेत उपस्थित शेतकऱ्यांना सरकारने तातडीचे कर्ज म्हणून देऊ केलेल्या दहा हजारांचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला असा प्रश्न केला...