प्रहार रविवार, दि. 7 ऑगस्ट 2016



आमचे संविधान आम्हाला कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याची ग्वाही देते. कायद्याचे राज्य या संकल्पनेत अर्थातच सर्वांना समान न्याय हे तत्त्व अंतर्भूत आहे. सर्वांना समान न्याय म्हणजे कोणत्याही कारणाने कोणत्याही व्यक्तीला विशेष वागणूक मिळणार नाही, कायदा मोडणाऱ्या सगळ्यांना सारखीच शिक्षा होईल, कुणालाही त्यातून सवलत मिळणार नाही असाच त्याचा अर्थ होतो. कायद्याने सगळ्यांना समान वागणूक देणारे संविधान आम्ही स्वीकारले हे तर खरे आहे, परंतु त्या संविधानाची म्हणजेच कायद्याची आपल्या देशात ज्या प्रकारे वाट लावली जाते ते पाहता या देशात खरोखरच कायद्याचे राज्य आहे काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कायदे पुस्तकातच बंदिस्त राहतात आणि या कायद्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आपल्या सोईने कायद्यांचा अर्थ लावत असतात. त्यातूनच मग एकासाठी एक तर दुसऱ्यासाठी दुसरा न्याय असे प्रकार सर्रास घडताना दिसतात.
  कायदा मोडणे हा भारतात गुन्हा आहे जरूर,  परंतु कायदा कुणी मोडला हे इथे अधिक महत्त्वाचे ठरते. कायदा मोडणाऱ्याचे सामाजिक, राजकीय स्टेटस पाहिले  जाते. सामान्य माणसाने कायदा मोडला तर त्याची त्वरित तुरूंगात रवानगी होते, त्याच्यावर शक्य होतील तितकी कलमे पोलिसांतर्फे लावली जातात, त्याने खरोखरच गुन्हा केला की नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला असतो खरा; परंतु सामान्य माणसांची प्रकरणे सुनावणीसाठी वर्षोनुवर्षे पडून राहतात आणि तोपर्यंत तो बिचारा कच्चा कैदी म्हणून तुरूंगात खितपत पडून राहतो. त्यात त्याची उमेदीची वर्षे वाया जातात, त्याच्या कुटुंबाची पार दैना होते, पुढे पाच-दहा वर्षांनंतर तो निर्दोष ठरून बाहेर आला तरी त्याचे आयुष्य वाया गेलेले असते; परंतु सेलेब्रिटी अर्थात राजकीय, सामाजिक, आर्थिकदृष्ट्या ताकदवर असलेल्या लोकांच्या बाबतीत असे कधीच होत नाही. सत्र न्यायालयाने दुपारी दोन वाजता दोषी ठरविल्यानंतर संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल होऊन उच्च न्यायालय त्या निकालावर स्थगनादेश देत संबंधित आरोपीला जामिन मंजूर करते, उसेन बोल्ट या धावपटूलाही लाजवेल अशी ही विक्रमी धावपळ वकिलमंडळींतर्फे केवळ आरोपीचे नाव सलमानखान असेल तरच होऊ शकते. त्याच्या जागी इतर कुणी असते तर उच्च न्यायालयाने सक्षम वकिलाच्या प्रतिवादाअभावी पाच-दहा वर्षे त्याच्या जामिन अर्जाकडे ढुंकूनही पाहिले नसते. हे केवळ एकच उदाहरण नाही, अशी अनेक उदाहरणे आपल्याला नेहमीच पाहायला, ऐकायला मिळत असतात. कोणत्याही बड्या व्यक्तीला अटक करण्याचे धाडस इथले पोलिस दाखवत नाही, त्यामागे त्यांच्यावर येणारा राजकीय दबाव हे जसे कारण असते तसेच अशा बड्या व्यक्तींनी अटक टाळण्यासाठी आपल्या तिजोरीचे तोंड मोकळे सोडलेले असते, हेदेखील एक प्रमुख कारण असते. इतके सगळे करूनही अटक अपरिहार्य ठरलीच तर संबंधित आरोपीच्या लगेच छातीत दुखायला सुरुवात होते आणि पुढे त्याला जामिन मंजूर होईपर्यंत तो एखाद्या 'फाईव्ह स्टार' हॉस्पिटलमध्ये आराम करतो. तुमच्याजवळ पैसा असेल, तुमच्या पाठीशी राजकीय पाठबळ असेल तर या देशाचे कायदे तुम्ही पाहिजे तसे वाकवू शकता आणि हे  काही नसेल तर मात्र कर्तव्यकठोर पोलिस आणि नि:पक्ष न्याययंत्रणा तुम्हाला कायमची अद्दल घडविल्याशिवाय राहत नाही.
 हे केवळ भारतातच होते, अन्य देशात, विशेषत: पुढारलेल्या देशात असे लाड कुणाचेच होत नाही. अगदी काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती, की अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नीने चुकीच्या जागी गाडी पार्क केली म्हणून तिला दंड करण्यात आला आणि तिनेही तो झक्कत भरला. भारतात असे कधी होऊ शकले असते? अध्यक्ष, पंतप्रधान वगैरे तर खूप दूरची गोष्ट राहिली, साध्या आमदाराला चुकीच्या पार्किंगसाठी दंड करण्याची हिंमत इथले पोलिस दाखवू शकत नाही. एखाद्या प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याने हे धाडस केलेच तर दुसऱ्याच दिवशी त्याची नक्षलग्रस्त भागात बदली झालेली असते. हा देश 'इंडिया' आणि 'भारत' अशा दोन भागांत विभागल्या गेला आहे, हा आरोप आम्ही नेहमीच करत आलो आहोत आणि तो आरोप सत्य असल्याचे सिद्ध करण्याचा जणू काही विडाच इथल्या पोलिस तसेच प्रशासकीय यंत्रणेने उचलला आहे. इतर देशात पोलिसांना लाच देणे गुन्हा आहे आणि तसे करण्याचा कुणी प्रयत्न केलाच तर त्याची तत्काळ तुरूंगात रवानगी होते, तसे पाहिले तर आपल्याही देशात लाच देणे-घेणे गुन्हा आहे, परंतु प्रत्यक्षात लाच देणाऱ्याला इथे सन्मानाची वागणूक मिळते. लाच देणाऱ्याची गैरसोय होणार नाही याची खबरदारी इथली यंत्रणा घेते, पोलिस त्यांच्याशी अदबीने वागतात, इतर कार्यालयांमध्येही हातची चार कामे बाजूला ठेवून अशा लाचखोरांचे काम आधी केले जाते. लाच देणारा किती मोठा आहे आणि दिल्या गेलेली लाच किती मोठी आहे, यावर त्याची कशी बडदास्त ठेवायची हे ठरविले जाते. एखाद्याने लाच देता प्रामाणिकपणे, कायद्याच्या चौकटीत वगैरे राहून आपले काम करवून घेण्याचा प्रयत्न केलाच तर याच कायद्याचा, कलमांचा वापर करून त्याचा प्रचंड मानसिक छळ केला जातो.
 एखादे काम विशिष्ट वेळेत पूर्ण झाले पाहिजे, असा काही नियम इथे नाही आणि असला तरी तो केवळ भिंतीवर टांगून ठेवण्यापुरताच आहे. इथे नियम एकच आहे आणि तो म्हणजे टेबलखालून पैसे द्या आणि आपले काम झटपट करून घ्या, अन्यथा दोन मिनिटाच्या कामासाठी किमान दोन वर्षे तरी तुम्हाला सरकारी कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतील. लाच देण्याघेण्याचा प्रकार आता इतका सर्रास होत आहे, की त्यात आपण काही चुकीचे करीत आहोत असे कुणालाच वाटत नाही. अगदी देवाच्या मंदिरातही रांगेत दर्शन घेण्यापेक्षा शे-पाचशे देऊन मागच्या दाराने आत जायचे आणि दर्शन घेऊन तत्काळ बाहेर पडायचे, ही मानसिकता लोकांमध्ये बोकाळली आहे. देवाच्या दारातही लाचखोरी करण्यासाठी जे लोक तयार असतात त्यांना इतर ठिकाणी पैसे देऊन काम करून घेण्याची लाज वाटण्याचे कारणच नाही. लाच देणाऱ्या या लोकांमुळे लाच घेणाऱ्यांचे निर्ढावलेपण वाढत आहे. दोष दोन्ही बाजूंचा आहे. लाच घेतली जाते कारण ती दिली जाते. साधी शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी वीस-पंचवीस लाख सहज मोजले जातात. अशाप्रकारे लाच देऊन शिक्षक झालेले भावी पिढ्यांवर कोणते संस्कार करणार? शिस्त, स्वच्छता, कायद्याचे पालन या तिन्ही बाबी कोणत्याही समाजाच्या, देशाच्या उन्नतीसाठी खूप महत्त्वाच्या ठरतात आणि नेमक्या याच तीन बाबतीत आपला देश अक्षरश: मागासलेला आहे.  त्याचे कारण शाळा किंवा कॉलेजमध्ये कायदा हा विषयच नसतो आणि त्याचे प्राथमिक जुजबी ज्ञानही मुद्दाम दिले जात नाही. अमेरिका, ऑस्ट्रेलिया किंवा युरोपिय देशांमध्ये तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला तिथे रस्त्यावर कागदाचा साधा कपटा पडलेला दिसणार नाही. रस्त्याच्या दोन्ही बाजूला आणि दुभाजकावर सुंदर फुलझाडे, प्रसन्न हिरवळ पाहायला मिळेल. रस्त्यावर खड्डा हा प्रकारच नाही, ही स्वच्छता, ही टापटीप तिकडेच शक्य आहे कारण तिकडचे लोक खऱ्या अर्थाने संस्कारीत आहेत, रस्त्यावर घाण करू नका, कचरा टाकू नका, इथे लघवी करू नका असे बोर्ड तिकडे लावावे लागत नाही. कायदा आपल्यासाठी असतो आणि त्याचे पालन करणे ही आपलीच जबाबदारी आहे याचे भान आणि जाणीव त्या लोकांना असते. आपल्याकडे मात्र कायदा मोडणे हाच पुरुषार्थ मानला जातो. गुन्हा करूनही मोकाट फिरणाऱ्याला आपल्याकडे प्रतिष्ठित समजले जाते. तो मोठा माणूस आहे, त्याचे काय वाकडे होणार, ही सर्वसामान्यांची प्रतिक्रिया असते. आपल्याकडची ही मानसिकता जोपर्यंत बदलत नाही आणि खऱ्या अर्थाने कायद्याचा धाक प्रस्थापित होत नाही तोपर्यंत इथे 'कायद्या()चे' हाच मंत्र प्रभावी ठरणार आहे.
  थोडक्यात हेच, की अमेरिका, लंडन, ऑस्टे्रलिया, कॅनडा, दुबई, सिंगापूर, जपान इत्यादी देशांमध्ये तुम्ही जर कायदा पाळला, तर तुमच्यासारखा सुखी मनुष्य नाही आणि मोडला, तर मात्र त्याची शिक्षा कुणीच टाळू शकत नाही आणि भारतात मात्र तुम्ही जर कायदा पाळला, तर तुमच्यासमोर अडचणींचे डोंगर उभे राहतील आणि कायदा मोडला, तर सगळ्याच गोष्टी सोप्या आहेत.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
 Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

प्रहार,रविवार, दि. 28 जून 2015 सरकार कुणाचे, दारुड्यांचे की शेतकऱ्यांचे?