प्रहार ...तरीही माझा भारत `महान'!रविवार, दि. 24 जुलै 2016

देशभक्ती हे मूल्य आहे, दैनंदिन जीवनाशी निगडीत मूल्य आहे, परंतु अलीकडील काळात हे मूल्य आपल्या जीवनातून हद्दपार होत असल्याचे दिसते. हा देश आपला असेल, नव्हे तो आपलाच देश आहे, तर या देशाला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त, अराजकमुक्त, भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, आपल्या देशभक्तीची खरी परीक्षा तिथेच होते आणि ही जरी देशभक्तीची परीक्षा असेल, तर दुर्दैवाने आपण बहुसंख्य भारतीय त्या परीक्षेत साफ अनुत्तीर्ण होतो, ही वस्तुस्थिती आहे.

देश ही केवळ एक भौगोलिक संकल्पना नाही, माझा देश म्हटल्यावर त्या भूमीसोबत आपले एक वेगळे आत्मियतेचे नाते तयार होते. खरे तर दगड, माती, नद्या, पर्वत सगळ्याच देशांत असतात; परंतु इतर देशांबद्दल आपल्याला आत्मियता वाटत नाही, उलट असेच दगड-मातीचे बनलेले काही देश तर आपल्यासाठी शत्रू असतात. तात्पर्य केवळ दगड-माती, नद्या, डोंगर-पर्वत यांचा मिळून बनलेला विशिष्ट आकाराचा भूभाग म्हणजे देश भलेही होत असेल; परंतु तो आपला देश असेलच असे नाही. आपला देश तोच ज्या देशाच्या मातीत आपला जन्म झालेला असतो. आपल्या जन्मदात्या आईसोबत जसे आपले जन्मजात नाते जुळलेले असते आणि ते शेवटपर्यंत कायम असते तसेच नाते आपण ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमिशी जुळलेले असते. त्यामुळे मायभूमीची सर  इतर कोणत्याही भूमीला येत नाही. या मायभूमीच्या रक्षणासाठी आजवर अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, परक्यांच्या दास्यातून ही भूमी मुक्त करण्यासाठी कोट्यवधी लोकांनी आपले रक्त सांडले आहे आणि आजही सीमेवर आपले लष्करी जवान आपल्या प्राणांची बाजी लावत या देशाचे रक्षण करीत आहेत. हे सगळे जरी ठीक असले तरी मुळात देशभक्ती म्हणजे काय, ती कशी प्रतीत होते, हा प्रश्न उपस्थित व्हावा, त्या प्रश्नाने संवेदनशील व्यक्ती अस्वस्थ व्हावी अशी ही परिस्थिती आज पाहायला मिळत आहे आणि हेच या देशाचे मोठे दुर्दैव आहे, असे म्हणता येईल. कदाचित वाचायला हे कटू वाटेल, परंतु बहुसंख्य भारतीयांच्या बाबतीत देशभक्ती 'सिझनल' म्हणजेच मोसमी असते. ही देशभक्ती काही विशिष्ट प्रसंगीच अगदी उचंबळून येते, एरवी मात्र ती कुठे गडप होते ते कळायला मार्ग नाही. वर्षातले दोन दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आमची देशभक्ती प्रचंड प्रमाणात आणि तीही केवळ दुपारी फार तर बारा वाजेपर्यंत उचंबळून आलेली असते. एरवी वर्षभर धूळ खात पडलेल्या देशभक्तीपर गीतांच्या कॅसेटस्, सिडी याच दोन दिवसांत बाहेर येतात आणि अगदी कानठळ्या बसतील अशा आवाजात ही गाणी वाजविली जातात. कागदी, कापडी तिरंग्यांचा बाजार भरतो, अर्थात त्याच दिवशी संध्याकाळी हे कागदी तिरंगे रस्त्याच्या बाजूला फाटलेल्या, चुरगाळलेल्या अवस्थेत पाहायला मिळतात, तो भाग वेगळा. पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सामना असतो तेव्हादेखील अशीच उन्मादी अवस्था पाहायला मिळते, पाकिस्तानसोबत इतर खेळांचे सामने असेल तर मात्र असे वातावरण नसते, हेदेखील आपल्या देशभक्तीचे एक वैशिष्ट्य म्हणायला हवे.
 देशभक्ती ही अशी मोसमी असू शकते का? देशभक्ती हे मूल्य आहे, दैनंदिन जीवनाशी निगडीत मूल्य आहे, परंतु अलीकडील काळात हे मूल्य आपल्या जीवनातून हद्दपार होत असल्याचे दिसते. हा देश आपला असेल, नव्हे तो आपलाच देश आहे, तर या देशाला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त, अराजकमुक्त, भ्रष्टाचारमुक्त ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे, आपल्या देशभक्तीची खरी परीक्षा तिथेच होते आणि ही जरी देशभक्तीची परीक्षा असेल, तर दुर्दैवाने आपण बहुसंख्य भारतीय त्या परीक्षेत साफ अनुत्तीर्ण होतो, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या कथित देशाभिमानावर प्रश्नचिन्ह लावणारी अनेक उदाहरणे देता येतील. जगातल्या सगळ्या देशांना त्यांची त्यांची मातृभाषा आहे, राष्ट्रभाषा आहे. बोलीभाषा अनेक असतील, परंतु राष्ट्रभाषा एकच असते आणि त्या भाषेचा देशातील सगळ्यांना अभिमान असतो. देशाचा कारभार त्याच राष्ट्रभाषेत चालतो. आपलीही राष्ट्रभाषा आहे, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, परंतु दुर्दैव हे आहे की हिंदी आपली राष्ट्रभाषा असूनही आपल्या देशाचा कारभार आपण ज्यांच्या गुलामीत दीडशे वर्षे होतो त्या इंग्रजांच्या इंग्रजी भाषेत चालतो. संसदेचे कामकाज इंग्रजीत होते, न्यायालयाचे कामकाज इंग्रजीत चालते, सरकारी कामकाज इंग्रजीतच चालते. आपल्या देशात शेकडो बोलीभाषा आणि एक राष्ट्रभाषा आहे; परंतु व्यवहारात आपली राष्ट्रभाषा आपल्या गुलामीचे प्रतीक असलेली इंग्रजी आहे. जगातल्या इतर कोणत्याही देशात राष्ट्रभाषेची अशी विटंबना होत नसेल.
 जातीव्यवस्था ही आपल्या देशाला, समाजाला लागलेली कीड आहे यावर सगळ्यांचे एकमत आहे; परंतु देशाचा कारभार ज्या कायदेमंडळाकडून चालविला जातो त्या कायदेमंडळासाठी प्रतिनिधींची निवड करताना त्याची जात आधी पाहिली जाते. राजकीय पक्ष उमेदवार निवडताना जातीचा आधी विचार करतात आणि मतदारदेखील मत देताना कोणता उमेदवार आपल्या जातीचा आहे, हे आधी पाहतात. आपल्या देशात लोक मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करायला तयार नसतात; परंतु त्याच मुलीचे लग्न अगदी कर्ज काढून थाटामाटात लावून दिले जाते. सिग्नलवर लाल दिवा लागलेला असताना गाडी पुढे नेऊ नये, हा साधा नियम आहे, परंतु हा नियम तोडण्यात पुरुषार्थ मानणाऱ्यांची संख्या या देशात कमी नाही. इथे कचरा टाकू नये, असा फलक ज्या ठिकाणी असतो तिथेच कचऱ्याचे ढिग केवळ भारतात पाहायला मिळतात. रस्त्यात बिनदिक्कत थुंकणारे महाभाग केवळ आपल्याच देशात आढळून येतील. आपला देश गरीब आहे असे म्हटले जात; परंतु याच गरीब देशात केवळ दोन चित्रपट तब्बल सातशे कोटींचा गल्ला जमा करून जातात, ही वस्तुस्थिती काय सांगते? आयुष्यभर कष्ट करूनही डोक्यावरील पाच-पंचवीस हजारांचे कर्ज फेडू शकल्याने हताश होऊन आत्महत्या करणारे शेतकरी याच देशात आहेत आणि हजारो कोटींचे कर्ज बुडवून सरकारला वाकुल्या दाखवित विदेशात पळून जाणारे महाभागदेखील याच देशात आहेत. इथे पोलिसांना पाहून सुरक्षित वाटण्याऐवजी पोलिसांची भीती वाटते, पोलिस स्टेशनमध्ये जाणे संकट वाटते. जिथे उन्हाळ्यात एकीकडे पिण्याची पाण्याची गरज भागविण्यासाठी सरकारला रेल्वेने पाणी पुरवावे लागते तिथेच क्रिकेटच्या मैदानावरील हिरवळ जिवंत ठेवण्यासाठी लाखो लीटर पाण्याची नासाडी केली जाते. पावसाळ्यात करोडो क्युसेक लिटर पाणी समुद्रात वाहून जाते; मात्र ते भूमिगत टाक्यांमध्ये साठवून ठेवल्या जात नाही. सरकारी कार्यालयातील कोणतेही काम करण्यासाठी लाच देणे हा व्यवस्थेचाच एक भाग आहे, असा इथे समज आहे, त्यामुळे आपण लाच देत आहोत किंवा घेत आहोत म्हणजे चुकीचे काम करीत आहोत, असे कुणालाही वाटत नाही. बस, ट्रेन सारखी सार्वजनिक मालमत्ता म्हणजे आपल्या बापाचीच जायदाद आहे असे समजून सीटचे कुशन फाडणे, वाटेल तिथे घाण करणे, कचरा टाकणे, शक्य असेल तर तिकिट काढता प्रवास करणे, ही सगळी कामे आमच्या देशभक्तीचा परिचय देणारीच आहेत.
 आमचे सरकार शिक्षणावर लाखो कोटींचा खर्च करते, परंतु अजूनही कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, हनुमान कवच आपल्याला धनसंपत्ती देईल, सुरक्षा प्रदान करेल असे वाटणाऱ्यांची संख्या करोडोच्या घरात आहे, आणि अंधश्रद्धेच्या विरोधात कायदा असूनही टीव्हीवर अंधश्रद्धा पसरविणाऱ्या मालिकांची रांग  लागलेली आहे. ट्रॅफिक पोलिसने हात दिल्यावरही थांबणारे लोक एखादी मांजर आडवी गेली तर हमखास थांबतात. या देशात करोडो लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, लाखो लोक वेळेवर योग्य औषधोपचार मिळाल्याने दगावतात, परंतु त्यांच्यासाठी कुणाला काही करावेसे वाटत नाही, त्याऐवजी देवस्थानांच्या दानपेटीत कोट्यवधीचे दान टाकले जाते. मोबाईल किंवा तत्सम चैनीच्या वस्तूंसाठी हजारो रुपये अगदी बिनदिक्कत खर्च करणारे लोक मेथीच्या जुडीचा किंवा कांद्याचा भाव पाच वरून दहा रुपयांवर गेला की मात्र महागाईच्या नावाने आतडे पिळवटून आक्रोश करतात. या देशात महामानवांच्या विचारांना केव्हाच तिलांजली देण्यात आली आहे, परंतु त्यांच्या पुतळ्यांना मात्र प्राणपणाने जपले जाते. ही यादी पुढे लांबवायचीच झाली तर खूप मोठी होईल. सांगायचे तात्पर्य आपला देश महान आहे असे आपण म्हणत असू तर तो खऱ्या अर्थाने महान करण्यासाठी प्रत्येकाने आपल्यापुरती तरी नियम, शिस्त आणि स्वच्छता पाळण्याची शपथ घेणे गरजेचे आहे. आपण सोडून इतर सगळ्यांनी हे केले पाहिजे ही वृत्ती जोपर्यंत आपल्यात आहे तोपर्यंत आपली कथित देशभक्ती प्रश्नांकितच राहणार आहे.


फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
 Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921

प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017