प्रहार रविवार, दि.11 मार्च 2018 मोदी सरकारची चांगली सुरूवात...! भौतिक विकासाची गती वाढविणे आपल्या हाती आहे आणि त्यात सरकारची भूमिका खूप महत्त्वाची असते. शेवटी देशातील साठ टक्के वर्ग विकासापासून वंचित राहत असेल तर देश प्रगत होऊच शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाची काळजी सरकारला प्राधान्याने घ्यावीच लागेल. तरच देश प्रगतिपथावर जाईल अन्यथा शेतकरी आत्महत्या करतच राहतील. आज मोदी सरकारने सध्या तरी घोषणांच्या माध्यमातून का होईना, तशी तयारी दर्शविली आहे. उद्या त्यांचे सरकार पुन्हा आले अथवा इतर कोणत्या पक्षाचे सरकार आले तरी ही प्रक्रिया थांबणार नाही, याची दक्षता घेतली जावी, हीच अपेक्षा आहे! विकास हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. अगदी सुरुवातीला एका अणुरूपात बंदिस्त असलेल्या सृष्टीचा महास्फोटानंतर निरंतर विकास होत गेला, आकाशगंगा, सूर्यमाला निर्माण झाल्या, त्यानंतर पृथ्वी आणि कदाचित पृथ्वीसारख्या इतर ग्रहांवर जीवसृष्टी विकसित झाली, त्यातही आधी पाण्यात जीवसृष्टी जन्माला आली नंतर जमिनीवरचे जीव निर्माण झाले, हा सगळा विकासक्रम विज्ञान आपल्याला सांगतच असतो. अगदी आजचा मानवदे...