प्रहार रविवार, दि.18 फेब्रुवारी  2018

 शेतकऱ्यांनी कर्मयोगी बनावे!
  शेतकऱ्यांनी आता बुद्धिवादी, कर्मवादी बनावे. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांबच राहावे, आपली शेती, आपला उद्योग, आपला धंदा आणि यातून चार पैसे कसे वाचतील याची हिकमत अवगत करावी, आणि तोच माल उत्पादित करावा ज्याची बाजारात मागणी आहे. त्यावर थोडी प्रक्रिया आणि पॅकिंग करून त्यापासून जास्त पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करावा. सप्ताह, पारायणे, कथा, किर्तने हे निव्वळ वेळ वाया घालविण्याचे उद्योग आहेत. त्या बुवा-बाबांच्या कमाईचा तो भाग आहे, त्यांचे खिसे आणि पोट भरण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वेळ आणि पैसा सार्थकी लावा. शेवटी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य तुमच्या कष्टावरच अवलंबून आहे, कोणताही देव आणि कोणतेही सरकार तुमच्या मदतीला धावून येणार नाही.


महाराष्ट्र ही संतांची कर्मभूमी मानली जाते. या सगळ्या संतमंडळींनी समाजाच्या प्रबोधनाचे काम केले आहे. भिक्तयोगासोबतच कर्मयोगाचाही त्यांनी तितक्याच हिरिरीने प्रचार आणि प्रसार केला. 'आधी प्रपंच करावा नेटका' असा संदेश देणाऱ्या या समस्त संतमंडळींनी 'तिर्थी देव नव्हे धोंडा' असे परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु संतांच्या या प्रबोधनाचा समाजावर फारसा परिणाम झालेला दिसत नाही. आजही ठिकठिकाणी केवळ वेळ आणि पैसा वाया घालविणारे अनेक धार्मिक उपक्रम अगदी धडाक्याने राबविले जातात. आपल्या प्रवचनासाठी लाखोची बिदागी घेणारे बाबा, बुवा, महाराज प्रवचनात मात्र सगळे काही इथेच ठेवून जावे लागते, हे मात्र आवर्जून सांगतात. सोबत काही जात नाही तर तुम्ही इतके वैभव कशासाठी जमविले, असा रोकडा सवाल त्यांना कुणी विचारीत नाही. या सगळ्या बुवा, बाबांचे 'सॉफ्ट टार्गेट' अर्थातच ग्रामीण भागात राहणारा भोळा शेतकरीच असतो. त्यामुळेच शहरांच्या तुलनेत खेड्यापाड्यात सप्ताह, कथा, प्रवचनांची रेलचेल दिसून येते. वर म्हटल्याप्रमाणे आपल्या प्रवचनासाठी हजारो, लाखो रुपये घेणारे हे महाराज लोक इतके पैसे घेऊनही योग्य मार्गदर्शन करीत नाहीत. कर्म हीच खरी पूजा आहे, कर्म हीच खरी भक्ती आहे, हे त्यांनी सांगायला हवे; परंतु ते हे कधीच सांगत नाहीत. त्यांनी असे सांगितले तर त्यांचाच धंदा बंद व्हायचा. गाडगेबाबांनी आणि तुकडोजी महाराजांनी हेच सांगितले होते, ते होते खरे मार्गदर्शक, परंतु दुर्दैवाने त्यांच्याच कर्मभूमीत, विदर्भ-मराठवाड्यात बुवा, बाबांचे इतके पीक फोफावले आहे, की या भूमीत गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांसारखे  प्रखर बुद्धिवादी संत होऊन गेले, हे सांगण्याचीही लाज वाटते. सप्ताह, यात्रा, वाऱ्या यांतून शेवटी हाती काहीच लागत नाही, वेळ आणि पैसा मात्र वाया जातो. तितकाच वेळ आणि पैसा शेतीत गुंतविला तर किमान काही तरी हाती लागेल. शेतकऱ्यांनी याचा थोडा विचार करायला हवा.
अति दैववादी असणे हा एक आपल्याला लागलेला शापच आहे. सगळे काही देवाच्या भरोशावर सोडून चालत नाही. देव असेलच तर तो याच माणसात आहे, याच मातीत आहे, कष्टात आहे, कर्मात आहे. कोणताही देव हातचे काम सोडून टाळ कुटायला आणि पायदळ वारी करायला सांगत नाही. भक्त पुंडलिकाचे उदाहरण या संदर्भात पुरेसे बोलके आहे. साक्षात पाडुंरंग समोर येऊन उभा ठाकल्यावरही आपल्या आई-वडिलांच्या सेवेत खंड न पडू देणाऱ्या, पांडुरंगालाच थोडा वेळ प्रतीक्षा करण्यास सांगणाऱ्या पुंडलिकाचा आदर्श सगळ्यांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी समोर ठेवायला हवा. शेतकऱ्यांनी आता अधिक बुद्धिनिष्ठ, तार्किक व्हायला हवे. हा मोबाईल, लॅपटॉपचा जमाना आहे. संवादाच्या आणि ज्ञानार्जनाच्या या आधुनिक साधनांचा वापर करायला शेतकऱ्यांनी शिकायला हवे. सवड मिळताच या साधनांच्या साहाय्याने जगात कुठे काय चालले आहे, जागतिक बाजारपेठ काय म्हणते, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान कसे आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. इंटरनेट म्हणजे माहितीचे मायाजाळच आहे, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे अर्थात मोक्ष कसा मिळेल हा प्रश्न सोडून, इतर सगळ्या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला इंटरनेटच्या माध्यमातून मिळू शकतात. शेतकऱ्यांनी त्यासाठी वेळ द्यावा. आपल्या घरातील बाया मंडळींच्या हातात ज्ञानवर्धक पुस्तके द्यावीत, त्यांनाही मोबाईल, संगणक हाताळण्यास शिकवावे. शेतात कष्ट आणि घरात ज्ञानोपासना याच दोन मार्गांनी शेतकरी आपले भले करून घेऊ शकतो, देव त्यांच्या मदतीला धावेल तो याच माध्यमातून. शेतकऱ्यांनी ज्ञानोपासक व्हावे याचा अर्थ त्याने वस्तुनिष्ठ विचार करायला शिकावे असाच होतो. देवाची भक्ती करायला कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु अगदी मिनिटभर हात जोडून मनोभावे नमस्कार केला तरी पुरेसे आहे, त्यासाठी यात्रा, वाऱ्या, पारायणे वगैरे करण्याची गरज नाही. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती चारी साधियेल्या' असे संत मंडळींनी सांगून ठेवले आहेच. हातातले काम सोडून देवाच्या मागे धावण्याने हाती काहीच लागणार नाही, उलट हातचे निघून जाण्याचीच शक्यता अधिक असते. हे विज्ञानयुग आहे, हे माहिती- तंत्रज्ञानाचे युग आहे, इथे बुद्धी आणि तर्काच्या जोरावरच पुढे जाता येते. ही बुद्धी केवळ धार्मिक गोष्टींची चिकित्सा करण्यापुरतीच मर्यादित ठेवण्याची गरज नाही. आपल्या आजूबाजूला काय घडत आहे किंवा बिघडत आहे, याचाही सापेक्ष विचार करायला हवा. जातीपातीच्या भांडणाने कुणाचेही भले होत नाही, भले होत असेल तर ते राजकारण्यांचे, हेदेखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला हवे. कोर्ट-कचेऱ्यांत किंवा सरकारी भीक मिळविण्यात आपला वेळ घालवायचा की तोच वेळ शेतात सार्थकी लावायचा, हे शेतकऱ्यांनी ठरवावे. शेती आहे किंवा अर्थार्जनाचे इतर उद्योग आहेत त्यासाठी पुरेसा वेळ द्यायचा आणि उरलेला वेळ आपल्या घरच्या लोकांसाठी द्यायचा, हे सूत्र सगळ्यांनीच लक्षात ठेवायला हवे. देशासाठी, समाजासाठी वेगळे काही करण्याची गरज नाही, तुम्ही तुमचे काम प्रामाणिकपणे केले तरी त्यातून देशाचे आणि समाजाचे भले होणारच आहे.
पैशाचे नियोजन हादेखील खूप महत्त्वाचा विषय आहे. पैसा कुठे आणि किती खर्च करावा, याचे भान शेतकऱ्यांनी बाळगायलाच हवे. मुगावर देऊ, तुरीवर देऊ असे करीत उधारी, कर्ज वाढविण्याची गरज नाही, हाती असेल त्याच पैशात शेतीचे नियोजन करावे. उद्या तुरीने, मुगाने दगा दिलाच तर कुठून पैसा उभा करणार? अंथरूण पाहून हातपाय पसरा, उगाच मोठेपणाचा आव आणून दानधर्म करण्यात अर्थ नाही. आता पैसा देव, धर्म, मंदिरासाठी नाही, तर आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, आरोग्यासाठी खर्च करावा, कमी खर्चाच्या सेंद्रीय शेतीची कास धरून उरलेला पैसा राखून ठेवावा. घरची लक्ष्मी आनंदात कशी राहील याची काळजी करावी, घरची लक्ष्मी आनंदात असेल तरच घरात सुबत्ता नांदेल. व्यसनांपासून कटाक्षाने चार हात लांब राहावे. अधिकाधिक वेळ स्वत:ला कामात गुंतवून घेतले, की अशा गोष्टींकडे लक्षच जात नाही. उगाच चावडीवर चकाट्या पिटत बसण्यापेक्षा तेवढ्याच वेळात एखादे चांगले पुस्तक वाचता येईल. वाचनाने मन आणि बुद्धी दोन्ही समृद्ध होतात. विनाकारणचे वाद टाळा आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे आपला वेळ आणि पैसा सत्कारणी लावा.  प्रामाणिकपणे कष्ट करून मिळालेला पैसा आंतरिक समाधान देऊन जातो.
 सांगायचे तात्पर्य, सत्ता कुठल्याही पक्षाची असो, ती शेतकऱ्यांचे भले करू शकत नाही हे स्पष्ट झाले आहे, कारण ती लबाडा घरची आवतने ठरली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता बुद्धिवादी, कर्मवादी बनावे. राजकारण आणि राजकारण्यांपासून चार हात लांबच राहावे, आपली शेती, आपला उद्योग, आपला धंदा आणि यातून चार पैसे कसे वाचतील याची हिकमत अवगत करावी, आणि तोच माल उत्पादित करावा ज्याची बाजारात मागणी आहे. त्यावर थोडी प्रक्रिया आणि पॅकिंग करून त्यापासून जास्त पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न करावा. सप्ताह, पारायणे, कथा, किर्तने हे निव्वळ वेळ वाया घालविण्याचे उद्योग आहेत. त्या बुवा-बाबांच्या कमाईचा तो भाग आहे, त्यांचे खिसे आणि पोट भरण्यापेक्षा आपल्या मुलाबाळांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वेळ आणि पैसा सार्थकी लावा. शेवटी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य तुमच्या कष्टावरच अवलंबून आहे, कोणताही देव आणि कोणतेही सरकार तुमच्या मदतीला धावून येणार नाही. तसे कधी वाटत असेल तरी तो एक भास आहे, हे समजून घ्या. त्या भासातून, भ्रमातून लवकरात लवकर बाहेर पडून आपल्या मनगटाच्या जोरावर आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करा. एका अपयशाने मुळीच खचून जाऊ नका. एडिसनला विजेच्या बल्बचा शोध हजार प्रयत्नानंतर लागला होता. एकदोन वेळा अपयश आले म्हणून त्याने प्रयत्नच सोडला असता, तर कदाचित आज सगळे जग अंधारात राहिले असते. अशा लोकांची चरित्रे वाचा, त्यातून स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, परिस्थितीवर मात करण्याची जिद्द त्यातून निर्माण होते. लाख प्रवचनांपेक्षा असे एखादे पुस्तक खूप अधिक परिणामकारक ठरू शकते. कर्मयोगी व्हा, त्यातूनच तुमचे कल्याण होऊ शकते. सप्ताह लावायचाच असेल, तर पहिला दिवस शेतीचे नवीन तंत्रज्ञान आणि पैसा कसा वाचेल म्हणजेच जैविक शेती कशी करावी, याचे प्रशिक्षण, दुसरा दिवस शेतीमालावर प्रक्रिया आणि मूल्यसंवर्धन, तिसरा दिवस माती आणि तिचे आरोग्य, चौथा दिवस शेतकऱ्यांना मदत करणारे गाय, साप, कीटक यांची ओळख आणि उपयोग, पाचवा दिवस शेतकऱ्यांना छळणारे आणि शेतकऱ्यांच्या बाजूचे कायदे, सहावा दिवस सरकारी योजना आणि त्यातील फोलपणा, सातवा दिवस शेतीचा हिशोब, उत्पादन खर्च, विमा योजना, अटी आणि नियम यांवर मार्गदर्शन असा सप्ताह ठेवा, आणि त्याकरिता लागणारे तज्ज्ञ वक्ते (म्हणजेच प्रवचनकार) देण्याची जबाबदारी माझी. त्याकरिता संपर्कात राहा मी तुमच्या सोबत आहे!

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

प्रहार,रविवार, दि. 28 जून 2015 सरकार कुणाचे, दारुड्यांचे की शेतकऱ्यांचे?