धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*
*‘प्रहार’* रविवार, दि. २७ डिसेंबर २०२०
*धडा ; पूर्वीच्या आणि आताच्या परिस्थितीपासून...*
(लेखक : *प्रकाश पोहरे*, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश आणि संस्थापक अध्यक्ष - ‘किसान ब्रिगेड’)
_आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे, तेव्हा उठा आणि कामाला लागा._
पूर्वी शेतकरी शेतमाल घरी ठेवून असायचा आणि व्यापारी किंवा अडते गावोगाव फिरून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन शेतमाल जमा करायचे. त्या वेळेला मागणी-पुरवठ्याच्या सिद्धांतानुसार पुरवठा कमी आणि मागणी जास्त होती आणि शेतकरी बियाणे, खते, मनुष्यबळ या बाबतीत स्वयंपूर्ण होता, म्हणजेच शेतकरी ‘दाता’ होता आणि शहरात राहणारे ‘याचक’ होते.
*हरित क्रांती झाली आणि परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढला. त्यानुसार शेतकऱ्यांचा खर्चही वाढला. परिणामी, मग शेतकरी त्यांचा माल स्वत: बैलबंडीमध्ये भरून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये विक्रीकरिता न्यायला लागला, म्हणजेच पूर्वीचा ‘दाता’ असलेला शेतकरी हा ‘याचक’(भिकारी) झाला आणि शहरी ग्राहक ‘दाता’ झाला.* त्यामध्ये बदल होऊन आता ऑनलाईनचा जमाना आला आहे. मग त्या बाबी शेतकऱ्यांनी समजून घेणे गरजेचे आहे. ‘ई ट्रेडिंग’सारख्या व्यवसायामुळे तुमचा शेतमाल तुमच्याच घरी ठेवून त्याद्वारे तुम्ही मालाची विक्री करू शकता.
शेतकरी का मागे पडत गेला हे आता आपण समजून घेणे जरुरी आहे....
🔴 *उदाहरण १: स्वातंत्र्य मिळाले तेव्हा थोड्याच लोकांना माहीत असेल, की एक डॉलरची किंमत ही एक रुपया एवढी होती; जी काही परिस्थितीमुळे वाढत-वाढत आज ७६च्यावर गेली म्हणजे याचाच अर्थ आम्ही ७६पट गरीब झालो आहोत किंवा लुटल्या गेलो आहोत, हा त्याचा सरळ अर्थ आहे.*
🔴 *उदाहरण २: अगदी अलीकडे १९७०-७२ ला १ क्विंटल कापूस विकला, की दीड तोळा सोने मिळायचे. त्या काळी तोळा १२ ग्रॅमचा होता म्हणजेच १८ ग्रॅम सोने मिळायचे. आज २०२० साली १ क्विंटल कापूस विकला तर साधारणपणे ५००० रु. मिळतात, म्हणजे आजच्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे केवळ एक ग्रॅम सोने मिळते. म्हणजे शेतकरी सतरा (१७) ग्रॅमने लुटल्या जातोय. वरून १९७०-७२ला कापसाचा उत्पादन खर्च फारच कमी होता आणि आज तो भरमसाठ वाढलाय ते वेगळेच. हीच परिस्थिती ऊस वगळता इतर सर्वच पिकांची आहे.*
स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताचा जगातील जीडीपीत २७ टक्के एवढा वाटा होता.(आज तो मुश्किलीने १ टक्के आहे) व भारताच्या जीडीपीत शेतीचा वाटा ५० टक्के होता.(आज १० टक्के आहे)
शेतीवर आधारित उद्योगसुद्धा साधारण २५-३० टक्के देशाच्या जीडीपीत सहयोग देत असत.(कपडा, सिल्क, मसाले व इतर)
याचा अर्थ असा, की आपला मूळ शेती व्यवसाय हाच उत्तम व्यवसाय होता व साधारण फक्त पावसाच्या पाण्यावर आणि निसर्गाच्या भरवशावर तो होत होता. आज परिस्थिती बदलली आहे. ज्यात कालवे, धरणे, बोअरवेल असे स्रोतसुद्धा तयार झाले आहेत, तरी शेती परवडत नाही याचे कारण समजून घेऊ यात.....
जगात जीवसृष्टीकरिता पाणी व ऑक्सिजन या सारखे सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘अन्न’.
अन्न पिकवितो कोण? तर ‘शेतकरी’. शेतकऱ्यास अन्न पिकविण्यासाठी व अधिक उत्पन्न घेण्यासाठी काय हवे असते ते म्हणजे....
१. सुपीक जमीन
२. मुबलक पाणी
३. मार्केट व योग्य भाव
वरील तिन्ही गोष्टींचे वर्षानुवर्षे योग्य व्यवस्थापन, जे अगोदर राजे-राजवाडे करीत असत व नंतर देशांतर्गत सरकार करीत असत.
आता गंमत समजून घेऊ.
‘सरप्लस’ ज्याच्याकडे, त्याचा बाजारावर म्हणजेच किमतीवर ताबा राहतो.
पूर्वी हा ताबा शेतकऱ्यांकडे होता.
अतिरिक्त धान्य पेवामध्ये ठेवल्या जायचे आणि जेव्हा बाजारात भाव वाढायचे तेंव्हा ते बाहेर काढले जायचे.
हरित क्रांती नंतर तो अतिरिक्त साठा सरकारच्या ताब्यात गेला आणि त्यांनी त्या साठ्याचा उपयोग मते मिळविण्यासाठी ‘अन्न सुरक्षा योजने’च्या माध्यमातून केला, मात्र यामुळे शेतकरी मेला.
आता हा अतिरिक्त साठा या नवीन ३ कायद्यांच्या मुळे कार्पोरेट कंपन्यांकडे जाणार आहे.
*जर भारतात शेती व शेती निगडित व्यवसायाचा वाटा जीडीपीत साधारण ७० टक्के होता व जगाच्या जीडीपीत २७ टक्के होता, तर तो देश पुढे जाऊन(म्हणजे येत्या ५० वर्षांत) नक्कीच जगात वर्चस्व प्रस्थापित करेन व अन्न-धान्याच्या जोरावर जगाची अर्थव्यवस्था कंट्रोल करेन....मग यास कसे थांबवावे व जगाची अर्थव्यवस्था कशी ऑईल किंवा डॉलरवर आणावी यांसाठी सुरू झाले ते एक षड्यंत्र, कारस्थाने ज्यात आपल्याच संधीसाधू व भ्रष्ट लोकांनी साथ दिली.*
हे करण्यामागे खरे कारण होते ते म्हणजे जागतिक लोकसंख्या व त्यांच्या अन्न-धान्य, कपडे व इतर गरजा पुरविणे व तेही स्वस्तात स्वस्त.... *मग भारत जर शेतीप्रधान होता व भारत अधिक बळकट झाला, तर भारतीय शेती व अन्न-धान्य हे त्यांच्या चलनाएवढ्या भावात त्यांना विकत घ्यावे लागेल, म्हणजे जर भारतात गहू १५ रु. किलो असेल तर अमेरिकेस तो $१५ डॉलरने घ्यावा लागेल व भारताची मोनोपॉली झाली असती(जशी आज अमेरिकेची आहे) व भारत जागतिक महासत्ता बनला असता.*
मागील ७० वर्षांचा अभ्यास केला, तर कळेल की, का भारतात प्रत्यक्ष राज्य न करतासुद्धा परकीय सत्तेच्या प्रभावामुळे शेती, वीज, पाणी, धरणे, कालवे व निगडित व्यवस्था हवी तशी विकसित होऊ दिली नाही किंवा केली नाही. इतर पुढारलेल्या देशांची परिस्थिती प्रथम व द्वितीय महायुद्धात एवढी ढासळली होती की जेवढी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा होती तेवढीच....
परंतु आपल्याकडे त्याकाळी होती ती बाब म्हणजे शेकडो वर्षांपासून चालत आलेली उत्तम शेती व भरपूर नैसर्गिक संसाधने....
आपल्याला प्रगती करण्यासाठी त्यावेळी इतर देशांइतकीच संधी होती; की आपण मागील ७० वर्षांत आपली जी ५० टक्के शेती आधारित जीडीपी होती ती नक्कीच ७५-८० टक्क्यांवर नेऊन अख्ख्या जगात ५०-६० टक्के वाटा घेऊन अधिराज्य केले असते; परंतु परिस्थिती म्हणा, परकीय शक्तीचा दबाव म्हणा किंवा चुकीची लीडरशिप म्हणा, यामुळे ते शक्य झाले नाही.
त्यासाठी प्रत्येक गावात रस्ते व ऑनलाईन मार्केट, गोडाऊन, शीतगृहे व्हायलाच पाहिजे होती, हे करणे तर शक्य होते; परंतु आपण एक नव्हतोच व अजूनही नाही म्हणून आज शेतकऱ्यांवर आजची दुर्दैवी परिस्थिती आली व याच परिस्थितीचा फायदा घेऊन परत नवनवीन पक्ष, नेते पुढे येताहेत जे परत तेच करतील जे मागील ७० वर्षांत केले किंवा झाले.... परंतु यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग कोणता व कसा? हे जाणून घेऊ या.
सर्वप्रथम, आजची नैसर्गिक परिस्थिती बघता व देशावरील आर्थिक कर्ज, गुंतागुंतीची अर्थव्यवस्था व जगातील रस्सीखेच, कपटी स्पर्धा व सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावापासून तर दिल्लीपर्यंतची ‘डर्टी पॉलिटिक्स’ आणि झपाट्याने बदलणारे तंत्रज्ञान बघता, आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना, गावातील लोकांना एकनिष्ठ पध्दतीने कार्य करावे लागेल...ते म्हणजे
*१ शक्य तिथे पाणी अडविणे व जिरवणे.*
*२ फक्त आणि फक्त कमी खर्चाची सेंद्रिय शेतीच करणे.*
*३. अधिक ‘उत्पादना’च्या मागे न लागता अधिक ‘उत्पन्ना’च्या मागे लागा.*
*४. पेट्रोल-डिझेल, वीजवर पर्याय म्हणून सोलर व बॅटरी किंवा इथेनॉलवरील यंत्र, गाडी, सोलरपंपाचा वापर करणे.*
*५. सामुदायिक विवाहसारखे कार्य प्रत्येक गावात घेणे.*
*६. तेराव्यासारखे अनावश्यक खर्च टाळणे.*
*७. व्यसनमुक्त राहून आपले स्वास्थ्य, पैसा व वेळ वाचविणे.*
*८. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दैववादीपणा सोडून विज्ञानवादी दृष्टिकोन स्वीकारणे. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ किंवा ‘ठेविलें अनंते तैसेचि राहावे, चित्ते असू द्यावे समाधान’ याऐवजी ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, ही वृत्ती जोपासणे.*
*९. किमान एक प्रकिया केल्याशिवाय शेतमाल न विकण्याची शपथ घेणे.*
*१०. गाव तेथे शेतकऱ्यांची संघटना म्हणजे ‘किसान ब्रिगेड’ची शाखा स्थापन करणे.*
आज पाहण्यात येते की, दैनंदिन जीवनात एवढी स्पर्धा असूनही आणि तंत्रज्ञान दररोज बदलत असताना शेतकरी या सगळ्या बाबी समजून घेण्याऐवजी ‘देव देव’, ‘हरी हरी’ करीत बसतात, भाकडकथा आणि कुणीतरी आयोजित केलेली प्रवचने वा भागवत ऐकत बसतात, पायदळवारी मध्ये रममाण होतात. अशांना सांगावेसे वाटते, की ‘प्रपंच करावा नेटका’ या उक्तीप्रमाणे प्रथम प्रापंचिक जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे सांभाळून आणि कुटुंबातील लोकांच्या गरजेनुसार पैसाअडका गाठीला बांधल्यानंतर मग परमार्थ करण्याऐवजी अनेक लोक जे स्वत: पायावर धड उभे नाहीत किंवा ‘घरची म्हणते देवादेवा आणि बाहेरचीला साडी चोळी शिवा’ किंवा ‘स्वत:ची खरकटी ठेवून.....’, असे लोक नको ते उद्योग करतांना जेव्हा मी पाहतो तेव्हा मन खिन्न होते.
आज दिल्लीत शेतकरी सीमेवर त्याला अडचणीत आणणारे ३ कायदे रद्द करण्यात यावे याकरिता मागील महिन्यापासून गोठवणाऱ्या थंडीत कुडकुडत बसला आहे; मात्र सरकार भीक घालायला तयार नाही, कारण देश कार्पोरेट कंपन्यानी ताब्यात घेतला आहे. या परिस्थितीत *शेतकऱ्यांना मुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे कमी खर्चाची विषमुक्त ‘सेंद्रीय शेती’ची चळवळ व ‘गाव तेथे किसान ब्रिगेड’चा बोर्ड लावणे,* तेव्हा उठा आणि कामाला लागा.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.
Comments
Post a Comment