विवाह समारंभ `इव्हेंट'झाले आणि......? प्रहार रविवार, दि. 25 डिसेंबर 2016


प्रहार रविवार, दि. 25 डिसेंबर 2016

                                                      विवाह समारंभ `इव्हेंट'झाले आणि......? 
पूर्वीच्या काळी लग्नसमारंभांना ही सामाजिक पृष्ठभूमी होती ती आता आधुनिक काळात वेगळ्या प्रकारे जपल्या जाऊ शकते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य ते पावित्र्य राखून असे समारंभ पार पडले, या समारंभासाठी राखून ठेवलेल्या पैशातून सामाजिक भान जपत काही दान केले तर अशा समारंभाचे पावित्र्य नक्कीच वाढेल. आता अलीकडील काळात लग्नसमारंभाच्या भपकेबाजपणाला कात्री लावण्याची प्रथा रूढ होऊ पाहत आहे आणि ही नक्कीच समाधानाची बाब आहे, परंतु हे अधिक व्यापक स्तरावर व्हायला हवे.
आजकाल प्रत्येक गोष्टीचा `इव्हेंट' करण्याची जणू काही फॅशनच आली आहे. साधा नामकरणविधी असला तरी एखाद्या हॉटेलमधील हॉल बुक करणे, तो सजविणे, बुफेची व्यवस्था करणे, गाण्याबजाविण्याचा कार्यक्रम ठेवणे असे प्रकार सर्रास केले जातात. अगदी साधे साधे समारंभ भपकेबाजपणे साजरे केले जातात. हौस आणि उपलब्ध असलेला मुबलक पैसा हे त्यामागचे कारण असू शकते, परंतु पैसा आहे म्हणून हौसेला इतके भडक स्वरूप द्यायलाच हवे का? या भपकेबाजपणामुळे अशा समारंभातील पावित्र्य तर हरवितेच शिवाय असे समारंभ साजरे करण्यामागचे मूळ कारणही दुर्लक्षित होते. लग्न समारंभात हा भपकेबाजपणा अधिकच ओंगळपणे समोर येताना दिसतो. पूर्वीच्या काळी लग्नसमारंभ साजरे केले जात असताना मुला-मुलीच्या सांसारिक आयुष्याला विधिवत सुरूवात करून देण्यासोबतच इतर अनेक गोष्टींचा विचार केला जायचा. या समारंभामुळे दोन्ही कुटुंबातील सगळे सगेसोयरे शिवाय त्यांचे परिचित एकत्र यायचे. नातेसंबंध जुळल्यामुळे त्यांच्यात वैचारिक देवाणघेवाण व्हायची, एकमेकांकडील परिस्थितीबाबत चर्चा व्हायची, पीक-पाण्याच्या गोष्टी व्हायच्या, आर्थिक किंवा अन्य संकटात एकमेकांना साथ देण्यासाठी अशा गोतावळ्याचा चांगला उपयोग व्हायचा. लग्नामुळे केवळ दोन कुटुंबच नव्हे तर दोन गाव जुळले जायचे. तो जावई केवळ त्या कुटुंबाचा नसायचा तर अख्ख्या गावाचा जावई असायचा, ती लेक अख्ख्या गावाची सून असायची. सरदार, उमराव, राजे, महाराजेदेखील राजकीय कटुता संपविण्यासाठी, मैत्रिचे संबंध दृढ करण्यासाठी एकमेकांचे परिवार लग्नसंबंधाने जोडायचे. लग्नसमारंभातले विधी त्या संबंधाचे पावित्र्य आणि अखंडत्व टिकविण्याच्या दृष्टीने परिणामकारक असायचे. त्यामुळेच पूर्वीच्या काळी घटस्फोट हा प्रकारच नसायचा. वैवाहिक संबंध टिकण्यासाठी सामाजिक दबाबदेखील खूप मोलाचा होता. अर्थात काळासोबत बरेच काही बदलले आहे आणि लग्नसमारंभ त्याला अपवाद असण्याचे कारण नाही. पूर्वीच्या काळी लग्नसमारंभाची तयारी काही महिन्यांपासून केली जायची. प्रत्यक्ष समारंभ काही दिवस चालायचा. पै-पाहुण्यांचा राबता अनेक दिवस असायचा. लग्नघर किमान महिनाभर तरी पाहुण्यांनी गजबजलेले असायचे. आता ते शक्य नाही आणि ते स्वाभाविकही आहे. लोकांचे दैनंदिन आयुष्य इतके वेगवान झाले आहे की काही तासांची सवड काढणेही लोकांना अशक्य झाले आहे. हजार-दोन हजार स्क्वेअर फुटांच्या घरात कुटुंबे आक्रसली गेली आहेत. त्यामुळे घरासमोर मांडव पडणे हा प्रकारच आता कालबाह्य झाला आहे. लग्नसमारंभाचे स्वरूप बदलणे ही एक कालसंगत घटना असली तरी अशा समारंभामागील मूळ उद्देशांचा विसर पडायला नको, ही अपेक्षा केल्या जाऊ शकते. नात्यांची वीण घट्ट करणे हा त्यापैकी एक मूळ उद्देश असायचा, परंतु आता तसे होताना दिसत नाही. अलीकडचे लग्नसमारंभ इतके औपचारिक झाले आहेत की पाहुणे अगदी पाहुण्यासारखे येतात आणि केवळ औपचारिक भेटी घेऊन निघून जातात. या समारंभाचे म्हणून जे पावित्र्य असते तेदेखील जपल्या जात नाही. नाचगाणी आणि मोठ्या आवाजात सुरू असलेला ऑर्केस्ट्राचे हेच अशा समारंभाचे आता आकर्षण ठरू पाहत आहे. या ऑर्केस्ट्राचा आवाज इतका मोठा असतो की बाजूच्या व्यक्तीशी बोलायचे झाल्यास त्याच्या कानाजवळच तोंड न्यावे लागते. वातावरणाचे पावित्र्य वाढविणारे सनई-चौघड्यांचे सूर आता ऐकूच येत नाहीत. लग्नाची वेळ हादेखील एक मोठा गहन चिंतेचा विषय झाला आहे. आमंत्रण पत्रिकेवर लग्नाची जी वेळ दिलेली असते ती कधीच पाळली जात नाही. आजच्या धावपळीच्या युगात जिथे मिनिटामिनिटाला महत्त्व आहे तिथे वेळेबाबतची ही बेशिस्त अनेकांना अडचणीची ठरू शकते, परंतु त्याचे भान राखले जात नाही. लग्नाला किती लोक येणार आणि किती लोक जेवणार याचा अंदाज कधीच जुळत नाही, त्यामुळे बरेचदा अन्नाची अक्षरश: नासाडी होते. भारतात दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या लोकांची संख्या आजही खूप मोठी आहे. एकीकडे लोक अर्धपोटी, उपाशी राहतात आणि दुसरीकडे अन्न अक्षरश: उकिरड्यावर फेकले जाते. देशभरात अशाप्रकारे वाया जाणाऱ्या अन्नाचा विचार केला तर या अन्नाद्वारे लाखो गरीबांची एकवेळची भूक भागल्या जाते. याचा अर्थ अशा लाखो गरीबांच्या तोंडचा एकवेळचा घास हिरावून आपण आपला आनंद साजरा करीत असतो, असादेखील होऊ शकतो. या सगळ्या पृष्ठभूमीवर लग्नाचा भपकेबाज 'इव्हेंट' करण्याऐवजी हा समारंभ अधिक आटोपशीर, वक्तशीर आणि किमान खर्चात पार पाडण्याबाबत विचार व्हायला हवा. काही दिवसांपूर्वीच एक बातमी आली होती. एका श्रीमंत परिवाराने आपल्या मुलीच्या लग्नाचा भपकेबाज डौल न करता त्याऐवजी गरीब निराधार लोकांना घरे बांधून देण्याचा संकल्प केला आणि तो तडीसदेखील नेला. तब्बल नव्वद घरे त्या परिवाराने बांधली आणि ती बेघरांना सोपविली. अर्थात सगळ्यांनी असेच काही करावे, असे कुणी म्हणणार नाही, परंतु लग्नसमारंभा वाया जाणारा पैसा आणि वेळ सत्कारणी अनेक प्रकारे सत्कारणी लावता येतो. समाजातल्या गरीब, उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत, त्यांना नेहमीच आर्थिक चणचण जाणवत असते, लग्नसमारंभातील जास्तीच्या खर्चाला फाटा देऊन ते पैसे अशा संघटनांना मदत म्हणून दिले लग्नसमारंभाचा आनंद आणि पावित्र्यही नक्कीच शतगुणीत होईल. एखाद्याला संकटात मदत करण्यातून जे समाधान मिळते, ते पैशात कधीच मोजले जाऊ शकत नाही. सांगायचे तात्पर्य पूर्वीच्या काळी लग्नसमारंभांना ही सामाजिक पृष्ठभूमी होती ती आता आधुनिक काळात वेगळ्या प्रकारे जपल्या जाऊ शकते. कमी वेळेत, कमी खर्चात आणि योग्य ते पावित्र्य राखून असे समारंभ पार पडले, या समारंभासाठी राखून ठेवलेल्या पैशातून सामाजिक भान जपत काही दान केले तर अशा समारंभाचे पावित्र्य नक्कीच वाढेल. आता अलीकडील काळात लग्नसमारंभाच्या भपकेबाजपणाला कात्री लावण्याची प्रथा रूढ होऊ पाहत आहे आणि ही नक्कीच समाधानाची बाब आहे, परंतु हे अधिक व्यापक स्तरावर व्हायला हवे. आपल्या आनंदात इतरांना सहभागी करून घेताना उपेक्षितांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलविण्याचा प्रयत्न झाला तर आपला आनंद चिरकाळ टिकेल. लग्नसमारंभाचा 'इव्हेंट' जरूर करावा, परंतु त्या 'इव्हेंट'मध्ये आपल्यासोबतच अशा लोकांनाही सामील करून घ्यावे की ज्यांच्या आयुष्यात कधी काळी, क्वचितच आनंदाचे क्षण येतात.
फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी:PraharbyPrakashPohare
आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी
Prakashpoharedeshonnati.blogspot.in टाईप करा.
प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com
Mobile No. +91-9822593921
प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017