कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!

*'प्रहार'* रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२०

*कोरोनाचा बाजार आणि धास्ती...!*
(लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)

_या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्‍या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्‍यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे._

    सध्या भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला *कोरोना नामक नव्या आतंकवादाने* अगदी झपाटून टाकले आहे. हा कोरोना कशामुळे होतो, माहीत नाही. म्हणजे कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलात तर कोरोना होतो, हे सांगितले जाते, परंतु कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाला कोरोना होतोच असे ठामपणे कुणीही म्हणू शकत नाही. कोरोनावर उपचार आहे का, माहीत नाही, म्हणजे सध्या तरी ठोस उपचार नाही असेच सांगितले जाते, परंतु कोरोना रूग्णाला दवाखान्यात भरती करून घेतले जाते, खासगी दवाखान्यात त्याच्या उपचाराचे लाखोंचे बिल काढले जाते आणि काही दिवसांनी तो रूग्ण कोरोनामुक्त होतो. ठोस उपचार नसेल तर कोरोनातून बरे होणार्‍यांचे प्रमाण जवळपास ९७ टक्के कसे आहे, याचेही नेमके स्पष्टीकरण नाही. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर कोरोनाची बाधा होण्याची शक्यता खूप कमी असते, म्हणजे साधारण निरोगी व्यक्तीला कोरोना होणार नाही, याचा अर्थ तो सांगितला जातो तितका घातक आणि जीवघेणा नक्कीच नाही. टी बी, मलेरिया, डेंगू एड्स सारख्या इतर संसर्गजन्य रोगामध्ये रोग्यापासून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण आणि कोरोनाबाधित रूग्णापासून इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाण याची तुलनात्मक मांडणी करताना कुणीच दिसत नाही. लॉकडाऊन कठोरपणे लागू असतानाच्या काळात कोरोना रूग्णांची संख्या प्रचंड होती, परंतु निर्बंध शिथिल केल्यानंतर ती कमी झाली, यामागची संयुक्तिक कारणमिमांसा कुणाकडेच नाही. बहुधा कोरोनाचे विषाणूदेखील दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या घरी गेले असावेत. दिवाळीनंतर कोरोना रूग्णाचे प्रमाण वाढत असल्याचे सांगितले जात आहे, म्हणजे सुट्टी संपवून कोरोना परत ड्युटीवर हजर झालेला दिसतो. ही बाब एव्हाना स्पष्ट झाली आहे की कोरोनाची जितकी दशहत सरकारी यंत्रणांनी, औषध कंपन्यांनी निर्माण केली आहे तितका तो जीवघेणा नक्कीच नाही. संसर्ग झाला तरी साध्या उपचाराने म्हणजे सध्या जे उपचार कोरोना रूग्णाला दिले जात आहेत त्या उपचाराने कोरोना बरा होऊ शकतो. सकस आहार आणि नियमित दिनचर्या आणि योग, प्राणायाम या उपायांनी कोरोना बरा होऊ शकतो, खरे कोरोनाच नव्हे तर इतर कोणत्याही आजाराला, विकाराला या उपायांनी शरीरापासून दूर ठेवता येते, इतका साधा, सरळ, सोपा उपाय असताना आणि तो अगदी सहजपणे अंमलात आणता येत असताना या कोरोनाचा इतका बाऊ का केला जात आहे, तेच कळत नाही. 
    आजवर कोणत्याही साथीच्या आजाराची इतकी दहशत निर्माण झाली नव्हती. या दहशतीने लोकांचा सामाजिक जीवनक्रमच बदलून टाकला आहे, लोकांची मानसिकता बदलली आहे, लोकांचा आत्मविश्वास खचत चालला आहे, नव्हे तो खचलाच आहे. कोरोनाच्या संदर्भात जो संभ्रम निर्माण झाला आहे किंवा जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आला आहे, त्यामुळे समाज दोन गटात विभागल्या गेल्याचे दिसते. समाजातला एक वर्ग कोरोनाच्या प्रचंड दहशतीखाली जगत आहे तर एक वर्ग कोरोनाच्या दहशतीला साफ धुडकावून पूर्वी सारखा अगदी बिनधास्त जगताना दिसत आहे. पहिल्या वर्गात प्रामुख्याने उच्चभ्रू लोकांचा समावेश आहे. कोरोनाच्या दहशतीत जगणारे हे लोक समाजापासून तुटलेले दिसतात. ते कुणाकडे जात नाही, कुणी त्यांच्याकडे आलेले त्यांना चालत नाही, एवढेच नव्हे तर आपल्याच घरातील व्यक्ती बाहेर जाऊन आला तर जणू काही तो परक्या ग्रहावरून आला, या दृष्टीने त्याच्याकडे पाहिले जाते, आतल्या लोकांचे समाधान होईल अशी संपूर्ण शुद्धीकरण प्रक्रिया अवलंबिल्याखेरीज त्याला त्याच्याच घरात प्रवेश नसतो, लहान मुलांना त्यांच्या आसपास फटकण्यास मज्जाव केलेला असतो. सोशल डिस्टन्सिंगच्या बाबतीत हा वर्ग कमालीचा आग्रही असतो. *पूर्वीच्या काळी काही विशिष्ट जातीतल्या लोकांना इतर जातीतील लोक स्पर्श देखील करायचे नाहीत, अगदी त्यांच्या सावलीचाही या लोकांना विटाळ व्हायचा, आता तोच प्रकार थोडा सुसंस्कृत स्वरूपात समोर येत असल्याचे दिसते. पूर्वी एखाद्या घरातील कुणाचा मृत्यू झाला तर तेरा दिवसाचे सुतक पाळले जायचे. त्या घरातील लोक तेरा दिवस घराच्या बाहेर पडत नसत आणि इतर लोकदेखील सुतकाच्या काळात त्यांच्या घरी जात नसत, गेले तरी सुरक्षित अंतर ठेवून तिथे बसत, आता कोरोनाच्या नावाखाली असेच तेरा दिवसाचे सुतक त्या रूग्णाला पाळावे लागते. रूग्णासाठी तेरा-चौदा दिवसांचे विलगीकरण म्हणजे सुतक पाळण्यासारखेच आहे. कोरोनाने बाकी काही केले नसेल परंतु आधुनिक जगाने, आधुनिक विज्ञानाने बाद ठरविलेल्या काही जुनाट प्रथांना पुन्हा पुनरुज्जीवित केले आहे, असेच म्हणावे लागेल.* 
    खरे सांगायचे म्हणजे जर कोरोना वास्तवात असलाच तरी अन्य साथीच्या आजारापेक्षा तो धोकादायक नक्कीच नाही, साथीच्या इतर आजारांमध्ये मरणार्‍यांचे प्रमाण कोरोनाने मृत्यूमुखी पडणार्‍यांपेक्षा खूप अधिक आहे. विशेष म्हणजे इतर आजारांवर काही निश्चित उपचार आहेत आणि ते घेतल्यावर रूग्ण बरा होतो, परंतु कोरोनावर कोणताही ठोस उपचार नसतानाही रूग्ण अगदी ठणठणीत बरे होतात, शिवाय हे बरे होण्याचे प्रमाणदेखील अन्य रोगांच्या तुलनेत अधिकच आहे. खरे तर भारतात सगळीकडेच डासांचा उच्छाद पाहायला मिळतो आणि या डासांमुळे मलेरिया, डेंग्यू सारख्या रोगांची मोठ्या प्रमाणात लागण होते, किमान भारतात तर मलेरिया आणि डेंग्यूने मरणार्‍यांची संख्या कोरोनाने मरणार्‍यांपेक्षा खूप अधिक आहे, परंतु घरातील कुणाला मलेरिया किंवा डेंग्यू झाला तर फारशी भीती त्या घरातल्यांना वाटत नाही, टीबी, खरूज किंवा इतर संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीकडे संशयाने पाहिले जात नाही, त्यांची भीती वाटत नाही, परंतु कोरोना झाला म्हटल्यावर जणू काही शेवटच्या स्टेजवरचा महारोग म्हणजे लेप्रसि चे निदान झाले असे सुतकी वातावरण घरात तयार होते. आता याला करोना झाला म्हणजे आपल्यालाही होईल, आपल्या लेकराबाळांना होईल, सगळ्यांनाच होईल आणि आपण सगळेच मरू अशी काहीशी विचित्र आणि विकृत धास्ती मनात निर्माण होते. बाहेरून किंवा बाहेर गावावरून एखादी व्यक्ती घरात आली तर त्याच्याकडे जणू काही तो यमदूतच आहे, अशा भीतीने पाहिले जाते. लोकांच्या मानसिकतेत या कोरोनामुळे एक घातक बदल होत चालला आहे आणि वेळीच त्याला आवर घातल्या गेला नाही तर उद्या प्रत्येक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीकडे संशयाने पाहायला लागेल, घरातील माणसेदेखील एकमेकांपासून अंतर ठेवून वावरतील आणि पुढे हे शारिरीक अंतर मानसिक आणि भावनिक अंतरात रूपांतरीत होईल. मायेने डोक्यावरून फिरणारा हात, पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, लाडाने घेतलेला गालगुच्चा, प्रेमाने कडेवर उचलून घेणे हे सगळे प्रकार बंद होतील आणि सगळे जगणेच कोरडे, यंत्रवत होऊन जाईल. या कोरोनासारखीच परंतु तुलनेत खूप कमी प्रमाणात एडस् सारख्या रोगाचीही दहशत एकेकाळी निर्माण करण्यात आली होती. आता त्या एड्सचे नावदेखील ऐकू येत नाही, परंतु त्या एड्सने डिस्पोझेबल इंजेक्शन्स आणि गर्भनिरोधक साधनांचा बाजार मात्र चांगलाच वाढविला. तसाच आता कोरानाच्या नावाखाली अनेक गोष्टींचा बाजार मांडल्या जात आहे. सध्या जगात *कोरोना मार्केटिंग ही सगळ्यात मोठी मार्केटिंग ठरली आहे, म्हणजे सॅनिटायझर, मास्क, हॅण्डवॉश, अ‍ॅप्रन कीट या सगळ्यांचा धंदा अगदी जोरात सुरू झाला आहे. नुकताच विमानप्रवास करावा लागला, त्यावेळी प्रवाशांची अवस्था पाहून हसावे की रडावे हेच कळत नव्हते.* 
    प्रत्येकाला फेस शिल्ड, एका रांगेत तीन प्रवासी बसले असतील तर त्यांना संपूर्ण शरीर झाकून जाईल असे अ‍ॅप्रन कीट घालावे लागणार, हॅण्ड सॅनिटायझर आणि मास्क तर आता अविभाज्य भाग झाले आहेत. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि या दिवसात सर्दी, पडसे होणे अगदी सामान्य बाब आहे, परंतु एखाद्या सर्दी, पडसे आणि खोकला झाला की लगेच त्याची कोरोना चाचणी करण्याचे सल्ले दिले जातात आणि अशी चाचणी केली तर ती हमखास पॉझिटीव्हच येणार आणि मग नसलेले उपचार देणे सुरू ही टांगती तलवार. शासनाकडून प्रत्येक रूग्णासाठी काही निधी पाठविला जातो, म्हणजे रूग्णसंख्या अधिक असेल तर पैसा अधिक मिळणार हे साधे गणित, हा निधी नेमका किती असतो, म्हणजे प्रत्येक रूग्णामागे किती पैसे खर्च केले जातात, अर्थात कागदोपत्री आणि प्रत्यक्षात किती खर्च होतो, हे गणित एकदा स्पष्ट झाले की कोरोना रूग्णांच्या संख्येत होणार्‍या वाढीचे गणित सहज सुटू शकते. *बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळात देशातील कोरोना लाट ओसरते, रूग्णसंख्या अतिशय कमी होते आणि निवडणूक पार पडताच पुन्हा कोरोनाचा उपसर्ग वाढतो, यामागेही कोणते गणित आहे, यावरही संशोधन व्हायला हवे.* 
    या देशात खरे प्रश्न कधीच चर्चेला येऊ दिले जात नाही. या खर्‍या प्रश्नांकडे लोकांचे लक्ष जाऊ नये म्हणून असे काही फंडे काढले जातात. कोरोना संकटकाळात मोदी सरकारने किती विधेयके पारित करून घेतली आणि त्याचा परिणाम पुढे काय होणार, याची सामान्य लोकांना काहीही कल्पना नाही. अगदी परवाच दिल्लीत शेतकर्‍यांचा प्रचंड मोठा मोर्चा निघाला, तो अडविण्यात आला, शेतकर्‍यांवर 'वॉटर कॅनन'ने पाण्याचा मारा करण्यात आला, शत्रू सैन्याला रोखण्यासाठी केली जाते तशी व्यूहरचना केली गेली, अडथळे उभारले गेले, परंतु माध्यमांनी या दडपशाहीची दखल घेतली नाही, कुठे चर्चा नाही. चर्चा होते ती कोरोनाची. सरकारची दहशत, सरकारची दडपशाही झाकून टाकण्यासाठी या कोरोनाची दहशत निर्माण केल्या गेली, असेच चित्र समोर येत आहे.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare  
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017