प्रहार,रविवार, दि. 22 फेब्रुवारी 2015 " हतबल विद्यार्थी,असहाय पालक!"

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

     रविवार, दि. 22 फेब्रुवारी  2015
हतबल विद्यार्थी,असहाय पालक!
दहावी-बारावी परीक्षेच्या दरम्यान विश्वचषकाचे सामने सुरू आहेत, चांगली दीड महिना ही स्पर्धारंगणार आहे आणि नंतर एप्रिल-मेमध्ये महाविद्यालयीन परीक्षा सुरू असताना आयपीएलची सर्कससुरू होणार आहे. एकूण काय तर वर्षभराच्या तयारीचा कस जिथे लागणार असतो तिथेच नेमके हेक्रिकेटचे काळे मांजर विद्यार्थ्यांना आडवे जाते. इतर गोंगाटाच्या साथीला हा क्रिकेटचा ज्वर असतोआणि त्यातून विद्यार्थ्यांचे मात्र पार वाटोळे होते, सगळ्यांना हे कळते, समजते, जाणवते, परंतु कुणीकाहीच करू शकत नाही आणि हीच मोठी खेदाची बाब आहे.

नेमेचि येतो तो पावसाळा' या उक्तीच्या धर्तीवर विद्यार्थ्यांची परीक्षा जवळ आली, की क्रिकेटचा  तापही सोबतच येत असतो. दरवर्षीचेच हे नाटक आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा आणि क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे भरगच्च वेळापत्रक इतके सारखे असते, की जणू काही एकच व्यक्ती दोन्ही वेळापत्रके तयार करीत असावा, असे वाटावे. आताही इकडे बारावी आणि दहावीच्या परीक्षा सुरू होत आहे आणि तिकडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये होत आहे. त्यामुळे इकडे टीव्हीवर सगळे सामने अगदी पहाटे सुरू होतात, ऐन अभ्यासाच्या वेळी हे सामने रंगात येतात. कितीही नाही म्हटले तरी विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासातून तिकडे विचलित होतेच. वास्तविक दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला एक निश्चित दिशा देणाऱ्या परीक्षा आहेत. इथूनच पुढे त्यांची वाटचाल कशी होणार हे ठरत असते, चांगले गुण मिळाले तर चांगल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो, गुणांची टक्केवारी घसरली, तर पुढील शिक्षणाचे आणि पर्यायाने नोकरी वगैरे मिळण्याच्या स्वप्नाचे तिन-तेरा वाजतात आणि नेमक्या या अतिशय महत्त्वाच्या परीक्षांच्या काळातच क्रिकेटचा जागतिक ऊरूस भरविला जातो.
     आधीच या क्रिकेटने देशातील 80 टक्के लोकांना व्यसनाच्याही पलीकडचे वेड लावले आहे. सगळे कामधंदे सोडून लोक वेड्यासारखे टीव्हीपुढे बसलेले असतात. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शांततेची गरज असते. कुठलाही कोलाहल आजूबाजूला नसेल, तर अभ्यासाकडे नीट लक्ष देता येते, परंतु नेमक्या याच काळात क्रिकेटसोबतच धार्मिक उत्सवांचीही रेलचेल असते. खेड्यापाड्यांत याच काळात विविध सप्ताहांना अगदी ऊत आलेला असतो. कुठे भागवत सप्ताह सुरू असतो, तर कुठे रामायण-महाभारताच्या कथा रंगत असतात, जोडीला दर दोन-चार दिवसांनी येणाऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्या असतातच. हे सगळे कार्यक्रम मोठमोठे भोंगे लावूनच साजरे केले जातात. आपल्यासमोर बसलेल्या लोकांना ऐकू जाईल इतकाच मोठा आवाज या भोंग्यांचा असायला हवा, परंतु अगदी उंचावर चारही दिशांनी तोंड करून हे भोंगे लावले जातात, संपूर्ण गावाचे एकाचवेळी प्रबोधन करण्याचा जणू काही विडाच या महाराज लोकांनी उचललेला असतो. आजकाल आरत्या, किर्तने, साधी पूजाविधीदेखील मोठ्या आवाजातील भोंगे लावूनच केली जाते. रस्त्याने जाणाऱ्या नवरदेवाच्या वरातीतदेखील हा नवरदेव जगावेगळा आहे, हे आसपासच्या पाच-पंचविस गावांना कळावे म्हणून प्रचंड मोठ्या आवाजात डीजे वाजविला जातो. सकाळची सुरुवातच अजानच्या भोंग्यापासून होते आणि नंतर कुठल्या तरी मंदिरातली आरती, कुठले तरी प्रवचन, किर्तन, कुणाचे तरी भाषण आणि या सगळ्यांच्या जोडीला ते दळभद्री क्रिकेट; विद्यार्थ्यांनी एकाग्र होऊन अभ्यास करावा तरी कसा?
क्रिकेटने तर या देशाचे प्रचंड नुकसान केले आहे. वेळ, पैसा आणि मनुष्यबळ या तिन्ही गोष्टींची प्रचंड हानी करणारा हा खेळ अगदी बोटावर मोजता येतील इतक्याच भिकारचोट देशात खेळला जातो. पुढारलेल्या देशांमध्ये या खेळाला स्थान नाही. अमेरिका, जर्मनी, जपान, फ्रान्स, चीनसोबतच बहुतेक युरोपिय देशांमध्ये या खेळाला स्थान नाही, कारण त्या लोकांना वेळेचे महत्त्व कळते. तासा-दोन तासात संपणाऱ्या खेळांना तिकडे अधिक महत्त्व आहे, दिवसदिवस वाया घालविणारा हा क्रिकेटचा खेळ त्यांना परवडू शकत नाही आणि कदाचित म्हणूनच ते पुढारलेले आहेत. आमच्यासारख्या भिकारचोट देशाकडे वेळच वेळ आहे, हाताला आणि डोक्याला काही कामच नसल्यामुळे दिवसभर टीव्हीसमोर बसून क्रिकेट पाहणे आम्हाला सहज शक्य आहे. मायबाप इंग्रजांनी ज्या ज्या देशांवर राज्य केले त्या त्या देशांत हा खेळ खेळला जातो आणि भारतीय उपखंडात तर या खेळाने अक्षरश: लोकांना वेडे केले आहे. सामान्य लोकांना कोणत्या तरी धुंदीत ठेवून त्यांचे महत्त्वाच्या प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचे जे काही फंडे इंग्रजांनी अवलंबिले होते त्यात या देशबुडव्या खेळाचाही समावेश होता. इंग्रज तर निघून गेले, परंतु त्यांचे हे पाप आम्ही स्वातंत्र्यानंतरही कुरवाळत बसलो, एवढेच नव्हे तर ही विषवल्ली इतकी वाढविली, की आज जगातल्या सगळ्या क्रिकेट मंडळात भारतीय क्रिकेट मंडळ सर्वाधिक श्रीमंत बनले आहे. म्हणजे भिकाऱ्यांचा सम्राट ही पदवी आपल्या देशाला सहज शोभण्यासारखी आहे.
     ज्या इंग्लंडने हा खेळ सुरू केला त्याच इंग्लंडमध्ये या खेळाला फारशी किंमत नाही. तिथे फुटबॉल आणि टेनिसची क्रेझ क्रिकेटच्या तुलनेत खूप अधिक आहे. भारतात मात्र एकूण क्रीडा क्षेत्रापैकी नव्वद टक्के क्रीडा क्षेत्र क्रिकेटने व्यापले आहे. भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, हे विधान केवळ सामान्य ज्ञानाच्या परीक्षेपुरते मर्यादित झाले आहे. इतर कोणत्याही खेळाला इथे लोकाश्रय नाही, राजाश्रय नाही. खरे तर लोकाश्रय नाही म्हणूनच राजाश्रय नाही. क्रिकेटचे मात्र प्रचंड स्तोम माजले आहे. आता तर अमिताभ बच्चनदेखील क्रिकेटचे समालोचन करीत आहे. म्हणजे या क्रिकेटच्या वेडात जितका मसाला भरता येईल तितका मसाला भरण्याचा प्रयत्न सुरू आहे. टीव्हीसमोरचा प्रेक्षक जागेवरून हलायला नको, अशीच सारी तजविज केली जात आहे. केवळ क्रिकेट आणि क्रिकेटविरांच्या आरत्या या देशात ओवळल्या जातात. बाकी सगळे खेळ आणि खेळाडू दिनवाणे होऊन कधीतरी आपल्याही वाट्याला लोकांचे कौतुक येईल, म्हणून प्रतीक्षा करीत असतात. हॉकीचा जादूगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ध्यानचंद यांना या देशाने `भारतरत्न' देऊन कधीच गौरविले नाही, ज्याच्या खेळाची मोहिनी खुद्द हिटलरला पडली होती, हिटलरने ज्याला जर्मनीकडून खेळण्याचा प्रस्ताव दिला होता, त्या ध्यानचंदची भारतात किंमत झाली नाही, ध्यानचंद क्रिकेटपटू नव्हते, हे हॉकीचे जादूगर होते. बुद्धिबळातील विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदलाही आम्ही अजून `भारतरत्न' मानले नाही, त्या काळी धावण्याच्या शर्यतीतील विश्वविक्रम मोडण्याचा पराक्रम करणाऱ्या मिल्खासिंगला आम्ही `पद्म' पुरस्कारातच गुंडाळले, परंतु सचिनसाठी मात्र सगळे निकष तातडीने बदलून त्याला `भारतरत्न'ने गौरविल्या गेले, कारण एकच तो क्रिकेट खेळत होता. भारतीयांचे, लोकांचे आणि सरकारचेही हे दळभद्री क्रिकेटप्रेम जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत हा देशबुडव्या खेळ तरुणांच्या आयुष्याची माती करीतच राहणार. ऐन परीक्षेच्या काळात क्रिकेटचे सामने आयोजित करून मुलांचे शैक्षणिक भवितव्यच धोक्यात आणण्याचा प्रकार केला जातो, परंतु या क्रिकेट वेडापुढे सगळेच हतबल दिसतात. पालकही काही म्हणू शकत नाही आणि विद्यार्थीदेखील तक्रार करू शकत नाही. दहावी-बारावी परीक्षेच्या दरम्यान हे विश्वचषकाचे सामने सुरू आहेत, चांगली दीड महिना ही स्पर्धा रंगणार आहे आणि नंतर एप्रिल-मेमध्ये महाविद्यालयीन परीक्षा सुरू असताना आयपीएलची सर्कस सुरू होणार आहे. एकूण काय तर वर्षभराच्या तयारीचा कस जिथे लागणार असतो तिथेच नेमके हे क्रिकेटचे काळे मांजर विद्यार्थ्यांना आडवे जाते. इतर गोंगाटाच्या साथीला हा क्रिकेटचा ज्वर असतो आणि त्यातून विद्यार्थ्यांचे मात्र पार वाटोळे होते, सगळ्यांना हे कळते, समजते, जाणवते, परंतु कुणी काहीच करू शकत नाही आणि हीच मोठी खेदाची बाब आहे.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017