शेती सोडून काहीही कर; मी तुझ्यासोबत आहे! प्रहार रविवार, दि. 4 जून 2017

प्रहार रविवार, दि. 4 जून  2017
शेती सोडून काहीही कर; मी तुझ्यासोबत आहे!
सध्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा संप गाजतो आहे. या पृष्ठभूमीवर प्रकाश पोहरे यांनी 28 फेब्रुवारी 16 रोजी म्हणजेच तब्बल 16 महिन्यांपूर्वी लिहिलेला प्रहार 'शेती सोडून काहीही कर; मी तुझ्यासोबत आहे!' त्यांचे द्रष्टेपण दाखविते. हा प्रहार येथे पुनर्मुद्रित करीत आहोत.
                                                                                                               -पुरवणी संपादक
कोणतेही काम करण्याची तयारी ठेवली आणि त्यासाठी थोडे कष्ट घेण्याची तसदी घेतली, की पोट भरणे ही समस्याच राहत नाही. शेतीला पर्याय खूप आहेत, फक्त आपल्या डोक्यातील रूढीवादी, परंपरावादी जळमटे दूर करणे गरजेचे आहे. मला हे शोभते काय? हे चांगले दिसते काय? लोक काय म्हणतील? इत्यादी - इत्यादी मनाच्या खेळातून बाहेर पडा. क्रांतीचा तोच मार्ग आहे. जेणेकरून आत्महत्येचा विचारही डोक्यात येणार नाही.
सरकारी नियोजनामुळे आपल्या उत्पादनाला योग्य भाव मिळत नसेल आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत असतील तर त्यावर एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे तोट्यात जाणारी शेती बंद करणे किंवा ज्यातून तोटा होतो तो धंदाच बदलणे. मागच्या `प्रहार'मध्ये आम्ही तसे आवाहन सगळ्या शेतकऱ्यांना केले होते. शेती फायद्याची होत नाही म्हणून शेती करणे किंवा उत्पादनाचे स्वरूप बदलणे हेच पर्याय उरतात; परंतु शेती करायची नाही तर मग काय करायचे, हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होऊ शकतो. अर्थात काय करायचे हा प्रश्न असेल, तर त्याची शेकडो उत्तरे आहेत, फक्त ती समजून घेण्याचा सकारात्मक दृष्टीकोन असायला हवा. इथे एक बाब नमूद करावीशी वाटते, की मुस्लीम किंवा सिंधी समाजात बेरोजगारीला किंवा आर्थिक विपन्नावस्थेला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अतिशय कमी आहे किंवा जवळपास  नाहीच, यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे या दोन्ही समाजांतील लोक पडेल ती कामे करण्यास तयार असतात. श्रमाला प्रतिष्ठा असते म्हणजे काय हे या दोन समाजांकडे पाहून कळते. एका कामात पैसा नाही मिळाला तर दुसरे काम, त्यात नाही मिळाला तर तिसरे काम हे लोक करतात, हातावर हात ठेवून आणि दैवाला दोष देत ते कुढत बसत नाहीत. काम कोणतेही असो, ते काम असते आणि आपल्या पोटाची गरज भागविणारे प्रत्येक काम प्रतिष्ठेचेच असते, त्यात हलके किंवा भारी असा भेद करता येणार नाही.
 सध्या देशात हिंदू-मुस्लीम असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो राजकारणाचा भाग असला, तरी या भेदाकडे आपण उलट नजरेने बघण्यास काही हरकत नाही. मुस्लीम समाजात श्रमाला प्रतिष्ठा आहे, अगदी लहान वयापासून काहीतरी व्यवसाय करण्याकडे या समाजातील मुलांचा-तरुणांचा ओढा असतो. विपरित परिस्थितीसोबत संघर्ष करीत जगण्याची उपजत उर्मी त्यांच्यात असते, त्यांचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्यातील हा गुण आपण आत्मसात का करीत नाही? हाताला काम नाही, हा तर्कच मुळी चुकीचा आहे. कामे भरपूर आहेत, फक्त ती शोधण्याची आणि जिद्दीने करण्याची तयारी हवी. एखाद-दुसऱ्या धंद्यातील अपयशाने खचून लगेच निराश होण्याची गरज नसते. संधीचे एक दार बंद होते तेव्हा इतर हजारो खिडक्या उघड्या होत असतात, हे लक्षात घ्यायला हवे. हे लक्षात घेऊन तोट्याचा धंदा ठरणारी शेती बाजूला ठेवून शेतकऱ्यांनी, त्यांच्या तरुण मुलांनी इतर क्षेत्रांतील संधीचा शोध घ्यायला हवा. कुठे कुठे अशी संधी मिळू शकते आणि त्यातून पैसा, उत्पन्न मिळू शकते याची जंत्रीच मी तुमच्यासमोर मांडत आहे. त्यातील कुठलाही योग्य वाटेल तो पर्याय स्वीकारून शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या मुलांनी आपल्या उपजिविकेची सोय करावी आणि शेतीमध्ये अन्नधान्य पिकविणे बंद करून म्हणजेच संपावर जाऊन शेतीतून उत्पादन घेणे बंद करून या सरकारला एकदा तरी चांगलाच धडा शिकवावा. काहीही करा; परंतु शेतीतून अन्न धान्य, भाजीपाला पिकविण्याची शपथ घ्या. अगदी शेतीशी निगडित दुग्ध व्यवसाय, कुक्ुकट पालन हे सर्वच किमान काही महिने बंद करादुधाचा खवा करा किंवा त्यातून लोणी, तूप काढा.
  मागच्यावेळी मी शेतीतून धान्याऐवजी चाऱ्याचे उत्पादन घेण्याचा सल्ला दिला होता, पाण्याची सोय असेल तर बांबूचे उत्पादनदेखील खूप फायदेशीर ठरू शकते. त्याशिवाय बकरी पालन, ससे पालन, तितर पालन हे व्यवसाय करता येतील. उंट, घोडा विकत घेऊन त्यावर बच्चे कंपनीची सवारी केली तरी त्यातून चांगला पैसा मिळू शकतो. शेतीतून विदेशी फळे, भाज्यांचे उत्पादन घ्या, खजूर लावा, बाभळीची झाडे लावा, अगदी कढीपत्त्याची झाडे लावली, तरी त्यातून चांगला पैसा मिळू शकतो. शेवगा, एरंडी लावा. जंगलात जाऊन बोरे, निंबोळ्या वेचा. विदेशी पक्षी पाळा, त्यांच्या व्यापारातूनही भरपूर पैसा मिळतो. शेवया, कुरड्या, पापड, लोणची विकून पैसे मिळू शकतात. शिंपीकाम करा, हजामतीचे दुकान टाका, पार्लर लावा, लॉण्ड्री सुरू करा, मटणाचे दुकान टाका, अॅण्ड्राईड मोबाईल घेऊन व्हिडिओ शूटिंग करा, त्याचे एडिटिंग करायला शिका, पत्रकारिता करा त्यातून निवडून येताही आमदारकीचे अधिकार गाजविण्याचीह संधी मिळू शकते, वर्तमानपत्रे विका, भाजीपाला विका, तीन महिन्यांचे जुजबी प्रशिक्षण घेऊन अकाऊंटंट व्हा, शेतकऱ्यांचे आयटी रिटर्नसचे फॉर्म भरून द्या, हातगाडी लावा, पाणीपुरी विका, आचारी व्हा, कार, ट्रॅक्टर चालवायला शिका, शेतीपयोगी यंत्रे चालवायला शिका, तेदेखील कमाईचे साधन ठरेल. जेसीबी घ्या आणि विहिरी, शेततळी, बंधारे घालायचा उद्योग सुरू कराअंडा-आमलेटची गाडी लावा, रस्त्याच्या बाजूला उगवणारा तरोटा जमा करा; त्याची कॉफी बनवा, जैविक खते तयार करा, हमाली करा, बूटपॉलिश करा, वायनरी लावा, लव्ह बर्ड्स पाळा आणि घरोघरी त्याचे पिंजरे विका, छोटा-मोठा टेक्निशियन व्हा, मेकॅनिक व्हा, इलेक्ट्रिशियन व्हासायकल दुरुस्तीचे दुकान टाका, भंगार गोळा करून विका, जडीबुटीचे प्रशिक्षण घ्या, कुत्र्यांना, पक्ष्यांना प्रशिक्षण देण्याचे काम शिका, पेस्ट कंट्रोलचे काम शिका, ठिबक सिंचन तंत्रज्ञान आत्मसात करा, प्लंबर व्हा, सुतार व्हा, पेंटर व्हा, पीओपीचे काम शिका, दुधाचा धंदा करा; ते घरोघरी जाऊन विका, बांबू लागवडीचे तंत्र शिका, वूड टर्नर, ओतारी काम, कुंभारी काम, एलईडी लाईट बनविण्याचे तंत्र शिका, ब्रश कटर घेऊन गवत कापा, माळी काम शिका, लॅण्ड स्केपिंग शिका, मोबाईलने पंप ऑपरेटिंग करणे शिका, डीटीपी ऑपरेटर व्हा, आरओ वॉटर प्लान्ट लावा, मोबाईल आटा चक्की, घरघंटी सुरू करा, कृत्रिम रेतन केंद्र सुरू करा, गोट फॉर्म सुरू करा, हायड्रोफोनिक तंत्रज्ञानाने चारा निर्मिती करा, वेफर्स बनवून विका, शुगर कॅण्डी अर्थात बुढ्ढीचे बाल विका, पॉप कॉर्न तयार करून विकाभेळ गाडी लावा, तांबडा- पांढरा रस्स्याचे मटन तयार करायला शिका, त्याची होम डिलिव्हरी करा, टॅनिन  म्हणजे चामडे कमवायला शिका, बाभळीच्या, शेवग्याच्या शेंगा गोळा करा, त्याच्या बिया विका किंवा त्याची रोपे तयार करून शेतकऱ्यांच्या शेतात लावून द्यायचा उद्योग सुरू करासोफा, फर्निचर स्वच्छ करायला, पॉलिश करायला शिका, गोमूत्र जमा करून ते डिस्टिल करून द्या, डिस्टिलरी लावा, केळी कापण्याचे काम करा, डाळींब छाटणी, बहार छाटणी करायला शिकासध्या हे काम करायला नाशिकवरून माणसे बोलवावी लागतात. शिक्षित असाल तर तहसिलमध्ये, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म वगैरे भरून देण्याचे काम करा, मेन हॉस्पिटलमध्ये जाऊन सरकारी योजना समजून घ्या, गरिबांना त्या समजावून सांगा, समाजसेवाही होईल आणि चार पैसेदेखील मिळतील, बैलबंडी घ्या; भाजीपाला विका, नर्सरी लावा, कचरा कुंड्या बनवा, कचरा जमा करून त्याची वर्गवारी करा, गोव्यासारखी मोटरबाईक टॅक्सी चालवा, ग्रामीण भागात घरोघरी जाऊन सोपे संडास बनवून द्या, हायवेच्या बाजूला तुमची शेती असेल तर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि वनीकरण विभागासाठी झाडे लावण्याचे काम करा, पंक्चर दुरुस्तीचे दुकान लावा, खानावळी, भोजनालय, ढाबे सुरू करा, शेतमाल विक्रीचे स्टॉल लावा, सर्पमित्र बनून सापाचे विष काढण्याचे तंत्र शिका, त्यातून चांगला पैसा मिळतो, लाखोळी डाळीचे वडे-भजे किंवा बेसन  विका, गुळपट्टी बनवा आणि विका, भटकी कुत्री पकडून त्यांची निर्यात नागालँड, सिक्कीम या राज्यांत करा कारण तेथे ती खातात, रेल्वे ट्रॅकच्या आजूबाजूला असलेली झाडे तोडण्याचे कामदेखील रोजगार पुरविते, झिल्लीफुलोर म्हणजे वेडी बाभूळ कापून कोळसा बनवा, बायोफ्युएल पॅलेटस् बनवा, शेतात चांगली माती असेल तर त्याच्या विटा बनवा, ओल्या हरबऱ्याचे गाठे किंवा दाणे काढून विका, तुरीच्या शेंगा विका, हुरडा विका, प्लॅन्टेशन करून द्या, ट्रॅक्टरने खड्डे करून द्या, तंदूर मास्टर बना, झक मारा म्हणजे मासे पकडा, फळांच्या रसाची गाडी लावा, टुरिस्ट गाईड म्हणून काम करा, फुलांचे, सुताचे हार विका, फोटो फ्रेमिंगचे काम करा, फ्लेक्स प्रिंटिंगचा धंदा करा, बांबू काम शिका, बांबूपासून कर्टन म्हणजे पडदे बनवायला शिका किंवा त्यापासून फर्निचर बनवा, सोप्या चुली बनवा; त्या घरोघरी जाऊन लावून द्या, बायोगॅस टँक बसवून द्या, अमृतपाणी टाके बसवून द्या, हिरवळीची मॅट बनवून विका, किचन गार्डन तयार करून द्यायला शिका, शेतकरी कायद्याच्या संदर्भातील पुस्तके विका, त्यांचे प्रशिक्षणाचे वर्ग सुरू करा, सीड बँक तयार करा, एक नाही अशी हजारो कामे आहेत. कोणत्या तरी एका धंद्यात तुमचा नक्कीच जम बसेल आणि तुमचे आयुष्य सुधारून जाईल.
    कोणतेही काम करण्याची तयारी ठेवली आणि त्यासाठी थोडे कष्ट घेण्याची तसदी घेतली, की पोट भरणे ही समस्याच राहत नाही. शेतीला पर्याय खूप आहेत, फक्त आपल्या डोक्यातील रूढीवादी, परंपरावादी जळमटे दूर करणे गरजेचे आहे. मला हे शोभते काय? हे चांगले दिसते काय? लोक काय म्हणतील? इत्यादी - इत्यादी मनाच्या खेळातून बाहेर पडा. क्रांतीचा तोच मार्ग आहे. जेणेकरून आत्महत्येचा विचारही डोक्यात येणार नाही. मरण पंथ त्यागा; संजीवन पंथाची कास धरा!
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.


Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017