धारियाजींचा यथोचित सन्मान गिरीश गांधींनी केला-प्रकाश पोहरे

रविवार, दि.15 ऑक्टोबर 2017
डॉ.मनमोहनसिंग यांना डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार
धारियाजींचा यथोचित सन्मान गिरीश गांधींनी केला-प्रकाश पोहरे

14 ऑक्टोबर  (सूर्यकांत भारतीय) अकोला:
वनराई या अराजकीय संस्थेद्वारे दिला जाणारा डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार यावर्षी माजी पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे ते खऱ्या अर्थाने मानकरी आहेत अभिनंदनासही पात्र आहेतडॉ.मनमोहनसिंग यांना हा पुरस्कार ज्यावेळी मिळतो आहे ती वेळ अत्यंत महत्त्वाची आहे.
 सद्यस्थितीमध्ये देशाचा शेतकी परिवार अत्यंत गुदमरलेल्या अवस्थेत जगतो आहे. आज त्याची जी घुसमट होते आहे, शेतकऱ्यांची अशीच घुसमट 2008 च्या काळातही झाली होती. शेतकरी जगण्याची आस हरवून बसला होता अशी त्याकाळची अवस्था होती. 2001 सालापासून प्रकाश पोहरे यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय लावून धरला होता. 2008 पर्यंत जवळपास 700 शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. शेतकऱ्यांच्या परिस्थितीला कोणी समजून घेणार की नाही असा संभ्रम असताना, त्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाच्या विषयावर केंद्राशी कोणी बोलावे हा प्रश्न होता. राज्यातील काँग्रेसचे नेते बोलतील अशी शक्यताच नव्हती. काँग्रेस संस्कृतीमध्ये थेट बोलण्याचे धाडस दाखवणे म्हणजे पायावर धोंडाच पाडून घेणे, एवढे ते कठीण काम होते; परंतु वास्तवाची जाणीव करून देणे गरजेचे होते. म्हणून त्यावेळी देशोन्नतीचे संपादक आणि शेती प्रश्नाचे अभ्यासक प्रकाश पोहरे हे अत्यंत चिंतीत होते. यावेळेला त्यांच्या मदतीला धावले वनराई अमरावतीचे मधू घारड. त्यांनी प्रकाश पोहरे यांना पंतप्रधान मनमोहनसिंगांची भेट मोहन धारियाजी घालून देऊ शकतात. हे त्यांच्या लक्षात आणून दिले.
प्रकाश पोहरे यांनी एका प्रासंगीक कार्यक्रमाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या विदारक परिस्थितीचे गांभीर्य श्री मोहन धारियाजींना पटवून दिले डॉ.मोहन धारिया यांना याविषयात तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांच्याबरोबर बोलणी करण्याची गळ घातली. डॉ.मोहन धारिया यांचेच नांव पोहरे यांच्या समोर येण्यालाही संदर्भ होता. तो म्हणजे ज्या वेळी डॉ.मोहन धारिया नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते त्याचवेळी राजीव गांधी यांनी डॉ.मनमोहनसिंग यांची मंडळावर सल्लागार सदस्य म्हणून निवड केली होती. दोन्ही डॉक्टरांचा त्याकाळात निकटचा संदर्भ आला असल्याची जाणीव प्रकाश पोहरे यांना असल्यामुळे त्यांनी मोहन धारियांना शेतीप्रश्नावर मनमोहनसिंगांशी चर्चा करण्यासाठी साकडे घातले. त्यावेळी डॉ.मोहन धारियांचा काँग्रेस नेतृत्वाच्या दरबारी मान-सन्मान आणि दबदबा होता. धारियाजींनी त्वरित पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंगांना संपर्क करण्याचे मान्य केले आणि लगेच दोन दिवसानंतरची तारीख मिळाली. पुढे दिल्लीमध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग, मोहन धारीया,शरद पवार, बॅरिस्टर अंतुले, बुधाजीराव मुळीक, प्रकाश पोहरे आणखी इतरही तज्ज्ञ मंडळींसोबत मनमोहनसिंग यांची मॅरॉथॉन बैठक झालीचाळीस मिनिटींची ठरलेली बैठक प्रकाश पोहरे यांनी 2 तास 40 मिनिटे रेटून नेली आणि पंतप्रधान मनमोहनसिंगांना शेतकरी आत्महत्या त्या केवळ कर्जबाजारीपणामुळेच आणि त्यातही अवैध सावकाऱ्यांच्या कर्जबाजारीपणामुळे होत असल्याचे पटवून दिले. धारियाजींनी मनमोहनसिंगाना त्वरित कर्जमाफी जाहीर करण्याचा आग्रह धरला मात्र मनमोहनसिंगांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतल्याशिवाय तसे करता येणार नाही हे नम्रपणे स्पष्ट केले. धारियाजी नाराज झाले आणि त्यांनी उपोषण करण्याची धमकीच दिली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंगांनी त्यांना तसे करण्याबाबत वारंवार विनंती केली. मात्र धारियाजी बधले नाहीत आणि त्यांनी आपला शब्द खरा करून दाखविला. पुण्याला गेल्याबरोबर धारियाजी आणि पोहरे उपोषणाला बसले. त्यानंतर विदर्भात सर्वदूर आंदोलन पेटले. 82 वर्षांचे धारियाजी आठ दिवस उपोषणावर होते. प्रकृती खालावली. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांना शेवटी दिल्लीचा आदेश सुटला आणि त्यांनी पुण्यात पोहचून धारियाजींना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, त्यापूर्वी कर्जमाफीकरिता बैद्यनाथन समिती जाहीर करायला पंतप्रधान मनमोहनसिंगांना धारियाजींनी भाग पाडले. उपोषण सुटले, धारियाजींचे प्राण वाचले. कालांतराने डॉ.मनमोहनसिंगांनी 72 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली हा इतिहास आहे.

डॉ.मनमोहनसिंग आपल्या राजकीय कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यातील अंतिम चरणात आहेत. त्यामुळे त्याचा थेट राजकीय संदर्भ जोडता येणार नाही आणि मुळातच या पुरस्काराला राजकीय कंगोरे नसल्यामुळे तशी वाच्यताही होण्याची शक्यता नाही; परंतु ज्यासमयी हा पुरस्कार दिला जात आहे त्यावेळेचे महत्त्व हे मात्र खूप मोठे आहे. 2008 साली प्रकाश पोहरे आणि दै.देशोन्नतीच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात डॉ.मनमोहनसिंग आणि डॉ.मोहन धारिया यांनी जी संवेदनशीलता दाखवली त्याचा हा सन्मान आहे. या समयी असे होणे हीच या पुरस्काराची उपलब्धी आहे. पुण्यातील उपोषणाचे वनराईचे श्री. गिरीश गांधीजी  आणि विदर्भ जनआंदोलन समितीचे किशोर तिवारी हे साक्षीदार आहेत याचा प्रकाश पोहरे यांनी आवर्जुन उल्लेख केला. एका अर्थाने हा राष्ट्रनिर्माणासाठी कष्ट करीत असलेल्या समस्त शेतकऱ्यांचा सन्मान आहे. म्हणून डॉ.मनमोहनसिंग यांना मिळालेला डॉ.मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार हा समयोचित तर आहेच, त्याचबरोबर उचित व्यक्तीला दिल्या गेला याचे आत्यंतिक समाधान आहे. आपण केलेल्या कामांचा आणि मोहन धारियाजी यांनी एका संवेदनशील विषयाकरिता आपले प्राण पणाला लावले होते. त्यांचा गिरीश गांधी यांनी योग्य सन्मान राखला त्याकरिता गिरीश गांधींचा मी आजन्म ऋणी राहील, असे प्रकाश पोहरे यांनी नम्रपणे नमूद केले.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017