*'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?*
*'प्रहार'* रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२०
*'निवडणुक यंत्रणा की मंत्रणा'?*
(लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)
_मतदान यंत्रामुळे आता निकाल झटपट मिळतात, व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पार पडते, बोगस मतदान होत नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते, बुथ कॅप्चरिंग हा प्रकार आता जवळपास हद्दपार झाला, असे अनेक चांगले बदल निवडणूक आयोग दाखवू शकते किंवा सांगण्यासारखे असे अनेक मुद्दे निवडणूक आयोगाकडे आहेत, परंतु ही मतदान यंत्रे आणि नंतरची मतमोजणी निर्दोष असते का, यावर मात्र अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जातात. या मतदान यंत्रात हेराफेरी करता येते, असा अनेकांचा दावा आहे. निवडणूक आयोगाने (?) हे सगळे आक्षेप मागेच फेटाळून लावले आणि यापुढे निवडणुकांसाठी मतदान यंत्रेच वापरली जातील, असे ठामपणे सांगितले. याचा अर्थ निवडणूक आयोगाचे हे मत बदलत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया यंत्राद्वारेच पार पडणार आहे आणि ही यंत्रे कशी करामत दाखवतात, हे वारंवार दिसून आले आहे._
भारतात मतदान यंत्राच्या माध्यमातून घेण्यास सुरूवात झाली त्याला दीड दशक ओलांडून गेले आहे. पूर्वी मतपत्रिका असायच्या आणि त्याद्वारे होणारी निवडणूक वेळखाऊ, कागदाची प्रचंड नासाडी करणारी, बोगस मतदानासाठी सोईची वगैरे आहे अशी हाकाटी झाली, त्यामुळे निवडणूक आयोगाने भारतातील जवळपास सगळ्याच निवडणूका, म्हणजे जिथे पसंतीक्रमाने मत दिले जात नाही, एकाच उमेदवाराची निवड करावी लागते, त्या सगळ्या निवडणूकांसाठी मतदान यंत्राच्या माध्यमातून घ्यायला सुरूवात केली.
मतदान यंत्रामुळे आता निकाल झटपट मिळतात, व्यवस्थेवरचा ताण कमी होतो, निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे पार पडते, बोगस मतदान होत नाही किंवा त्याचे प्रमाण अतिशय नगण्य असते, बुथ कॅप्चरिंग हा प्रकार आता जवळपास हद्दपार झाला, असे अनेक चांगले बदल निवडणूक आयोग दाखवू शकते किंवा सांगण्यासारखे असे अनेक मुद्दे निवडणूक आयोगाकडे आहेत, परंतु ही मतदान यंत्रे आणि नंतरची मतमोजणी निर्दोष असते का, यावर मात्र अनेकदा प्रश्नचिन्ह लावले जातात. या मतदान यंत्रात हेराफेरी करता येते, असा अनेकांचा दावा आहे. निवडणूक आयोगाने (?) हे सगळे आक्षेप मागेच फेटाळून लावले आणि यापुढे निवडणुकांसाठी मतदान यंत्रेच वापरली जातील, असे ठामपणे सांगितले. याचा अर्थ निवडणूक आयोगाचे हे मत बदलत नाही तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया यंत्राद्वारेच पार पडणार आहे आणि ही यंत्रे कशी करामत दाखवतात, हे वारंवार दिसून आले आहे.
*२०१४च्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदींची लाट होती. सलग दहा वर्षे सत्तेवर राहिलेल्या संपुआची भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे प्रचंड बदनामी झाली होती किंवा "टीम अण्णा"चा आणि निर्भया हत्याकांडाचा खुबीने वापर करून नियोजनबद्धपणे ती केल्या गेली, असेही म्हणता येईल. परंतु सलग दहा वर्षे सत्तेत असल्याने स्वाभाविकपणे तयार होणारा ‘अॅण्टी इनकम्बन्सी फॅक्टर’ काँग्रेस आघाडीच्या विरोधात होता, शिवाय नरेंद्र मोदींनी "तथाकथित" गुजरात विकास मॉडेल(?)च्या नावाखाली एकप्रकारचे गारूड जनतेवर केले होते.* राहुल गांधींच्या तुलनेत भाजपचा हा फायरब्रॅण्ड नेता लोकांना आवडला , कारण "ना बीबी ना बच्चा काम करेंगा अच्छा" असे देशात जे अनेकांना वाटत होते त्यात माझाही समावेश होता हे सांगायला मला आज संकोच वाटत नाही. एक सुप्त लाट देशभर तयार झाली होती आणि त्या लाटेवर स्वार होत भाजपने २८२ जागा प्राप्त करीत स्वबळावर बहुमताचा आकडा पार केला.
भाजपचा तो विजय अनपेक्षित नव्हता. मोदींचे प्रभावी(?) वक्तृत्व, तोपर्यंत कोरी असलेली पाटी आणि काँग्रेस सरकारची तथाकथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे झालेली बदनामी या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून भाजपचा मोठा विजय झाला. अर्थात त्यावेळी आपण कुणाचे हात बळकट करीत आहोत, याची कल्पना मतदारांना नक्कीच नव्हती. त्यांच्यासमोर गुजरातचा विकास घडवून आणणारे विकासपुरूष नरेंद्र मोदी हाच एक चेहरा आला होता, त्या चेहऱ्याआड किती चेहरे दडले आहेत, याची कल्पना त्यावेळी देशभरातील मतदारांना येणे अशक्यच होते. मोदींनी दिल्लीत आपले बस्तान बसविले आणि उत्तरोत्तर ते पक्के करीत नेले. आधी स्वपक्षातील आव्हान देऊ पाहणारे मोहरे गारद केले आणि नंतर विरोधी पक्षांकडे आपला मोर्चा वळविला. लोकसभेत भक्कम बहुमत असल्याने पाच वर्षे कोणताही धोका मोदी सरकारला नव्हता. सरकारच्या या ताकदीचा मोदींनी आपले आसन बळकट करण्यासाठी खुबीने वापर केला. सरकारच्या अखत्यारीतील सगळ्या यंत्रणा आपल्या टाचेखाली आणल्या, सत्तेच्या घोड्यावर आपली मांड मजबूत केल्यानंतर मोदींनी तो पाहिजे तसा पळविला. अदानी, अंबानी सारख्या आपल्या काही खास भांडवलदार मित्रांच्या हितरक्षणासाठी प्रसंगी संपूर्ण देशाला गंडविणारे निर्णय मोदींनी बिनदिक्कत घेतेले. नोटाबंदी, जीएसटी सारख्या निर्णयांनी देशाची अगदी वाट लावून टाकली. शेतकऱ्यांच्या एकाही प्रश्नाला मोदी सरकारने हात घातला नाही असे म्हटल्यापेक्षा, शेतकऱ्यांना दिलासा देणारी जी काही तुटपुंजी व्यवस्था होती ती सुद्धा मोदींनी पार उध्वस्त करून टाकली हे म्हणणे जास्त उचित ठरेल. एकूण काय तर मोदी सरकारची ती पाच वर्षे अतिशय निराशाजनक होती. सामान्य जनता मोदींवर प्रचंड नाराज होती. शेतकरी आत्महत्या करत होते आणि पार धुळीस मिळाले होते. विरोधकांच्या मोर्चेबांधणीत काही त्रुट्या अवश्य होत्या, परंतु २०१९च्या निवडणुकीत मोदी पुन्हा सत्तेवर, किमान स्वबळावर तरी येणार नाहीत, हे अगदी धडधडीत दिसत होते. अगदी लुटुपुटुचे पुलवामा-बालाकोट प्रकरण घडवून आणल्यानंतरही मोदींची स्थिती फारशी चांगली नव्हती. परंतु चमत्कार झाला. २०१४च्या निवडणुकीत संपूर्ण देशभर मोदींची लाट असतांनाही भाजपला जेवढ्या जागा मिळाल्या त्यापेक्षा अधिक जागा मोदींकडून जनतेचा भ्रमनिरास झालेला असतांना, मोदी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी असतांना भाजपला मिळाल्या.
हा चमत्कार घडवून आणण्यात आलेला आहे अशी चर्चा बरेच दिवस गाजली आणि नंतर जिरली सुद्धा, मात्र तेव्हापासून मतदान यंत्रावर लागलेले प्रश्नचिन्ह अजूनही दूर झालेले नाही. अगदी ताजे उदाहरण घ्यायचे झाल्यास बिहारचे घेता येईल. *बिहारमध्ये काहीतरी गडबड नक्कीच झाली. तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हेच सांगतो. निवडणूक अधिकाऱ्यांनी विजयी घोषित केलेल्या ११९ उमेदवारांची यादीच तेजस्वी यादवांनी मतमोजणी सुरू असताना सोशल मीडियावर टाकली. त्यापैकी नऊ उमेदवार नंतर पराभूत कसे झाले, या प्रश्नाचे उत्तर कुणाकडेच नाही. जवळपास पंधरा मतदारसंघ असे होते की ज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या उमेदवारातील मतांचा फरक हजारपेक्षा कमी होता आणि अशीच परिस्थिती ही २०१९च्या लोकसभा निवडणुकीतसुद्धा पाहण्यात आली होती. त्यावेळी आणि यावेळी सुद्धा सगळ्या मतदारसंघात पुन्हा मतमोजणी घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली. खूप उशिरापर्यंत चाललेली मतमोजणी आणि मिनिटामिनिटाला बदलत जाणारी उमेदवारांची आघाडी, शंका उपस्थित करायला वाव देणारी लोकसभा निवडणुकीत आणि बिहार निवडणुकीतसुद्धा होती. तज्ज्ञांपासून सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांचे अंदाज सारखे असतील तर निकाल त्या अंदाजानुसारच लागतो, परंतु बिहारमध्ये तसे झालेले नाही, त्यापूर्वी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तसे झाले नव्हते आणि नंतरच्या बऱ्याच निवडणुकांमध्ये असे अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले.* कुठेतरी पाणी नक्कीच मुरत आहे आणि त्याचा संबंध निवडणुकीच्या यंत्राशी असण्याची दाट शक्यता आहे. ही भीती जर खरी असेल तर जोपर्यंत मोदी आहेत तोपर्यंत केंद्रात भाजपच आणि तेदेखील स्वबळावर सत्तेत येईल, हे निश्चित समजायचे आणि हळूहळू ‘बिहार’च्या मार्गाने देशातील अनेक राज्ये भाजप आपल्या ताब्यात घेईल. काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष क्षीण झाले की पाशवी बहुमताच्या जोरावर काहीही करणे मोदी किंवा कदाचित त्यांच्या वारसदाराला सहज शक्य होईल. *लोकशाहीपुढे असलेला हा धोका दूर सारायचा असेल तर लोकांनी फक्त एकच मागणी लावून धरावी आणि ती म्हणजे मतदान यंत्राद्वारे नको तर मतपत्रिकेद्वारे करा.* धर्म, जात, राष्ट्रीय अस्मिता, वेगवेगळ्या रंगाचे राजकारण या सगळ्या धुंदीतून लोक बाहेर पडले तर समोर काय वाढून ठेवले आहे हे त्यांच्या लक्षात येईल. *उदाहरणच द्यायचे झाले तर बेलारूसच देता येईल. या छोट्याशा देशात एका जागृत पत्रकाराने लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेला लढा नक्कीच प्रेरणादायी आहे. बेलारूसमध्ये गेली तीन महिने सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत. सरकार विरोधातील या असंतोषाचा जनक आहे सर्गेई तिखानोवस्की नामक एक फ्रीलान्स पत्रकार किंवा ब्लॉगर. तो तिथल्या हुकूमशाही सरकारची सातत्याने समीक्षा करत असतो. सरकारी योजना, नीती, धोरण आदीची जनभूमिकेतून समीक्षा व विश्लेषण करतो, सरकारला प्रश्न व जाब विचारतो. उलटतपासणी करतो. बेलारूसमध्ये त्याला प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. त्याचे य़ूट्यूब वीडियो काही मिनिटात प्रचंड वायरल होतात. एकदा त्याला एका दर्शकाने कमेंट केली, तुम्ही राष्ट्रपतीविरोधात सक्रीय राजकारणात उतरा! पाठोपाठ हजारो कमेंट पडल्या. दर्शक त्याला आगामी सार्वत्रिक निवडणुकात भाग घेण्याची विनंती करत होते. विचार करून सर्गेई तिखानोवस्कीने जाहिर केले की मी निवडणूक लढवेन. जनतेमध्ये जल्लोष झाला. काहीच दिवसात त्याच्या लोकप्रियतेत तुफान वाढ झाली. राष्ट्रपती अलेक्झांडर लुकाशेंको यांना भितीची चाहुल लागली. त्यांनी जुने वाद उकरून त्य़ाच्यावर चौकशी बसवली. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्याला जेलमध्ये टाकले. जनता हैरान-परेशान झाली. हुकूमशाही सत्तेपुढे जनता हताश झाली. राष्ट्रपतींनी विरोधी उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणातून काढून टाकला होता. आता लुंकाशिको एकच शक्तिशाली उमेदवार.. जनता हताश झाली. इथे इंट्री होते स्वेतलानाची. ती एक शिक्षक व हाऊस विमेन. ब्लॉगर सर्गेईची पत्नी. वय ३७. तिने केवळ राष्ट्रपतीसमोर विरोधक हवा म्हणून निवडणुकीचा फॉर्म भरला. राजकारणात तिला रस नव्हता पण अनिच्छेने तिला यात यावे लागले. इकडे जनतेत उत्साह परत आला. तिच्या प्रचार सभांना प्रचंड गर्दी. जनतेचा उत्साह पाहून स्वेतलानाने प्रचारात जीव ओतला. नवरा जेलमध्ये तर ही प्रचारसभामध्ये सरकार व हुकमूशाह राष्ट्रपतीची कट्टर विरोधक म्हणून रिंगणात. जनतेच्या आशा व आकांक्षाना परत येताना तिने पाहिले. मतदारांची कल्पना सत्यात आणण्यासाठी ती आता मनापासून कामाला लागली. निवडणुका पार पडल्या. बहुसंख्य मतदारांनी स्वेतलाना बाजूने कौल दिला. मतमोजणीत वर्तमान राष्ट्रपती पराभूत होत आहे, हे कळून येताच सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आणि वर्तमान राष्ट्रपतींना विजयी घोषित करण्यात आले. सामान्य जनता त्यांच्या मताधिकाराचा अवमान झाला म्हणून सरकारविरोधात रस्त्यावर उतरली. मतमोजणीत पक्षपात, गोंधळ व गडबड झाल्याचा आरोप करत त्यांनी निकाल मान्य करण्यास नकार दिला. राष्ट्रपतींनी खोटारडेपणा करून मते आपल्याकडे वळविली असा मतदारांंचा आरोप होता. सरकारने आंदोलन करणाऱ्या जनतेला झोडपून काढले. प्रतिस्पर्धी उमेदवार स्वेतलानाला गुचपूचरित्या देशाबाहेर काढले किंवा गायब केले. आज १०० दिवस झाले बेलारूस अशांत आहे. स्थानिकांना अलेक्झांडर लुकाशेंको राष्ट्रपती म्हणून नको आहेत. जनता मागे हटायला तयार नाही. त्यांना सत्ताबदल हवा आहे. जनतेला ब्लॉगर व त्याची पत्नी स्वेतलानालाच्या हातात सत्ता द्यावी असे वाटते. त्यासाठी गेली तीन महीने आंदोलन सुरू आहे. एक पत्रकार, एक ब्रॉडकास्टर (ब्लॉगर) काय करू शकतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. सांगायचे तात्पर्य लोक जागरूक असतील तर सत्ताधाऱ्यांवर नक्कीच वचक राहतो. आज बेलारूसमध्ये जे घडत आहे ते उद्या भारतात घडू लागले तर नवल वाटू नये,* अशी सध्याची परिस्थिती आहे. लोकशाहीची ही विटंबना वेळीच रोखायची असेल तर सगळ्यांनी आतापासून एकच धोशा लावायला हवा आणि तो म्हणजे "यापुढे मतदान मतपत्रिकेद्वारेच"!
*मतदान जोपर्यंत यंत्राने होत आहे, तोपर्यंत भारतातील निवडणूका यंत्रवतच पार पडतील आणि निकाल कुणाच्या बाजूने मंतरलेला असेल ते सांगण्याची गरज नाही.*
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
Comments
Post a Comment