'प्रहार' - रविवार, दि.५ मे २०१९
'वाट','वाटसरू' आणि 'वाटाडे'!
(लेखक : प्रकाश पोहरे - मुख्य संपादक, दै. देशोन्नती)
पत्रकार युवराज नायर यांनी 'DDC youtube channel'करिता `देशोन्नती'चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांची 'बुद्ध धम्म'संदर्भात एक विस्तृत मुलाखत घेऊन ती सोशल मीडियावर व्हायरल केली. तिला उदंड प्रतिसाद मिळाला. संपादक प्रकाश पोहरे यांचे अनेकांनी अभिनंदन केले, तर काहींच्या भुवया वर गेल्या. या विषयावर पोहरेंनी दिनांक ११-१०-२००० या दिवशी लिहिलेला 'प्रहार' आम्ही वाचकांच्या माहितीकरिता पुनर्मुद्रित करीत आहोत. तो वाचून आज १८ वर्षांपूर्वीसुद्धा पोहरे यांची भूमिका आणि विचार किती स्पष्ट होते याची वाचकांना कल्पना येईल.- पुरवणी संयोजक
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन पक्षाचे जे अनेक भाग झाले आहेत त्यापैकी दोन भागांचे शक्तीप्रदर्शन विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी अकोल्यात पार पडले. शक्तीप्रदर्शनापूर्वी उभय गटातील वाद एवढा विकोपास गेला होता, की संघर्षाची ठिणगी पडते की काय, असे वाटायला लागले होते. सुदैवाने ती परिस्थिती टळली; मात्र हे शक्ती प्रदर्शन रिपब्लिकन नेत्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह लावणारे ठरले, यात वाद नाही.
रिपब्लिकन नेते ऊठसूट भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकराचे नांव घेत असतात; मात्र या नेत्यांनी त्या महान आत्म्यांची शिकवणूक कितपत आचरणात आणली याचा त्यांच्या अनुयायांनीदेखील अंतर्मुख होऊन विचार केला, तर त्यांची मान आपसुकच नकारात्मक अर्थाने हलू लागेल, याची आम्हाला खात्री आहे.
हिंदू धर्मातील अनिष्ट प्रथांमुळे त्याच धर्मातील विशिष्ट घटकांवर युगानुयुगे जो अन्याय झाला तो अन्याय हिंदू धर्मात राहून दूर होऊ शकत नाही याची खात्री पटल्यामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह भगवान गौतम बुध्दांनी पुनर्स्थापित केलेला आणि दया, शांती, करुणेद्वारा निर्वाणाचा मार्ग दाखविणारा बुध्द धम्म स्वीकारला; परंतु आपणच कसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सच्चे अनुयायी आहोत हे उच्चरवाने सांगत घसा कोरडा करून घेणाऱ्या त्यांच्या तथाकथित अनुयायांनीच डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या भगवान बुध्दाच्या धम्माचे तुकडे केले आहेत.
स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी धम्म वापरण्याचा प्रयोग काही रिपब्लिकन नेत्यांनी सुरू केला. केवळ भगवान गौतम बुध्द व डॉ. आंबेडकरांवरील प्रेमापोटी, निष्ठेपोटी जे लाखो आंबेडकरी या नेत्यांनी हाक देताबरोबर उपाशीपोटी, वाट्टेल त्या हालअपेष्टा सहन करीत धावून येतात त्यांच्या प्रेमाचा, निष्ठेचा या नेत्यांनी व्यापार सुरू केला. समान महत्त्वाकांक्षा असलेले चार लोक एकत्र आले, तर त्यांचे फार दिवस पटणे शक्य नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आंबेडकरी जनतेच्या प्रेमाची शिडी वापरून झटपट वर जाण्याची अनेक रिपब्लिकन नेत्यांना घाई झाली. त्यातूनच सुरू झाली एकमेकांचे पाय ओढण्याची स्पर्धा आणि त्याचा अंतिम परिपाक जो होणार होता तोच झाला. रिपब्लिकन पक्षाची शकले उडाली. एकदा नव्हे अनेकदा उडाली. या नादान नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शेवटी आंबेडकरी जनतेनेच रेटा लावला. त्यांना एका व्यासपीठावर येऊन रिपब्लिकन पक्षाच्या एकत्रीकरणाची घोषणा करणे भाग पडले; मात्र एकत्र नांदल्यास आपली प्रत्येकाचीच `दुकानदारी' चालू शकणार नाही, हे सत्य उमगलेल्या काही नेत्यांनी लवकरच आपापले वेगळे `दुकान' थाटले. आतापर्यंत या दुकानदारांनी आपली कार्यक्षेत्रे आखून घेतली होती आणि सहसा दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात तोंड खूपसायचे नाही, असा अलिखित दंडक घालून घेतला होता; मात्र खासदार रामदास आठवले यांच्या गटाने प्रथमच खासदार प्रकाश आंबेडकरांच्या बालेकिल्ल्यात हातपाय पसरविण्याचा प्रयत्न केला आणि युध्दाला तोंड फुटले.
अकोल्यात विजयादशमीच्या दुसऱ्या दिवशी उभय गटांचे धम्मचक्र प्रवर्तन दिन कार्यक्रमाच्या नावाखाली जे काही कार्यक्रम झाले त्याचा भगवान गौतम बुध्दांशी, त्यांच्या धम्माशी, पंचशीलाशी, धम्माच्या शिकवणुकीशी काडीचाही संबंध नव्हता हे कुठलाही सच्चा धम्मसेवक कबूल करेल. तिथे जे काही झाले ते केवळ राजकीय शक्तीप्रदर्शन होते. राजकीय दुकानदारी होती. दोन्ही कार्यक्रमांमध्ये ज्या प्रकारची भाषणे झाली ती भाषणेच त्या कार्यक्रमाचे खरे स्वरूप उघड करण्यासाठी पुरेशी आहेत. अर्थात नेतेमंडळी आणि त्यांचा कंपू हे कधीच मान्य करणार नाही. कारण आंबेडकरी जनतेची 'धम्म', 'पंचशीला'च्या नावाखाली दिशाभूल करणे आणि आपली राजकीय पोळी शेकून घेणे हेच या मंडळीच्या आयुष्याचे इतिकर्तव्य आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या लोकांप्रतिच्या तळमळीपोटी आपल्या जीवनाचा यज्ञ केला त्या लोकांशी या मंडळीना काही घेणेदेणे नाही. यांना खासदारकी, आमदारकी मिळाली किंवा सत्तेेचा तुकडा चघळायला मिळाला की, समस्त दलित बांधवांवर युगानुयुगे जो अन्याय झाला त्याचे परिमार्जन झाले, असे समजणारी ही मंडळी आहेत. गप्पा आपल्या समाजाच्या उत्थानाच्या मारायच्या आणि प्रत्यक्षात हा समाज अज्ञानी, अशिक्षित, मागासलेलाच कसा राहील याची काळजी घ्यायची, ही या मंडळीची कार्यप्रणाली आहे. कारण समाज सुशिक्षित झाला, पुढारला तर आपले पितळ उघडे पडेल आणि त्याचबरोबर आपली दुकानदारी संपुष्टात येईल, याची भीती त्यांना वाटते. तसे नसते तर इतर सर्व बाबतीत डॉ. आंबेडकरांचा शब्द प्रमाण मानणाऱ्या किंवा तसे दर्शविणाऱ्यांनी दलितांसाठी केवळ १० वर्षे आरक्षण ठेवण्याच्या डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेची कदर करीत यापुढे आम्हाला आरक्षणाची कुबडी नको, असे ठणकावून सांगितले असते. साधी गोष्ट आहे, अपघातात पाय मोडलेल्या व्यक्तीला डॉक्टर शस्त्रक्रियेनंतरचे काही दिवस कुबड्या वापरण्यास सांगतात; मात्र काही दिवसांनी ते रुग्णाला कुबड्या फेकून देऊन स्वत:च्या पायावर उभे राहण्यास सांगतात. प्रारंभी रुग्ण धडपडतो; मात्र लवकरच त्याचा आत्मविश्वास जागृत होतो आणि तो चालायलाच नव्हे, तर चक्क धावायला लागतो. याउलट डॉक्टरांनी जर त्याला कुबड्या फेकून देण्यास सांगितले नाही, तर तो जन्मभरासाठी कुबड्यांचा आश्रित होऊन जाईल. त्याचा आत्मविश्वास कधीच जागृत होणार नाही आणि आत्मविश्वास हरवलेली व्यक्ती किंवा समाज कधीच जगाशी स्पर्धा करू शकत नाही. ती व्यक्ती किंवा तो समाज सतत कुणाचातरी आश्रय शोधत असतो. रिपब्लिकन नेत्यांना नेमके तेच हवे आहे. आंबेडकरी जनतेचा आत्मविश्वास जागृत झाला आणि ती जगाशी स्पर्धा करू लागली, तर तिला आपल्या आधाराची गरज भासणार नाही आणि मग आपल्या 'दुकानदारी'चे काय, हा प्रश्न त्यांना सतत भेडसावीत असतो. त्यामुळेच आरक्षण हटविण्याचा मुद्दा उपस्थित झाला, की ते आभाळ कोसळल्यागत ओरडत असतात. कारण दलितांनी सदैव आरक्षणाच्या कुबड्या घेऊन जगावे आणि आधारासाठी आपल्याकडे बघावे, ही त्यांची इच्छा असते, दुर्दैवाने आंबेडकरी जनताही या नेत्यांच्या भूलभुलैयातून बाहेर पडण्यास तयार नाही, हे कटू सत्य आहे.
वास्तविक खरा धम्म म्हणजे काय, हे यापैकी किती नेत्यांनी उमगलेले आहे. खोटे बोलू नका, चोरी करू नका, निर्व्यसनी राहा, व्यभिचार करू नका, हिंसा करू नका, या पंचशीलांपैकी किती शीलांचे पालन यापैकी किती नेते करतात? खरा धम्म समजून घ्यायचा असेल, तर विपश्यना करावी लागते. दहा-दहा दिवस, महिना-महिना साधना करावी लागते, मौन पाळावे लागते. रिपब्लिकन नेत्यांपैकी कुणी विपश्यना केली असेल किंवा केली असेल, तर तिच्यामध्ये चित्त ओतून ती केली असेल, असे मला वाटत नाही. अन्यथा आज ते ज्या मार्गाने अनुयायांना नेत आहेत त्या मार्गावर ते गेलेच नसते. या नेत्यांपैकी रा.सु. गवई हे नुकतेच ६ ते १७ सप्टेंबरच्या शिबिरात शिबीरार्थी होते. सौ. कमलाताई रा. गवई यांनी तर आचार्यपद प्राप्त केले आहे. मी स्वत:ला सच्चा बौध्द उपासक समजतो, कारण मी विपश्यना करतो. पंचशीलची तत्त्वे मी माझ्या आयुष्यात अंगिकारण्याचा प्रयत्न करतो. मी स्वत:ला बौध्द धर्माचा प्रचारक समजतो. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री विलासराव देशमुख अकोल्यात येऊन गेले तेव्हा काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचा विरोध मोडून काढीत मी त्यांना आग्रहपूर्वक अकोला जिल्हा कारागृहातील विपश्यना शिबिरात घेऊन गेलो होतो. आज अकोला शहरात बौध्द धर्माचे खरे प्रचारक अनेक आहेत. त्यात श्रीधरजी बजाज आहेत, अकोला कारागृह अधिक्षिका श्रीमती स्वाती साठे आहेत, आमचे मित्र निरंजन रुंगटा, जनार्दन वानखडे, प्रा.मुंकुद भारसाकळे, अशोक इंगळे, तायडे, ओइंर्बे, तेलगोटे, अशी कितीतरी मंडळी आहेत. ही मंडळी प्रसिध्दीच्या मागे लागली नाही किंवा आपले कार्य `कॅश' करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. याउलट बहुतेक रिपब्लिकन नेते काय करीत आहेत? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्त्वांना, विचारांना हरताळ फासण्याचे एकमेव काम ते करीत आहेत. समाजमने जोडण्याऐवजी तोडण्याचे काम करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देवाधर्माच्या अवडंबरास आयुष्यभर कडाडून विरोध केला. भगवान गौतम बुध्दांनी मूर्तिपूजेचा विरोध केला; मात्र आजच्या रिपब्लिकन नेत्यांनी डॉ. आंबेडकर व भगवान गौतम बुध्दांचेच अवडंबर माजविले आहे.
पुतळयाचे राजकारण हा त्यांचा सर्वाधिक आवडता विषय आहे. ब्राह्मणांना शिव्या घालणे हा त्यांचा दुसरा प्रमुख कार्यक्रम असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना हे कधीच अभिप्रेत नव्हते. त्यांनी हल्ला चढविला होता तो ब्राह्मणांवर नव्हे, तर ब्राह्मणी प्रवृत्तीवर! दुर्दैवाने आज आंबेडकरी चळवळीतच ब्राह्मणी प्रवृत्तीची माणसे गोळा झाली आहेत.
नुसतीच गोळा नव्हे, तर वरचढ झाली आहेत. आंबेडकरी जनतेच्या हे ज्या दिवशी ध्यानात येईल तो आंबेडकरी चळवळीचा सुदिन म्हणावा लागेल. माझे हे विश्लेषण अनेकांना रूचणार नाही. माझ्यावर प्रतिगामी असल्याचा आरोप होईल, तर कुठे मला अडचणीत आणता येत नाही म्हणून या लेखाचे भांडवल करून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्या जाईल, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही हे धाडस मी करीत आहे. कारण मी आधीच स्पष्ट केले आहे की मी बौध्द धर्माचा अनुयायी आहे आणि त्यामुळे माझ्या बांधवांना जागृत करणे, हे मी माझे कर्तव्य समजतो, भले त्याचे काहीही मोल पडो.
फेसबूकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com,
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments
Post a Comment