विदर्भाला सेंद्रीय शेतीचे झोन घोषित करा-प्रकाश पोहरे
विदर्भाला सेंद्रीय शेतीचे झोन घोषित करा - प्रकाश पोहरे मुलाखत
किटकनाशकांची नव्हे किडरोधकांची गरज!
रसायने निरुपाय म्हणून वापरायची असतात उपाय म्हणून नव्हे!
वैदर्भीय शेती-किटकनाशकमुक्त शेती व्हावी!
७ ऑक्टोबर (सूर्यकांत भारतीय) अकोला:वैदर्भीय शेती-कीटकनाशकमुक्त शेती ही घोषणा प्रत्यक्ष कार्यान्वित केली तर विदर्भातील शेतीला सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही, असे मत लोकनेते प्रकाश पोहरे यांनी आज मुलाखतीदरम्यान व्यक्त केले. विदर्भात फवारणी करीत असताना होत असलेल्या शेतमजुरांच्या मृत्यूच्या घटनांच्या पाश्र्वभूमिवर ते बोलत होते.
सेंद्रिय शेतीकरिता अनुकूल वातावरण
देशाच्या पूर्व भागाला ज्याप्रमाणे सेंद्रिय शेतीचे झोन घोषित केले त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या पूर्व भागालाही सेंद्रिय शेतीचे झोन घोषित करण्याची आवश्यकता असल्याची भलामण करीत प्रकाश पोहरे यांनी याबाबत शासनाच्या इच्छाशक्तीलाच एकप्रकारे आवाहन केले.
ते म्हणाले की , सेंद्रिय शेतीची पाळेमुळे विदर्भात खोलवर रुजली असून तिचा विस्तार करण्यास फारसे प्रयास करावे लागणार नाहीत. महाराष्ट्रामध्ये जवळपास ६१३५८ चौरस किमी च्या जंगलापैकी विदर्भामध्ये ३३१९८ चौ.किमी भूभाग जंगलाने व्यापला आहे. या भागात आजही पारंपरिक पद्धतीने सेंद्रिय शेती होतच असते.
या भागात वस्तीस असणारा आदिवासी समाज आजही विषमुक्त शेतीच करीत आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये थोड्या अधिक प्रमाणात जंगले असल्यामुळे सेंद्रिय शेती करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे.
अलीकडच्या काळात विषमुक्त अन्नधान्य, फळे व भाजीपाला याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे अशा वस्तुंची मागणी वाढली आहे; परंतु पुरवठा होत नसल्याने नाईलाजास्तव रासायनिक शेतमाल नागरिकांना खरेदी करावा लागतो.
सेंद्रिय शेती कर्जमुक्त करणारी
सेंद्रिय शेतीच्या अर्थशास्त्रावर भाष्य करताना प्रकाश पोहरे यांनी रासायनिक शेतीमध्ये होत असलेल्या खर्चाच्या तुलनेत नफा कमी होतो असे स्पष्ट केले व तोट्याची शेती झाल्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो हे अधोरखित केले. शासन शेतमालाला भाव देत नाही हे अनेक वर्षाच्या अनुभवाने सिद्ध झाले असताना शेतीमध्ये अधिक खर्च करण्यापासून शेतक-यांनी स्वत:ला वाचवले पाहिजे. सेंद्रिय शेती हा त्यावर उत्तम उपाय
असून या शेतीमध्ये लागत खर्च कमी असतो. सेंद्रिय शेती कर्जमुक्त करणारी शेती आहे.
शासनाच्या मदतीने सर्व शक्य
सेंद्रिय शेतीचा अर्थ बाहेरुन सेंद्रिय खते व फवारे विकत आणून शेतीमध्ये टाकणे याअर्थाने सेंद्रिय शेती नसून आपल्याच शेतामध्ये खते व कीडरोधक व पिकपोषके तयार करून त्याचा वापर करणारी सेंद्रिय शेती आहे. अशा पद्धतीने शेती करण्यासाठी शेतक-यांना शासनाच्या मदतीची आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने रायायनिक शेती करणा-या शेतक-यांना खते व तत्सम निविष्ठांवर शासन अनुदाने देते त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती करणा-या शेतक-यांनाही शासनाने अनुदाने दिली पाहिजे, अशी मागणी पोहरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, शेतकरी ज्यावेळी रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळतो त्यावेळी मार्ग बदलल्यानंतर होणा-या संभाव्य नुकसानीत शासनाने मदत केली पाहिजे. उत्तम गुणवत्तेचे बियाणे मिळण्याची हमी शेतक-यांना दिली पाहिजे. सेंद्रिय शेती करण्यासाठी गाई म्हशी यासारख्या गुरेढोरांची गरज लागते.
त्यांच्या पालन पोषणासाठी शासनाने अनुदान देणे आवश्यक आहे. मजुरांवर आधारित कामे यासाठी शासनाने मजुरीचा शेतक-यांवर पडणारा भार सबसीडी देऊन शासनाने हलका केला पाहिजे.
सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतक-यांना काय अडचणी येतात याची एकदा पडताळणी शासनाने केली पाहिजे. ती केली तर, मी ज्या काही अनुदानाच्या व सहाय्याच्या मागण्या केल्या आहेत त्याच शेतक-यांसमोरच्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत असे लक्षात येईल. त्या सोडवणे हेच सेंद्रिय शेती करण्यासाठीचे प्रोत्साहन आहे अशी भूमिका पोहरे यांनी मांडली. प्रायोगिक तत्वावर काही गावे किंवा ब्लॉक संपूर्णपणे सेंद्रिय शेतीयुक्त केले पाहिजे.
कीटकनाशक नव्हे कीडरोधक हवे
कीटकनाशकाची फवारणी करताना शेतमजुरांनी घ्यावयाची काळजी व त्याविषयी सुरू असलेल्या जनजागरण कार्यक्रमाविषयी बोलताना पोहरे यांनी सरकारच्या कृषी विभागाला धारेवर धरले. त्यांनी कृषी अधिका-यांना प्रश्न केला की, कीटकनाशके फवारण्याची गरजच काय आहे? काळजी घेतल्यामुळे फवारणी करणाया मजुरांचे प्राण तर वाचतील; परंतु फवारणी झालेल्या शेतमालाला तर विषमुक्त करता येणार आहे काय? एका व्यक्तीला सुरक्षा प्रदान करून अनेक व्यक्तींना असुरक्षित करण्यात हशील काय असा बिनतोड प्रतिप्रश्न पोहरे यांनी केला. रसायने निरुपाय म्हणून वापरायची असतात उपाय म्हणून नव्हे हे साधे तत्व पाळण्याची खबरदारी न घेतल्यामुळे रासायनिक शेतीचे दुष्परिणाम नागरिक भोगत आहेत. ते पुढे म्हणाले की, निसर्गचक्रानुसार पिकांवर कीड येणारच आहे; परंतु तिला नष्ट करणा-या खर्चिक आणि आरोग्यास अपायकारक रासायनिक उपाययोजना केल्यापेक्षा किडीला येण्यापासून रोखणा-या बीनखर्चिक उपाय शोधणे गरजेचे आहे. पिकांना कीटकनाशके नव्हे तर कीडरोधकांची गरज आहे हे समजून घेतले पाहिजे आणि कीडरोधक तयार करणे फार सोपे आहे. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतावर सहजपणे ते करू शकतो. केंद्र शासनाच्या मदतीने राज्य सरकारने इच्छाशक्ती दाखविल्यास व सुचविलेल्या मागण्या मान्य केल्यास विदर्भातून रासायनिक शेती हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही व सेंद्रिय शेती पुन:र्स्थापित करण्यासाठी शेतकरी एका पायावर तयार होतील, असे प्रकाश पोहरे मुलाखतीच्या शेवटी म्हणाले

Comments
Post a Comment