प्रहार रविवार, दि.18 फेब्रुवारी 2018 शेतकऱ्यांनी कर्मयोगी बनावे! शेतकऱ्यांनी आता बुद्धिवादी, कर्मवादी बनावे. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांबच राहावे, आपली शेती, आपला उद्योग, आपला धंदा आणि यातून चार पैसे कसे वाचतील याची हिकमत अवगत करावी, आणि तोच माल उत्पादित करावा ज्याची बाजारात मागणी आहे. त्यावर थोडी प्रक्रिया आणि पॅकिंग करून त्यापासून जास्त पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करावा. सप्ताह, पारायणे, कथा, किर्तने हे निव्वळ वेळ वाया घालविण्याचे उद्योग आहेत. त्या बुवा-बाबांच्या कमाईचा तो भाग आहे, त्यांचे खिसे आणि पोट भरण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वेळ आणि पैसा सार्थकी लावा. शेवटी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य तुमच्या कष्टावरच अवलंबून आहे, कोणताही देव आणि कोणतेही सरकार तुमच्या मदतीला धावून येणार नाही. महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी मानली जाते. या सगळ्या संतमंडळींनी समाजाच्या प्रबोधनाचे काम केले आहे. भिक्तयोगासोबतच कर्मयोगाचाही त्यांनी तितक्याच हिरिरीने प्रचार आणि प्रसार केला. 'आधी प्रपंच करावा नेटका' असा संदेश देण...