आपली शक्तिस्थाने ओळखा! प्रहार रविवार, दि.1 जानेवारी 2017

प्रहार रविवार, दि.1 जानेवारी 2017
                                                         आपली शक्तिस्थाने ओळखा! 
 आज अगदी औषधालाही देशी वाण दिसत नाही. संकरित वाणांमुळे उत्पादनात जरी वाढ झाली असली, तरी अन्नधान्यातील सकसत्व संपून गेले आहे. या धान्यातून आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत. आपल्या देशी वाणांच्या संगोपनासोबतच रोजगार निर्मितीचीही एक मोठी संधी किंवा एक मोठे क्षेत्र उपलब्ध होऊ शकते. त्यातून अस्सल देशी वाणांचे, प्रजातींचे जतन तर होईलच शिवाय एक मोठा उद्योगदेखील आकारास येईल, विशेष म्हणजे हा उद्योग ग्रामीण भागाशी अधिक निगडित असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते.
आपला देश भौगोलिक आणि नैसर्गिक साधनसंपत्तीने अगदी समृद्ध आहे. कदाचित जगातील इतर कोणत्याही देशाला इतका समृद्ध वारसा लाभलेला नसावा; परंतु आपली अवस्था स्वत:च्या नाभीतील कस्तुरीच्या सुवासाने धुंद होत त्या सुवासाचा शोध घेण्यात भटकणाऱ्या कस्तुरीमृगासारखी झाली आहे. आपल्या समृद्धीची आपल्यालाच जाणीव नाही. वास्तविक नैसर्गिक नियमानुसार त्या-त्या परिसरात योग्य असलेल्या जाती-वंशाचे सातत्य कायम राखले जाते. म्हणजे त्या परिस्थितीत जे योग्य आहे तेच निर्माण होते. जैविक साखळीसाठी तेच उपयुक्त असते. आपल्याकडचे पीक, आपल्याकडची जनावरे, आपल्याकडची झाडे-झुडपे इथल्या परिस्थितीला अनुरूप असतात आणि सोबतच या सगळ्यांवर अवलंबून असलेल्या जैविक घटकांनाही तीच उपयुक्त ठरतात. ही एक प्रकारची जैविक साखळी असते. या नैसर्गिक जैविक साखळीला छेद देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे स्वाभाविक परिणाम जीवनमानावर होत असतात आपण नेमकी हीच चूक केली. मोगल, निजाम आणि नंतर ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीने आपल्याला केवळ राजकीय गुलामीच दिली नाही, तर वैचारिकदृष्ट्याही पंगू करून ठेवले. त्यामुळे आपल्या परंपरा, आपली संस्कृती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे निर्णयक्षमता आपण जवळपास घालवून बसलो. साहेबांचे तेवढे चांगले आणि आपले ते मागासलेले, बुरसटलेले असा बौद्धिक न्यूनगंड आपल्यात निर्माण झाला. आपल्या याच न्यूनगंडाचा युरोपीय देशांनी, अमेरिकेने भरपूर फायदा उचलला. आपल्या देशी गाई चांगल्या नाहीत, त्या भरपूर दूध देत नाहीत, असे सांगत या देशी गाइंर्सोबत होलिस्टन,फ्रिझर, जरसीह वगैरे जातींच्या वळूचे संकर घडवून आणले आणि या देशात संकरित गाइंर्ची पैदास वाढविली. या संकरित गाई इथल्या हवामानाशी जुळवून घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांची निगा राखण्यासाठी भरपूर प्रयत्न करावे लागतात. मुळात संकर हा प्रकारच नैसर्गिक व्यवस्थेला छेद देणारा आहे. या जगात सर्वोत्तम असे काहीच नसते, किंबहुना तसे नसावे हीच निसर्गाची रचना आहे; परंतु त्या रचनेसोबत आपण छेडछाड केली. खूप दूध देणारी, लाथा न मारणारी, चारा कमी खाणारी गाय आपल्याला हवी होती. निसर्गत: तसे होऊ शकत नाही म्हणून आपण संकर घडवून तसे करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक चक्रासोबतची ही छेडछाड टिकू शकत नाही. 
गाईचे हे उदाहरण प्रातिनिधीक स्वरूपाचे आहे, जवळपास प्रत्येक प्रजातीत, विशेषत: अन्नधान्याच्या बाबतीत हाच प्रकार सुरू आहे. अधिक उत्पादन हाच एकमात्र उद्देश समोर ठेवल्यामुळे इतर अनुषंगिक बाबींवर या सगळ्याचा अतिशय विपरित परिणाम होत आहे. आपल्या देशातून आपण देशी गाई घालवून बसलो, परंतु आपल्या ह्याच देशी गाइंर्चे योग्य जतन आणि संगोपन करून ब्राझीलने त्यांच्या देशात दुग्धक्रांती घडवून आणली. आपल्याकडच्या गवळाऊ, लाल डांगी, कंधारी सारख्या जातीवंत गाई आता अगदी बोटावर मोजण्याइतपतच उरल्या. किमान आता तरी या देशी गाइंर्च्या प्रजातींची योग्य जोपासना करून भारतातील देशी गाइंर्ची संख्या वाढवायला हवी. वर म्हटल्याप्रमाणे आपण अन्नधान्याच्या बाबतीतही हीच चूक केली. अधिक उत्पादनासाठी पिकांच्या मूळ देशी वाणांसोबत संकर घडवून आणला. या संकरित वाणांनी संपूर्ण देश व्यापून टाकला आहे. आज अगदी औषधालाही देशी वाण दिसत नाही. या संकरित वाणांमुळे उत्पादनात जरी वाढ झाली असली, तरी अन्नधान्यातील सकसत्व संपून गेले आहे. केवळ पोट भरण्यासाठी या धान्याचा उपयोग होतो. या धान्यातून आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाहीत. त्याचा परिणाम आपल्या शारीरिक प्रतिकार क्षमतेवर झाला आहे. अलीकडील काळात विविध प्रकारचे आजार, विकार मोठ्या प्रमाणात बळावत चालल्याचे दिसते ते याचमुळे, या आजारांवरील औषधेही विदेशीच असतात. याचा अर्थ आपले केवळ आर्थिकच नाही, तर अप्रत्यक्षरित्या शारीरिक शोषण पाश्चात्य राष्ट्रांकडून केले जात आहे. या देशातील अस्सल गावरान म्हणजेच देशी उत्पादने संपवून संपूर्ण देशालाच संकरित करण्याचे खूप मोठे आंतरराष्ट्रीय कारस्थान रचल्या गेले आहे. याकडे आम्ही वेळोवेळी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्याची गंभीर दखल घेतल्या जात नाही, ही खेदाची बाब आहे. 
अगदी साध्या कुत्र्यांचेही उदाहरण घेतले तरी हेच दिसून येते. आपल्याकडे विदेशी कुत्री पाळण्याचा भारी सोस आहे. वास्तविक देशी कुत्री इथल्या वातावरणाशी, निसर्गाशी समरस झालेली असतात. इथल्या परिस्थितीत सगळ्या प्रकारच्या संकटांना तोंड देण्याची नैसर्गिक क्षमता त्यांच्यात असते. त्या कुत्र्यांमधील योग्य जातींचे चांगल्याप्रकारे संगोपन करणे गरजेचे असताना आपण मात्र विदेश कुत्र्यांच्या जे केवळ 'शो पिस' असतात प्रेमात पडतो. इतिहासात आपल्याकडच्या अस्सल देशी जनावरांनी आपल्यातील अद्भूत क्षमतांचा परिचय दिल्याच्या घटना ठायीठायी आढळतील. महाराणा प्रतापांच्या चेतक घोड्याने घेतलेली ती उडी आजही हळदीघाटचा इतिहास जिवंत करणारी आहे. शिवाजी महाराजांचा वाघ्या नावाचा कुत्रा इतिहासात अजरामर झाला आहे. या प्राण्यांच्या स्वामीनिष्ठेचे, पराक्रमाचे गोडवे आजही गाईले जातात; परंतु दुर्दैवाने त्यांच्याच वंशातील प्राण्यांना मात्र केवळ ते देशी आहेत म्हणून दुय्यम वागणूक दिली जाते. वनस्पतींच्या बाबतीतही हेच म्हणता येईल. आज गावरान आंबा बाजारातून जणू काही लुप्त झाला आहे. त्याची चवदेखील चाखायला मिळत नाही. खास इथल्या मातीत रूजणारी, वाढणारी, फोफावणारी झाडे आपल्याला दिसत नाहीत. रस्त्याच्या बाजूने अनेक चांगली झाडे लावता येतात, परंतु एक कडुनिंबाचा अपवाद वगळता इतर कोणतीही झाडे उपयुक्त दिसत नाही. वास्तविक चिंच, आंबा यांसारखी भरपूर सावली देणारी, फळे देणारी झाडे रस्त्यांच्या कडेला लावली आणि त्यांच्या संगोपनाची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे अथवा वैयिक्तक स्तरावर कुणाकडे दिली, त्या झाडापासून मिळणारे उत्पादन त्यांनाच दिले तर अशा उपयुक्त झाडांची संख्या वाढेल, त्यातून रोजगारही निर्माण होईल. शोभेची विदेशी झाडे लावण्याऐवजी उपयुक्त देशी झाडांच्या जातींचे संवर्धन व्हायला हवे. आपल्याकडे रेल्वे ट्रॅकच्या बाजूने भरपूर जागा असते. त्यावर अशीच निरूपयोगी झाडे वाढलेली दिसतात. या जागेचा योग्य वापर करून भरपूर सावली आणि उत्पादन देणारी झाडे लावायला हरकत नाही. दुबईत रस्त्याच्या कडेला खजुराची झाडे लावण्यात आली आहेत. खरे तर देशी वाणांचे, प्रजातींचे संवर्धन करण्यासाठी इतरही अनेक सोपे उपाय योजता येतील. हरिणांसारखे प्राणी पाळण्याची परवानगी शेतकऱ्यांना दिली तर त्यांचे संवर्धन तर होईलच शिवाय शेतकऱ्यांनाही त्यातून उत्पन्न मिळेल, त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही, या प्राण्यांच्या वाढीवरही योग्य नियंत्रण राखता येईल. सापांच्याही बाबतीत असा विचार करता येईल. सर्पमित्रांना योग्य प्रशिक्षण देऊन सापाचे विष काढण्याचे, साप पाळण्याची परवानगी देता येईल. पक्षी संगोपनावरही भारतात बंदी आहे. लोकांकडे विदेशी पक्षी दिसतात, परंतु देशी पक्षांच्या संगोपनावर बंदी आहे. पक्षीपालन हादेखील एक चांगला व्यवसाय होऊ शकतो, सरकारने त्यादृष्टीनेही विचार करायला हवा. सांगायचे तात्पर्य आपल्या देशी वाणांच्या संगोपनासोबतच रोजगार निर्मितीची एक मोठी संधी किंवा एक मोठे क्षेत्र उपलब्ध होऊ शकते. त्यातून अस्सल देशी वाणांचे, प्रजातींचे जतन तर होईलच शिवाय एक मोठा उद्योगदेखील आकारास येईल, विशेष म्हणजे हा उद्योग ग्रामीण भागाशी अधिक निगडित असल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकते. सरकारने यादृष्टीने गांभीर्याने विचार करावयास हवा.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare 
 आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी 
 Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017