‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!

रविवार, दि. २१  फेब्रुवारी २०२१

(लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) 

नैसर्गिक, विना-रसायन शेती करणारे कितीतरी प्रामाणिक शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि हाच विचार करून आम्ही मग शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आम्हाला ठाऊक आहेत, तसेच त्यांचे परिवारजनही. आता एक मोठा परिवारच तयार झालाय. रोज नवनवे लोक या मोहिमेत सामील होत चाललेत. जैविक शेती मिशन माध्यमातून त्यांची मोक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र चालू करून दिलीत. ग्राहकांनासुद्धा आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे वास्तव उमगू लागलं आहे.


       आज जगाला अनेक असाध्य आजारांनी व असाध्य रोगांनी घेरले आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हे असे पाचवीला पूजलेले आजार झाले आहेत, की जे एखाद्या व्यक्तीला झाले तर ते त्याच्या मृत्यूपर्यंत साथ देतात, सोबतच त्याचे सर्व अर्थकारण आणि घरातील वातावरण खराब करतात. या संदर्भात मी आपल्याला केवळ एकच प्रश्न विचारतो आणि तो म्हणजे, *'काय तुम्हाला अशी व्यक्ती माहिती आहे का, की जिला वर उल्लेखित कुठल्याही प्रकारचा एखादा आजार झाला आणि तिने अ‍ॅलोपॅथी डॉक्टरकडे जाऊन स्वत:चा उपचार सुरू केला आणि औषधे, गोळ्या, इंजेक्शन घेऊन काही महिन्यांत, वर्षांनंतर रोगमुक्त झाली?'*

       मी हा प्रश्न माझ्या अनेक मित्रांना, नातेवाईक आणि अनेक डॉक्टर मित्रांनाही विचारला; मात्र मला याचे उत्तर 'कुणीच नाही', असे मिळाले.

       आज भारतामध्ये मधुमेह, हृदय रोग, कॅन्सर या रोगांपासून ग्रस्त असणाऱ्या लोकांची संख्या चिंतनीय पातळीवर वाढली आहे. मुळात हे तीन रोग का होतात किंवा त्याची लक्षणे का दिसतात, यावरच विचार करणे गरजेचे आहे.

       या तीनही रोगांचे मूळ आपण आजकाल स्वीकारलेली वेगवान जीवन पद्धती आहे. आज त्यामुळे शारीरिक कष्टाची कामे बहुतांश लोक करतच नाहीत. रिमोट आणि अँड्रॉइड फोनने तर आम्हाला फारच आळशी बनवून टाकले आहे. व्यायाम, योग, प्राणायाम आम्ही विसरून गेलो आहोत. त्याचबरोबर आम्ही जे खात आहोत त्यामध्ये वाढलेली भेसळ व त्यात असलेले विषारी औषध. विषारी औषध हे सेंद्रिय शेतीमुळे आणि उत्पादनामुळे दूर केल्या जाऊ शकतात; मात्र भेसळीचे काय? *भेसळीला सगळ्यात जास्त जबाबदार असेल तर ते आम्हाला स्वस्तामध्ये मिळविण्याची हाव*.

       आज आम्हाला हे निश्चित ठरवावे लागेल, की *'स्वस्त आणि दिसायला आकर्षक हवं, की शुद्ध, विषमुक्त आणि चविष्ट हवं?'*

       की *'उदर भरण नोहे जाणिजे हे यज्ञ कर्म'* या उक्तीप्रमाणे वागायचे!!!

       आणि त्याकरिता *'शेतकऱ्यांना थोडा अधिक पैसा द्यायचा, की हॉस्पिटलचे बिल भरायचे?'*

       माझे मित्र दादाराव काकड आणि माझ्या शेतात जवळपास ४ एकर ऊस या वर्षी आम्ही लावला होता, त्या उसाचा गूळ बनविण्यासाठी माहिती घेण्याच्या उद्देशाने योगायोगाने गेल्या दोन आठवड्यांत बऱ्याच गूळ प्रकल्पांत जाण्याचा योग आला. सर्व ठिकाणी, विना अपवाद, अगदी राजरोसपणे, उघड उघड भेसळ चालू आहे. वरून प्रत्येकापाशी त्याचे संपूर्ण समर्थनही तयार आहे.

       भेसळीचे काही प्रकार जे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले ते असे:

*μ बाद/तृतीय दर्जाची साखर १:१ या प्रमाणात नव्या उसाच्या रसात मिसळली जाते.*

*μ फॉस्फोरिक एॅसिड त्यात मिसळतात, ज्यामुळे मळीचे ८ तासांत ४ लॉट तयार करता येतात.*

*μ चमकदार भगवा रंग येण्यासाठी त्यात कृत्रिम रंग मिसळतात.*

*μ कुठल्याही दर्जाचा ऊस असो, त्यापासून दिसायला 'आकर्षक' गूळ काढण्यासाठी हायड्रस पावडर मिसळली जाते.*

*μ 'भेंडी पावडर' नावाची, वेष्टणावर For industrial use only.*

*Not for human consumption. अशी स्पष्ट सूचना छापलेली एक पूड त्यात मिसळली जाते.*

*μ जळालेला, अत्यंत खराब दर्जाच्या उसाचा गूळ, १:५ प्रमाणात बेमालूमपणे टाकला जातो, त्याची दुर्गंधी येऊ नये म्हणून आणखी एक रसायन (वाफा पावडर) टाकले जाते.*

*μ उभा ऊस फॅक्टरी  घेऊन जाते, त्यामुळे अनेक गुऱ्हाळवाले नर्सरी वेस्ट म्हणून फेकून  दिलेली, आंबलेली उसाची कांडी अत्यंत कमी किमतीत विकत घेऊन त्यापासूनही मोठ्या प्रमाणावर गूळ बनवतात.*

        या सर्व गोष्टीचं स्पष्टीकरण- लॉजिक, किंवा जस्टीफिकेशन- एकच: ग्राहकांना स्वस्त आणि दिसायला चांगला गूळ हवाय, तो आम्ही देतो!!

        अधिक खोलात गेलो तर आणखी काही धक्कादायक गोष्टी पुढे येतील कदाचित; पण विविध मार्गांनी, वेगवेगळ्या ब्रँड नावांनी, चकचकीत पॅकिंग करून असा माल रीतसर विकल्या जात आहे हे निश्चित.

        गूळ उद्योग हे केवळ अन्न-प्रक्रिया उद्योगातल्या भयानक वास्तवाचं प्रातिनिधिक उदाहरण आहे. माझा प्रत्यक्षदर्शी अनुभव मी इथे कथन केला आहे.

        इथे कहाणी संपली नाही. वरील कथा वाचल्यावर अनेक जणांनी यावर अपेक्षित अशा प्रतिक्रिया घाईघाईने दिल्या. त्यांचा सूर साधारणपणे 'ओह् माय गॉड्' किंवा 'अरे देवा, किती भयानक' या स्वरूपाच्या होत्या. त्यात बव्हंशी निष्क्रीय हताशा होती. खरंच अशक्य आहे का आम्हाला या विषयाच्या मुळाशी जाणं? मागील अनेक वर्षे डायबिटिसची पर्वा न करता आम्ही मनमुराद साखर खात आलो. आता मधुमेह झाल्या नंतर साखरेच्या दुष्परिणामांचा ओरडा होऊ लागला; पण गोड तर खाल्लेच पाहिजे. मग अनेक घरांतील स्वयंपाकात गूळ मेनस्ट्रीमवर अवतरला. उसाच्या रसाचे तांबडे घनस्वरूप ग्लॅम-रस झाले; पण शितावरून भाताची परीक्षा करायची, तर आम्ही कुणीच, कधीच आमचे अन्न कुठून येते, ते कसे तयार होते, याचा विचार करत नाही.

        आपण गाडी घेताना, किंवा घरात कुठल्याही प्रकारची वस्तू विकत घेताना कोण चोखंदळ असतो; मात्र दुर्दैवाने ज्याकरिता आम्ही जगतो, किंवा ज्यावर आम्ही जगतो ते अन्न आणि भाजीपाला विकत घेण्यासाठी आम्ही बहुतेक वेळा एकतर घरच्या नोकराला पाठवून देतो, किंवा मग स्वस्त कोठे मिळते त्याचा शोध घेतो.

        'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणतो, पण आपल्या या अत्यावश्यक ब्रह्माचा निर्माता कोण? काय करावं लागतं त्याला ते ब्रह्म निर्माण करताना? यातलं काहीच आमच्या गावी नसतं. आठवून बघा, आज जेवलो त्यातले कुठले पदार्थ कुणी पिकवले? होतं का माहीत तुम्हाला? चुकून  कधीतरी एखाद्या मित्राच्या, नातेवाईकाच्या झाडावरचा पेरू खाल्ला होता, त्याला किती काळ लोटला?

        *आमच्या शेतावर आम्ही संपूर्ण सेंद्रिय पध्दतीने म्हणजे कुठल्याही प्रकारची रासायनिक खते न टाकता  केवळ सेंद्रिय खत वापरतो, तसेच कुठल्याही प्रकारची कीटकनाशकेसुद्धा फवारत नाही. मध्यंतरी दोन महिन्यांअगोदर आम्ही उत्पादन केलेली काकडी एक एक किलोची पॅकिंग करून, सोबत तसे माहितीपत्रक टाकले, बाजारात नाशिकवरून येणारी काकडी १५ रु. किलोनी उपलब्ध होती, त्यामुळे सुरुवातीला दुकानदार आमच्या काकडीकरिता थोडे अधिकचे म्हणजे २५ रु. सुद्धा द्यायला तयार नव्हते; मात्र त्यांना ग्राहकांना टेस्टिंग करायला काही काकडी मोफत दिली, ज्याचा अपेक्षेप्रमाणे परिणाम झाला. जो ग्राहक आमची काकडी खायचा तो तिचे ४० रु. किलोला द्यायला तयार झाला आणि बघता बघता आमच्या 'वेदनंदिनी' काकडीचे मार्केट तयार झाले, कारण जिभेला कळलेली चव.*

        *एक किलो शेंगदाणा तेलाला उत्पादन करायला, जर २५० -३०० रु. चे शेंगदाणे लागतात, तर मग ते तेल बाजारात १५० रु. किलोने कसे मिळते, हा प्रश्न विचारायला आम्ही विसरलो. जर बैल दूध देऊ शकत नाही, तर मग डाळ वाण आलेल्या सोयाबीनमधून आणि तांदुळामधून तेल कसे निघते? असे खोलात जाणारे प्रश्न आम्ही विचारत नाही कारण खोलात जायला नको वाटतं आम्हाला. 'रेडी टु आस्क' आणि 'रेडी टु डिग डीपर' कधी होणार? संभाषण नको असतं आम्हाला. बोलत बसलो, तर तो फलाणा शो हुकणार, टीव्हीवरची ती क्रिकेट मॅच जाणार, फेसबुकवरचा किंवा व्हाट्सअ‍ॅपवरचा वेळ काँप्रोमाईझ् होणार वगैरे वगैरे.*

        आपला फॅमिली डॉक्टर असतो, फॅमिली धोबी असतो, पेट्रोल भरायचा फॅमिली पेट्रोल पंप असतो, तसा आपला व आपल्या ५-१० नातेवाईक व मित्र मिळून एक किंवा  ३-४ शेतकऱ्यांचा मिळून फॅमिली शेतकरी किंवा शेतकरी गट का असू नये, असा विचार का करत नाही आम्ही? जे आम्हाला आमच्या घरात लागणा-या भाज्या, धान्य, अंडी, दूध, पाणी वर्षभर पुरवठा करतील!!!

        नैसर्गिक, विना-रसायन शेती करणारे कितीतरी प्रामाणिक शेतकरी आपल्या आजूबाजूला आहेत. आणि हाच विचार करून आम्ही मग शोध घ्यायला सुरुवात केली. अनेक शेतकरी आणि त्यांची शेतं आम्हाला ठाऊक आहेत, तसेच त्यांचे परिवारजनही. आता एक मोठा परिवारच तयार झालाय. रोज नवनवे लोक या मोहिमेत सामील होत चाललेत. जैविक शेती मिशन माध्यमातून त्यांची मोक्याच्या ठिकाणी विक्री केंद्र चालू करून दिलीत. ग्राहकांनासुद्धा आता शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचे वास्तव उमगू लागलं आहे. अज्ञात स्त्रोतांच्या 'सर्टिफाईड् ऑरगॅनिक'ची पडताळणी करत बसण्यापेक्षा एका कुटुंबातली 'ट्रस्ट-बेस्ड्' व्यवस्था अधिक विश्वासार्ह ठरते आहे. एक दोन फळं खराब निघाली किंवा एखादी पालेभाजी सुकलेली हाती आली, तर केवळ स्वत:च्या पाच-पंचवीस रुपयांचं नुकसान यापलीकडे जाऊन शेतकऱ्याचे प्रामाणिक कष्ट व शेतीतली अंतर्भूत अनिश्चितता याचे भान ठेवून पुढच्या वेळी नक्की चांगला माल मिळेल यावर विश्वास ठेवणारा आणि मुख्य म्हणजे जिभेवर विश्वास ठेवणारा ग्राहक या व्यवस्थेत सहभागी होऊ लागला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आणि समाधानाचे सत्य आहे, कारण नजर धोखा खाऊ शकते; मात्र जिभेला धोका देणे कठीण आहे. त्यामुळे ज्याने एकदा सेंद्रिय भाजीपाला किंवा सेंद्रिय गव्हाच्या पोळीची चव घेतली त्याला अधिकचे काही सांगावेच लागत नाही, पुढच्या वेळी त्याची पावले आपसूकच सेंद्रिय दुकानाकडे वळतात.

        तुम्ही अजून यात जोडले गेले नसाल, तर आम्हाला विचारा आणि घ्या उडी तुम्ही पण. तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या फॅमिली शेतकऱ्याशी गूळपीठ जमवायला आम्ही निश्चितच पुढाकार घेऊ.

        नाहीतर आहेच सुरू भरपूर भेसळ आणि पुरेपूर फसवणूक! आणि मग भारदस्त नाव असलेले आजार आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये लाखोंची बिल भरणे, यापैकी काय निवडायचे याचा निर्णय आता  तुम्हालाच घ्यायचा आहे.


फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी: PraharbyPrakashPohare आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी

Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.

 प्रतिक्रियांकरिता:  Email: pohareofdeshonnati@gmail.com

Mobile No +९१-९८२२५९३९२१

 प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017