प्रहार, प्रहार, रविवार, दि. 7 सप्टेंबर 2014 ‘ धार्मिक अतिक्रमण म्हणजे जिवंत अॅटमबॉम्बच ‘

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

 प्रहार,रविवार, दि. 7 सप्टेंबर  2014

‘ धार्मिक अतिक्रमण म्हणजे जिवंत अॅटमबॉम्बच ‘
या देशात इतर कुठल्याही प्रश्नावर लोक आक्रमक होणार नाहीत, परंतु धार्मिक श्रद्धेचा विषय असला,की लगेच लोक रस्त्यावर उतरतात, त्यांच्या भावना क्षुब्ध होतात, दंगली केल्या जातात, लोकांच्यायाच मानसिकतेचा गैरफायदा घेत सुपीक डोके असलेले लोक धार्मिक स्थळांच्या माध्यमातूनआपल्या दुकानदाऱ्या चालवित असतात. त्यांना माहीत असते, की धार्मिक स्थळे म्हणजे जिवंतअॅटमबॉम्ब आहेत, त्याची पिन काढण्याचे, त्याला धक्का पोहचविण्याचे धाडस कुणी करणार नाही.आज भारतातील जवळपास प्रत्येक शहरात प्रत्येक मोठ्या रस्त्यावर कुठे ना कुठे असे अतिक्रमणदिसून येते आणि त्याला हात लावण्याची हिंमत कुणी दाखवित नाही.

सध्या अनेक शहरांत अतिक्रमण हटाव मोहीम अगदी जोरात सुरू आहे. अकोल्यातही ही मोहीम राबविली जात आहे. नेहमीचा अनुभव पाहता अतिक्रमण विरोधी पथक अतिक्रमण हटविते आणि परत दुसऱ्या दिवसापासून ती अतिक्रमणे पुन्हा त्याच ठिकाणी जैसे थे उभे दिसतात, परत कधीतरी चार-सहा महिन्यांनी अतिक्रमण पथकाला जाग येते, पुन्हा कारवाई केली जाते आणि पुन्हा दुसऱ्या दिवसापासून अतिक्रमण तसेच दिसते; परंतु यावेळी महापालिका प्रशासनाने एकदा हटविलेले अतिक्रमण पुन्हा त्या जागेवर होऊ नये, याची विशेष खबरदारी घेतल्याचे दिसते. त्यामुळे शहरातील रस्ते आता बरेच मोकळे दिसत आहेत, अनेक पक्की अतिक्रमणे जमीनदोस्त झाली आहेत, त्या ठिकाणी वृक्षारोपण वगैरे करून त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे.
  खरे तर लोकांना अतिक्रमण करून रस्त्यावर धंदा करण्याची गरज का भासते, याचाही मुळापासून विचार व्हायला हवा. सरकारी धोरणामुळे उद्योग वाढत नाहीत, मोठ मोठे कारखाने बंद पडत आहेत, सरकारी नोकऱ्या संपल्यात जमा आहेत, त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे, शेवटी पोटासाठी काही तरी करायचे म्हणून हे बेरोजगार तरुण रस्त्यावर गाड्या लावून चहा, वडापाव किंवा इतर लहान-मोठे जिन्नस विकत असतात. या लोकांची ही बाजू समजून घेण्यासारखी असली, तरी रस्त्यावर किंवा रहदारीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने त्यांनी अतिक्रमण करणे समर्थनीय ठरत नाही. स्थानिक प्रशासनाने त्यांना वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी, अकोल्यात तशी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे, तिथे त्यांनी आपल्या गाड्या लावाव्यात. अनेक ठिकाणी बांधकामाशी संबंधित नियमांचे सर्रास उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम केले जाते, ते पाडण्याची मोहीमही राबविली जात आहे आणि ती स्वागतार्हच म्हणायला हवी.
  रस्त्यावरचे अतिक्रमण ही तर फारच गंभीर बाब आहे. रस्ते शरीरातील रक्तवाहिन्यांसारखे असतात, त्यात कुठे ब्लॉकेज झाले, तर संपूर्ण शरीरालाच धोका निर्माण होतो, रस्त्यांवरच्या ब्लॉकेजमुळेही रहदारी कुंठीत होणे, लहान-मोठे अपघात होणे, रस्त्यावरच्या खाद्य पदार्थांच्या किंवा इतर गाड्यांवर होणाऱ्या गर्दीमुळे भांडणे, वादावादी होणे असे प्रकार नेहमीच घडतात. आरोग्याचेही प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे ही अतिक्रमणे हटविणे आवश्यकच ठरते, परंतु त्यापेक्षा गंभीर मुद्दा धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणांचा आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर अगदी मोक्याच्या ठिकाणी एखादे मंदिर, दर्गा किंवा अशीच कुठलीतरी धार्मिक वास्तु उभी दिसते. ते बांधकाम अवैध आहे, अतिक्रमित आहे, हे स्पष्ट दिसत असताना त्याला हात लावण्याची कुणाची हिंमत होत नाही, कोणताही अधिकारी तसे धाडस करू शकत नाही, अर्थात काही अधिकारी त्याला अपवाद असतात. नागपूरला काही वर्षांपूर्वी चंद्रशेखर नावाचे आयुक्त येऊन गेले, त्यांनी नागपूरच्या विकासाचा कार्यक्रम राबविताना धर्माच्या नावावर उभी असलेली अशी अतिक्रमणे जमीनदोस्त करण्याचे धाडस दाखविले आणि म्हणूनच आज नागपूर मोकळा श्वास घेताना दिसत आहे, परंतु असे अधिकारी अपवादात्मकच म्हणावे लागतील. बहुतेक अधिकारी इतर अतिक्रमणांवर निग्रहाने हातोडा चालवितात, परंतु धार्मिक स्थळांच्या अतिक्रमणाबाबत मात्र कचखाऊ भूमिका घेतात. त्यांनी थोडे धाडस दाखविण्याचा प्रयत्न केला तर त्याची काय परिणती होऊ शकते, याचा अनुभव सध्या अकोल्याचे उपायुक्त घेत आहेत. कुठल्याशा धार्मिक कार्यक्रमाच्या भोजनावळी भर रस्त्यावर महापालिकेची परवानगी न घेता उठविल्या जात आहेत हे कळल्यावर उपायुक्तांनी तिथे जाऊन कारवाई केली आणि लगेच त्यांच्या विरोधात राजकीय नेत्यांनी रान माजवायला सुरुवात केली. त्यात बहुतेक अतिक्रमण काढल्यामुळे दुखावलेल्या नेत्यांचा किंवा त्यांच्या चेल्याचपाट्यांचा समावेश होता, आता हे प्रकरण त्या उपायुक्तांची बदली झाल्याशिवाय शांत होणार नाही, असे दिसते. एका चांगल्या, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला संधी मिळताच कशाप्रकारे वेठीस धरल्या जाते, हे या प्रकरणावरून आणि यापूर्वीचे आयुक्त चंद्रशेखर रोकडे प्रकरणावरून दिसून येते.
  सांगायचे तात्पर्य धार्मिक स्थळांच्या माध्यमातून केले जाणारे अतिक्रमण ही एक गंभीर समस्या आहे. आधी कुठेतरी मोक्याची जागा हेरून चार दगडांना शेंदूर फासून छोटसे मंदिर उभे करायचे, भक्तीच्या आड स्वार्थ साधू पाहणाऱ्यांनी तिथे रोज पूजा-पाठ आणि इतर छोटे-मोठे कार्यक्रम करायचे, त्या तथाकथित धार्मिक स्थळाचे अवडंबर माजवायचे आणि नंतर हळूहळू त्या मंदिराचा विस्तार करायचा, आजूबाजूची जागा गिळंकृत करायची आणि पुढे त्या जागेवर वेगवेगळे धंदे सुरू करायचे, हा गोरखधंदा सगळीकडे अगदी सर्रास सुरू असल्याचे दिसते. नागपूर-वर्धा मार्गावर नुकतेच मला एक असेच मंदिर दिसले, नाव काय तर 'वीजमाता मंदिर', या मंदिराच्या बाजूला आता बांधकाम होत आहे, सुरुवातीला भक्ताच्या सोईसाठी वगैरे केले जाणारे हे बांधकाम नंतर विविध व्यवसायांचे अड्डे बनतात. अमरावतीत ईविन चौक ते रेल्वेस्टेशन रोडवर अशाच एका सुपीक डोके असलेल्या माणसाने आधी हनुमान मंदिर उभे केले, परंतु हनुमान मंदिरात केवळ शनिवारी गर्दी होते, मंदिराचे प्रस्थ वाढवायचे तर ते पुरेसे नाही, हे ओळखून त्याने नंतर तिथे विठ्ठलाचे मंदिर बांधले, परंतु तिथेही एकादशीलाच अधिक गर्दी होते, शेवटी त्याने साईबाबाचे मंदिर बांधले आणि आता तिथे रोज गर्दी होते. शेगावकडे जाणाऱ्या अकोला-निंबा रस्त्यावर गायगावला पूर्वी अगदीच छोटेसे गणपतीचे मंदिर होते. माझे वडील आणि शंकरराव ताथोड यांनी पाच बाय पाच फुटाचे बांधकाम करून त्या गणपतीला व्यवस्थित छत मिळवून दिले, परंतु त्यावर नंतर अशाच सुपीक डोक्याच्या माणसानी त्या मंदिरावर कब्जा केला आणि तेथे थोडेबहुत बांधकाम केले. याचबरोबर हा गणपती नवसाला पावतो हे सांगणारे काही चतूर माणसे अलगद पेरली. आता तेच मंदिर अगदी भव्य वगैरे झाले आहे, गणपतीसोबतच तिथे गजाननाचीही प्रतिष्ठापना झाली आहे, शेगावला जाणारे भाविक आधी या गजाननाचे दर्शन घेतात आणि मगच पुढे जातात. हळूहळू तिथे इतरही बांधकामे झाली, मंदिराचा पसारा वाढला, भंडारे करणाऱ्यांची संख्याही वाढली, त्यामुळे आवक वाढली, हा येणारा पैसा कुठे जातो, हे कळायला मार्ग नाही, परंतु मंदिराच्या माध्यमातून इतर व्यवसायांना तिथे चांगलाच वाव मिळत असल्याचे दिसते. मंदिरे, दर्गे याशिवाय अशा अतिक्रमणासाठी महापुरुषांचा वापरदेखील सर्रास केला जातो. कुठे शिवाजी महाराजांचा तर कुठे बाबासाहेबांचा, कुठे भगव्या ध्वजाचा तर कुठे पंचशील ध्वजाचा वापर करून अतिक्रमण करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. या महापुरुषांचा किंवा प्रतिकांचा वापर करून मोक्याची जागा हेरायची आणि त्यानंतर तिथे छोटे-मोठे उद्योग सुरू करायचे, ही अतिक्रमणकर्त्यांची जणू काही मोडस ऑपरेंडी झाली आहे. या अतिक्रमणांना हात लावायचा म्हटले, की लगेच लोकांच्या धार्मिक भावना उफाळून येतात, धर्मस्थानावर घाला घातला म्हणून दंगली वगैरे केल्या जातात. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगरपालिकेने त्यावर एक नामी उपाय शोधला आहे. या नगरपालिकेने शहरातील सगळे पुतळे हटवून ते सगळे पुतळे एकाच ठिकाणी स्थापित केले आहेत. त्यामुळे वाहतुकीचा अडथळा तर दूर झालाच शिवाय सगळे पुतळे एकाच जागी असल्याने पुतळ्यांची विटंबना वगैरे प्रकारांनाही आळा बसला.
  सांगायचे तात्पर्य हेच, की धार्मिक स्थळांच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या अतिक्रमणावर जोपर्यंत योग्य कारवाई होत नाही तोपर्यंत अतिक्रमणाच्या मानसिकतेला पुरेसा आळा बसणार नाही. धार्मिक स्थळाचे अवैध अतिक्रमणदेखील हटविले जाते, हा संदेश लोकांपर्यंत गेला तर इतर अतिक्रमणांना आपोआपच आळा बसेल. ज्या ईश्वराने संपूर्ण जग निर्माण केले त्या ईश्वराला आपल्या पूजास्थानासाठी अतिक्रमणाचा आधार घ्यावा लागतो, ही बाब मोठी हास्यास्पद म्हणावी लागेल. खरे तर हे धार्मिक स्थळांचे अतिक्रमण नसून काही स्वार्थी लोकांनी श्रद्धेवरच केलेले अतिक्रमण म्हणावे लागेल. लोकांची श्रद्धा अगदीच उतू जात असेल, तर या लोकांनी भूखंड विकत घेऊन किंवा सरकार, स्थानिक प्रशासनाची पूर्व परवानगी घेऊन मंदिरे बांधावीत, अतिक्रमण करण्याची काय गरज? मुळात त्यात श्रद्धा वगैरे काहीही नसते, श्रद्धेच्या नावाखाली आपली आपली दुकानदारी चालवायची असते. या देशात इतर कुठल्याही प्रश्नावर लोक आक्रमक होणार नाहीत, परंतु धार्मिक श्रद्धेचा विषय असला, की लगेच लोक रस्त्यावर उतरतात, त्यांच्या भावना क्षुब्ध होतात, दंगली केल्या जातात, लोकांच्या याच मानसिकतेचा गैरफायदा घेत सुपीक डोके असलेले लोक धार्मिक स्थळांच्या माध्यमातून आपल्या दुकानदाऱ्या चालवित असतात. त्यांना माहीत असते, की धार्मिक स्थळे म्हणजे जिवंत अॅटमबॉम्ब आहेत, त्याची पिन काढण्याचे, त्याला धक्का पोहचविण्याचे धाडस कुणी करणार नाही. आज भारतातील जवळपास प्रत्येक शहरात प्रत्येक मोठ्या रस्त्यावर कुठे ना कुठे असे अतिक्रमण दिसून येते आणि त्याला हात लावण्याची हिंमत कुणी दाखवित नाही. राजकीय माणसे काही करू शकत नाही कारण त्यांची दुकानदारी धोक्यात येते. त्यामुळे त्यांचे धोरण हे अशा लोकांच्या गर्दीच्या मानसिकतेवर अवलंबून असते, मात्र चंद्रशेखरांसारखी धडाकेबाज मोहीम, काही राजकीय पाठबळ किंवा न्यायालयीन आदेश घेऊन जर कुण्या अधिकाऱ्यानी केली व अशी धार्मिक अतिक्रमणे भुईसपाट केली आणि तिथे विकासात्मक कामे केली तर 99 टक्के लोक सुरुवातीला केवळ बघ्याची भूमिका घेतील, मात्र नंतर विकास पाहिल्यावर तीच माणसे अशा अधिकाऱ्यांना डोक्यावरही घेतील.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017