१२ जून२०१६ अंधश्रध्देचा धंदा करणाऱ्यांना कोण आळा घालणार?

अंधश्रध्देचा धंदा करणाऱ्यांना कोण आळा घालणार?

भोंदू बाबा, वैदू, महाराज, मांत्रिक ही सगळी मंडळी अडाणी लोकांची थेट फसवणूक करतात म्हणून त्यांच्या अशा कारवायांना कायद्याद्वारे पायबंद घातल्या गेला; परंतु जे शिक्षित, पांढरपेशे लोक याच अंधश्रद्धांचा बाजार मांडून अप्रत्यक्षरित्या लोकांची केवळ फसवणूकच करीत नाही, तर एकप्रकारे अंधश्रद्धा पसरविण्याचेही काम करतात त्यांना कोण जाब विचारणार?
महाराष्ट्रात दाभोळकर, श्याम मानवांसारख्या कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा पारित करण्यात आला. अंधश्रद्धेच्या नावाखाली ग्रामीण भागातील अडाणी, भोळसट आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत लोकांची जी काही लूट कथित बुवा, बाबा, भगत, मांत्रिक वगैरे मंडळी करीत होती, त्यातून या गरीब लोकांची सुटका करण्यासाठी, त्यांची पिळवणूक थांबविण्यासाठी अशा कायद्याची नितांत गरज होतीच. अर्थात श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील अंतर अतिशय तरल असल्याने कोणत्या गोष्टी श्रद्धेच्या प्रांतात मोडतात आणि कोणत्या अंधश्रद्धेच्या हे ठामपणे सांगता येत नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच कुठलाही शास्त्रीय आधार नसलेल्या गोष्टींचा वापर करीत एखाद्याची शारीरिक, मानसिक आणि आर्थिक पिळवणूक करणे दंडनीय अपराध ठरावा, ही बाब अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात प्रामुख्याने नमूद करण्यात आली. एखाद्याची कुठल्या तरी बाबा, बुवा किंवा देव, देवतेवर श्रद्धा असेल, भलेही त्याला कोणताही शास्त्रीय आधार नसला तरी जर त्या श्रद्धेतून त्या व्यक्तीचे कुठल्याही प्रकारचे शोषण होत नसेल, तर त्याला अशी श्रद्धा ठेवण्यास कुठलीही मनाई करण्यात आलेली नाही. महत्त्वाचा मुद्दा हाच की श्रद्धेच्या किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली कुणालाही कुणाचेही आर्थिक, मानसिक, शारीरिक शोषण करता येणार नाही, हा अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा गाभा आहे.
  वर म्हटल्याप्रमाणे विशेषत: ग्रामीण भागातील लाखो लोकांना या माध्यमातून होणाऱ्या पिळवणुकीतून बाहेर काढण्यासाठी असा कायदा आवश्यकच होता. या कायद्याच्या अनुषंगाने कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या म्हणजेच अंधश्रद्धेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची फसवणूक जर अपराध ठरत असेल, तर सध्या छोट्या पडद्यावर सुरू असलेल्या अनेक मालिकांवर, त्यांच्या निर्मात्यांवर, दिग्दर्शकांवर कारवाई का केली जाऊ शकत नाही? एका वाहिनीवर 'नागिन आणि कवच' नावाची मालिका सुरू आहे. या मालिकेत जे काही दाखविले जात आहे, ते म्हणजे अंधश्रद्धेचे अगदी कमाल उदात्तीकरणच म्हणायला हवे. मालिकांमधून कोणता विषय हाताळायचा, याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे, असा दावा निर्माता-दिग्दर्शक करू शकतात; परंतु तो पोकळ आहे. अभिव्यक्ती अथवा माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही काहीही दाखवू शकत नाही. चित्रपटांमधून असे काही दाखविले जाऊ नये म्हणून चित्रपटाचे परीक्षण करणारे सेन्सार बोर्ड आहे, जर चित्रपटांना असे काहीही दाखविण्याचे स्वातंत्र्य नसेल तर छोट्या पडद्यावरील मालिकांना ते कसे असू शकते? आपल्याकडे `काहीही' याचा संबंध केवळ लैंगिक दृष्यांसोबत जोडला जातो; परंतु थोडा खोलवर विचार केला, तर किमान त्या दृष्यांना कुठेतरी वास्तवाची जोड असते, फक्त सार्वजनिकरित्या असे दृष्य दाखविणे आपत्तीजनक ठरते; परंतु ज्या दृष्यांना किंवा संपूर्ण चित्रपट अथवा मालिकांनाच कुठलाही आधार नाही, त्या मालिका केवळ अंधश्रद्धांचा बाजार मांडून पैसे कमावित असतील तर त्यांना कुणी रोखायचे? ही प्रेक्षकांची म्हणजेच ग्राहकांची फसवणूकच नाही का? अंधश्रद्धेच्या नावाखाली भोळसट, अडाणी लोकांची फसवणूक होऊ नये, लुबाडणूक होऊ नये म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तयार करण्यात आला असेल, तर त्याच आधारावर 'नागिन'सारख्या मालिकांमधून लोकांची आर्थिक फसवणूक केली जात आहे, असे म्हणता येणार नाही का? भलेही त्यात प्रेक्षकांची प्रत्यक्ष फसवणूक होत नसेल, परंतु मालिकेच्या निर्मितीसाठी आणि इतर कारणांसाठी झालेला खर्च शेवटी कुठून तरी वसूल केला जात असेलच आणि त्याचा बोजा शेवटी सामान्य लोकांच्या खिशावरच पडत असेल. ही एकप्रकारे अप्रत्यक्ष फसवणूकच नाही का? `रात्रीस खेळ चाले' नामक अशीच एक मालिका सध्या एका वाहिनीवर सुरू आहे. सुरुवातीला या मालिकेच्या विरोधात हाकाटीही झाली; परंतु नंतर काहीतरी `सेटलमेन्ट' झाली आणि मालिका पूर्ववत सुरू राहिली. या मालिकेतून आम्ही भूतखेत, तंत्र-मंत्र या सगळ्या गोष्टी बिनबुडाच्या आहेत, हेच दाखविणार आहोत असे कदाचित मालिकेचे निर्माते म्हणत असतील, परंतु ते सगळे दाखविले जाईल मालिकेच्या शेवटच्या एक-दोन भागात, तत्पूर्वी मालिकेचे हजार भाग या अंधश्रद्धेला खतपाणीच घालत राहणार, त्याचे काय? भोंदू बाबा, वैदू, महाराज, मांत्रिक ही सगळी मंडळी अडाणी लोकांची थेट फसवणूक करतात म्हणून त्यांच्या अशा कारवायांना कायद्याद्वारे पायबंद घातल्या गेला; परंतु जे शिक्षित, पांढरपेशे लोक याच अंधश्रद्धांचा बाजार मांडून अप्रत्यक्षरित्या लोकांची केवळ फसवणूकच करीत नाही, तर एकप्रकारे अंधश्रद्धा पसरविण्याचेही काम करतात त्यांना कोण जाब विचारणार? अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणाऱ्या मंडळींनी खरे तर हा विषय आता हाती घ्यायला हवा. छोट्या आणि मोठ्या पडद्याच्या माध्यमातून जी अंधश्रद्धा पसरविली जात आहे, नुसतीच पसरविली जात नसून त्याद्वारे कोट्यवधी रुपयांचा व्यापार केला जात आहे, त्या विरोधात आता आवाज उठवायला हवा, त्यांना वेसण घालणारे कायदे करायला हवेत. खरे तर भगत, मांत्रिक, तांत्रिक यांना चाप लावणे फारसे कठीण काम नाही, खरे आव्हान बुद्धिवादी म्हणवल्या जाणाऱ्या लोकांकडून व्यावहारिक कौशल्याचा वापर करीत बेमालूमपणे पसरविल्या जात असलेल्या अंधश्रद्धेला रोखण्याचे आहे. मागे काही दिवसांपूर्वी राज्यात महिलांना देवाच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळावा, शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळावा वगैरे कारणांसाठी मोठी चळवळ झाली. त्याचा संबंध महिलांना बरोबरीचा हक्क मिळण्यासोबत जोडल्या गेला आणि म्हणूनच तो युिक्तवाद बिनतोड ठरला; परंतु त्या बिनतोड युिक्तवादाच्या बुरख्याखाली महिलांना देव-देवतांच्या नादी लावण्याचा, त्यांच्यातील वैज्ञानिकदृष्टी संपविण्याचा, त्यांचा विवेकवाद नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप केला जाऊ शकतो. ठीक आहे, बरोबरीचा हक्क म्हणून आम्ही एकदा शनिच्या चौथऱ्यावर जाऊन शनिला तेलाचा अभिषेक करू, अंबाबाईच्या गाभाऱ्यात एकदा प्रवेश करून जी काही पूजाअर्चा करायची ती करू; परंतु त्यानंतर आम्हीच अशा अंधश्रद्ध विचारांना ठोकरून पुन्हा कधीही त्या शनिकडे पाहणारही नाही, अशी भूमिका या आंदोलनकर्त्यांनी घेतली असती तर ते योग्य ठरले असते. श्रद्धा असणे वाईट नाही, परंतु ती मानसिक आणि बौद्धिक विकासाला, सक्षमतेला पोषक असायला हवी, तशी ती नसेल, बुद्धिवादाची कवाडे बंद करणारी असेल, विवेकवादावर पडदा टाकणारी असेल तर अशी श्रद्धा केवळ मानसिक गुलामगिरीला बळ देणारी ठरते आणि त्यातूनच पुढे विविध प्रकारच्या शोषणाला आपण बळी पडत असतो. विशेषत: महिला वर्ग यात अधिकच भरडला जातो. अशा `सोफिस्टिकेटेड' अंधश्रद्धेला बळी पडणारे लोक अशिक्षित, अडाणी नसतात आणि हीच बाब अतिशय चिंतेची आहे.
  ग्रामीण भागातील वैदू किंवा बुवा-बाबाकडे जाणारे लोक अडाणी असतात, त्यांचे योग्य प्रबोधन केले, त्यांना योग्य शास्त्रीय माहिती दिली तर ते नक्कीच सुधारू शकतात; परंतु जे शिक्षित आहेत, ज्यांना शास्त्रीय ज्ञान आहे त्यांचे प्रबोधन कसे करणार? अशा लोकांमधील वाढत चाललेली अंधश्रद्धा कशी थोपविणार? भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात `इस्रो'च्या एका निवृत्त प्रमुखाने त्यावेळी अंतराळ यानाचे प्रक्षेपण सफल व्हावे म्हणून त्या अंतराळ यानाची सोन्याची प्रतिकृती करून ती तिरूपतीच्या बालाजीला समर्पित केली होती. `इस्रो'चा प्रमुखच जर इतका अंधश्रद्ध असेल तर इतरांबद्दल काही बोलायलाच नको. सांगायचे तात्पर्य अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याने ग्रामीण भागातील अडाणी जनतेची त्यांच्यावर लादल्या गेलेल्या शोषणातून भलेही मुक्तता झाली असेल, परंतु ज्या सुशिक्षित वर्गाने स्वत:हून अंधश्रद्धेची झापडे आपल्या डोळ्यासमोर लावली आहेत, त्यांच्यासाठी कोणता कायदा करावा? प्रबोधनाचे म्हणावे तर ही मंडळी आधीच सुशिक्षित आहे, त्यांचे काय नव्याने प्रबोधन करायचे? मूळ समस्या आपल्या समाजाच्या दैववादी मानसिकतेत आहे. ही मानसिकता जेव्हा कर्मवादी होईल तेव्हाच इथल्या सगळ्या अंधश्रद्धा आपोआप गळून पडतील.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017