प्रहार, रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2014 `देवेंद्र यू टू'!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 16 नोव्हेंबर 2014
`देवेंद्र यू टू'!
आदर्शवादाच्या गप्पा आणि व्यावहारिक राजकारण यांच्यात सांगड घालताना जी कुतरओढ नेहमीच पाहायला मिळते तीच आता या सरकारच्या बाबतीत पाहायला मिळत आहे आणि दुर्दैवाची बाब ही आहे की या फसव्या नाटकाचे नायक देवेंद्र फडणवीस आहेत. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या दरम्यान एकवेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल, परंतु राष्ट्रवादीचा पाठिंबा कधीच घेणार नाही, वेळ पडल्यास अविवाहित राहू, परंतु राष्ट्रवादीचे कुंकू कपाळाला लावणार नाही असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्या सरकारचा ज्या केविलवाण्या पद्धतीने बचाव करीत आहे ते पाहता अगदी सहज शब्द बाहेर पडतात, `देवेंद्र यू टू'!
राज्यात भाजपने सरकार स्थापनेचा दावा केला आणि देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड केली त्यावेळी राजकारणात काही गुणात्मक बदल पाहायला मिळतील, राजकारण होईल, परंतु ते नीतीमूल्यावर आधारित असेल, असे वाटले होते; परंतु विश्वासमताच्या वेळी भाजपने जे काही राजकारण खेळले ते पाहता, देवेंद्र यांचेही पाय मातीचेच निघाले, असे खेदाने म्हणावे लागते. देवेंद्र फडणवीस यांची राजकारणातील आजवरची कामगिरी अगदी निष्कलंक म्हणावी अशीच आहे. आजवर विरोधी पक्षातून राजकारण करणाऱ्या फडणविसांनी सत्ताधाऱ्यांशी कोणतीही तडजोड केल्याचे उदाहरण नाही. शरद पवारांचेच शब्द वापरायचे, तर विरोधी पक्षातील इतर काही मंडळी `तोडपाणी' करण्यात मग्न असताना देवेंद्र फडणवीस मात्र प्रामाणिकपणे सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे लावून धरत होते. संधीसाधूपणा, बेरकीपणा, साट्यालोट्याचे राजकारण देवेंद्र फडणविसांनी कधी केले नाही आणि म्हणूनच नीतीन गडकरींसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्याला डावलून भाजप श्रेष्ठींनी देवेंद्र फडणविसांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला तेव्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला. देवेंद्र फडणविसांच्या आजवरच्या तपश्चर्येचे फळ त्यांना मिळाले असे म्हणता येईल, परंतु दुर्दैव हे की त्यांना स्वबळाचे सरकार स्थापन करता आले नाही. भ्रष्टाचार फोफावण्यास जे तडजोडीचे राजकारण कारणीभूत ठरते तेच देवेंद्रच्याही वाट्याला आले. देवेंद्र फडणविसांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणदेखील स्वच्छ प्रतिमेचे नेते आहेत; परंतु त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांना किती तडजोडी कराव्या लागल्या, डोळ्यासमोर भ्रष्टाचार होताना दिसत असूनही डोळ्यावर पट्टी बांधून कसा राज्याचा गाडा हाकलावा लागला, तो अवघ्या महाराष्ट्राने पाहिला. तेच भोग देवेंद्र फडणविसांच्या नशिबी आले आहेत; परंतु `मी सरकार वाचविण्यासाठी सरकार चालविणार नाही, तर महाराष्ट्राला विकासाकडे नेण्याचे काम करेल, कुठलीही भ्रष्ट तडजोड करणार नाही' असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्रीपद सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणविसांनी दिले आणि एक नवी आशा निर्माण झाली.
विधानसभेत भाजपकडे बहुमत नाही हे उघडच आहे. त्यामुळे सरकार चालविण्यासाठी कुणाची तरी मदत भाजपला घ्यावीच लागणार आहे; फक्त ही मदत कुणाची घेतली जाते आणि त्यासाठी कोणत्या तडजोडी केल्या जातात, हाच भाग महत्त्वाचा होता. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजप सरकारला विनाअट पाठिंबा दिला आहे. सरकार अस्थिर करणार नाही किंवा होऊ देणार नाही, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. अर्थात तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, भाजपने त्यांना पाठिंबा मागितला नव्हता आणि राष्ट्रवादीने दिलेला पाठिंबा आम्ही स्वीकारत आहोत, असेही भाजपने कधी म्हटले नाही, परंतु भाजपची चलाखी अशी आहे की आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा नाकारतो असेही भाजपने म्हटलेले नाही. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करू नये किंवा चालवू नये, अशीच देवेंद्र फडणविसांची इच्छा होती आणि ती त्यांनी वारंवार पक्षश्रेष्ठी अर्थात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याकडे व्यक्त केली; परंतु शिवसेनेला एकदा धडा शिकवायचाच असा निर्धार केलेल्या पक्षश्रेष्ठींनी सेनेला सरकारमध्ये सामील करून घेण्याचे फडणविसांचे सगळे प्रयत्न फोल ठरविले. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत सेनेला शेवटपर्यंत झुलवत ठेवायचे, ही भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांची रणनीती होती. शहा-मोदी या जोडगोळीपुढे देवेंद्र फडणविसांचे काही चालणे शक्यच नाही. त्यांच्याच कृपाप्रसादाने फडणविसांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीऐवजी सेनेचा पाठिंबा घेऊन स्थिर आणि मजबूत सरकार स्थापन करण्याचे देवेंद्र फडणविसांचे प्रयत्न शेवटी अपयशी ठरले.
सेना सरकारमध्ये सामील होणार नाही आणि सेनेचा सरकारला बाहेरूनही पाठिंबा असणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर पुढे काय करायचे, हा खरा प्रश्न देवेंद्र यांच्यासमोर होता. एक तर आपण राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालवू इच्छित नाही, असे स्पष्टपणे सांगत मुख्यमंत्रीपदावरून बाजूला होणे हा पर्याय त्यांच्यासमोर होता किंवा आपल्या राजकीय आयुष्यातील आजवरची सगळ्यात मोठी तडजोड करून राष्ट्रवादीचा अप्रत्यक्ष पाठिंबा स्वीकारत मुख्यमंत्रीपद आपल्याकडे कायम ठेवायचे, हा दुसरा पर्याय होता. पहिला पर्याय देवेंद्र फडणविसांच्या आजवरच्या राजकारणाला प्रतिष्ठा देणारा, त्यांची प्रतिमा अधिक उंचावणारा आणि चिखलात खरोखरच कमळ उमलते या संकेताला बळ देणारा ठरला असता; परंतु तसे झाले नाही. शेवटी सत्ता आणि मुख्यमंत्रीपदाचा मोह अधिक बलवान ठरला आणि तसा तो राहतोच; मात्र त्यामुळे देवेंद्र फडणविसांचे पायदेखील मातीचेच आहेत, हे त्यांनी विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी दाखवून दिले. फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने विश्वासमत प्रस्ताव पारित केला तो तांत्रिकदृष्ट्या योग्य किंवा अयोग्य असेलही; परंतु नैतिकतेच्या आधारावर भाजपचा आणि त्यातही खासकरून देवेंद्र फडणविसांचा दारूण पराभव करणारा ठरला. सरकारकडे बहुमत आहे की नाही हे आजही स्पष्ट झालेले नाही. विधानसभेत भाजपचे 122 सदस्य आहेत, रासपचा एक सदस्य त्यांच्यासोबत आहे, ही संख्या एकूण 123 होते; परंतु भाजपच्या एका आमदाराचे निधन झाल्याने आता हे संख्याबळ 122वर आले आहे. विधानसभेत बहुमतासाठी 145 सदस्य असणे गरजेचे आहे. आम्ही सभागृहात विश्वासमत प्राप्त केले हा भाजपचा दावा असेल, तर त्यांनी उर्वरित 23 सदस्यांची नावे सांगायला हवी होती; परंतु तसे झालेले नाही. वस्तुस्थिती हीच आहे की आजही भाजपचे सरकार अल्पमतात आहे आणि राष्ट्रवादीने जर भाजपच्या विरोधात भूमिका घेतली तर हे सरकार पडू शकते. याचा अर्थ भाजपचे सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावरच टिकून आहे; परंतु भाजपला राष्ट्रवादीचा उघड पाठिंबा नको आहे. आमचे सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर आहे, हे मान्य करायला भाजप तयार नाही. विश्वासमत प्रस्तावाच्या वेळी मतविभागणी झाली असती तर हे सरकार राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर स्थापन झालेले आहे, हे स्पष्ट झाले असते, ते टाळण्यासाठीच आवाजी मतदानाचा फार्स करण्यात आला. राजकारणाच्या दृष्टीने भलेही हे समर्थनीय ठरत असेल, परंतु कालपर्यंत ज्या साधनशुचितेच्या, ज्या नैतिकतेच्या गप्पा देवेंद्र फडणवीस करीत होते त्याचे काय? राजकारणात तडजोडी कराव्याच लागतात, त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा देण्यास नकार दिला म्हणून आम्ही राष्ट्रवादीचा पाठिंबा स्वीकारला हे मोकळ्या मनाने मान्य करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्याचे नैतिक धैर्य देवेंद्र फडणवीस का दाखवू शकले नाही? ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा प्रकार ते का करीत आहेत? भविष्यात कदाचित इतर पक्षांमध्ये फूट पाडून किंवा `कर्नाटक पॅटर्न' राबवून भाजप स्वबळावर आपले बहुमत सिद्ध करेल, परंतु आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नसेल तर हे सरकार अल्पमतात आहे, ही वस्तुस्थिती आहे.
आदर्शवादाच्या गप्पा आणि व्यावहारिक राजकारण यांच्यात सांगड घालताना जी कुतरओढ नेहमीच पाहायला मिळते तीच आता या सरकारच्या बाबतीत पाहायला मिळत आहे आणि दुर्दैवाची बाब ही आहे की या फसव्या नाटकाचे नायक देवेंद्र फडणवीस आहेत. निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या दरम्यान एकवेळ सत्ता मिळाली नाही तरी चालेल, परंतु राष्ट्रवादीचा पाठिंबा कधीच घेणार नाही, वेळ पडल्यास अविवाहित राहू, परंतु राष्ट्रवादीचे कुंकू कपाळाला लावणार नाही असे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे देवेंद्र फडणवीस आज आपल्या सरकारचा ज्या केविलवाण्या पद्धतीने बचाव करीत आहे ते पाहता अगदी सहज शब्द बाहेर पडतात, `देवेंद्र यू टू'!
Comments
Post a Comment