गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!*

*'प्रहार'* रविवार, दि. ६ डिसेंबर २०२०

*गुजरातच्या विकासाकरिता महाराष्ट्राचा बळी!*
(लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश)

_दिल्लीश्वरांना मराठी माणूस, मराठी मुलूख सतत खूपत असतो ही ऐतिहासिक परंपरा आजही कायम आहे. गुजरातचा किंवा अन्य कोणत्याही राज्याचा विकास होत असेल तर त्यात आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु महाराष्ट्राची मुंडी पिरगाळून या विकासाचे इमले उभे होत असतील तर ती बाब निषेधार्हच म्हणायला हवी._

             दिल्लीच्या सिंहासनावर बसून संपूर्ण देशावर सत्ता गाजविण्याच्या औरंगजेबाच्या स्वप्नांना पहिले कडवे आव्हान दिले ते या महाराष्ट्राने, या मराठी मातीने. या मातीचा अंगभूत गुण असलेल्या शौर्याला आकार आणि दिशा देत छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची पताका उभारली. मोगलशाही, आदिलशाही, निजामशाहीला एकाचवेळी टक्कर देत शिवाजी महाराजांनी आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले. अख्खा देश आपल्या टाचेखाली आणणार्‍या मोगली सल्तनतला हे छोटेसे स्वराज्य शेवटपर्यंत संपविता आले नाही. *दिल्लीश्वरांना कुणी आव्हान दिलेले तेव्हाही आवडत नव्हते, आजही आवडत नाही.*
             शिवाजी महाराजांच्या हयातीत हे स्वराज्य नष्ट करता येणे शक्य नाही, हे जाणून असलेला औरंगजेब महाराजांच्या निधनानंतर दख्खनची भूमी पादाक्रांत करण्यासाठी स्वत: प्रचंड फौजफाटा घेऊन दक्षिणेत उतरला, परंतु इथे आल्यावर त्याला ‘बापसे बेटा सवाई’ असल्याचा साक्षात्कार झाला. तब्बल नऊ वर्षे संभाजी महाराजांनी मोगलांना झुंजविले, शेवटी दगाफटक्याने संभाजी महाराजांचा घात झाला, परंतु त्यानंतरही महाराणी ताराबाई आणि संताजी घोरपडे, धनाजी जाधव सारख्या योद्धांनी मोगलांना झुंजवत ठेवले. अखेर औरंगजेब या मातीत दफन झाला, परंतु त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. 
             त्या काळात मोगलांची चाकरी करणारे इतर प्रदेशातील मांडलिक राजे, सरदार, शिवाजी महाराजांचा आणि पुढे त्यांच्या वारसदारांचा दुस्वास करायचे. अगदी तेव्हापासून महाराष्ट्राच्या बाबतीत एक अढी दिल्लीश्वरांच्या आणि त्यांच्या ओंजळीने पाणी पिणार्‍यांच्या मनात राहत आली आहे. आज परिस्थिती बदलली असली तरी ती अढी अजूनही कायम असल्याचे दिसते. आजही महाराष्ट्राचा दुस्वास केला जातो. *आजही मराठी नेत्याला दिल्लीत कटकारस्थान करून अडचणीत आणले जाते. त्यामुळेच यशवंतराव चव्हाण, शरद पवार, नितीन गडकरीसारखे नेते सर्वथा योग्यता असूनही पंतप्रधान होऊ शकले नाहीत. नाही म्हणायला महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील ह्या राष्ट्रपती झाल्या; मात्र त्याकरिता त्यांचे नावापुढील 'शेखावत' हे बहुधा उपयोगी पडले असावे.* 
             आजही महाराष्ट्राची प्रगती अनेकांच्या डोळ्यात खुपते, आजही मराठी लोकांना मुंबईत ‘घाटी’ म्हणून हिणवले जाते. आजही महाराष्ट्राचा मानबिंदू असलेली मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान रचले जाते. खरे तर *महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या वेळीच मुंबई गुजरातला देण्याचा घाट मोरारजी देसाईसारख्या काही महाराष्ट्रद्वेष्ट्या नेत्यांनी घातला होता, परंतु १०७ हुतात्म्यांचे बलिदान देणारा प्रखर लढा उभारून मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्राकडेच राखली. मुंबई महाराष्ट्रापासून तोडता आली नाही याची सल गुजराती नेत्यांना आजही अस्वस्थ करीत असते.* मोरारजी देसाईंनी त्यावेळी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही आणि आता तर ते शक्यच नाही. अर्थात अधूनमधून मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याच्या चर्चा केल्या जातात, परंतु तेदेखील सर्वथा अशक्य आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडणे अशक्य असले तरी मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न मात्र अगदी जोरात सुरू आहेत. *नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासून मुंबई आणि महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे वळविण्याचा त्यांचा आटापिटा सुरू होता, आता तर ते पंतप्रधान आहेत आणि त्यांचा उजवा हात असलेले अमित शहा हेदेखील गुजराती आहे. या दोघांनी अतिशय सुनियोजितपणे मुंबईचे खच्चीकरण सुरू केले आहे.*
             गिरणगाव तर यापूर्वी केव्हाच उद्ध्वस्त झाला आहे. *गिरणगावचे मराठी कामगार केव्हाच मुंबईबाहेर दूर उपनगरात फेकल्या गेले आहेत. जव्हेरी बाजारातील अनेक हिरे व्यापारी आता गुजरातमध्ये स्थिरावले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्ट बंद पाडल्या गेले आहे. त्यामुळे त्यावर अवलंबून असलेले ट्रान्सपोर्ट, क्लिअरिंग हाउसेस, जहाज दुरुस्ती इत्यादी व्यवसाय बंद पडले आहेत. भिवंडीचा कपडा मार्केट, यार्न आणि साडी मार्केट सुरतला हलविला गेला आहे. त्यासाठी या बाजारातील गुजराती व्यापार्‍यांना हाताशी धरण्यात आले आहे. बेलापूरचे रासायनिक कारखाने गुजरातमधील भरूच जवळ असलेल्या दहेजमध्ये नेण्यात आले आहेत. मुंबईतील अनेक आयटी हब्ज अहमदाबादकडे वळविण्यात आल्या आहेत. टाईल्सचा उद्योग वापीला पळविण्यात आला आहे आणि इतके करूनही समाधान झाले नसल्याने आता अहमदाबाद- गांधीनगरच्या दरम्यान नवी ‘गिफ्ट’ अर्थात 'गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक' सिटी उभारली जात आहे.* 
             हे सगळे जे केल्या गेले आहे किंवा केल्या जात आहे ते केवळ आर्थिक राजधानी म्हणून असलेले मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठीच. *अहमदाबाद-मुंबई दरम्यान धावणार्‍या बुलेट ट्रेनचा घाट केवळ गुजरातचा फायदा डोळ्यासमोर ठेवून घातल्या गेला आहे.*
             हैद्राबाद, बंगळुरू सारखी शहरे मुंबईला आव्हान देत असतानाच परवा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या प्रस्तावित 'फिल्म सिटी'च्या प्रमोशनसाठी मुंबईत येऊन गेले. म्हणजे *मुंबईतील चित्रपट उद्योगदेखील संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.* मुंबईचे खच्चीकरण करून महाराष्ट्रावर सूड उगविण्याचाच हा प्रयत्न आहे. दिल्लीश्वरांना मराठी माणूस, मराठी मुलूख सतत खुपत असतो ही ऐतिहासिक परंपरा आजही कायम आहे. गुजरातचा किंवा अन्य कोणत्याही राज्याचा विकास होत असेल तर त्यात आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु महाराष्ट्राची मुंडी पिरगाळून या विकासाचे इमले उभे होत असतील तर ती बाब निषेधार्हच म्हणायला हवी.
             दुर्दैवाने मोजके दोन-चार नेते सोडले तर अन्य कुणीही नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची भाषा करताना दिसत नाही. त्यांना जाब विचारण्याची हिंमत कुणात नाही. *भाजपचे महाराष्ट्रातील नेते तर गुजरातचे एजंट असल्यासारखे मोदींच्या महाराष्ट्रद्रोही कारवायांना साथ देताना दिसतात.* दिल्लीच्या सिंहासनावर बसलेल्या पूर्वीच्या राजांपेक्षा, नेत्यांपेक्षा सध्या दिल्लीश्वर असलेले नरेंद्र मोदी खूप अधिक चाणाक्ष आणि धुर्त आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला राष्ट्रवादाचा ‘एनेस्थिया’ देऊन ते आपली ऑपरेशन्स अगदी सहज पार पाडत असतात. कदाचित म्हणूनच अगदी डोळ्यादेखत मुंबई आणि महाराष्ट्राचे खच्चीकरण केले जात असताना कुणीही आवाज उठवताना दिसत नाही. 
             *वर्षभरापूर्वीच्या एका ‘प्रहार’मध्ये मी महाराष्ट्राचे कसे खच्चीकरण केले जात आहे याचे विश्लेषण केले होते. जिज्ञासूंकरिता त्या ‘प्रहार’ची आज खूप चर्चा होत आहे. अनेकांनी मला दूरध्वनी करून माझे त्याबद्दल कौतुकही केले आहे. त्या ‘प्रहार’मध्ये मी राज ठाकरेंच्या भूमिकेचे समर्थन केले होते. २०१३मध्ये लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मोदींची तोंडभरून स्तुती करणारे राज ठाकरे नंतरच्या २०१९च्या निवडणुकीत मात्र मोदीविरोधात प्रचार करत होते, त्यावेळी महाराष्ट्रातून एकटे तेच मोदींना खड्या आवाजात जाब विचारण्याची हिंमत दाखवित होते आणि त्यांचा 'लावरे तो व्हिडीओ' फार प्रसिद्ध झाला होता. आता मात्र राज ठाकरे देखील शांत झालेले दिसतात. कदाचित मध्यंतरीच्या काळात त्यांना दिल्या गेलेल्या ‘ईडी’ डोसचा हा परिणाम असावा.*
             एकूण काय तर *विरोधी नेत्यांना कसे शांत करायचे आणि लोकांना गुंगीत ठेवून आपल्याला हवे ते कसे साध्य करून घ्यायचे ही कला नरेंद्र मोदींनी चांगलीच आत्मसात केली आहे. तसे नसते तर तिकडे पंजाबचे शेतकरी थेट दिल्लीवर धडक देत असताना इकडे महाराष्ट्रात तुलनेत बरीच शांतता पाहायला मिळाली नसती.* मराठी माणूस निधड्या छातीचा, समोरासमोर लढणारा आहे, त्याला डावपेच जमत नाही, ते त्याच्या रक्तातच नाही, त्यामुळे तो नेहमीच फसविला जातो. थोडक्यात म्हणजे तो सज्जन आहे मात्र त्याच्या सज्जनतेला बावळट, मूर्ख किंवा भयताड असे संबोधून त्याची मानहानी, अवहेलना केली जाते. त्यामुळे काळासोबत स्वतःमध्ये योग्य ते बदल करून घेणे आवश्यक झाले आहे. तुलनेत तरुण पिढी स्मार्ट आहे मात्र तरीसुद्धा त्यांच्यात हिंदी भाषिक लोकांमध्ये असते तशी व्यापारी चतुराई नाही, जी त्यांनी शिकणे गरजेचे आहे. मराठी माणसाला पाठीमागून वार करणार्‍यांनी नेहमीच परास्त केले आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या बाबतीत जे काही चालले आहे ते पाठीमागून वार करण्यासारखेच आहे. *दक्षिणेकडील राज्याच्या लोकांमध्ये अस्मितेसाठी जी एकजूट दिसते ती दुर्दैवाने मराठी माणसात दिसत नाही आणि म्हणूनच या भ्याड हल्लेखोरांचे नेहमी फावते. केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षा योजनेत हिंदीला स्थान देण्याचा नुसता विचार बोलून दाखविला आणि दक्षिणेकडील चारही राज्यांनी एकसाथ त्यावर कडाडून हल्ला केला. या राज्यांचा आक्रमक पवित्रा पाहून केंद्राला आपला विचार बदलावा लागला. ही अशी आक्रमकता महाराष्ट्राने कधीही दाखविली नाही. औरंगजेबाच्या काळात अनेक मराठी सरदार शिवाजी महाराजांच्या विरोधात उभे राहून मोगलांची साथ देत होते आणि आजही महाराष्ट्रातील अनेक नेते दिल्लीश्वराची मर्जी राखण्यासाठी महाराष्ट्र ओरबाडला जात असताना टाळ्या पिटण्याचे काम करताना दिसतात. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.*
             या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन मराठी तरुणांनी आणि शेतकरी व उद्योजकानीं आपली एक वज्रमूठ बांधण्याची गरज आहे, मात्र दुर्दैवाने तसे न करता व्हाट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर तो नको तेवढा वेळ वाया गमावितो. मी पोरांना किंवा समाजाला जातीय समीकरणे तयार करा हे अजिबात सांगत नाहीय तर आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा विचार करून स्मार्ट बना! एवढेच केवळ सांगत आहे. उद्योग क्षेत्रात कार्यरत व्हा, केवळ 'नोकरी एके नोकरी'च्या शोधात राहू नका, कारण आज त्या संपल्या आहेत. त्यामुळे उसाची रसवंती, ज्युसची गाडी, नाहीतर साधी भेळपुरी, पाणीपुरीची गाडी लावा, देखभाल दुरुस्तीचे केंद्र उघडा, आपल्यात जो काय हुन्नर, कला असेल त्यानुसार काहीही सुरू करा, पैसे नाहीत, भांडवल नाही म्हणून नुसते रडत बसू नका. *मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की जिथे इच्छा असते तेथे पैश्यामुळे काम अडत नाही. केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कुठल्याही कामाची लाज बाळगली नाही तर तुम्हीही प्रकाश पोहरे बनू शकता. अडचणी येतच असतात, त्यावेळेस माझी आठवण करा, मला त्या सोडवायला आवडेल.*

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare  
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017