अटक केलेल्या रामकृष्ण टेकाम यांना तातडीने बंधनमुक्त करून त्यांचा जाहीर सत्कार करा !

अकोला / सोमवार, दि .16 ऑक्टोबर 2017
नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूप्रकरणी
अटक केलेल्या रामकृष्ण टेकाम यांना तातडीने
बंधनमुक्त करून त्यांचा जाहीर सत्कार करा!
शेती समस्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश पोहरे यांची मागणी
15 ऑक्टोबर (प्रतिनिधी) वर्धा:
 चार नरबळी तसेच अनेक जनावरांना मारणाऱ्या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूला कारण ठरल्याचा दोष ठेवून वनविभागाने अटक केलेल्या अंभोरा येथील शेतकरी रामकृष्ण भगवान टेकाम यांना अटक करण्याची कारवाई ही वनविभागाचे आणि प्रशासकीय यंत्रणेचे टाळके ठिकाणावर नसल्याचे द्योतक असून, रामकृष्ण टेकाम यांना ताबडतोब बंधनमुक्त करून त्यांचा यथोचित सत्कार करावा नरभक्षक वाघिणीला मारल्याबद्दल त्यांना वनविभाग तसेच प्रशासकीय यंत्रणेने रोख पुरस्कार द्यावा, अशी मागणी शेती समस्याचे ज्येष्ठ अभ्यासक आणि देशोन्नतीचे मुख्य संपादक प्रकाश पोहरे यांनी केली.

वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या आणि शेतमजुरांच्या जीवाचे मोल कळले नाही. त्यांच्या कष्टाचे महत्त्वही कळले नाही. असेच रामकृष्ण टेकाम यांच्या अटकेतून समोर आले. आता तरी शासकीय यंत्रणेने तसेच वनविभागाने रामकृष्ण टेकाम यांच्याविरोधात केलेली कारवाई तातडीने मागे घ्यावी आणि शेतकरी हिताचा निर्णय घ्यावा, असेही प्रकाश पोहरे यांनी म्हटले. आत्मसंरक्षण करणे आणि शेतात कष्टाने उभे केलेल्या पिकाचे संरक्षण करणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे पिकाच्या संरक्षणासाठी आणि नरभक्षक वाघीणीपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी सिंदीविहिरी शिवारातील शेताच्या कूंपनतारांत वीज प्रवाह सोडण्याशिवाय या भागातील शेतकऱ्यांसमोर पर्यायच नव्हता. वनविभागाने तसेच प्रशासकीय यंत्रणेने तथाकथीत भूलतज्ज्ञांची फौज हत्तीवर मिरवीत वाघिणीच्या मागे ठेवली आष्टी तालुक्यातल्या वडाळा गावाजवळील जंगलात शंभर मीटरवर असलेली वाघीण यांना जेरबंद करता आली नाही. उलट या भागात दोन शेतकऱ्यांच्या नरडीचा घोट या वाघीणीने घेतला. ती पुन्हा नरबळी घेण्याकरिताच सिंदीविहिरी तसेच बोर अभयारण्य परिसराकडे निघाली होती. या वाघिणीला जेरबंद करण्याकरीता आलेल्या तथाकथीत भूलतज्ज्ञांवर तसेच हत्तीच्या अंबारीत बसून वाघिणीच्या मागावर असलेल्या वनविभागाच्या पथकाकरिता लक्षावधी रुपयांचा खर्च प्रशासकीय यंत्रणेने केला. तरीही त्यांना ही वाघिण गवसली नाही. ती मोकळी राहिली असती तर तिने किती नरबळी घेतले असते, याचा अंदाजच नव्हता. अखेर रामकृष्ण टेकाम यांच्या शेताच्या कूंपनतारांत सोडलेल्या वीज प्रवाहाचा धक्का लागून ती वाघीण मेली. यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांची शेतातील कामे सुरक्षितपणे पार पाडता येणार आहे. उच्च न्यायालयाने या वाघिणीला मारण्याचाच आदेश दिला होता. पण वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणा यात सपशेल अयशस्वी ठरली. वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणा जे काम करू शकले नाही, ते काम रामकृष्ण टेकाम यांच्या प्रयत्नातून साध्य झाले. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांचे जीव वाचले. शिवाय वनविभाग आणि प्रशासकीय यंत्रणेच्या लाखो रुपयांची बचत झाली. अशा वेळी रामकृष्ण टेकाम यांनाच गुन्हेगार ठरविणे हा प्रशासकीय यंत्रणेचे आणि वनविभागाचे डोके ठिकाणावर नसल्याचा उत्तम नमुना आहे. त्यामुळे रामकृष्ण टेकाम यांना तातडीने बंधनमुक्त करून त्यांनी शेतकरी, शेतमजूर तसेच जनसामान्यांच्या हितासाठी केलेल्या कामाबद्दल पुरस्कृत करावे. त्यांचा जाहीर सत्कार करावा. तसेच त्यांना रोख बक्षीस द्यावे, अशी मागणी शेती समस्यांचे ज्येष्ठ अभ्यासक प्रकाश पोहरे यांनी केली आहे. शासनाचे आणि वनविभागाचे डोके ठिकाणावर येत नसेल तर शेतकरी, शेतमजुरांना संघटीत होवून रामकृष्ण टेकाम यांच्या पाठीशी उभे राहात जनआंदोलन उभे करावे लागेल. त्यामुळे आता तरी लगेच निर्णय घेत रामकृष्ण टेकाम यांना बंधनमुक्त करावे, अशी मागणी प्रकाश पोहरे यांनी केली.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017