प्रहार रविवार, दि.16 ऑक्टोबर 2016 , विरोधाभास, स्वागतार्ह आणि प्रश्नार्थक!

प्रहार रविवार, दि.16 ऑक्टोबर 2016विरोधाभास, स्वागतार्ह आणि प्रश्नार्थक!

मराठा समाजाच्या मागण्या मान्य होतील न होतील हा पुढचा प्रश्न आहे, परंतु एक बाब मात्र स्पष्ट आहे की या भारतीय समाजाला ज्या शांततेचे, शिस्तीचे, स्वच्छतेचे वावडे आहे त्या समाजासमोर लाखो मराठ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. खरे तर ही अपेक्षा बौद्ध बांधवांकडून होती, कारण गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा आणि सहजीवनाचा संदेश दिला होता. त्यांच्या मेळाव्यात अशाप्रकारची शिस्त, शांतता आणि स्वच्छता दिसायला हवी होती, परंतु जे चित्र समोर आले ते विरोधाभासीच म्हणावे लागेल.
भारत हा एक खूप महान देश आहे, भारताला खूप मोठी परंपरा लाभली आहे, संस्कृती लाभली आहे, अनेक तत्त्ववेत्ते, गणितज्ज्ञ, आध्यात्मिक ज्ञानी, थोर समाजसेवक भारतात होऊन गेले, हे सगळे खरे असले तरी हा सगळा इतिहास आहे, याचे विस्मरण होऊन चालणार नाही. कोण्या एके काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता या स्वप्नरंजनात आपल्याला आजच्या गरिबीचे उत्तर कसे सापडणार? भारताचा भूतकाळ खूप गौरवशाली होता, हे मान्य केले तरी त्यातून वर्तमानकाळातील परिस्थिती कशी काय बदलणार आहे? भारताचा वर्तमानकाळ भूतकाळाच्या संदर्भात अगदी पूर्णपणे विरोधाभासी आहे. शेवटी आपण जगत असतो ते वर्तमानकाळात आणि चिंता करतो ती भविष्यकाळाची, आपल्या जगण्याशी आणि चिंतेशी भूतकाळाचा तसा फारसा संबंध नसतो. त्यामुळे भूतकाळात आपण किती महान होतो, याचे दाखले देण्यात आता काही अर्थ नाही.
आज भारताचे चित्र काय आहे, परिस्थिती काय आहे आणि कोणत्या क्षेत्रात आपण किती मागासले आहोत, याची चर्चा आणि चिंता करणे गरजेचे आहे. ज्या काळी भारतात सोन्याचा धूर निघत होता त्या काळी इंग्लंड, अमेरिकेतील आदिवासी जमाती गुहेतच चाचपडत होत्या, जनावरांची शिकार करून जगत होत्या, हे मान्य असले तरी आता त्याच अमेरिकेने, इंग्लंडने, युरोपने जी प्रगती केली आहे तिची बरोबरी आपण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. भारत आता इथल्या ज्ञानभंडारासाठी, सुबत्तेसाठी जगात ओळखला जात नाही, भारताची ती ओळख केव्हाच पुसल्या गेली आहे. आज पाश्चात्य जगात भारताची ओळख धुळीने माखलेला, ओंगळवाणा, गलिच्छ, भिकाऱ्यांच्या सुळसुळाट असलेला देश अशीच आहे. अर्थात भारताची ही एकच काळी बाजू पाहिल्या जाते, भारतातील अनेक चांगल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्या जाते, हा आरोप होऊ शकतो आणि त्यात तथ्यदेखील आहे; परंतु जी काळी बाजू आज आपली ओळख म्हणून समोर केली जाते ती तशी आहे, हे सत्यदेखील नाकारता येणार नाही. भारतातून युरोप, अमेरिकेत जाऊन आलेल्या कुणालाही या देशांमध्ये आणि भारतात कोणते अंतर आहे, हा प्रश्न विचारा, त्याचे पहिले उत्तर हेच असेल की युरोप, अमेरिकेत अतिशय स्वच्छता आणि शिस्त आढळून येते, ती आपल्याकडे दिसत नाही. कुण्या भारतद्वेष्ट्या पाश्चात्य माणसाचे हे विश्लेषण नसते, तर आपल्याच देशातील लोकांची ही तक्रार असते. अमेरिकेत किंवा युरोपातील कोणत्याही देशात तुम्ही गेला तरी सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचा एक कपटाही तुम्हाला दिसणार नाही. अगदी सार्वजनिक `टॉयलेटस्'देखील अतिशय स्वच्छ असतात. रस्ते अतिशय रूंद, गुळगुळीत आणि कमालीचे स्वच्छ असतात, रस्त्यांच्या दोन्ही बाजूला आणि रस्तेदुभाजकावरही छान फुलांची झाडे लावलेली असतात, विशेष म्हणजे त्या झाडांचाही कचरा जमिनीवर पडलेला नसतो. तिकडे सर्वत्र आढळून येणारे हे दृष्य भारतात तुम्ही कुठे पाहिले आहे का? गुळगुळीत सुंदर रस्ते हे अजूनही भारतीयांचे स्वप्नच आहे. स्वच्छ `टॉयलेटस्' ही तर संकल्पनाच आम्हाला मान्य नाही. कचरा कचरापेटीत टाका असे आपल्याकडे लोकांना सांगावे लागते, तरीदेखील कचरा कचरापेटीपेक्षा बाहेरच अधिक दिसतो. पान, गुटखा खाऊन कुठेही थुंकणे हा तर आपल्याकडे लोकशाहीने प्रदान केलेला अधिकार समजला जातो. रेल्वे रूळाच्या आजूबाजूची जागा शौचास बसण्याचे आदर्श ठिकाण मानले जाते. अशी खूप उदाहरणे देता येतील. प्रश्न मनोवृत्तीचा आहे. स्वच्छता आणि शिस्त ही मूल्ये आहेत, अंतर्गत जाणीवा आहेत, कुणी शिकवून त्या शिकता येत नाहीत, त्या मुळातूनच असायला हव्या. त्या तशा नसतात तेव्हाच कायद्याने त्या बंधनकारक कराव्या लागतात. आपल्याकडे स्वच्छतेसाठी, शिस्तीसाठी कायदे करावे लागतात, हीच मोठी लाजिरवाणी बाब आहे. कदाचित अनेकांना हे उदाहरण पटणार नाही, परंतु ही वस्तुस्थिती आहे की आषाढी आणि कार्तिकी एकादशी जवळ आली की पंढरपुरातील स्थानिक रहिवाशांच्या पोटात गोळा उठतो, या दोन्ही यात्रांच्या काळात पंढरपुरातील अनेक लोक चार-आठ दिवसांसाठी दुसरीकडे कुठेतरी जाण्याचा बेत आखतात आणि ज्यांना शक्य आहे ते जातात, कारण या काळात महाराष्ट्रातील हे सगळ्यात मोठे तीर्थक्षेत्र घाणीचे अक्षरश: आगर बनलेले असते. ज्या चंद्रभागेच्या वाळवंटात पूर्वी संतांची किर्तने रंगत त्याच चंद्रभागेच्या वाळवंटात नाकाला रूमाल लावल्याशिवाय पाय ठेवता येत नाही आणि स्वत:ला सांभाळून चालण्याची मोठी कसरत करावी लागते. देवाचे हे पवित्र तीर्थक्षेत्र त्या चार-आठ दिवसांत अक्षरश: नरकपुरी झालेले असते. ही केवळ पंढरपूरचीच व्यथा नाही. जिथे कुठेही अशी प्रचंड गर्दी होते तिथे तिथे हीच अवस्था दिसून येते. नुकताच नागपूरला धम्म परिवर्तन सोहळ्याचा समारंभ झाला. त्यासाठी बौद्ध बांधवांची लाखोची गर्दी जमली होती. खरे तर या सोहळ्याची तारीख निश्चित असते, त्यामुळे या सोहळ्याला जाण्यासाठी आधीपासून व्यवस्थित नियोजन करता येऊ शकते, परंतु तसे होत नाही. या एक-दोन दिवसात आरक्षण वगैरे करून रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा जीव अगदी मुठीत असतो, कारण आरक्षण करूनही जागा मिळेलच याची शाश्वती नसते. आरक्षित, अनारक्षित सगळ्याच डब्यात प्रचंड गर्दी असते, हे लोक मोठ्या श्रद्धेने दीक्षाभूमीकडे निघालेले असतात, त्यात वाद असण्याचे कारण नाही; परंतु आपली श्रद्धा इतरांसाठी अडचणीची ठरू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी कुणाची? त्या पवित्र दीक्षाभूमीवर सोहळा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाऊन पाहाल तर सर्वत्र घाणीचे साम्राज्य दिसते. मुंबईच्या दादर चौपाटीवर किंवा शिवाजीपार्कवर हीच परिस्थिती असते. एरवी रोज सकाळी तिकडे फिरायला येणारे लोक या दोन-चार दिवसात तिकडे फिरकण्याचीही हिंमत करू शकत नाही. प्रश्न केवळ स्वच्छतेचा आणि शिस्तीचा आहे, त्याचा धर्माशी, श्रद्धांशी किंवा सामाजिक, आर्थिक मागासलेपणाशी दुरान्वयानेही संबंध नाही.
गौतम बुद्ध हे या देशाचे महान सुपूत्र होते आणि त्यांनी अवघ्या जगाला शांततेचा, सद्भावाचा संदेश दिला, किमान तो संदेश तर समजून घ्या. गौतम बुद्धाच्या पुतळ्यासमोरच प्रचंड कर्कश्श आवाजात डिजे लावून आपण नक्की कुणाचा आदर करीत असतो? खरे तर या संदर्भात अतिशय विरोधाभासी दृष्य गेल्या काही दिवसांत पाहायला मिळाले. ज्या लोकांवर कायम उधम माजविण्याचा, टगेगिरी करण्याचा आरोप करण्यात येतो त्या मराठ्यांनी अतिशय शिस्तीत, शांततेत लाखोंचे मोर्चे काढले आणि एका ठिकाणी नाही, तर महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असे मोर्चे निघाले. मोर्चेही लहानसहान नव्हते, न भूतो न भविष्यती अशी लाखोंची गर्दी त्या मोर्चात होती, परंतु कुठेही घोषणाबाजी नाही, राडेबाजी नाही, गोंगाट नाही, बेशिस्त नाही आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे इतर कुणाचीही अडचण होणार नाही याची खबरदारी मोर्चेकऱ्यांनी घेतली होती. कुणावरही दुकाने बंद करण्याची जबरदस्ती केलेली नव्हती, जी दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने उघडी होती त्यांना मोर्चेकऱ्यांचा कुठलाही त्रास झाला नाही आणि यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे लाखोंची गर्दी जमूनदेखील कुठेही अस्वच्छता दिसली नाही. मोर्चा संपल्यानंतर त्या ठिकाणी गेल्यास इथे काही वेळापूर्वीच लाखोंची गर्दी जमली होती, हे सांगूनही कुणाला खरे वाटणार नाही, असे चित्र दिसायचे. स्वच्छता, शांतता आणि शिस्त यांचे अभूतपूर्व प्रदर्शन एरवी राडेबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मराठ्यांनी संपूर्ण देशासमोर मांडले. आपली प्रतिमा बदलण्याचा त्यांचा हा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद होता आणि म्हणूनच ठिकठिकाणी मराठ्यांच्या मोर्चाला इतर सगळ्याच जाती-समुदायाकडून पाठिंबा मिळत गेला, मोर्चेकऱ्यांसाठी पाण्याची, वैद्यकीय सुविधांची सोय इतर समाजाच्या लोकांकडून केल्या गेली. आजही कोणत्याही समाजातील कुणालाही विचारले तरी तो हेच सांगेल की मराठा समाजाच्या मागण्यांशी आम्ही सहमत असू अथवा नसू, परंतु या समाजाने ज्या शिस्तीत, शांततेत मोर्चे काढले त्याबद्दल त्यांचे आम्हाला कौतुकच आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य होतील न होतील हा पुढचा प्रश्न आहे, परंतु एक बाब मात्र स्पष्ट आहे की या भारतीय समाजाला ज्या शांततेचे, शिस्तीचे, स्वच्छतेचे वावडे आहे त्या समाजासमोर लाखो मराठ्यांनी एक आदर्श घालून दिला आहे. खरे तर ही अपेक्षा बौद्ध बांधवांकडून होती, कारण गौतम बुद्धांनी जगाला शांततेचा आणि सहजीवनाचा संदेश दिला होता. त्यांच्या मेळाव्यात अशाप्रकारची शिस्त, शांतता आणि स्वच्छता दिसायला हवी होती, परंतु जे चित्र समोर आले ते विरोधाभासीच म्हणावे लागेल. हा विरोधाभास एकीकडे स्वागतार्ह यासाठी म्हणावा लागेल की राडेबाज मराठ्यांनी जगाला शिस्तीचे, शांततेचे आणि स्वच्छतेचे धडे दिले आणि चिंतनीय यासाठी म्हणावे लागेल की ज्यांच्याकडून या सगळ्यांची अपेक्षा होती किंवा आहे, त्यांनी मात्र शिस्त, स्वच्छता आणि शांततेचे धिंडवडे काढले. मराठा मोर्च्यांपासून आणि या प्रहारपासून बोध घेऊन भविष्यात काही सुधारणा होईल अशी अपेक्षा.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017