शेतकरी कोमात, मराठे मौनात आणि भाजपा जोमात! प्रहार रविवार, दि.26 फेब्रुवारी 2017
प्रहार रविवार,
दि.26 फेब्रुवारी 2017
शेतकरी कोमात,
मराठे मौनात
आणि भाजपा
जोमात!
नगरपालिकांपाठोपाठ
महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीतही राज्यातील जनतेने भाजपला कौल दिला. हा जनतेचा कौल आहे, त्यामुळे तो सन्मानपूर्वक स्वीकारायलाच हवा, परंतु त्याचे विश्लेषण, त्याची चिकित्सा केली जाऊ शकते आणि ती व्हायलादेखील हवी. भाजपचे नेते आज हेच सांगत आहेत की नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक, विकासाभिमुख राजकारणावर राज्यातील जनतेने आपल्या मान्यतेची मोहोर उमटविली. भाजपचा मोठा विजय झाल्यामुळे त्यांच्या नेत्यांचे सगळेच तर्क मान्य करावे लागतील किंवा किमान ऐकून तरी घ्यावेच लागतील, परंतु वस्तुस्थिती काय आहे, याचाही विचार व्हायला हवा. भारतातील मतदार सुज्ञ आहेत, असे म्हटले जाते. कोणत्याही भूलथापांना ते बळी पडत नाहीत आणि आपली ताकद मतपेटीच्या माध्यमातून ते वारंवार दाखवित असतात, असेही बोलले जाते. हे वरकरणी सत्य वाटत असले तरी हे काल-परवाचे निकाल मतदारांच्या सुज्ञतेवर प्रश्नचिन्ह लावणारे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. गेल्या दोन-अडीच वर्षांत केंद्रातील किंवा राज्यातील भाजप सरकारने असे कोणते भव्यदिव्य काम केले की नगरपालिका, महापालिका, जिल्हापरिषद अशा सगळ्याच स्तरांवर भाजपला घवघवीत यश मिळावे? या सरकारच्या काळात शेतकरी समाधानी आहेत? या सरकारच्या काळात लहान-मोठे व्यापारी, उद्योजक समाधानी आहेत? बेरोजगारांचा प्रश्न सुटला आहे? गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले आहे? एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला अत्यंत कमी भाव आणि दुसरीकडे महागाई मात्र जोमात हे दुष्टचक्र भेदल्या गेले आहे? या सगळ्या प्रश्नांचे उत्तर नकारार्थी असेल तर भाजपच्या यशाच्या चढत्या आलेखाचे रहस्य काय?
शहरी भागात भाजपला चांगले यश मिळाले; परंतु ते अपेक्षित होते. शहरी भागात भाजपची आधीपासूनच चांगली ताकद होती, कारण सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळालेली आणि भाजीपाला, धान्य इत्यादी जीवनावश्यक(?) वस्तुंच्या किंमती कमी झालेल्या असूनही महागाई भत्ता वाढतच असणारी नोकरदार मंडळी तसेच इतर शहरांत राहणाऱ्या मंडळींनासुद्धा या जीवनावश्यक(?) वस्तू स्वस्त मिळत होत्या; परंतु ग्रामीण भागाचे काय? मोदी सरकारच्या नोटबंदीने सर्वाधिक त्रास सहन करावा लागला तो शेतकऱ्यांना. त्यांचे अपरिमित नुकसान झाले. त्यांचा शेतातला तयार झालेला माल जसे संत्रा, फळे, भाजीपाला घ्यायला कुणी तयार नव्हते. व्यापारीदेखील नोटबंदीने त्रस्त होते. आपल्याकडील जुन्या नोटा खपविण्यासाठी व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना नगदी पैसा हवा असेल तर या जुन्या नोटा स्वीकाराव्या लागतील अशी अट घातली. त्या जुन्या नोटांचा काहीच फायदा नव्हता. त्या बँकेत जमा केल्या, तरी बँकेतून पैसे काढण्यावर मर्यादा होती. जिल्हा बँकांच्या व्यवहारावर सरकारने बंदीच घातली होती आणि बहुतेक शेतकऱ्यांची खाती याच जिल्हा बँकेत असल्यामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व संकटाला तोंड द्यावे लागले. शिवाय गेल्या वर्षीच्या तुलनेत शेतकऱ्यांच्या पिकाला अर्ध्यापेक्षा कमी भाव मिळत होता. त्यातच तुरीच्या आणि चण्याच्या पेरणीच्या दिवसात भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास असल्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन्ही पिकांची पेरणी केली होती त्यामुळे देशांतर्गत उत्पादन अगदी बंपर म्हणावे असे झालेले असताना सरकारने 'डाळ दर आणि साठा नियंत्रण कायदा' आणला. वरून तुरीची आणि चण्याची आयात करून बाजारातील या दोन्हींचे भाव पाडले. इतर पिकांचीही हीच गत झाली. कोणताही शेतकरी सरकारच्या कामगिरीवर किंवा सरकारच्या या धोरणावर समाधानी नव्हता. तो सरकारवर प्रचंड नाराज होता, ही नाराजी व्यक्त करण्याची एक सुवर्णसंधी शेतकऱ्यांकडे होती. ही नाराजी मतपेटीतून व्यक्त झाली असती तर किमान सरकारला आपल्या धोरणांवर पुनर्विचार करावा लागला असता. शेतकऱ्यांच्या नाराजीची दखल घ्यावी लागली असती, परंतु झाले उलटेच. ज्या जिल्हा परिषदांमध्ये पूर्वी दोन-तीन सदस्य निवडून आले तरी मोठी कामगिरी केली असे भाजपला वाटायचे त्याच जिल्हा परिषदांमध्ये सत्ता स्थापनेच्या जवळपास भाजप पोहचली आहे, अनेक जिल्हा परिषदांमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. विदर्भातील वर्धा, चंद्रपूर जिल्हा परिषदांमध्ये भाजप सत्तेत आली आहे तर गडचिरोली, बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद जिल्हा परिषदांमध्येही भाजप सगळ्यात मोठा पक्ष ठरला आहे. विदर्भ, मराठवाड्यातच शेतकऱ्यांच्या समस्या अधिक गंभीर आहेत. शेजारच्याच शेतकऱ्यानी थोडा धुरा इकडचा तिकडे केल्याबरोबर, किंवा कुण्या रस्त्यावरच्या वाटसरूने शेतातील दोन-चार हरभऱ्याची झाडे उपटली तर हातात कुऱ्हाड घेणारा शेतकरी भाजपने भाव पाडून शेतकऱ्यांच्या घरातील हजारो-लाखों रुपयांवर दरोडा घातलेला असताना त्याचा बदला घेण्याऐवजी त्यांना निवडून देतो, हे लक्षात घेता भाजपचे यश विस्मयचकित करणारे ठरते. या भागातील बहुतेक शेतकरी मराठा समाजाचे आहेत आणि दोन-चार महिन्यांपूर्वीच या शेतकऱ्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आपल्या विराट शक्तीचे दर्शन संपूर्ण देशाला घडविले होते. ती प्रचंड शक्ती, ती प्रचंड एकजूट गेली कुठे, हा प्रश्न आता उपस्थित होऊ पाहत आहे. यामागचे एक तर्कसंगत कारण प्रभावी विरोधी पक्ष किंवा पर्याय मतदारांपुढे नसणे हे असू शकते आणि दुसरे कारण मोदी, फडणवीस यांच्या चेहऱ्यावरील आश्वासकतेची भुरळ अजूनही कायम आहे, हे असू शकते. लोकसभेत अभूतपूर्व यश संपादन केल्यानंतर भाजपने अगदी पद्धतशीरपणे विरोधकांचे खच्चीकरण करण्यास सुरुवात केली. लोकसभा, विधानसभेत बसलेल्या धक्क्यातून काँग्रेेस, राष्ट्रवादी अजूनही सावरली नसल्याचे दिसते. सरकारच्या विरोधात लोकांमध्ये असलेल्या नाराजीचा लाभ या पक्षांना उठविता आला नाही. खरे तर राजकीय गरज ओळखून दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन भाजप सरकारच्या विरोधात रान माजवायला हवे होते, परंतु दुर्दैवाने तसे झाले नाही. भाजपला लोकसभेत घेरण्याऐवजी केवळ `बाथरुममध्ये रेनकोट घालून आंघोळ करणारे पंतप्रधान' अशी शेलकी टिप्पणी केल्याबरोबर काँग्रेससारखा विरोधी पक्ष त्याच शब्दाचा कीस पाडत बसला. शिवाय या पक्षामधील अंतर्गत गटबाजीदेखील पक्षाची ताकद कमकुवत करण्यास कारणीभूत ठरली. गेल्या काही महिन्यांत तर विरोधी पक्षाची भूमिका सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने वठविण्यास सुरुवात केली होती. विरोधकांच्या या विस्कळीत कमकुवतपणाचा भाजपने अगदी पुरेपूर फायदा उचलला आणि लोकांसमोर आपणच एक समर्थ पर्याय असल्याचे ठासून सांगितले. केंद्रात भाजपचे सरकार आहे, राज्यातही भाजपचेच सरकार आहे आणि अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था भाजपकडे आल्यास झपाट्याने विकास होईल, हा भाजपचा प्रचार प्रभावी ठरला. हा प्रचार किती परिणामकारक होता याचा उत्तम दाखला म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे देता येईल. आजपर्यंत या महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे, अजित पवारांचे वर्चस्व राहिले आणि हे केवळ राजकीय स्वरूपाचे वर्चस्व नव्हते तर या महापालिकेत राष्ट्रवादीने प्रचंड विकासकामे केली होती. राज्यात सर्वाधिक विकसित महापालिका म्हणून पिंपरी-चिंचवडचा उल्लेख केला जायचा. लोकांनी विकासाला साथ द्यायचा विचार केला, असे म्हणायचे तर या महापालिकेत पुन्हा राष्ट्रवादीलाच संधी मिळायला हवी होती, परंतु तसे झाले नाही. गेल्यावेळी केवळ तीन नगरसेवक महापालिकेत असलेल्या भाजपने यावेळी प्रचंड मुसंडी मारत तब्बल 77 जागा पटकावित स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. विलासराव देशमुखांसारखा मुख्यमंत्री देणाऱ्या लातुर जिल्हा परिषदेत गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती, ती सत्तादेखील भाजपने उलथून टाकीत स्वबळावर ही जिल्हा परिषद काबीज केली. नगण्य अस्तित्व असलेल्या प.महाराष्ट्रातही भाजपने मुसंडी मारत सांगली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा रोवण्याचा दावा मजबूत केला आहे. ही सगळी आकडेवारी भल्याभल्या राजकीय तज्ज्ञांना तोंडात बोट घालायला लावणारी आहे. इतर पक्षांची विश्वासार्हता कमी होणे आणि त्याचवेळी विकासाच्या संदर्भात गोबेल्स थाटाच्या भाजपच्या प्रचाराची भुरळ लोकांना पडणे हेच भाजपच्या यशाचे कारण म्हणता येईल. लोकशाहीत विरोधी पक्ष प्रबळ असणे म्हणजेच लोकांकडे एक पर्याय उपलब्ध असणे आवश्यक ठरते. भाजपचे आक्रमक राजकारण बघता हा पर्यायच संपविण्याचे प्रयत्न तर केले जात नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे. सत्ता आणि पैशाच्या जोरावर विरोधी पक्षातील नेते आपल्याकडे खेचण्याचे काम भाजपने जोरात सुरू केले आहे. शिवसेनेला आपल्या विरोधात भूमिका घेण्यास भाग पाडून विरोधकांची ताकद विभाजित करण्याचा भाजपचा डावदेखील यशस्वी होताना दिसत आहे. आता पुढचे दोन वर्षे निवडणुका नाहीत. सेनेने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला तर कदाचित विधानसभेच्या मूदतपूर्व निवडणुका होऊ शकतात, परंतु ताज्या निकालाकडे पाहून शिवसेना ही हिंमत करेल असे वाटत नाही. त्यामुळे या दोन वर्षांत सत्ता आणि पैशाच्या जोरावर भाजप आपली ताकद वाढवत नेणार आणि भाजपच्या संघीय राजकारणाला बळी पडलेल्या विरोधकांची ताकद अधिकच क्षीण होणार. राजकारणात हे सगळे चालायचेच असे म्हटले तरी यात खरे मरण होणार ते शेतकऱ्यांचे. निवडणुकीत मिळालेले यश म्हणजे आपल्या धोरणांचा विजय आहे, असे मानणारे भाजप सरकार पुढच्या काळातही शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्षच करण्याची शक्यता आहे. या सरकारला वेळेवर जागे करण्याची एक मोठी संधी शेतकऱ्यांकडे होती, ती त्यांनी गमावली असे म्हणता येईल. या पृष्ठभूमीवर आता 'भाजप जोमात आणि शेतकरी कोमात' अशीच परिस्थिती निर्माण होणार आहे. या सरकारला खडबडून जागे करण्याचे काम लाखोंच्या मराठा मोर्चाने केले होते; परंतु ही मराठ्यांची ताकददेखील मतपेटीत विरघळून जाऊन ते कोमात गेले, असेच म्हणावे लागेल.
फेसबुकवर
प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि
ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता:
Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या
प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments
Post a Comment