प्रहार,रविवार, दि. 20 जुलै 2014 “ नवीन तंत्रज्ञान आले मात्र तंत्रज्ञ कुठे आहेत “



आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

रविवार, दि. 20 जुलै 2014
नवीन तंत्रज्ञान आले मात्र तंत्रज्ञ कुठे आहेत

          जगाच्या इतिहासात विसावे शतक हे विज्ञान युगाचे शतक म्हणून ओळखले जायचे, या शतकात विज्ञानाने प्रचंड मोठा पल्ला गाठला. संगणक क्रांतीची सुरुवात याच शतकात झाली आणि आता एकविसाव्या शतकात तर तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कितीतरी पटीने अधिक होत असल्याचे दिसते. अगदी पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची परिस्थिती पाहिली, तरी भारतातील रस्त्यावर मोजक्या दोन-चार कंपन्यांच्या चार चाकी गाड्या दिसायच्या आणि त्यादेखील खूप कमी प्रमाणात. फिएट, अॅम्बेसिडर या दोन कंपन्यांच्या मोटर गाड्या आणि विलिज म्हणजेच महेंद्र कंपनीची जीप अशा या तीनच कंपन्यांच्या कार रस्त्यावर धावायच्या आणि अतिश्रीमंत लोकच या कार पदरी बाळगू शकत होते. दुचाकी वाहनातही स्कूटर प्रकारात व्हेस्पा, लॅम्ब्रेटा आणि मोटरसायकलमध्ये राजदूत, बुलेट, येझ्दी याच मोजक्या कंपन्या दिसायच्या, शिवाय या कार किंवा मोटारसायकलींचे उत्पादनही मर्यादित असल्याने त्या मिळण्यासाठी खूप प्रतीक्षा करावी लागायची. फिएट विकत घ्यायची, तर किमान पाच वर्षे आधी बुकिंग करावे लागायचे, साध्या स्कूटरसाठी 3 ते 4 वर्षे थांबावे लागायचे.  तीच परिस्थिती टेलिफोनसंदर्भातही होती. त्याचा परिणाम म्हणून जुन्या गाड्यांचा बाजारदेखील प्रचंड नफ्यात चालायचा. एखाद्याने पंधरा हजारांत फिएट घेतली असेल आणि पाच वर्षांनी ती विकून दुसरी नवी गाडी त्याला घ्यायची असेल, तर त्या पंधरा हजारांच्या फिएटला वीस हजार मिळायचे, नवी गाडी सहज उपलब्ध होणे आणि दरम्यानच्या काळात मुद्रा स्थितीमुळे गाडीची वाढत गेलेली किंमत हे त्यामागचे मुख्य कारण असायचे. पाच हजारांची स्कूटर जुनी झाल्यावर आठ हजारांत विकली जायची. तंत्रज्ञानाच्या आणि उत्पादनाच्या क्षेत्रात काही मोजक्या कंपन्यांनी आपली मोनोपोली तयार केल्यामुळे हे सगळे घडत होते. स्वातंत्र्ययुद्धात दिलेल्या तथाकथित योगदानाची पुरेपूर किंमत वसूल करीत काही बड्या औद्योगिक घराण्यांनी सरकारला हाताशी धरत वाहन उत्पादन आणि अन्य काही उद्योगांवर आपली इतकी मजबूत पकड बसविली होती, की विदेशी तंत्रज्ञानाला भारतात पाऊल टाकायचे असेल, तर ते याच कंपन्यांच्या माध्यमातून टाकावे लागायचे. 70-80च्या दशकापर्यंत भारतात या औद्योगिक घराण्यांची ही मक्तेदारी कायम होती. त्यामुळे आयात-निर्यातीवर, विशेषत: तंत्रज्ञानाच्या आयातीवर बंधने लादण्यात आली होती. सरकारच्या या नीतीचा परिणाम अगदी अलीकडील काळापर्यंत जाणवत होता.
 युरोप-अमेरिकेत जे तंत्रज्ञान वीस-पंचवीस वर्षे जुने झालेले असायचे त्या तंत्रज्ञानाचे इथे नवे तंत्रज्ञान म्हणून स्वागत केले जायचे. युरोपातील प्रगत देशांच्या तुलनेत आपण पंचवीस वर्षे मागे होतो. राजीव गांधी सत्तेवर आल्यानंतर हे चित्र हळूहळू बदलू लागले, माहिती आणि दूरसंचार म्हणजेच मोबाईल आणि डिजीटल चॅनेल यामध्ये तर आमूलाग्र बदल होऊन एका नव्या युगाची सुरुवात झाली आणि पुढे 1994ला खुल्या अर्थव्यवस्थेचा भारताने स्वीकार केल्यानंतर नरसिंहराव-मनमोहन सरकारने तर भारताची दारे विदेशी तंत्रज्ञानासाठी सताड उघडी केली. उत्पादन, आयात-निर्यातीवरील बंधने गळून पडली आणि विदेशी तंत्रज्ञानाचा तसेच उत्पादनांचा महापूर भारतात आला. 70-80च्या दशकापर्यंत जी बंधने भारताने स्वत:वर लादून घेतली होती, त्यामुळे तांत्रिक विकास आणि उत्पादनाच्या बाबतीत भारतात मोठा `बॅकलॉग' निर्माण झाला होता, तो 90च्या दशकात एकदम भरून काढण्याचा प्रयत्न झाला किंवा विदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादने अचानक मोठ्या प्रमाणात भारतात दाखल झाल्याने एक मुख्य अडचण ही निर्माण झाली, की वेगवेगळ्या देशांत या नवीन तंत्रज्ञानाने उत्पादित वस्तुंची दुरुस्ती आणि देखभालीसाठी आवश्यक तितके प्रशिक्षित मनुष्यबळ भारतात उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी या वस्तुंमध्ये काही बिघाड झाला, तर त्या अगदी टाकून द्याव्या लागतात किंवा एखाद्या मोठ्या शहरात दुरुस्तीसाठी न्याव्या लागतात आणि ते परवडण्यासारखे नसते. गाड्या दुरुस्त करणारे जुने मेकॅनिक बाद ठरू लागले, कारण गाड्यांमधील नवीन तंत्रज्ञानाचा त्यांना परिचयच नव्हता. पॉवर स्पे्र, ट्रॅक्टर, छोटी इंजिने अशा अनेक छोट्या-मोठ्या वस्तू मेकॅनिककडे योग्य तांत्रिक माहिती नसल्याने पडून राहू लागल्या. त्यात लोकांचा प्रचंड पैसा अडकला. पूर्वी गाडी दुरुस्तीसाठी मेकॅनिककडे नेली, की तो मालकाच्या समोरच गाडी दुरुस्त करायचा, त्यामुळे मालकाला किंवा ड्रायव्हरलाही त्यातले बरेच काही माहीत व्हायचे, परिणामी छोटे-मोठे बिघाड घरीच दुरुस्त केले जायचे. गाडीचा ड्रायव्हर हा अर्धा मेकॅनिक असायचा, आता केवळ गाडी चालविणे आणि फारतर स्टेपनी बदलणे यापलीकडे ड्रायव्हरला गाडीतले फारसे कळत नाही. आता सर्व्हिसिंगकरिता गाडी गॅरेजमध्ये लावून निघून जायचे आणि त्यांनी सांगितलेल्या वेळी येऊन गाडी घेऊन जायची, ही पद्धत आहे. त्यामुळे गाडीत नेमका कोणता बिघाड झाला आणि कोणती दुरुस्ती केली हे मालकाला काहीच कळत नाही. अनेकदा तर दुरुस्तीसाठी आवश्यक तंत्रज्ञान किंवा तंत्रज्ञ नसल्यामुळे या विदेशी वस्तू बिघाडानंतर चक्क भंगारात काढाव्या लागतात. पूर्वी एखादी स्कूटर घेतली, की पंधरा-वीस वर्षे ती वापरली जायची, आता दर दोन वर्षांनी गाड्या जुन्या होऊन भंगारात निघत आहेत. हे तंत्रज्ञानदेखील देशागणिक बदलत असते. साध्या स्क्रूचे आटे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळे असतात, त्यामुळे या देशातला नट त्या देशातल्या मशिनमध्ये बसत नाही. यांत्रिक उत्पादनांचे सुटे भाग वेगवेगळ्या देशांत तयार होतात, हे सुटे भाग पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानेही अनेक उत्पादने पडून राहतात आणि मग त्याऐवजी नवी वस्तू घेण्याला पर्याय उरत नाही. यातून विदेशी कंपन्यांचा धंदा जोरात होत असला, तरी भारतीयांचे पैसे अक्षरश: वाया जातात. पूर्वी दीड टनाचा एसी तीस हजारांत मिळायचा, आता तोच वीस हजारांत मिळतो, रुपयाच्या अवमूल्यनचा विचार केला, तर तो एसी पाच हजारांतच पडतो, तात्पर्य तंत्रज्ञानाच्या आयात-निर्यातीवर त्या काळी असलेल्या बंदीमुळे इथल्या लोकांची किती प्रचंड लूट 70-80च्या दशकात होत होती, हे स्पष्ट होते. आता हे चित्र बदलले आहे किंवा बदलत आहे, परंतु एक अडचण मोठी ठरू पाहत आहे. भारतीय बाजारात धबधब्यासारख्या कोसळणाऱ्या या विदेशी उत्पादनांच्या देखभाल आणि दुरुस्तीचे तंत्रज्ञान आपल्याकडे व्यापक स्वरूपात उपलब्ध नाही. आजही आपल्या आयटीआयमध्ये जुन्याच मशिनवर विद्यार्थ्यांना दुरुस्तीचे धडे दिले जातात. हे मेकॅनिक बाहेर पडल्यावर नव्या वस्तुंची काय दुरुस्ती करणार? आजही कॉइल्सपासून बनविलेल्या शंभर किलो वजनाच्या वेल्डिंग मशिनचाच वापर त्याचे तंत्र शिकविताना केला जातो. बाजारात आता केवळ पाच किलो वजनाच्या आणि पाच ऍम्पिअरवर आणि साध्या सिंगल फेजवर चालणाऱ्या वेल्डिंग मशिन्स आल्या आहेत. देखभाल-दुरुस्तीचे हे तंत्रज्ञान आयटीआयमधून मिळायला हवे. बदलत्या काळानुसार तंत्रात होणारे बदल आपल्या शिक्षण व्यवस्थेतही येणे गरजेचे आहे.

 आज भारतात कुशल मनुष्यबळाची प्रचंड कमतरता आहे. त्यामुळे या क्षेत्रात रोजगाराची प्रचंड संधी उपलब्ध आहे, फक्त त्यासाठी क्षणाक्षणाला बदलणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख नव्या पिढीला करून देणे, त्या तंत्रज्ञानाच्या देखभाल दुरुस्तीचे अद्यावत ज्ञान तंत्रशिक्षण संस्थांमधून किंवा त्या त्या देशासोबत तसा करार करून दिले जाणे आवश्यक आहे. आज आपली परिस्थिती अशी आहे, की अगदी युरोप, अमेरिका  तोडीचे तंत्रज्ञान चीनच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध असले, तरी ते समजून घेऊन त्याची देखभाल आणि दुरुस्ती करणारे तंत्रज्ञच आपल्याकडे उपलब्ध नाहीत किंवा जे आहेत ते केवळ मोठ्या शहरांमध्ये आहेत. अगदी गावपातळीवर हे तंत्रज्ञ उपलब्ध होणे ही काळाची गरज आहे, या अभावी या सगळ्या विदेशी वस्तुंची अवस्था `वापरा आणि फेकून द्या' अशी झाली आहे. त्यातून विदेशी कंपन्यांचा धंदा जोरात चालतो; परंतु भारतीयांचा पैसा विनाकारण खर्च होतो. यात भारताचे प्रचंड नुकसान होत आहे. वस्तुंची आयुर्मयादा जी पूर्वी पंधरा-वीस किंवा त्यापेक्षा अधिक वर्षांची होती ती आता केवळ दोन-तीन वर्षांवर आली आहे. जर या उत्पादनांचे सुटे भाग आणि त्या वस्तू दुरुस्त करणारे तंत्रज्ञ पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाले, तर देशाची ही अप्रत्यक्षरित्या होणारी लूट थांबविली जाऊ शकते, तसेच भारतामध्येसुद्धा संशोधन उत्पादनाला चालना मिळून आपण आत्मनिर्भर होऊ शकतो.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017