प्रहार रविवार, दि.२६ मे २०१९ शेतकऱ्यांना `न्याय' कोण देणार...? (लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती) कर्जमाफी हा प्रकार आर्थिकदृष्ट्या, तात्त्विकदृष्ट्या चुकीचा असेल तर तो सगळ्यांच्याच बाबतीत चुकीचा असायला हवा. उद्योगांची हजारो कोटींची कर्जे पडद्याआड माफ करायची आणि शेतकऱ्यांना मात्र मोठ्या दातृत्वाचा आव आणीत काही हजारांची कर्जमाफी द्यायची, हा सरकारचा दोगलेपणा नाही का? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर ओरड करणाऱ्यांनी सरकारला याचा जाब विचारावा. आधी उद्योगपतींना कर्जमाफी देणे बंद करावे, शेतकऱ्यांकडून ज्या दंडेलीने कर्जवसुली केली जाते तशी ती उद्योगांकडून करावी, सगळ्यांना समान न्याय द्यावा आणि हे शक्य नसेल तर सरकारने आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात ओरडणाऱ्यांनी आपली तोंडे बंद करावीत. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा कायम चर्चेचा विषय राहिला आहे. अलीकडील काळात तर राजकीय पक्षांसाठी जणू काही हे एक चलनी नाणे झाले आहे. निवडणुका जवळ आल्या किंवा सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रोश वाढला, की हमखास उपयोगी पडणारे ब्रह्मास्त्र म्हणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा व...