भारत एक मोठी बाजारपेठ असल्याचे मानले जाते, तशी ती नक्कीच आहे, परंतु इथे केवळ वस्तुच विकल्या जात नाही तर अस्मिता, विचार, स्वप्ने, उन्माद, लोकांचा सारासार विवेक असे सगळे काही विकले जाते किंवा त्यांचा धंदा मांडता येतो. त्या दृष्टीने विचार केला तर भारत नक्कीच जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणायला हवी. इथे कुणीही कोणत्याही प्रश्नावर आंदोलन करू शकतो आणि त्याला थोडी धार्मिक उन्मादाचीफोडणी दिली की, ते आंदोलन अगदी शंभर टक्के यशस्वी होण्याची खात्री असते. आपल्याकडे धर्माचा, श्रद्धेचा, भावनेचा प्रश्न निघाला की लोकांच्या सारासार विवेकाला जणू काही लकवा मारला जातो आणि लोक अशा आंदोलनात डोके गहाण ठेवून सहभागी होतात.काल-परवापर्यंत जिचे कुणी नावही ऐकले नव्हते अशी एखादीमहिला एका रात्रीत देशभरात ओळखली जाते, या चमत्काराचे श्रेय शनिला नक्कीच द्यावे लागेल.
शनिच्या संदर्भातील इतर चमत्कारांबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु ‘त्या’ महिलेला एका रात्रीत शनिदेवाने 'स्टार' बनविले, हे शनिचेच महात्म्य म्हणावे लागेल. शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा म्हणूनया महिलेने आंदोलन उभे केले. मुद्देदेखील असे निवडायचे की त्यांना एक पैसादेखील खर्च न करता फुकटात भरपूर प्रसिद्धी मिळेल. शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश करण्याच्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केली आणि त्यांना हवे ते साध्य झाले. यातून महिलांचे किती प्रश्न सुटले, शनिच्या चौथऱ्यावर प्रवेश मिळाल्याने किती महिलांचे कसे भले झाले, त्यांचे कोणते दु:ख दूर झाले, त्यांच्या कोणत्या समस्या कमी झाल्या, किंवा होणार आहेत? याचा लेखाजोखा कोण मांडणार? ही म्हणे महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई होती. या लढाईतून महिलांच्या आत्मसन्मानात काय फरक पडला ते माहीत नाही, परंतु विज्ञान युगात जिथे युरोप, अमेरिकेतील महिला चंद्र, मंगळ आणि भविष्यात साक्षात शनीवरही जाण्याच्या तयारीत आहे त्या युगात आमचे कथित सुधारक(?)महिलांद्वारा शनिच्या चौथऱ्यावर तेलाचा अभिषेक करून मोठी लढाई जिंकल्याचा आव आणत आहेत, हा विरोधाभास नक्कीच प्रकर्षाने पुढे आला. महिलांच्या आत्मसन्मानासाठी खरा लढा तर सावित्रीबाई आणि जिजाऊंनी दिला. 'चूल आणि मूल' एवढ्याच परिघात बंदिस्त झालेल्या महिलांना बाहेरच्या जगात मुक्त श्वासघेण्याची संधी त्यांनी दिली, त्यासाठी सावित्रीबार्इंनी मुलींना शिक्षणाचा योग्य मार्ग दाखविला, तर जिजाऊंनी शिवाजी महाराजांसारखा पुत्र आणि संभाजींसारखा नातू घडविला.पूजा-व्रतवैकल्ये यात गुंतून पडल्याने महिलांचे प्रचंड नुकसान झाले.
महिलांची प्रगती खुंटण्यामागे चार 'पी' प्रामुख्याने कारणीभूत आहेत. पूजा-पाठ, पेहराव, पोळ्या आणि पर्स अर्थात महिलांची सगळी क्षमता, त्यांची योग्यता यातच गुंतून पडते. महिलांचा बराच वेळ पूजा-पाठ, व्रतवैकल्ये करण्यात जातो, उरलेला वेळ पोळ्या म्हणजेच स्वयंपाक करण्यात खर्च होतो. त्यांच्या सध्याच्या पाचवारीसारख्या पेहरावानेही त्यांच्या मोकळेपणाने वावरण्यावर बरीच बंधने येतात. यावर काही प्रमाणात मात केली आहे ती पंजाबी आणि खिश्चन महिलांनी. त्यांचा पेहराव अतिशयसुटसुटीत असतो. सामूहिक लंगरच्या माध्यमातून पंजाबी महिलांनी तर बेकरीच्या माध्यमातून ब्रेड व पाव यांद्वारे खिश्चन समाजाने महिलांची पोळ्या लाटण्यातून सुटका केली. आज आपल्याकडेही नोकरी वगैरे करणाऱ्या महिलांची पहिली पसंती पंजाबी ड्रेसला किंवा जिनपँट, टी शर्टला असते. वरकरणी हा मुद्दा कदाचितक्षुल्लक वाटेल, परंतु महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यात पोशाखाची भूमिका खूप महत्त्वाची ठरते. या पृष्ठभूमीवर महिलांसाठी आंदोलन करायचे असेल तर ते महिलांना पुढे नेणारे, त्यांच्यावरील अन्याय दूर करणारे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवाज उठविणारे हवे, परंतु इथे तर महिलांना शनिच्या चौथऱ्यावर चढवून दगडावर तेल ओतायला सांगून त्यांना अजून शंभर वर्षे मागे ढकलण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. खरे तर शनिच्या चौथऱ्यावर येण्यास आम्हाला तुम्ही काय मनाई करता, आम्ही आणि आमचे नवरे व लेबाळे त्या चौथऱ्यावर किवा त्या परिसरात पाऊलही टाकणार नाही. अशी खंबीर भूमिका या महिलांनी घ्यायला हवी.
तुम्ही आम्हाला नाकारण्याचा प्रश्नच नाही, आम्हीच तुम्हाला धुडकावून लावतो असा स्वाभिमानी बाणा दाखवून देण्याची एक चांगली संधी या निमित्ताने महिलांना होती, ती चौथरा आणि गाभाऱ्यातील प्रवेशाच्या लाचार आंदोलनाने घालविली, असे आमचे स्पष्ट मत आहे. खरे तर साधारण वीस वर्षांपूर्वी त्या शिंगणापूरचे नावही कुणाला माहीत नव्हते. तिथे उघड्यावर एक दगड उभा होता आणि त्याला शनिदेव मानून काहीडोकेबाज गावकऱ्यांनी त्याची पूजा वगैरे मांडली आणि पुढे काही व्यवहारचतूर लोकांनी या शनिदेवाच्या नावाने आख्यायिका, चमत्काराच्या कहाण्या पसरवायला सुरुवात केली आणि शनिचे महात्म्य वाढू लागले. गुलशन कुमारच्या 'सूर्यपूत्र शनि' आणि ‘ जय संतोषी माँ’ या चित्रपटांनी तर या देवी-देवतांची साडेसातीचसंपली आणि ते प्रचंड लोकप्रिय झाले. भक्तांच्या झुंडीच्या झुंडी शिंगणापूरकडे येऊ लागल्या. भक्तांचे हे आकर्षण कायम राहावे म्हणून त्या शनिचे स्तोम अधिकच माजविण्यात आले. शनिला महिलांचा विटाळ होतो, त्याला तेलाचाच अभिषेक करावा लागतो, शनिच्या त्या शिळेवर कोणतेही बांधकाम केले जाऊ शकत नाही, केल्यास ते कोसळते, शिंगणापूरच्या कुठल्याही घराला दरवाजा नाही कारण तेथे चोऱ्या होऊ शकत नाही. अशा अनेक आख्यायिका पद्धतशीरपणे पसरविल्या गेल्या. यातील फोलपणा शिंगणापूरच्या पोलिस स्टेशनमधील क्राईमडायरी तपासली म्हणजे लक्षात येईल. आपल्याकडे चमत्काराला नमस्कार करण्याची परंपरा आहेच, या सगळ्या घडलेल्या न घडलेल्या चमत्कारांची भुरळ लोकांना पडली. त्यातून भक्तांच्या हाती काय लागले हे सांगता येणार नाही, परंतु शिंगणापूरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे मात्र उखळ पांढरे झाले. अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी जिथे जमिनीचे भाव काही हजारांत होते ते आता कोटींमध्ये पोहचले. शिंगणापुरात व्यवसाय करणाऱ्यांवर शिंगणापुरात जमिनी असनाऱ्यावर मात्र शनि प्रचंड प्रसन्न झाला. हीच परिस्थिती अशा प्रकारच्या कुठल्याही देवस्थानाच्या गावात पाहायला मिळेल. या कथित भक्ती किंवा श्रद्धेमागचे अर्थशात्र सामान्य लोकांना कळत नाही. त्यांच्या श्रद्धेचा अगदी व्यवस्थित बाजार मांडला जातो. लोकांनी हे समजून घ्यायचे असेल तर 'देऊळ' हा चित्रपट अवश्य बघावा, कुठे बघायला मिळण्याची संधी नसेल तर सीडी मिळवा किंवा अगदी इंटरनेटवर युट्यूबद्वारे डाऊनलोड करून पहा. लोकांच्या श्रद्धांचा व्यावसायिक जसा फायदा उचलतात तसाच फायदा राजकारणीदेखील उचलतात.
श्रद्धेच्या विषयावर माथी भडकविणे सोपे जाते, गर्दीसहज गोळा होते आणि प्रसिद्धीही भरपूर मिळते. दगडु शेठ हलवाई, लाल बागचा राजा असोत किंवा सिद्धी विनायक, शिर्डीचे साईबाबा वा तिरुपतीचे बालाजी असोत, गर्दी जमविणे आणि वेगवेगळे दर ठरवून लोकांच्या रांगा लावून पैसे कमविणे हा व्यवसाय जोरात आहे. तृप्ती देसार्इंनी नेमके तेच केले. महिलांचे सगळे प्रश्न संपलेआहेत का? फक्त शनिच्या चौथाऱ्यावर कोल्हापूरला अंबाबाईच्या गाभाऱ्यात आणि त्र्यंबकेश्वरला महादेवाच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळाला किंवा दग्र्यात प्रवेश मिळाला म्हणजे समस्त महिलावर्गाचे कोटकल्याण होणार आहे का? हे मुद्दे कदाचित महिलांच्या न्याय हक्काशी निगडीत असतीलही, परंतु प्राधान्य कशाला द्यायचे याचाही विचार व्हायला नको का? सावित्रीबार्इंनी ज्या महिलांना व्रतवैकल्याच्या, पूजा-पाठच्या भटी जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्याच महिलांना आज एकविसाव्या शतकात पुन्हा मंदिराच्या गाभाऱ्यात लोटण्याचा प्रयत्न व्हावा, हे तर विज्ञानाचे चाक उलटे फिरविण्यासारखे झाले.महिलांसाठीच काही करायचे असेल तर आधी शांतपणे महिलांच्या नेमक्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यात प्राधान्याने सोडवाव्या अशा समस्या कोणत्या आहेत याचा विचार करायला हवा. शनिच्या चौथाऱ्यावर महिला गेल्या काय किंवा न गेल्या काय, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्याने काहीही चांगला वा वाईट फरक पडणार नाही उलट त्यांच्या अशा प्रश्नांना हात घातला पाहिजे की ज्यांचा संबंध त्यांच्या दैनंदिन आयुष्यासोबत आहे, परंतु ते केले जात नाही. उथळ मुद्दे हाती घेऊन तितकीच उथळ आंदोलने केली जातात, प्रसिद्धी मिळविली जाते आणि त्यातून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करून मग त्याची किंमत वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांनी आणि इतर सगळ्यांनी ही राजकीय बनवेगिरी ओळखायला हवी. विदर्भ-मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालेला आहे, महिलांना डोक्यावर हंडे ठेवून मैलोनगणती पायपीट करावीलागते, विहिरीत उतरून पाणी काढावे लागते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आपला कांदा अक्षरश: रस्त्यावर पेटवून देण्याची वेळ आली आहे, तूर डाळ जास्त भावाने विकणे सरकारने गुन्हा ठरविला आहे. सरकारी धोरणांमुळे शेतकर्यानची म्हणजेच शेतकरी महिलांची आर्थिक परिस्थिती अधिकच गंभीर स्वरूप धारण करीतअसल्याचे दिसत आहे, ज्याचे परिणामी शेतकरी महिलांची मुलेबाळे चांगल्या शाळांमध्ये जाऊच शकत नाही. करा त्या विरोधात आंदोलन, शेतकरी महिलांचे संघटन करा, त्यांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरा, परंतु तसे काही केले जात नाही कारण अशा आंदोलनाला 'टीआरपी' नसतो आणि अशी आंदोलने करायचीतर स्वत: उन्हातान्हात हिंडावे लागते, गावपाड्यात राहावे लागते, मिळेल ते खाण्याची तयारी ठेवावी लागते. परिटघडीचे कपडे, डिओचा स्पे्र, गालावर पावडरचा लेप, बोटात अंगठ्या, मनगटावर उंची घड्याळ आणि 'एसी' गाडीतून सातत्याने प्रवास हे सगळे चोचले पुरविणारे आंदोलन करायचे तर शेतकऱ्यांना प्रश्न हातीघेऊन कसे चालेल? त्यासाठी असेच शनि, अंबाबाई, त्र्यंबकेश्वर, हाजी अली सारखे सवंग प्रसिद्धीचे मुद्दे निवडावे लागतील. तेवढे व्यवहार चातुर्य अशा प्रकारच्या एनजीओकडे नक्कीच आहे आणि म्हणून त्यांनी देवस्थानांची मालिकाच निवडली आहे. महिलांच्या प्रश्नाचे त्यांना काहीही देणेघेणे नाही, स्वत:च्या प्रसिद्धीचासोस(?) भागविण्यासाठी ही सगळी उठवळ आंदोलने त्या करीत आहेत.
दुर्दैवाने काही पुरोगामी संघटनादेखील या नसलेल्या मुद्याला उगाच उगाळून त्यांच्या मूळ लक्ष्यापासून भरकटत आहेत. असे नम्रपणे सूचवावेसे वाटते. शनिच्या चौथऱ्यावर महिला गेल्या काय किंवा न गेल्या काय, त्यांच्या दैनंदिन आयुष्यात त्याने काहीही चांगला वा वाईट फरक पडणार नाही उलट त्यांच्या अशा प्रश्नांना हात घातला पाहिजे की ज्यांचा संबंध त्यांच्या दैनंदिन आयुष्यासोबत आहे, परंतु ते केले जात नाही. उथळ मुद्दे हाती घेऊन तितकीच उथळ आंदोलने केली जातात, प्रसिद्धी मिळविली जाते आणि त्यातून आपले उपद्रवमूल्य सिद्ध करून मग त्याची किमत वसूल करण्याचा प्रयत्न केला जातो. महिलांनी आणि इतर सगळ्यांनी ही राजकीय बनवेगिरी ओळखायला हवी.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी: prahar by prakash pohare आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी prakash pohare blog टाईप करा.प्रतिक्रियांकरिता: pohareofdeshonnati@gmail.comMob no. +९१-९८२२५९३९२१ - +९१-९८२२५९३९०१प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव मेसेज करा.प्रसिद्धीचा सोस, न्याय, हक्ककी भरकटणे?प्रहारप्रकाश पोहरेरविवार, दि.१ मे २०१६
Comments
Post a Comment