`शिवाजी'चा वाळवीने पोखरलेला वटवृक्ष पुन्हा डौलदार होईल का?

 प्रहार  रविवार, दि. 17 सप्टेंबर  2017

`शिवाजी'चा वाळवीने पोखरलेला वटवृक्ष पुन्हा डौलदार होईल का?

जोपर्यंत  शिवाजी शिक्षण संस्था निस्वार्थी लोकांच्या ताब्यात होती तोपर्यंत संस्थेचे वैभव टिकून होते, मात्र वसंतराव धोत्रेंच्याच शब्दात सांगायचे तर `वाणी संतांची आणि करणी सैतानाची' असा अनुभव अॅड. शेळकेंच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेकांना आला. अशा माणसांच्या हाती संस्था राहिली तर संस्थेचा वटवृक्ष कोसळायला वेळ लागणार नाही, याची जाणीव उशिराने का होईना सभासदांना झाली. भाऊसाहेबांच्या स्वप्नांचा हा इमला तसाच कायम ठेवायचा असेल, त्याचे वैभव वाढवायचे असेल तर या भव्य इमारतीला मुळापासून पोखरणारी वाळवी नष्ट करावीच लागेल आणि  संस्थेचा कारभार पुन्हा सक्षम हातांकडे सुपूर्द करावा लागेल, याचे भान वेळीच आल्याने अगदी मोक्याच्या वेळी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सभासद पुढे सरसावले...
   एखादे कोणतेही मोेठे काम उभारायला अनेकांना आपल्या आयुष्याचा यज्ञकुंड करावा लागतो. अनेकांच्या त्यागातून मोठे काम उभे राहत असते, परंतु तेच काम नेस्तनाबूद करायला सामान्य कुवतीच्या धनलोभी आणि स्वार्थी लोकांना क्षणाचाही वेळ लागत नाही. उभारणे केव्हाही कठीणच असते, मोडणे त्या तुलनेत खूप सोपे असते. एकदा का ती इमारत, ती उभारणी मोडकळीस लागली की तिची परत उभारणी जवळपास अशक्यप्राय ठरते. हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्याला ठायीठायी दिसतात. अशाच अनेक उदाहरणांत अजून एका उदाहरणाची भर शिवाजी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पडू पाहत होती, परंतु भाऊसाहेबांचा वारसा जपण्याची धडपड करणाऱ्या काही मोजक्या लोकांनी या संस्थेचा ऱ्हास होऊ देणार नाही अशी खूणगाठ बांधली आणि ही संस्था पुन्हा वैभवाला नेण्यासाठी त्यांनी धडपड सुरू केली. खरे तर अशी धडपड करावी लागणे हेच मुळी दुर्दैव म्हणावे लागेल. ज्या समाजातून आपण आलो आहोत त्या बहुजन समाजात शिक्षणाची जी परवड सुरू आहे, केवळ संधी अभावी आणि आर्थिक दुरावस्थेमुळे गुणवत्ता असूनही हा समाज शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून भाऊसाहेबांनी शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊसाहेब पंजाबरावांनी आणि त्यानंतर त्यांचे तितकेच समर्थ वारसदार या संस्थेचे कारभारी होते तोपर्यंत या संस्थेची भरभराट होत होती. रयत शिक्षण संस्थेपाठोपाठ राज्यातील सगळ्यात मोठी शिक्षण संस्था म्हणून शिवाजी शिक्षण संस्था नावलौकिकास आली. शिवपरिवाराचे सदस्य होणे लोकांसाठी भूषणावह होते. भाऊसाहेबांनंतर घारफळकर, इंगोले यांनी समर्थपणे संस्थेची धुरा सांभाळली. त्यानंतरचे अध्यक्ष काळमेघ यांनीही संस्थेचे वैभव जीवापाड जपले. हे सगळेच लोक संस्थेचे कार्य समाजऋणातून मुक्त होण्याची संधी म्हणून करीत होते. त्या काळी अशा कोणत्याही संस्थेचे काम म्हणजे घरचे खाऊन लष्कराच्या भाकरी थापण्यासारखे होते. वैयिक्तक स्वार्थाचा विचारही कुणाच्या मनात शिवला नव्हता. प्रसंगी संस्थेच्या हितासाठी चार लोकांसोबत वाईटपणा घेण्याचीही या लोकांची तयारी असायची. काळमेघ यांची ख्याती तर तरुण भारताने अग्रलेखात लिहिल्याप्रमाणे `फाटक्या तोंडाचा माणूस' अशीच होती. माणूस फाटक्या तोंडाचा तेव्हाच असू शकतो, जेव्हा त्याला कोणताही स्वार्थ साधायचा नसतो. फटकळ बोलणारी माणसे लोकांना आवडत नाही, हे खरे असले तरी हीच माणसे विश्वासपात्र असतात. त्यांचे अंतकरण पारदर्शक असते. आत एक आणि बाहेर एक असा काही मामला नसतो. स्वार्थाचा विचारही मनात येत नसल्यामुळे कुणी काय म्हणेल, कुणी दुखावणार तर नाही, असा विचार ते करत नाहीत. काळमेघ यांच्यानंतर मधला काही काळ वगळला तर वसंतराव धोत्रेंनी शिवाजी शिक्षण संस्थेची धुरा सांभाळली. तेदेखील त्याच पठडीतले होते. त्यांच्या फटकळ स्वभावाची सगळ्यांनाच ओळख होती, परंतु वर म्हटल्याप्रमाणे निस्वार्थी माणसेच फटकळ असू शकतात, त्यामुळे शिवपरिवाराने वसंतराव धोत्रेंवर विश्वास व्यक्त करीत त्यांच्याकडे सलग दहा वर्षे संस्थेची धुरा सोपविली. शिवाजी संस्थेचा जवळपास 275 शाळा, कॉलेजेसचा एकूण पसारा, आर्थिक उलाढाल, त्यातून मिळणारी प्रतिष्ठा, प्रतिष्ठेतून साधता येणारे राजकारण याचे आकर्षण अॅड. शेळकेंसारख्या काही लोकांच्या मनात निर्माण झाले आणि त्यांनी ही संस्था ताब्यात घेण्यासाठी नैतिक-अनैतिक अशा सगळ्याच मार्गांचा वापर सुरू केला. खरे पाहता त्यांचा हा प्रयत्न वा.मो. काळमेघांच्या काळापासुनच सुरू होता, मात्र काळमेघ खमके निघाले आणि जाताजाता त्यांनी कारभार वसंंतराव धोत्रेंच्या खांद्यावर टाकून त्यांचे मनसुबे उधळून लावले होते. मात्र वसंतराव धोत्रेंच्या कडक स्वभावामुळे दुर्दैवाने शेळकेंच्या  या प्रयत्नांना दहा वर्षांनंतर यश आले आणि शिवाजी शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाला वाळवी लागायला सुरुवात झाली. वसंतराव धोत्रे यांच्या नंतर अॅड. अरूण शेळके या संस्थेचे अध्यक्ष झाले आणि संस्थेचा आलेख उतरू लागला. अध्यक्ष म्हणून असलेल्या, नसलेल्या अधिकारांचा वापर करून त्यांनी अनेक गैरप्रकार केले. संस्थेत कर्मचाऱ्यांची भरती करताना सभासदांच्या सक्षम नातेवाईकांना प्राधान्य देणे अपेक्षित असते, परंतु त्यामध्ये अर्थकारण करता येत नाही आणि केले तर वार्ता कर्णोपकर्णी होेते म्हणून तसे करता इतरांची भरती करण्यात आली. मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या जागा भरतानाही हीच पध्दत वापरण्यात आली. त्यात काय घोटाळे झाले असतील, याच्या सुरस आणि अर्थपूर्ण कथा नुसत्याच बाहेर आल्या नाहीत तर त्या अगदी बंगलोरपर्यंत पोहोचल्या आहेत. आपल्या अधिकारांचा वापर करून आपल्याला हवी ती माणसे हव्या त्या जागेवर नेमण्याचा सपाटाच  अर्थपूर्ण कारणांनी शेळकेंनी लावला. कालपर्यंत राजकारणाच्या दलदलीपासून अलिप्त असलेल्या या संस्थेला राजकारणाचा आखाडा बनविण्याचा खटाटोप त्यांनीच केला. शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष शिक्षक आमदारकीसाठी उभा राहतो, हे पहिल्यांदाच घडले. खरे तर आमदारकीपेक्षाही शिवाजी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हे अधिक मानाचे, प्रतिष्ठेचे पद आहे. त्या पदावरच्या व्यक्तीने आमदारकीसाठी उभे राहणे आणि त्याकरिता संस्थेच्या कर्मचाऱ्यांकडून लाखो, करोडोंचा निधी जमा करून मिंधे होणे म्हणजे त्या पदाचे अवमूल्यनच म्हणावे लागेल; परंतु संस्थेत कार्यरत असलेले शिक्षक आणि कर्मचारी आपले बटीक आहेत आणि त्यांच्या जोरावर आपण आमदारकी खेचून आणू शकतो, या राजकीय महत्त्वाकांक्षेने केवळ त्यांचाच घात झाला नाही तर संस्थेचीही प्रचंड बदनामी झाली. एकेकाळी आमदार, खासदार निवडून आणण्याची क्षमता बाळगणारे हे पद स्वत: आमदारकीच्या आखाड्यात उतरले आणि परास्त झाले. त्यांचा हा राजकीय स्वार्थ शिक्षक मतदारांना रूचला नाही, आणि त्यांनी त्यांना पाडून त्यांची जागा त्यांना दाखविली मात्र त्यांच्यामुळे वसंतराव खोटरेंसारखा सक्षम उमेदवार या निवडणुकीत पराभूत झाला. वर म्हटल्याप्रमाणे जोपर्यंत ही संस्था निस्वार्थी लोकांच्या ताब्यात होती तोपर्यंत संस्थेचे वैभव टिकून होते, मात्र वसंतराव धोत्रेंच्याच शब्दात सांगायचे तर `वाणी संतांची आणि करणी सैतानाची' असा अनुभव अॅड. शेळकेंच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात अनेकांना आला. अशा माणसांच्या हाती संस्था राहिली तर संस्थेचा वटवृक्ष कोसळायला वेळ लागणार नाही, याची जाणीव उशिराने का होईना सभासदांना झाली. भाऊसाहेबांच्या स्वप्नांचा हा इमला तसाच कायम ठेवायचा असेल, त्याचे वैभव वाढवायचे असेल तर या भव्य इमारतीला मुळापासून पोखरणारी वाळवी नष्ट करावीच लागेल आणि  संस्थेचा कारभार पुन्हा सक्षम हातांकडे सुपूर्द करावा लागेल, याचे भान वेळीच आल्याने अगदी मोक्याच्या वेळी परिवर्तन घडवून आणण्यासाठी सभासद पुढे सरसावले. न्यायालयाचे आदेश धुडकावून किंवा त्या आदेशाचा सोईस्कर अर्थ लावून अध्यक्ष शेळके व्यतिरिक्त उर्वरीत कार्यकारिणी न्यायालयीन आदेशाने बरखास्त झाल्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून एककल्ली कारभार करणाऱ्या अरूण शेळकेंना त्यांची जागा दाखवून देण्याची ही संधीच होती.
 प्रश्न कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचा नाही, प्रश्न प्रवृत्तीचा आहे. राजकारणाने दुषित झालेली, भ्रष्टाचाराने बरबटलेली, हुकूमशाही थाटात कारभार करणारी प्रवृत्ती शिवाजी शिक्षण संस्थेला विळखा घालून बसली होती, हा विळखा दूर होत नाही तोपर्यंत ही संस्था पुन्हा वैभवाला नेण्याचे स्वप्न साकार होणार नव्हते. गेल्या दहा वर्षांत या प्रवृत्तीने संस्थेची किती बदनामी केली, संस्था कशी रसातळाला नेली याचे विश्लेषण दै.देशोन्नतीने एका मालिकेद्वारे केली होते. बहुजन समाजातल्या मुलांना शिक्षणाच्या माध्यमातून सशक्त, समृद्ध आणि सुदृढ करण्याचा वसा या शिक्षण संस्थेने घेतला होता. वसंतराव धोत्रेंच्या कारकिर्दीपर्यंत संस्था आपला हा लष्कराच्या भाकरी भाजण्याचा वसा प्राणपणाने जपून होती, परंतु अॅड. शेळकेंच्या कार्यकाळात पुढे सगळेच काही भरकटत गेले. संस्थेच्या वैभवाला उतरती कळा लागली. खूप गोड बोलणारी, अतिनम्रता दाखवणारी, पाया पडणारी, अति स्तुती करणारी, अतिआदर-सत्कार करणारी, माणसं अत्यंत धोकादायक, दांभिक, आतल्या गाठीची, लबाड, बेरकी, संधीसाधू विश्वासघातकी असतात. तुमच्याच खांद्यावर हात ठेवून तुम्हालाच खांदा देण्याचे षड्यंत्र ती रचत असतात. याचा अनुभव सदस्यांना आला. याउलट, जी माणसं तोंडावर स्पष्ट, कणखर, टीकात्मक, फटकळ बोलतात त्यांचे अंतर्मन वरच्या प्रवृत्तीपेक्षा नक्कीच चांगली असतात. विश्वासघात करणं, फसवणं त्यांच्या रक्तातच नसतं. ती खरंच मनमोकळी विश्वासू असतात...! याची जाणीव थोडी उशिरा झाल्यामुळे गोड बोलणाऱ्या माणसांनी कधी केसाने गळा कापला हे कळलेच नाही. अर्थात खूप उशीर झाला होता असे नाही, परंतु उशिराने का होईना शहाणपण येणे महत्त्वाचे असते. 65 ते 90 वर्षांच्या आजीवन सभासदांना तसे शहाणपण आले, ही सौभाग्याचीच बाब म्हणावी लागेल. यापुढे शिवाजी शिक्षण संस्था भाऊसाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी हर्षवर्धन देशमुखांच्या नेतृत्वात पुन्हा नव्या जोमाने उभारी घ्यायला सज्ज झाली आहे; मात्र आजीवन सभासदांनी यापुढे आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.


Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

प्रहार,रविवार, दि. 28 जून 2015 सरकार कुणाचे, दारुड्यांचे की शेतकऱ्यांचे?