प्रहार, रविवार, दि. 9 फेब्रुवारी 2014, शिष्टाचाराची ऐशी-तैशी...
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
'शिष्टाचाराची ऐशी-तैशी'
कोणताही देश शेवटी त्या देशातील माणसांमुळे मोठा होत असतो आणि त्या देशातील माणसांची उंची किती आहे हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून स्पष्ट होते. चौकात वाहतूक पोलिस नाही म्हटल्यावर, सर्रास वाहतूक नियम तोडणारे लोक, आपल्या घरातील कचरा बाहेर उघड्यावर टाकणारे लोक, शक्य झाले तर तिकिट न काढताच प्रवास करणारे लोक, आपल्या धुंदीत इतरांच्या कानांचे पडदे फाडणारे असभ्य लोक ज्या देशात आहेत, त्या देशाला महान होण्याचा किंवा महान म्हणवून घेण्याचा किती अधिकार आहे, हे लोकांनीच ठरवायला हवे.
शाने श्रीमंती येते ही गोष्ट खरी असली, तरी केवळ श्रीमंतीच येते, त्या श्रीमंतीसोबत किंवा आर्थिक प्रगतीसोबत इतर अनेक आनुषंगिक प्रगती होतेच असे नाही, किंबहुना पैशासोबत नको त्या गोष्टी आणि नको त्या संस्कारांचाच अधिक प्रादुर्भाव होतो असे किमान आपल्या देशात तरी दिसून येते, खरे तर आपल्याच देशात दिसून येते असे म्हणावयास हरकत नाही. गतकाळच्या तुलनेत विचार केला, तर आपल्या देशातील मध्यमवर्गीयांची संख्या नक्कीच झपाट्याने वाढली आहे. लोकांच्या हातात पैसा अधिक खुळखुळून राहिला आहे. शेतकऱ्यांसारखा सामाजिक घटक जो आधीपासून गरीब होता तो गरीबच राहिला हे सत्य असले, तरी निम्नवर्गातील इतर लोकांची बऱ्यापैकी आर्थिक प्रगती झालेली दिसते. निम्नवर्गीय म्हणजे सरकारी नोकरशाही, विदेशात नोकरी करणारे किंवा व्यावसायिक, ज्यांच्यासाठी घरी साधी सायकल असणे एकेकाळी श्रीमंतीचे लक्षण मानले जायचे त्या लोकांच्या दारात आता दोन किंवा चारचाकी गाड्या सहज उभ्या दिसतात. पूर्वीचा मध्यमवर्ग आता श्रीमंत गटात मोडल्या जाऊ लागला. चार चाकी वाहन अगदी सहजपणे पदरी बाळगण्याइतकी ऐपत त्यांच्याकडे आली. निम्न आणि मध्यमवर्ग या दोन गटांचीच खऱ्या अर्थाने आर्थिक प्रगती झाली; परंतु त्यांची संख्या मोठी असल्याने एकूणच सामाजिक, आर्थिक स्थिती सुधारल्याचे चित्र दिसते.
या सुधारणेबाबत आक्षेप असण्याचे तसे कारण नाही; परंतु आर्थिक सुधारांसोबत जी वैचारिक पक्वता किंवा जबाबदारीची जाणीव येणे अपेक्षित होते तसे काही झाल्याचे दिसत नाही. अनेक घटनांतून आणि उदाहरणांतून या वर्गाच्या बेजबाबदार वर्तनाची साक्ष वारंवार पटते. साधे साधे सामाजिक संकेत सर्रासपणे पायदळी तुडविले जाताना दिसतात. सकाळ होत नाही तोच एखाद्या मशिदीतून अजानचा स्वर कानी पडतो. ही अजान मोठ मोठे भोंगे किंवा कर्णे लावूनच का दिली जाते, हे कळायला मार्ग नाही. पूर्वीच्या काळी लोकांना नमाजची वेळ समजावी म्हणून उंच मनोऱ्यावर उभे राहून अजान दिली जायची, त्यानंतर जनाब अंतुल्यांच्या काळात कर्णे किंवा भोंग्याच्या माध्यमातून ती दिली जाऊ लागली. आज त्याची खरेच गरज आहे का? सगळ्यांकडे आता मोबाईल आले आहेत, घड्याळी पूर्वीपासून होत्या, सकाळी उठण्यासाठी त्यावर अलार्म सहज लावल्या जाऊ शकतो. ज्यांना यायचे ते स्वत:च योग्य वेळ पाळून येऊ शकतात, त्यासाठी प्रचंड मोठ्या आवाजात कर्णे लावण्याची काय गरज आहे? प्रश्न केवळ अजानपुरताच मर्यादित नाही. प्रचंड मोठ्या आवाजात होणाऱ्या सकाळ- संध्याकाळच्या आरत्यांच्या मागेदेखील कोणतेही संयुिक्तक कारण दिसत नाही. केवळ ``ते'' करतात म्हणून आम्ही करतो असा पवित्रा या संदर्भात घेतल्या जाताना दिसतो. कोणतेही धार्मिक कार्यक्रम प्रचंड ध्वनीप्रदूषण करणाऱ्या कर्ण्यांशिवाय, भोंग्यांशिवाय पार पडताना दिसत नाही. सार्वजनिक गणेशोत्सव, दुर्गोत्सव म्हणजे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण करणारे आणि अचकट- विचकट हातवारे करून डिजेच्या तालावर धांगडधिंगा घालण्याचे धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. हे उत्सव जवळ आले, की अनेक शांतताप्रिय नागरिकांच्या छातीत धस्स होते, विशेषत: ज्या परिसरात देवी किंवा गणेशाची स्थापना केली जाते त्या परिसरातील लोकांना पुढचे नऊ-दहा दिवस प्रचंड मनस्तापाचे ठरतात. जितका मोठा गोंगाट, जितका प्रचंड गोंगाट तितकी श्रद्धा मोठी असा काहीसा समज किंवा गैरसमज लोकांचा झालेला दिसतो आणि या सर्व उत्सवावर राजकीय दादांचा आणि भाऊंचा प्रभाव व पैसा फार मोठ्या प्रमाणात दिसतो. लोकांनी सश्रद्ध असावे, परंतु आपली श्रद्धा इतरांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा अधिक्षेप करणार नाही, याची काळजी कोण घेणार? त्यासाठी आवश्यक जबाबदारीची जाणीव, इतरांच्या मतांचा आदर करण्याची वृत्ती पैशासोबत येऊ शकत नाही, ती मुळातूनच असायला हवी. सकाळच्या वेळी कुणी अभ्यास करीत असतो, कुणाचे वाचन वा वैचारिक मंथन सुरू असते, कुणी ध्यानाला बसलेला असतो, कुणाची विपश्यना सुरू असते, सकाळची निरव शांतता त्यासाठी अतिशय उपयुक्त असते आणि नेमक्या त्याचवेळी कुठूनतरी कान फाडून टाकणारी बांग ऐकू येते, कुठूनतरी कानठळ्या उठविणाऱ्या आरतीचा गोंगाट ऐकू येतो आणि सगळी शांतता नष्ट होते. मोठ मोठे भोंगे लावण्याची खरेच काय गरज आहे? मोठ्या आवाजात ऐकायची इतकीच हौस असेल, तर साधे स्पीकर आपल्या खोलीत वा हॉलमध्ये लावून ध्वनीप्रदूषण आपल्यापर्यंत मर्यादित राखता येत नाही का? पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी जंगलात जाऊन ध्यानधारणा, साधना करायचे, आजच्या भाषेत बोलायचे तर ते त्यांचे रिसर्च वर्क असायचे, जंगलात जाऊन हे करण्याचे कारणच हे होते, की अशा कामासाठी अत्यंत शांतता व एकाग्रता लागते. त्याच शांततेची आपण हरघडी ऐसीतैसी करत असतो. टीव्ही, रेडिओ, एफएमच्या माध्यमातून चोवीस तास चारही बाजूने गोंगाट आपल्या कानावर आदळत असतो. एफएमच्या चॅनेलवर कुणीतरी एक रेडिओ जॉकी असतो, त्याच्यासोबत एक फटाकडी असते, त्यांचे पांचट विनोद दिवसभर सुरू असतात आणि सोबत प्रचंड धांगडधिंगा असणारी गाणी वाजत असतात आणि हे चोवीस तास सुरू असते आणि त्याहीपेक्षा गंभीर बाब म्हणजे ऐकणारे लोक आपल्यासोबत आजूबाजूच्या पाच-पन्नास लोकांना ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ते ऐकत असतात. या साध्या साध्या गोष्टींतून लोकांचा शिष्टाचार कोणत्या पातळीवरचा आहे, हे दिसून येते.
आपण आपल्या संस्कृतीचा उदो उदो करताना नेहमीच पाश्चिमात्य संस्कृतीला नावे ठेवत असतो; परंतु पाश्चिमात्य देशात व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान राखला जात असताना आपले व्यक्तीस्वातंत्र्य इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा आणणार नाही, याची कायम दक्षता घेतली जाते. तिकडे कुणी असे मोठे भोंगे लावून इतरांचे कान बहिरे करू शकत नाही, कुणी तसे केलेच तर पोलिस ताबडतोब त्याची गठडी वळून तुरूंगात टाकतील. मुळात तिकडे असे काही होतच नाही, कारण तिकडच्या लोकांना आपल्या स्वातंत्र्या इतकीच इतरांच्याही स्वातंत्र्याची जाणीव असते. हा सगळाच प्रश्न एक नागरिक म्हणून ज्या काही जबाबदाऱ्या असतात त्यांचे भान ठेवण्याचा आहे. आपल्याकडे आपण एक नागरिक म्हणून मिळणारे सगळे फायदे उपटायला तत्पर असतो; परंतु जबाबदारीची कोणतीही जाणीव आपल्याला नसते. अशा बेजबाबदार नागरिकांमुळेच आपला समाज भ्रष्ट, अस्वच्छ आणि मूल्यविहिन झाला आहे. असा समाज एक चांगला देश कधीच घडवू शकत नाही.
आपल्याकडे हगणदारी मुक्त ग्राम योजना राबवावी लागते, हे किती दुर्दैवी आहे. उघड्यावर शौच केल्याने आपण आपल्यासोबतच इतरांचेही आरोग्य धोक्यात आणत असतो, इतकी साधी बाब ज्या देशातील लोकांना कळत नाही त्या देशाला कोणत्या तोंडाने महासत्ता बनण्याचा दावा करता येणार आहे? हीच बाब तंटामुक्ती ग्राम योजनेचीही.
आपल्या येथे अगदी उच्चभू्र म्हणविणाऱ्या लोकांच्याही लग्नवराती भर रस्त्यातून डीजेचा प्रचंड गोंगाट करीत, रहदारीला अडचण निर्माण करीत आपल्याच मस्तीत जात असतात. या गोंगाटामुळे इतरांना त्रास होऊ शकतो, रहदारीस अडथळा आल्याने अनेकांचा विनाकारण खोळंबा होऊ शकतो, याची जाणीव सुशिक्षित आणि श्रीमंत म्हणविणाऱ्यांना नसेल तर इतरांकडून कोणत्या अपेक्षा करता येतील? इथे लघवी करू नये असा फलक लावला असतो तिथेच मुत्रीघर तयार झालेले दिसते. इथे थुंकू नये असे लिहिले असते त्याखालीच पिचकाऱ्या रंगविलेल्या दिसतात. तात्पर्य या देशातील श्रीमंत, सुशिक्षित म्हणविणाऱ्यांचीच शिष्टाचाराच्या बाबतीत इतकी भीषण अवस्था असेल तर या देशाचे भवितव्य कसे काय उज्ज्वल असू शकते?
कोणताही देश शेवटी त्या देशातील माणसांमुळे मोठा होत असतो आणि त्या देशातील माणसांची उंची किती आहे हे अगदी छोट्या छोट्या गोष्टींतून स्पष्ट होते. चौकात वाहतूक पोलिस नाही म्हटल्यावर, सर्रास वाहतूक नियम तोडणारे लोक, आपल्या घरातील कचरा बाहेर उघड्यावर टाकणारे लोक, शक्य झाले तर तिकिट न काढताच प्रवास करणारे लोक, आपल्या धुंदीत इतरांच्या कानांचे पडदे फाडणारे असभ्य लोक ज्या देशात आहेत, त्या देशाला महान होण्याचा किंवा महान म्हणवून घेण्याचा किती अधिकार आहे, हे लोकांनीच ठरवायला हवे. खरे म्हणजे या सर्व बाबी अगदी हळूहळू समाजात पाझरत असतात; आणि त्यातूनच एक ``कल्चर'' किंवा संस्कृती उदयाला येत असते. त्याकरिता शिक्षण, राज्यकर्ते, आर्थिक व सामाजिक स्थिती इत्यादी घटक महत्त्वाच्या भूमिका बजावत असतात; मात्र दुर्दैवाने आपल्या देशात शिक्षणामध्ये जि.प., न.पा., मनपा यांचा स्तर इतका खालावलेला आहे, की त्यामधून याबाबत काही अपेक्षा करणेच मूर्खपणा आहे. बहुतांश राज्यकर्तेसुद्धा समाजकारणातून पुढे न येता करिश्मा किंवा गॉडफादरच्या माध्यमातून उदयाला आलेले असल्यामुळे आणि झटपट श्रीमंतीचे माध्यम ठरल्यामुळे तसेच उदासिन मतदारांच्या 50 टक्के मतदानामुळे युती व आघाड्या सांभाळण्यात गुंग असल्यामुळे त्यांच्याकडूनही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. खऱ्या व प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांचे हाल पाहिल्यामुळे समाजकार्यात पुढे असणारी घराणी वा व्यक्ती आता विरळ नव्हे, जवळपास नामशेष झाली आहेत. आणि मी लिहितो त्या प्रकारे लिहिणेसुद्धा आजकाल ``जोखमीचे'' झालेले असल्यामुळे सिव्हिलायझेशन म्हणजे सभ्यतेचे म्हणजे शिष्टाचाराचे भविष्यात भारतात तरी काही खरे दिसत नाही.
Comments
Post a Comment