प्रहार रविवार, दि.१६ जून २०१९ सर्व उपद्व्याप शहरी मतदारांसाठीच...! (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) हे समजणे जरुरी आहे, की सरकारच्या योजना या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कधीच तयार केल्या जात नाहीत, तर त्या शहरी भागातील मतदारांना डोळ्यासमोर ठेवून आखल्या जात असतात, कारण सरकारला महागाई आणि ती सुद्धा फक्त खाण्या- पिण्याच्या वस्तुंची महागाई वाढू द्यायची नसते आणि त्याकरिता सरकार वाट्टेल ते उपाय योजत असते. यालाच महागाई कृत्रिमरीत्या नियंत्रणात ठेवणे असे म्हणतात. आपला देश जरी कृषिप्रधान आहे, आणि आपली अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर आधारित आहे, असे बोलले जाते, अर्थात त्यात तथ्य नक्कीच आहे. आपल्या देशातील एक मोठा वर्ग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्राशी निगडीत आहे. याचा अर्थ या वर्गाची आर्थिक स्थिती आणि कृषी क्षेत्राचा विकास याचा थेट संबंध आहे. या पृष्ठभूमीवर विचार केला तर आपला देश अजूनही गरीब का आहे किंवा अजूनही भारत हे विकसनशील राष्ट्र का आहे, या प्रश्नाचे उत्तर कृषी क्षेत्राकडे सरकारचे झालेले अक्षम्य दुर्ल...