प्रहार, रविवार, दि. 12 ऑक्टोबर 2014 “वापरा आणि फेका “ सूत्र सगळीकडेच !

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

   रविवार, दि. 12  ऑक्टोबर 2014
वापरा आणि फेका  सूत्र सगळीकडेच !

आजअत्यंत स्वार्थी,आत्मकेंद्री अशी `वापरा आणि फेकून द्या'ही प्रवृत्ती सगळ्याच क्षेत्रांत बोकाळल्यामुळे एकूणच सामाजिक मूल्यढासळत चालल्याचे दिसते. त्याचा दूरगामी परिणाम समाज, गाव,देश या व्यापक संकल्पनांवर होण्याची भीती आहे आणि हे एक मोठे संकट म्हणावेलागेल.

दल हा मानवी जीवनाचा आणि एकूणच निसर्गचक्राचा एक अविभाज्य घटक आहे, यात शंका असण्याचे कारण नाही. त्यामुळे जसे निसर्गात बदल होताना दिसतात तसेच ते मानवी जीवनातही होताना दिसतात. बदल मुख्यत्वे भौतिक स्वरूपाचे आणि बाह्यकेंद्री असले, तरी त्याचा परिणाम मानवी स्वभावावर होणे अपरिहार्य असते आणि त्यामुळे या बदलाच्या अनुषंगाने माणसाचा स्वभाव, विचार आणि एकूणच जीवनशैली बदलत असल्याचे आढळून येते. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीची स्थिती आणि आताची स्थिती याचा तुलनात्मक अभ्यास केला, तर किती प्रचंड प्रमाणात बदल झाले आहेत, हे सहज लक्षात येईल.
  पूर्वी बँकांचा कारभार म्हटला, की ते मोठ मोठे लेजर्स, त्यांची कोपऱ्यावर फाटलेली पाने, त्या लेजर्समधून नाव शोधणे नंतर त्यावर हाताने व्यवहार नोंदविणे, त्यावर मोठ्या साहेबांची स्वाक्षरी वगैरे सगळा द्राविडी प्राणायाम व्हायचा, त्यात खूप वेळ वाया जायचा आणि अर्थातच मनुष्यबळही खूप लागायचे. आता कसे संगणकाच्या माऊसचे एक बटण दाबले, की दुसऱ्याच क्षणाला व्यवहार पूर्ण होऊन पैसे ग्राहकाच्या हातात पडतात आणि तो बँकेच्या बाहेर येतो. पूर्वी बँकेत नोकरी करायची म्हणजे वाणिज्य शाखेचा पदवीधर असणे, त्याला अकाऊंटिंगचे ज्ञान असणे अपरिहार्य होते, आता संगणक नीट हाताळता येत असेल, तरी पुरेसे ठरते. आताच्या घडीला जवळपास सगळ्याच बँकांचे संगणकीकरण झालेले असल्यामुळे कामाचा वेग वाढला आहे आणि सोबतच तुलनेत खूप कमी मनुष्यबळाचा वापर होत आहे. हा बदल केवळ बँकिंग क्षेत्रातच झाला अशातला भाग नाही. सगळ्याच क्षेत्रांत असे बदल दिसून येतात. काही दिवसांपूर्वी शेतातील जनरेटरचे रेडिएटर खराब झाले म्हणून दुरुस्त करण्यासाठी नेले असता त्या मेकॅनिकने हे जुने रेडिएटर दुरुस्त करण्याऐवजी नवे रेडिएटर घेण्याचा सल्ला दिला, कारण काय तर आता बाजारात जे नवे रेडिएटर आले आहेत ते वापरा आणि फेका अशा स्वरूपाचे आहेत. त्यामुळे रेडिएटरची दुरुस्ती हा प्रकारच आता बाद झाला आहे. पूर्वीचे रेडिएटर तांब्या-पितळेचे असायचे, त्यात काही बिघाड झाला, तरी तो दुरुस्त केला जायचा, वेल्डिंग वगैरे व्हायचे; आता नवे आलेले रेडिएटर अल्यूमिनिअमचे आहेत, वजनाला हलके आणि अधिक कार्यक्षम आहेत; परंतु एकदा बिघडले, की ते भंगारातच टाकावे लागतात. अलीकडील काळात हा नवा ट्रेंड बाजारात दिसून येत आहे. यंत्रांची दुरुस्ती वगैरे प्रकार आता हळूहळू बंद होत चाललेला दिसतो. एखादे उपकरण बिघडले, की ते फेकूनच द्यावे लागते आणि त्याच्या जागी नवे उपकरण लावावे लागते.
हे नवे आधुनिक तंत्रज्ञानच मुळी `वापरा आणि फेका' या पायावर उभे आहे. असे बदल शिक्षण क्षेत्रातही पाहायला मिळतात. सर्वांगीण शिक्षण हा प्रकार आता बाद ठरू पाहत आहे. पूर्वी एकच डॉक्टर सगळ्या प्रकारच्या आजारावर उपचार करायचा, परंतु आता तसे राहिलेले नाही, प्रत्येक आजाराचा आणि अवयवाचा स्पेशालिस्ट डॉक्टर दिसून येतो. पुढे तर डाव्या डोळ्याचा नेत्रतज्ज्ञ, उजव्या डोळ्याचा नेत्रतज्ज्ञ असे झाले तरी आश्चर्य वाटून घेऊ नये. शिक्षणात तेच होत आहे. कॉमर्सच्या विद्यार्थ्याला इतिहासाचे ज्ञान नसते, विज्ञान शाखेचा विद्यार्थी नफा-तोट्याचे गणित जुळवू शकेलच याची खात्री देता येत नाही. मागे एकदा असेच एकाला मी शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने मला एम.ए.ला इतिहास हा विषय नव्हता, असे उत्तर दिले. त्यावर मी मनातल्या मनात उद्या कुणी बापाचे नाव विचारले, तर त्याला असे उत्तर देऊ नको म्हणजे मिळविली, असे म्हटले.
  सांगायचे तात्पर्य हे जग आता झपाट्याने नॅनो होत आहे. एखादाच विषय आणि त्या विषयातील पोटविषय तेवढ्यापुरतेच ज्ञान संपादन करायचे आणि आपली उपयुक्तता तेवढ्यापुरतीच मर्यादित करायची, असे सगळे चालले आहे. राजकारण तरी त्यापेक्षा वेगळे कुठे आहे? पूर्वी समाजकारण हेच राजकारणाचे प्रवेशद्वार होते. समाजसेवा करून आपली योग्यता सिद्ध करणाऱ्याला राजकारणात संधी आणि प्रतिष्ठा मिळायची. आता तसे काही राहिलेले नाही. मुळात लोकांकडे आता तितका वेळच नाही. अर्धे आयुष्य समाजकारणात घालवून नंतर राजकारणात जायचे, हा दूरचा कंटाळवाणा मार्ग लोकांना मान्य नाही. सगळ्यांना सगळ्याच बाबतीत झटपट रिझल्ट हवे असतात. त्यामुळे आता ऐन विशी-तिशीत थेट राजकारणात उतरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राजकारण आता समाजसेवेचे वगैरे माध्यम राहिलेले नाही, तर त्याकडे करिअरचे एक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच जसा एखादा डॉक्टर आपल्या पश्चात आपण उभारलेला दवाखाना, सगळा व्याप सांभाळल्या जावा आणि मुलाला कमाईची चिंता राहू नये म्हणून आपल्या मुलाला डॉक्टर करू इच्छितो, तसाच नेतादेखील आपल्या मुलाला नेता करू इच्छितो. राजकारणाकडे अशाप्रकारे करिअरचे एक क्षेत्र म्हणून पाहिले जात असल्याने स्वाभाविकच राजकारणातील मूल्ये कमी झाली आहेत आणि सोबतच राजकारण्यांची कारकिर्ददेखील अल्पजीवी ठरू पाहत आहे. पाच-दहा वर्षे आमदारकी-खासदारकी किंवा एखादे पद उपभोगल्यानंतर आयुष्यभराची तजविज करून राजकीय पटलाच्या बाहेर फेकल्या जाणाऱ्या नेत्यांची संख्या खूप मोठी आहे. राजकारणाकडे करिअर म्हणून पाहणाऱ्यांनाही याची जाणीव असल्यामुळे एकदा संधी मिळाली, की त्याचे सोने करून घेण्याची प्रवृत्ती वाढत आहे. थोडक्यात काय तर राजकारणालाही `वापरा आणि फेकून द्या' असेच स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच संधीच्या शोधात एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असा प्रवास अगदी सहजपणे केला जात आहे. यावेळी तर हे दृष्य अगदी घाऊक प्रमाणात पाहायला मिळत आहे. पक्षनिष्ठा, वैचारिक बांधिलकी वगैरे गोष्टी केव्हाच इतिहासजमा झाल्या आहेत. बरे हा बदल केवळ राजकारण्यांपुरता मर्यादित आहे अशातला भाग नाही, मतदारदेखील परिस्थितीनुसार आपला कौल बदलत असतात. त्यांचीही बांधिलकी कोणत्याही एका पक्षासोबत नसते. एखादी लाट आली की त्या लाटेत सगळे वाहवत जातात,  लाट ओसरली की त्याच पक्षाला धोबीपछाड द्यायला ते मागेपुढे पाहत नाही.
  पूर्वी विधिमंडळात विरोधी पक्षाचे फार कमी लोक असायचे, परंतु विधिमंडळ दणाणून सोडण्याची त्यांची क्षमता असायची आणि अनेक प्रसंगी सरकारला आपल्यासमोर झुकण्यास ते बाध्य करायचे, आता तसे होत नाही. सत्ताधारी आणि विरोधी यांची संख्या जवळपास बरोबरीची असतानाही विधिमंडळात विरोधी पक्षाचा आवाज दुमदुमत नाही. याला कारण राजकारणाचे बदलते स्वरूप हेच आहे. पूर्वी विरोधक संख्येने कितीही कमी असले तरी त्यांचा सन्मान केला जायचा, त्यांच्या मतांचा आदर केला जायचा, तो सुसंस्कृतपणा तेव्हाच्या राजकारणात होता. आता आदर वगैरे गोष्टींना थारा राहिलेला नाही. हाती सत्ता आहे ती आपल्या मर्जीने कारभार पाहण्यासाठी हा दृष्टीकोन बळावल्यामुळे विरोधकांना सन्मान वगैरे देण्याची गरज कुणाला वाटत नाही. त्यामुळेच संख्येने भरपूर असूनही विरोधकांचे सभागृहात काहीही चालत नाही. संख्याबळावर आपलेच म्हणणे रेटून नेण्याचा प्रघात पडला आहे आणि त्यापुढे विरोधकही हतबल होताना दिसतात. उद्या सरकार बदलले तरी चित्र हेच कायम राहील कारण हा बदल व्यक्तीसापेक्ष नसून प्रवृत्तीसापेक्ष आहे. एकूणच राजकीय लोकांची प्रवृत्ती प्रचंड आत्मकेंद्री झालेली दिसते. त्याचा फटका अनेक राजकीय पक्षांनाही बसू पाहत आहे किंवा बसला आहे. पक्षाची संपूर्ण सूत्रे आपल्याच हातात राहावी या मानसिकतेतून अनेक पक्षांत दुसऱ्या फळीचे नेतृत्व समोर येऊ दिल्या जात नाही. त्यामुळे अनेक पक्षदेखील व्यक्तीकेंद्रित झाले आहेत, अशा वेळी त्या व्यक्तीचा प्रभाव ओसरला, की त्याचा फटका त्या पक्षालाही बसणे स्वाभाविक आहे. काँग्रेसचा लोकसभेतील पराभव हे त्याचे अगदी ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल. थोडक्यात काय तर अत्यंत स्वार्थी, आत्मकेंद्री अशी `वापरा आणि फेकून द्या' ही प्रवृत्ती सगळ्याच क्षेत्रांत बोकाळल्यामुळे एकूणच सामाजिक मूल्य ढासळत चालल्याचे दिसते. त्याचा दूरगामी परिणाम समाज, गाव, देश या व्यापक संकल्पनांवर होण्याची भीती आहे आणि हे एक मोठे संकट म्हणावे लागेल.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017