प्रहार, रविवार, दि. 18 मे 2014 ‘कॉंग्रेसच्या निष्क्रियतेला शेतकर्यांचा आणि उद्योजकांचा दणका......’
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि.18 मे 2014
‘कॉंग्रेसच्या निष्क्रियतेला शेतकर्यांचा आणि उद्योजकांचा दणका......’
एकीकडेपक्षातील आव्हानांना तोंड देतानाच मोदींना त्यांनी स्वत:बद्दल ज्या प्रचंड अपेक्षानिर्माण करून ठेवल्या त्यांची पूर्तता करण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. मोदींनामिळालेले यश विदेशी कपन्यांना धार्जिण अशा एका निष्क्रिय सरकारच्या विरोधातील देशांतर्गतअसलेल्या उद्योजकांची प्रतिक्रिया आहे. लोकांमध्ये तात्पूरता हाईप निर्माण करण्याचेकाम यापूर्वी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल सारख्यांनी केले होते, पुढे त्यांचे काय झाले, याचे भान मोदींना बाळगावेच लागणारआहे.
लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेली निवडणूक प्रक्रिया म्हणून यावेळच्या निवडणुकीचा उल्लेख करता येईल. 7 एप्रिल ते 12 मे या जवळपास सव्वा महिन्याच्या कालावधीत एकूण नऊ टप्प्यांमध्ये मतदान पार पडले. दीर्घकाळ रेंगाळलेल्या या निवडणुकीचा निकाल अखेर समोर आला. समोर आलेला निकाल बराचसा अपेक्षित आणि काहीसा अनपेक्षित असा म्हणता येईल. काँग्रेसचे सरकार उलथून पडेल, हे अपेक्षितच होते, भाजप किंवा रालोआला सर्वाधिक जागा मिळतील हेदेखील अपेक्षित होते, परंतु रालोआला स्वबळावर बहुमत गाठता येईल असे वाटत नव्हते. फार तर 230 पर्यंत रालोआ मजल मारेल असाच सगळ्यांचा अंदाज होता; परंतु मोदींच्या सुप्त लाटेने सगळ्यांचेच अंदाज चुकविले. मोदींचा तीन लाख किलोमीटरचा प्रचार प्रवास दौरा, साडे चारशे सभांचा धडाका अखेर त्यांच्या पदरात भरभरून माप टाकून गेला. सहा महिन्यांपूर्वी किंवा अगदी एका महिन्यापूर्वी रालोआ स्वबळावर केंद्रात सत्ता स्थापन करेल असे कुणी म्हटले असते, तर त्याच्या धाडसाचे कौतुकच केल्या गेले असते. विविध राज्यांतील प्रादेशिक पक्षांची ताकद, भाजपचा केवळ काही राज्यांपुरता असलेला प्रभाव आणि भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केल्याने भाजपच्या विरोधात अल्पसंख्याक मतदार एकजूट होण्याचा धोका, अनेक राजकीय पक्षांचा मोदींना असलेला विरोध तसेच भाजपातही मोदींच्या विरोधात सक्रिय असलेला एक गट आणि संघ हे सगळे लक्षात घेता मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप अनुकूल परिस्थिती असूनही फार मोठी मजल मारेल असे राजकीय तज्ज्ञांना विशेषत: संघालाही वाटत नव्हते; परंतु मोदी अगदी झपाटल्यासारखे संपूर्ण देशभर फिरले, अत्यंत प्रभावी रितीने त्यांनी प्रचार यंत्रणा राबवली, लोकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा किंवा नारे त्यांनी कौशल्याने वापरले, आधुनिक तंत्रज्ञानाचा, सोशल साईटस्चा त्यांनी अतिशय प्रभावी वापर केला, भाजपची आपली प्रचार यंत्रणा असताना मोदींनी बंगळुरूत स्वत:ची स्वतंत्र 'वॉर रूम' उभी केली, अमित शहा सारख्या आपल्या खास माणसांना खास जबाबदारी देऊन कामाला लावले, त्यांनी सगळा प्रचार भाजपमय नव्हे, तर मोदीमय करून टाकला, या सगळ्या प्रचारातून सध्याच्या काँग्रेस सरकारला आपण सक्षम पर्याय देऊ शकतो, ही भावना त्यांनी मतदारांमध्ये निर्माण केली. त्यांच्या आक्रमक प्रचारामुळेच एरवी भाजपचे अस्तित्वही नसलेल्या राज्यात भाजपला लक्षणीय मते मिळाली, तर दिल्ली, महाराष्ट्र, तामिळनाडू, बिहार, उत्तरप्रदेशसारख्या काँग्रेसबहुल राज्यात काँग्रेसचा जवळपास सफाया झाला.
मोदींनी अतिशय कौशल्याने आणि अत्यंत आक्रमकपणे केलेल्या प्रचारामुळेच भाजपला न भूतो असे हे यश मिळाले, हे मोदी विरोधकांनाही मान्य करावे लागेल. देशातल्या सगळ्या 543 मतदारसंघात भाजप आघाडीकडून एकच उमेदवार उभा होता आणि तो म्हणजे नरेंद्र मोदी, असे जे म्हटले जाते ते अतिशयोक्त नक्कीच नाही. एरवी जे उमेदवार निवडून येण्याची सुतराम शक्यता नव्हती, तेदेखील मोदी लाटेत निवडून आले. मोदींच्या नावाने अनेक बुडणारे दगड तरंगले. भाजपला मिळालेले यश हे मोदींच्या मेहनतीचे फळ आहे, असे ज्याप्रमाणे म्हणता येईल तसेच ते काँग्रेसच्या नाकर्तेपणाचेही म्हणावे लागेल. गेल्या दहा वर्षांत काँग्रेस सरकारने निष्क्रियतेचे जे लाजिरवाणे प्रदर्शन केले त्याचा परिणाम म्हणून मतदारांनी सक्षम सरकारच्या बाजूने मतदान केले. असे सक्षम सरकार आपण देऊ शकतो, हे मोदी मतदारांना पटविण्यात यशस्वी झाले, त्यासाठी त्यांनी गुजरात मॉडेल मतदारांसमोर ठेवले. दुर्दैवाने काँग्रेसकडे असे कोणतेही मॉडेल नव्हते. सांगण्यासारखे काहीच नसल्यामुळे काँग्रेसचा सगळा प्रचार केवळ मोदीविरोधी राहिला. काँग्रेसचे नेते जितक्या त्वेषाने मोदींवर तुटून पडत तितकीच मोदींची बाजू बळकट व्हायची. मोदी विकासाची भाषा बोलत होते आणि काँग्रेसचे नेते गुजरात दंगलीचे गुजराती मतदारांनी केव्हाच गाडून टाकलेले भूत उकरून त्यांना झालेल्या `मोदी फोबिया'चे दर्शन घडवित होते. दहा वर्षांत आपण काय केले याचा लेखाजोखा एकही काँग्रेस नेता मांडत नव्हता, कारण काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्त्वाने त्यांना त्यांची प्रतिभा दाखवायला मोकळीकच दिली नव्हती. केवळ मोदी आले तर दंगली होतील, मोदी आले तर देशाचे विभाजन होईल, मोदी आले तर अल्पसंख्याकांना जगणे मुश्किल होईल, असा नकारात्मक प्रचार मोदी विरोधक करीत राहिले. विरोधकांच्या या नकारात्मक प्रचाराचाही मोदींना खूप फायदा झाला. वास्तविक गुजरातमध्ये लागोपाठ तीन वेळा असाच नकारात्मक प्रचार करून काँग्रेसने सणसणीत आपटी खाल्ली आहे, परंतु त्या अनुभवातून काँग्रेसला शहाणपण आले नाही. खरे तर काँग्रेसची ही मजबुरीच म्हणायला हवी, मोदींच्या विरोधात अन्य मुद्दे त्यांच्याकडे नव्हते आणि आपल्याकडून सांगण्यासारखे गेल्या दहा वर्षांत त्यांनी काही केलेच नव्हते किंवा सोनियाच्या आजूबाजूच्या चौकडीने त्यांना तशी संधी मिळूच दिली नाही.
थोडक्यात सांगायचे तर काँग्रेसच्या निष्क्रिय सरकारने मोदींसाठी जमीन नांगरून ठेवण्याचे काम केले, त्यातून मतांचे भरघोस पीक काढण्याचे तंत्र मोदींना चांगलेच अवगत होते. या तंत्राच्या मदतीनेच त्यांनी अटलबिहारी वाजपेयींनाही जमला नाही तो चमत्कार करून दाखविला; परंतु आता पुढची वाटचाल मोदींसाठी आव्हानात्मक आहे. हे आव्हान चारही बाजूने आहे. अन्न सुरक्षा कायदा सारखा देशाची अर्थव्यवस्था भिकेला लावणारा कायदा मागच्या सरकारने पारीत केला. वाढलेल्या करांमुळे असह्य झालेली महागाई, वाढलेला भ्रष्टाचार, जनलोकपाल आणि सातव्या वेतन आयोगाला काँग्रेसने दिलेली मान्यता असे अनेक खड्डे कसे पार करायचे, याचा विचार मोदींना करावा लागेल. संपुआ सरकारच्या काळात औद्योगिक वाढीचा दर शून्याच्या जवळपास पोहचला, सरकारचा धोरण लकवा त्यासाठी कारणीभूत ठरला होता. औद्योगिक विकासाला चालना देऊन देशाच्या वाढत्या बेरोजगारीवर काबू मिळविण्यासाठी मोदींना कठोर उपाययोजना कराव्या लागतील, 'चिप पब्लिसिटीचे' राजकारण त्यासाठी बाजूला ठेवावे लागेल. सुदैवाने मोदींचे सरकार आधीच्या दोन सरकारप्रमाणे लंगडे नाही. आपल्या मर्जीने निर्णय घेऊन ते राबविण्याइतकी ताकद मतदारांनी मोदींना पुरविली आहे. हे सगळे आव्हान पेलताना मोदींना पक्षांतर्गत विरोधाचाही सामना करावा लागू शकतो. नरेंद्र मोदींचे पंतप्रधान होणे भाजपातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना रूचलेले नाही आणि पचलेलेही नाही. खरे तर संघालादेखील नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे अपेक्षित होते की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संघाला भाजपची सत्ता यावी असे वाटत होते, परंतु नरेंद्र मोदी पंतप्रधान होणे संघाला कदाचित मान्य नसावे. भाजपला सत्तेप्रत पोहचविण्यासाठी नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेचा वापर करायचा आणि ऐनवेळी त्यांना बाजूला सारायचे अशी संघाची रणनीती होती, असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. नरेंद्र मोदी ओबीसी आहेत, एक ओबीसी माणूस देशाच्या सर्वोच्च पदी पोहचतो, हे संघालाही पचविणे जड जात असावे. संघाच्या अपेक्षेनुसार मोदी लाटेमुळे भाजपला 180 ते 200 जागा मिळायला हव्या होत्या, त्या परिस्थितीत सत्ता स्थापण्यासाठी अन्य पक्षांची मदत घ्यावी लागली असती आणि त्या पक्षांना मोदी मान्य होणार नाहीत हे कारण समोर करून मोदींना बाजूला सारून आपला माणूस पंतप्रधान पदावर बसविण्याचा संघाचा प्रयत्न होता, अशी शंका घेण्यास पुरेसा वाव आहे; परंतु मोदींनी आपल्या अथक परिश्रमाने संघाचा हा डाव उलथवून लावला. देशभरातील मतदारांनी मोदींना भरभरून कौल दिला. विशेष म्हणजे नेहमी काँग्रेससोबत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि काही औद्योगिक घराण्यांनी यावेळी भाजपाला भरघोस साथ दिली, ते मतदानाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
मोदींनी आपल्या प्रचारातून एक प्रकारचा हाईप निर्माण केला, तो अभूतपूर्व असाच होता. मोदींच्या या यशामुळे संघाची पंचाईत झाली आहे. तुर्तास मोदींचे वर्चस्व संघ मान्य करेल, परंतु पुढच्या काळात मोदींपुढे अडचणी निर्माण करण्याचे काम संघाकडून होऊ शकते. एकीकडे पक्षातील या आव्हानांना तोंड देतानाच मोदींना त्यांनी स्वत:बद्दल ज्या प्रचंड अपेक्षा निर्माण करून ठेवल्या त्यांची पूर्तता करण्याचे आव्हानही पेलावे लागणार आहे. मोदींना मिळालेले यश विदेशी कपन्यांना धार्जिण अशा एका निष्क्रिय सरकारच्या विरोधातील देशांतर्गत असलेल्या उद्योजकांची प्रतिक्रिया आहे. लोकांमध्ये तात्पूरता हाईप निर्माण करण्याचे काम यापूर्वी अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल सारख्यांनी केले होते, पुढे त्यांचे काय झाले, याचे भान मोदींना बाळगावेच लागणार आहे. आज अण्णांना कुणी विचारीत नाही आणि केजरीवालची पोलखोल झाली आहे. आता सुदैवाने मोदींकडे मजबूत सरकार आणि पूर्ण पाच वर्षे आहेत. कोणत्याही आव्हानांचा सामना करण्याइतपत कणखरता त्यांच्यात आहे. या सगळ्या आव्हानांवर मात करीत देशवासियांच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात मोदी यशस्वी झाले आणि `भारता'सोबत `इंडिया'ला पुन्हा उभारी दिली, तर कदाचित पुढची दहा वर्षे त्यांचीच असतील, परंतु कोणत्याही कारणाने ते अपयशी झाले, तर नरेंद्र मोदी नावाचे हे वादळ इतिहासजमा व्हायला वेळ लागणार नाही.
Comments
Post a Comment