प्रहार रविवार, दि.29 मे 2016 बहुजन ऐक्यात दरार पाडण्यासाठी `सैराट' कारस्थान!



ज्या समाजाने गावाच्या, राज्याच्या, देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले, बलिदान केले, त्याचे वर्णन कोणत्याही कलाकृतीतून पाहायला किंवा ऐकायला मिळत नाही. शिक्षणासारख्या क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती मोठे काम केले, हे महाराष्ट्रालाच काय उभ्या देशाला माहीत आहे. पंजाबराव देशमुखांचे योगदान नजरेआड कसे करता येईल? परंतु मराठा समाजाचे हे सुधारणावादी, पुरोगामी रूप कधीच पुढे आणले जात नाही. गावचा पाटील म्हटला की तो मराठाच असणार आणि तो बदफैलीच असणार, रंगेल असणार, रगेल आणि नालायक असणार हे जणू काही ठरवून टाकण्यात आले आहे. इतर अनेक बाबतीत परंपरागत गृहितकांना छेद देणाऱ्या 'सैराट' या चित्रपटाला या ठाशीव आणि घोटीव अपप्रचाराला मात्र छेद देता आला नाही.

  सध्या राज्यात 'सैराट' चित्रपटाने अगदी धूम माजवली आहे. उत्पन्नाचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटाने मोडले आहेत. 'सैराट'च्या धुंदीत अवघा महाराष्ट्र झिंग झिंग झिंगाट झाल्याचे दिसत आहे. अर्थात हा चित्रपटदेखील तितकाच चांगला  आहे. चित्रपटाची कथा, त्यातील गाणी आणि मुख्य म्हणजे चित्रपटाचा विषय तरुणांना मोहित करणाराच आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी या चित्रपटासाठी बरीच मेहनत घेतल्याचे पदोपदी जाणवते; परंतु एक बाब थोडी खटकल्याशिवाय राहत नाही आणि ती चित्रपटाच्या शेवटाशी संबंधित आहे. चित्रपटाची नायिका मराठा समाजाची दाखविली आहे. ती अन्य जातीच्या गरीब मुलासोबत लग्न करते आणि ते दोघेही हैद्राबादला पळून जाऊन तिथे आपला संसार थाटतात आणि तिथे ते सुखाने राहत असतात. ही मुलगी आपल्या आईच्या संपर्कात असते. या मुलीचे वडील मराठा समाजाचे दाखविले आहेत. आपल्या देशात आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. दोन्हीकडचे लोक हा विवाह मान्य करत नाही. हरियाणासारख्या राज्यात तर खाप पंचायतींनी याबाबतीत एकप्रकारची दहशतच निर्माण केली आहे. तिकडे `ऑनर किलिंग' अर्थात स्वप्रतिष्ठेसाठी अशा पळून जाऊन लग्न केलेल्या तरुण-तरुणींची हत्या करण्याचे प्रमाण खूप अधिक आहे. सगळ्याच समाजात थोड्या फार फरकाने आंतरजातीय विवाहाला विरोध करण्याची मानसिकता दिसून यायची; मात्र जसजसा शिक्षणाचा आणि आर्थिक स्तर वाढत गेला तसतसा यामध्ये झपाट्याने बदल होऊ लागला आहे. या चित्रपटाचा शेवटही असाच जुनाट मानसिकतेच्या `ऑनर किलिंग'शी संबंधित दाखविला आहे; परंतु प्रश्न हा आहे, की मराठी चित्रपटाला खलनायकी भूमिका साकारण्यासाठी एका विशिष्ट किंवा अधिक स्पष्ट बोलायचे झाल्यास मराठा अथवा पाटील समाजाचाच माणूस का लागतो? 15-20 वर्षापूर्वीचेही बहुतांश मराठी चित्रपट पाहिले तर ते तमाशा, गावगाडा, सरपंच किंवा पाटील आणि त्याचा बदफैलीपणा याभोवतीच फिरत असल्याचे दिसून येईल. गावातला पाटील म्हणजे तो रंगेल, रगेल, भानगडबाज - राजकारणी असलाच पाहिजे, हा जणू काही मराठी चित्रपटातील अलिखित संकेत होऊन गेला आहे. अगदी अलिकडे येऊन गेेलेल्या `कापूस कोंड्याची गोष्ट' या चित्रपटातही असेच दाखविल्या गेले. याही चित्रपटात नायिकेचा बाप मराठा समाजाचा दाखविला आहे आणि त्याच्यात हे सगळेच दुर्गुण ठाशीवपणे दाखविण्यात आले आहेत. खरेतर नायक आणि नायिका पळून जाऊन तिकडे दूर हैद्राबादमध्ये आपला संसार थाटतात, आपल्या परीने तो रेटत असतात, त्यांचा कुणालाही त्रास नसतो, त्यांना एक मूलही होते, फक्त ती नायिका आपल्या आईच्या संपर्कात असते. असे असताना त्या नायिकेचा भाऊ  चार वर्षांनंतर गावातून चार-पाच गुंडांना सोबत घेऊन जातो आणि त्या दोघांचाही गुपचूप खात्मा करतो. नायक-नायिका रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दाखवून, चित्रपट नि:शब्द संपतो. ती तरुणी गावातच राहत असते आणि तिच्यामुळे तिच्या आई-वडिलांना किंवा घरच्यांना टोमणे सहन करावे लागले असते, त्यांना गावात मानहानी पत्करावी लागली असती तर एकवेळ हे अतिरेकी पाऊल समजून घेता आले असते, परंतु तसे काही नसताना तिकडे दूर हैद्राबादमध्ये जाऊन स्थायिक झालेले आणि गुण्यागोविंदाने राहत असलेल्या बहिणीची आणि जावयाची 4 वर्षांनंतर काहीही कारण नसताना नायिकेच्या भावाने जाऊन  हत्या करण्यात आल्याचे दाखविण्यात आले, हे कशासाठी? चित्रपटाचे दिग्दर्शक भलेही असे म्हणत असले की मी या चित्रपटातून कोणत्याही जातीच्या नव्हे तर जातियवादाच्या विरोधात संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु तरी हा प्रश्न उरतोच की मुलगी किंवा मुलगा तथाकथित खालच्या किंवा उच्च जातीचा दाखविताना उच्च जात म्हणून मराठाच का दाखविण्यात आली? इतर कोणत्याही तथाकथित उच्च जातीची निवड का केली नाही? खरे तर या चित्रपटात दिग्दर्शकांनी एरवी जो एकसुरीपणा अशा चित्रपटात दिसून येतो तो यशस्वीपणे टाळला आहे. पळून जाणारे जोडपे कोणत्याही मंदिरात जाताना दाखविले नाही, चित्रपटात कुठेही मंदिर, बुवा, बाबा दिसत नाहीत. नायकाचे मित्रदेखील भिन्न धर्मीय आणि भिन्न जातीचे दाखविले आहेत. ते नायकाला ज्या प्रमाणे जिवाभावाने साथ देतात, त्यातून सामाजिक एकतेचा संदेशदेखील जातो, इतका सगळा वेगळेपणा जोपासत असताना केवळ गावातला रगेल, रंगेल आणि राजकारणी माणूस दाखवायचा तर तिथेच आतापर्यंतची परंपरा दिग्दर्शकांनी का पाळली? इथेही त्याला परंपरेला छेद देता आला असता? हे त्यांनी जाणीवपूर्वक केले असेल असा आरोप करता येणार नाही, परंतु नकळतपणे मराठा समाजाबद्दल एक नकारात्मक भावना त्यातून प्रसारित होण्यास त्यांनी हातभारच लावला आहे.
 वास्तविक चित्रपटांमधून, कथा-कादंबऱ्यांतून मराठा किंवा पाटील समाजाचे जे चित्र साकारले जाते ते वस्तुस्थितीला धरून नाहीकिंबहुना हा समाज पुरोगामी विचारांचा आहे. महाराष्ट्रातील बहुतेक पुरोगामी चळवळी मराठा समाजाने सुरू केल्या आहेत. शिक्षणासोबतच आधुनिक विचार या समाजाने स्वीकारले आहेत. त्यामुळे त्यांचे अशा स्वरूपाचे चित्रिकरण मनाला क्लेश देणारे ठरते. हे सगळे मी मराठा किंवा पाटील आहे म्हणून म्हणत नाही. मी इगतपुरीला जाऊन चार विपश्यना शिबिरे केली आहेत. एक महिन्याचे दीर्घ शिबिर आणि सत्तीपठणही केले आहे. त्या अर्थाने मी बौद्ध धर्माचा उपासक आहे. बुद्ध धर्म म्हणजे श्रमाला प्रतिष्ठा देणारा, श्रमिकांच्या शोषणाविरोधात उभा राहणारा आणि विज्ञानवादी विचार करणारा धर्म आहे. भगवान गौतम बुद्धांनी भारताच्या भूमीवर शोधलेला, वाढविलेला, जोपासलेला तो सगळ्यात महान धर्म आहे म्हणूनच सम्राट अशोकाने याचा प्रसार प्रचार केला; मात्र जात्यंध्यांच्या कुटील कारवायांमुळे भारतामधूनच या धर्माचा अस्त झाला; आणि या धर्माच्या शिकवणीवर ज्या ज्या देशांनी वाटचाल केली ते ते देश आज जगात महासत्ता म्हणून वावरत आहेत. ज्यामध्ये चीन, जपान, म्यानमार, थायलंड, कंबोडिया, भूतान, श्रीलंका, तिबेट, तायवान या देशांचा उल्लेख करावाच लागेल. उलट भारतासारखा देश जिथे श्रमाचे आणि श्रमिकांचे शोषण केले जाते, त्यातून शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागतात, हे या धर्माचे सार आणि महत्त्व समजून घेतल्यामुळे आज रसातळाला जाऊ पाहत आहे. सांगायचे तात्पर्य माझ्या जन्माने मराठा किंवा पाटील असण्याचा आणि या चित्रपटाच्या संदर्भातील आक्षेपाचा थेट संबंध नाही. वाईट प्रवृत्तीचे, रगेल, रंगेल माणसे सगळ्याच समाजात आहेत किंवा असतात. कारण ती एक प्रवृत्ती आहे. जी सर्वच धर्मीय लोकांमध्ये पाहायला मिळते; परंतु चित्रपट आणि कथा, कादंबऱ्यांमधून अशी व्यक्तीचित्रणे रंगविण्याचा प्रसंग येतो तेव्हा नेमका गावचा पाटील किंवा सरपंच असलेला मराठाच वाईट प्रवृत्तीचा दाखविला जातो. वास्तविक पाटील ही जात नाही तर ते पद आहे. अगदी शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून जी वतनदारी चालत होती त्यात गावाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारी व्यक्ती म्हणजे पाटील समजली जायची. त्याची जात कोणतीही असू शकत होती. अनेक ठिकाणी मुस्लीम किंवा मराठेतर जातीतील लोकांना पाटीलकी मिळालेली दिसून येते. त्यामुळे अमूक धर्मीयच पाटील होते असे नाही. तीच बाब देशमुख, कुळकर्णी या पदांच्या बाबतीतही होती. महसूल गोळा करण्याचे काम करणारे ते देशमुख आणि हिशेब नोंदविण्याचे काम करणारे ते कुळकर्णी, अशी ती व्यवस्था होती. त्या काळी लिहिण्या-वाचण्याचे ज्ञान केवळ ब्राट्ठाट्ठाण समाजात होते म्हणून बहुतेक सगळे कुळकर्णी ब्राम्हण वर्णाचे होते, परंतु देशमुख आणि पाटील कोणत्याही धर्माचे लोक होऊ शकायचे. हा इतिहास विसरून कालांतराने पाटील हे संबोधन केवळ एका समाजापुरते मर्यादित केल्या गेले. त्यातून गावचा पाटील म्हणजे मराठा असे चुकीचे समीकरण रूढ झाले.
मराठा हा मरहट्टा या शब्दाचा अपभ्रंश आहे हे प्रथम लक्षात घ्यावे. स्वराज्याच्या स्थापनेकरिता रानावनातील मावळ्यांना शिवाजी महाराजांनी `मरेल पण हटणार नाही' अशी प्रतिज्ञा दिली. या मरतील पण हटणार नाहीत अशा लढाऊ मावळ्यांच्या म्हणजेच `मरहट्ट्यां'च्या जिवावरच महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. हेच मरहट्टे कालांतराने शाब्दीक अपभ्रंश होऊन मराठे म्हणून ओळखल्या जाऊ लागले. त्यातीलच काही लोकांना `पाटीलकी' म्हणजे गावच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली. महिलेवर अत्याचार केला म्हणून शिवाजी महाराजांनी हातपाय छाटलेला रांझाचा पाटील हा ब्राम्हण होता हे ध्यानी घ्यावे; मात्र गावचा पाटील हा बदफैलीच असायचा, हे सिद्ध करणारे कोणतेही ऐतिहासिक पुरावे नसताना, प्रत्येक चित्रपटात, कथा-कादंबऱ्यांत गावच्या पाटलाला बदफैली दाखवून एका लढवय्या समाजाला बदनाम केल्या गेले. ज्या समाजाने गावाच्या, राज्याच्या, देशाच्या विकासासाठी मोठे योगदान दिले, बलिदान केले, त्याचे वर्णन कोणत्याही कलाकृतीतून पाहायला किंवा ऐकायला मिळत नाही. शिक्षणासारख्या क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटलांनी किती मोठे काम केले, हे महाराष्ट्रालाच काय उभ्या देशाला माहीत आहे. पंजाबराव देशमुखांचे योगदान नजरेआड कसे करता येईल? परंतु मराठा समाजाचे हे सुधारणावादी, पुरोगामी रूप कधीच पुढे आणले जात नाही. गावचा पाटील म्हटला की तो मराठाच असणार आणि तो बदफैलीच असणार, रंगेल असणार, रगेल आणि नालायक असणार हे जणू काही ठरवून टाकण्यात आले आहे. इतर अनेक बाबतीत परंपरागत गृहितकांना छेद देणाऱ्या 'सैराट' या चित्रपटाला या ठाशीव आणि घोटीव अपप्रचाराला मात्र छेद देता आला नाही. इतर अनेक चित्रपटांप्रमाणे याही चित्रपटात खलनायक गावचा मराठाच दाखविण्यात आला आहे. मराठा समाजाला बदनाम करण्याचे हे एक व्यापक कारस्थान तर नाही ना, अशी शंका त्यातून उपस्थित होऊ शकते. विशेषत: सैराटनेही तोच कित्ता गिरविल्याने ही शंका अधिकच बळकट होताना दिसते.
 दुसरी गोष्ट म्हणजे या चित्रपटाची दखल जातीवादी मीडिया घेत नसल्याची अफवा सोशल मीडियावर मोठ्या खुबीने पसरवली गेली. या विरोधाभासात कितपत तथ्य आहे. रोज प्रत्येक पेपरला लेख, न्यूज चॅनल्सवर सैराट टिमच्या मुलाखती, बातम्यांमध्ये सैराट चर्चा.. सर्व मीडियावर सैराट सैराटच आहे...!  सैराट जर खरोखरच जात्यांतक विद्रोहाचा दिशादर्शक सिनेमा असता, तर तो ब्राम्हणी वर्चस्व असलेल्या  मीडियात सातत्याने दिसला तरी असता काय? यावरून स्पष्ट होते, की ब्राम्हणवादींचा या चित्रपटास विरोध मुळीच नव्हता नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे चित्रपटाची कमाई 40-50 कोटी रुपयांपर्यंत पोहचल्याचा भलताच आनंद अतिउत्साही `बिनडोक' बहुजनांना होत असेल, मात्र सिनेमा बनविताना सर्वांचे मानधन कराराप्रमाणे आधीच दिले जाते त्यावरील नफा, कमाई ही केवळ त्या सिनेमाच्या निर्मात्यांची असते. मग निर्माते निखिल साने, नीतीन केणी, कार्यकारी निर्माती गार्गी कुलकर्णी, निर्मिती झी स्टुडिओ या ब्राम्हणवादी मीडियासह गार्गी कुलकर्णीच्या आटपाट या संस्थेची आहे, तर कमाई कुणाची झाली? म्हणजे अतिउत्साहाच्या भरात भोळ्या बहुजनांनी `बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना' सारखी गत करून घेतली आहे. कथा, पटकथा दिग्दर्शक म्हणून मंजुळे नावाचा बहुजन जरी पडद्यावर दिसत असला, तरी पडद्यामागे तो गार्गी कुलकर्णी या महिलेसोबत 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत असल्याचे त्याच्या भावामार्फत कळते. गार्गीच्या मार्गाने मंजुळेचा गैरवापर झाल्याची खुद्द मंजुळेला कितपत कल्पना असावी, याबाबत अद्याप माहिती नसली, तरी या मुद्याचे तात्पर्य हे की सध्या जनजागृती आणि शैक्षणिक आर्थिक उन्नतीमुळे बहुजन बदलत आहे. परिणामी येणाऱ्या काळामध्ये बहुजनांचे तुफानी जनआंदोलन उभे राहणार आहे. म्हणूनच खरा `जातीयवादी' चेहरा लपवून बहुजनांमध्ये वाढत असलेला धगधगता जनरोख आपल्याऐवजी मराठ्यांकडे वळविण्याच्या कुटील हेतूने मराठा कसा कर्मठ आहे ही गोष्ट सैराटमधून जाणीवपूर्वक ठसविण्याचा प्रयत्न केला आहे. जेम्स लेन - पुरंदरे प्रकरणी मराठा - ओबीसी - बौध्द - बहुजनांमध्ये जे एैक्य दिसून आले. त्यात दरार पाडण्याचा हा बुध्दिवाद्यांचा निषिध्द कावा आहे.

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:Prahar by Prakash Pohare 
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी  Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.





Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017