प्रहार रविवार, दि.18 सप्टेंबर 2016 प्रयोजन संपलेला उत्सव!
आजच्या विज्ञानयुगातही लालबागचा राजा नवसाला पावतो म्हणून त्याच्या हुंडीत अक्षरश: करोडोंचे दान टाकणारे लोक कोणत्या भारताचे प्रतिनिधीत्व करतात, एकविसाव्या शतकातील की सोळाव्या शतकातील? गणेशाला बुद्धिची देवता मानली जाते, तसे असेल तर आता त्या गणेशाकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की या तुझ्या भक्तांना थोडी तरी बुद्धी दे, त्यांना सांग की पैशाचे आमिष दाखवून कोणत्याच देवाकडून कोणतेच काम केले जाऊ शकत नाही, ही सगळी शोषणवादी व्यवस्था काही स्वार्थी लोकांनी केवळ आपल्या भल्यासाठी उभी केली आहे, त्यांना हेही सांग की देवाची खरी भक्ती करायची असेल तर गरीब, अज्ञानी, पिडलेल्या, पिचलेल्या लोकांची सेवा करा, तुमच्या सारखे त्यांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्या!
राज्यभरात गणेश विसर्जन शांततेत पार पडले आणि पोलिस विभागांसकट सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास टाकला. ही एक विटंबनाच म्हणायला हवी की देवादिकांच्या उत्सवातच सामाजिक शांतता सर्वाधिक धोक्यात येते, सामाजिक ऐक्याचे प्रतिक वगैरे म्हणविले जाणारे उत्सवच सामाजिक शांतता ढवळून काढत असतात, यावेळी तसे काही झाले नाही याबद्दल खरे तर गणेशाचे आभारच मानायला हवे. मुळात या उत्सवाला आजकाल प्राप्त झालेले स्वरूप पाहता हा उत्सव असाच पुढे सुरू ठेवावा का, हाच खरा प्रश्न आहे. गणेशोत्सव सार्वजनिक झाला तोच मुळी राजकीय कारणांसाठी. ब्रिटिशांनी 1857च्या उठावानंतर भारतीय लोकांवर अनेक कडक निर्बंध लादले, त्यात जमावबंदी, शस्त्रास्त्र बाळगण्यावर बंदी वगैरे निर्बंधांचा समावेश होता, फक्त धार्मिक कार्यक्रमांना त्यातून सूट दिली होती. याच पळवाटेचा आधार घेत एरवी घराच्या चार भिंतींतच साजरा केला जाणारा गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात करण्यात आला. सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये राजकीय पुढाऱ्यांची व्याख्याने वगैरे आयोजित केली जायची आणि त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न व्हायचा. नेत्यांच्या, विचारवंतांच्या व्याख्यानमाला या त्यावेळच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्य होते. हा उत्सव दहा दिवस सुरू ठेवण्यामागेही अर्थातच अशाप्रकारच्या जनजागृतीस अधिक वेळ मिळावा हाच उद्देश होता.
खरे तर धर्मशास्त्रच प्रमाण मानायचे झाल्यास हा उत्सव अगदी एका दिवसाचाच आहे. गणेश चतुर्थीला नदीकाठी जायचे, तिथल्या मातीचा गणपती आपल्या तळहातावर तयार करायचा, हातावरच त्याची प्राणप्रतिष्ठा करायची आणि नंतर त्या नदीतच त्याचे विसर्जन करायचे, अशाप्रकारचे हे ऋात धर्मशास्त्रात सांगितले आहे; परंतु वर म्हटल्याप्रमाणे या उत्सवाला राजकीय कारणांसाठी भव्यदिव्य आणि सार्वजनिक स्वरूप दिले गेले. त्यावेळची ती एक राजकीय गरज होती हे मान्य केले तरी आता स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तो उत्सव त्याच स्वरूपात सुरू ठेवण्याची काय आवश्यकता आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. विशेषत: अलीकडील काळात या उत्सवाला जे बिभित्स स्वरूप प्राप्त झाले आहे ते पाहता हा प्रश्न अधिकच संयुिक्तक ठरतो. आता गणेशोत्सव धार्मिक श्रद्धेचा भाग राहिलेला नाही. या उत्सवाच्या माध्यमातून आता निव्वळ राजकारण आणि अर्थकारण केले जाते. बहुजन समाजाने या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. धार्मिक श्रद्धांच्या गुंगीत घोळवून बहुजन समाजाला त्यांच्या खऱ्या प्रश्नांची, समस्यांची जाणीवच होऊ द्यायची नाही, या परंपरागत मार्गाचे एक प्रतीक म्हणून सध्याच्या गणेशोत्सवाकडे पाहावे लागेल. या उत्सवाच्या नावाखाली दहा दिवस नुसता धांगडधिंगा सुरू असतो. अनेक गणेशमंडळाचे कार्यकर्ते वर्गणीच्या पैशातून दारू ढोसतात आणि बरेचदा त्या गणेशाच्या साक्षीनेच हे सगळे गैरप्रकार केले जातात. गणेशाच्या आगमनाची किंवा विसर्जनाची मिरवणूक म्हणजे या कार्यकर्त्यांना नशापाणी करण्याचा मुक्त परवानाच असतो. काही मंडळांनी तर यावरही कडी करीत आपल्या गणेशाची महती वाढावी आणि पैशाचा प्रचंड ओघ आपल्याकडे यावा म्हणून अगदी पद्धतशीरपणे अफवा पसरविण्याचे काम केले आहे. मुंबईतील 'लालबागचा राजा' हे या प्रकारचे एक उत्तम उदाहरण म्हणायला हवे. नवसाला पावणारा गणेश म्हणून त्याची अशी काही प्रसिद्धी करण्यात आली आहे की या केवळ दहा दिवसांत कोट्यवधीचे दान पैसे आणि दागिन्यांच्या स्वरूपात तिथे जमा होते. त्या पैशांचे पुढे काय होते, त्यांचा नीट हिशेब ठेवला जातो की नाही, हे कुणालाच माहीत नाही. मुळात नवसाला पावणारा गणेश अशी त्या गणेशाची प्रसिद्धी करणेच अंधश्रद्धेला खतपाणी देण्यासारखे आहे. अशाप्रकारे खोटी आमिषे दाखवून भाविक लोकांकडून पैसे उकळणे हा खरे तर गुन्हाच आहे. काही लोकांनी या संदर्भात तक्रारदेखील केली आहे आणि या तक्रारीची दखल घेऊन धर्मादाय आयुक्तांनी या मंडळाला नोटीस बजावली आहे. नवस बोलणे म्हणजे शेवटी देवाला लाच देणेच नाही का? आणि गणेश ही एकच देवता असेल तर एका ठिकाणी ती लाच घेऊन भक्तांचे काम करते आणि इतर ठिकाणी मात्र लाच घेत नाही, असे कसे होऊ शकेल? मुळात ही लाचखोरी गणेशाच्या नावाखाली ही मंडळेच करीत असतात आणि त्यातून जमा होणाऱ्या कोट्यवधी रूपयांचे गबन करीत असतात.
राजकारणी लोकांना तर धर्माच्या नावाखाली गुंगीत जगणारे लोक हवेच असतात, त्यामुळे महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा कथित जागृत गणेशाचे आणि इतर देवदेवतांचे मोठे पीक आलेले दिसते. या प्रत्येक ठिकाणी पैशांचा अपहार केला जातो. तुळजापूरच्या मंदिरातून काही किलो सोन्याचे दागिने गायब झाल्याची बातमी फार जुनी झालेली नाही. कोल्हापूरच्या मंदिरातही असाच पैशांचा अपहार झाल्याची बातमी नुकतीच आली आहे. शेगावसारखे काही मोजके अपवाद वगळले तर जवळपास प्रत्येक देवस्थान भक्तीच्या नावाखाली सामान्य लोकांची लूट करणाऱ्या लोकांचे अड्डे झाले आहेत. 'ओ माय गॉड' या चित्रपटात या सगळ्या भोंदुगिरीचे चांगले चित्रण करण्यात आले आहे. बहुजन समाजाचे आर्थिक, मानसिक शोषण करणारी ही सगळी थेरं आता बंद व्हायला हवी आणि त्यासाठी बहुजन समाजानेच पुढाकार घ्यायला हवा, परंतु एरवी पुरोगामित्वाचे नारे देणारे या समाजाचे नेतेच या प्रकारांना उत्तेजन देताना दिसतात. उद्या बहुजन समाज या गुंगीतून बाहेर पडला आणि त्याने आपल्या खऱ्या समस्यांसाठी या नेत्यांना जाब विचारायला सुरुवात केली तर या नेत्यांचे पितळ उघडे पडेल, कदाचित त्यामुळेच ही राजकीय नेतेमंडळी आणि समाजाचे नेते म्हणवून घेणारे लोक अशा उत्सवांच्या किंवा अशा देवस्थानांच्या विरोधात बोलताना दिसत नाही. बहुजन समाजाने 'देव आपले भले करेल' या शोषणवादी मानसिकतेतून आधी बाहेर पडणे गरजेचे आहे. त्या मानसिकतेतून बाहेर पडल्यानंतरच देवदेवतांच्या नावाखाली या मूठभर मंडळींची लूटमार बंद होईल. कोणताही देव नवसाला पावत नाही, लाच घेऊन काम करणारा तो कसला देव? एखाद्या खेड्यात चांगला दवाखाना, दर्जेदार शाळा उभी करायची म्हटली तर कुणी देणगी देणार नाही, परंतु अमुक एक देव नवसाला पावतो म्हटल्यावर त्याच्या पायाशी पैशांच्या राशी ओतल्या जातात. भारत हा अशा वेडगळ लोकांचा देश आहे आणि म्हणूनच या देशाची प्रगती होताना दिसत नाही. आजच्या विज्ञानयुगातही लालबागचा राजा नवसाला पावतो म्हणून त्याच्या हुंडीत अक्षरश: करोडोंचे दान टाकणारे लोक कोणत्या भारताचे प्रतिनिधीत्व करतात, एकविसाव्या शतकातील की सोळाव्या शतकातील? गणेशाला बुद्धिची देवता मानली जाते, तसे असेल तर आता त्या गणेशाकडे एवढीच प्रार्थना करावीशी वाटते की या तुझ्या भक्तांना थोडी तरी बुद्धी दे, त्यांना सांग की पैशाचे आमिष दाखवून कोणत्याच देवाकडून कोणतेच काम केले जाऊ शकत नाही, ही सगळी शोषणवादी व्यवस्था काही स्वार्थी लोकांनी केवळ आपल्या भल्यासाठी उभी केली आहे, त्यांना हेही सांग की देवाची खरी भक्ती करायची असेल तर गरीब, अज्ञानी, पिडलेल्या, पिचलेल्या लोकांची सेवा करा, तुमच्या सारखे त्यांनाही सन्मानाने, स्वाभिमानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्या!
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments
Post a Comment