प्रहार, रविवार, दि. 4 जानेवारी 2015 लोकांना हवे `4जी',यांचा प्रयत्न `5जी'साठी!
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 4 जानेवारी 2015
लोकांना हवे `4जी',यांचा प्रयत्न `5जी'साठी!
मोदींकडून लोकांना '4जी'ची अपेक्षा असताना मोदींना आम्ही पंतप्रधान पदावर बसविले असा दावा करणाऱ्या संघटना या देशात '5जी'चा आग्रह धरीत आहेत. हा '5जी'चा आग्रह विकासाच्या संदर्भात असता, तर कुणाला काही आक्षेप असण्याचे कारणच नव्हते; परंतु यांच्या '5जी'मध्ये गाय, गीता, गंगा, गोडसे आणि घरवापसीचा (उर्प्हह) समावेश आहे. गोवंशाचे रक्षण व्हावे, गंगा स्वच्छ असावी याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, परंतु त्याला जोडून गोडसे, गीता, घरवापसी वगैरे संकल्पना येत असतील, तर हा शुद्ध धार्मिक किंवा भावनिक अजेंडा म्हणावा लागेल, विकासाशी त्याचा कोणताही संबंध नाही.
देशातील लोकांना काय हवे, या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर या देशातील लोकांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत दिले आहे. नरेंद्र मोदींना लोकांचे समर्थन मिळाले त्यामागे मुख्य कारण मोदींनी लोकांना दिलेली विकासाची आश्वासने, हेच होते. ही आश्वासने पूर्ण करण्याची क्षमता असल्याचे त्यांनी `गुजरातमध्ये विकास केला,' असे दाखवून देशासमोर मांडले होते. मोदी भाजपचे आहेत, मोदी संघाचा चेहरा आहेत किंवा मोदींच्या कारकिर्दीत गुजरातमध्ये मोठी दंगल उसळली होती, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून देशातील लोकांनी केवळ एक विकास पुरुष म्हणून मोदींच्या मागे आपले भक्कम समर्थन उभे केले. लोकांनी या निवडणुकीत भाजपला मत दिलेच नाही, त्यांनी मोदीला म्हणजेच विकासाला मत दिले. या निवडणुकीत मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार नसते, तर भाजपला इतका मोठा विजय मिळाला नसता, कदाचित पुन्हा एकदा भाजपला विरोधी पक्षातच बसावे लागले असते. ही वस्तुस्थिती आहे आणि कुणाच्या मान्य करण्याने अथवा न करण्याने ती बदलू शकत नाही; परंतु ही वस्तुस्थिती स्वीकारायला संघ परिवार तयार नसावा, असेच गेल्या काही दिवसांतील घटनांवरून दिसून येत आहे.
मोदींना आम्ही पंतप्रधान पदावर बसविले, असे संघाला वाटत आहे आणि म्हणूनच आमचा अजेंडा मोदींनी राबवावा किंवा आमच्या कार्यक्रमात मोदींनी अर्थात सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी त्यांची अपेक्षा आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत संघाने आपली संपूर्ण ताकद मोदींच्या पाठीशी उभी केली होती, हे सत्य असले तरी केवळ संघाच्या ताकदीच्या जोरावर मोदी किंवा भाजपला हे यश मिळाले असे म्हणता येणार नाही. संघाने यापूर्वी वाजपेयी, अडवाणी यांच्या पाठीशीही आपली संपूर्ण ताकद उभी केली होती, परंतु त्यांच्या कारकिर्दीत भाजपला स्वबळावर इतके यश कधीही संपादन करता आले नाही. अनेक जण किंबहुना सगळेच ही बाब मान्य करतात, की मोदींपेक्षा अटलबिहारी वाजपेयी हे अधिक सर्वमान्य नेते होते, त्याकाळी त्यांची प्रतिमा आणि प्रभाव मोदींपेक्षा उजवा होता; परंतु त्याचवेळी हेदेखील लक्षात घ्यावे लागेल, की अटलबिहारी वाजपेयींच्या काळात भाजपला लोकसभेत कधीही दोनशेचा आकडा गाठता आला नाही, ते मोदींनी करून दाखविले कारण देशाचा विकास घडवून आणण्याची क्षमता, ताकद आणि तशी दूरदृष्टी मोदींकडे आहे, असा विश्वास लोकांना वाटला. तात्पर्य गेल्या लोकसभा निवडणुकीतील भाजपला मिळालेले यश हे मोदींच्या विकास स्वप्नांना मिळालेले यश होते, परंतु ही वस्तुस्थिती समजून घ्यायला संघ परिवार तयार नाही. केंद्रात आता मोदी सरकार आहे म्हणजे आपल्याला मोकळे रान मिळाले आहे, अशा आविर्भावात संघ आणि परिवारातील संघटनांचे नेते आपापले कार्यक्रम धिटाईने राबविताना दिसत आहे.
लोकांनी मोदींना समर्थन दिले ते '4जी'साठी अर्थात विकासासाठी, परवलीचा शब्द आहे. '4जी' हा दूरसंचार क्षेत्रातील विकासाचा पुढचा टप्पा आहे आणि विकासाच्या दृष्टीने प्रातिनिधीक म्हणून या शब्दाचा वापर करता येईल. तात्पर्य मोदींकडून लोकांना '4जी'ची अपेक्षा असताना आणि मोदीदेखील ही अपेक्षा पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असताना मोदींना आम्ही पंतप्रधान पदावर बसविले असा दावा करणाऱ्या संघटना या देशात '5जी'चा आग्रह धरीत आहेत. हा '5जी'चा आग्रह विकासाच्या संदर्भात असता, तर कुणाला काही आक्षेप असण्याचे कारणच नव्हते; परंतु यांच्या '5जी'मध्ये गाय, गीता, गंगा, गोडसे आणि घरवापसीचा (उर्प्हह) समावेश आहे. गोवंशाचे रक्षण व्हावे, गंगा स्वच्छ असावी याबद्दल कुणाचे दुमत असण्याचे कारण नाही, परंतु त्याला जोडून गोडसे, गीता, घरवापसी वगैरे संकल्पना येत असतील, तर हा शुद्ध धार्मिक किंवा भावनिक अजेंडा म्हणावा लागेल, विकासाशी त्याचा कोणताही संबंध नाही. लोकांना हे नको आहे, यामागच्या किळसवाण्या राजकारणाची लोकांना चीड आहे. गोडसेचे मंदिर उभारून एका विकृतीला समाजमान्यता देण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याला लोकांचा पाठिंबा कसा असू शकतो? 'घरवापसी'मुळे देशासमोरची कोणती समस्या दूर होऊ शकते? भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता देण्याने किती लोकांच्या पोटाची खळगी भरू शकते? या सगळ्या मुद्द्यांचा विकासाशी कुठे संबंध येतो? परंतु हे मुद्दे प्रकर्षाने पुढे आणले जात आहेत आणि मोदी सरकारने त्यांची पाठराखण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशाच्या विकासापेक्षा धार्मिक उन्मादात ज्या लोकांना अधिक रूची आहे, हा देश एका धर्माच्या नावाने ओळखला जावा, हे ज्यांचे स्वप्न आहे असे लोक मोदींच्या विकासमार्गातील एक मोठी धोंड बनू पाहत आहेत. हे एकाच धर्माच्या बाबतीत होत आहे, असे नाही. लव्ह जिहाद सारखे प्रकार अन्य धर्मांतही होत आहेत, तालिबानी प्रवृत्तीचे आकर्षण अन्य धर्मांतही आहे, इराक-सीरियामध्ये जी संघटना निष्पाप लोकांच्या रक्ताचे पाट वाहवत आहे त्या संघटनेत सामील होण्यासाठी या देशातूनही काही लोक गेले होते आणि अनेकांची जाण्याची इच्छा आहे. इकडच्या असो वा तिकडच्या अशा सगळ्या लोकांना देशाच्या विकासापेक्षा धार्मिक उन्मादाचे अधिक आकर्षण आहे, परंतु देशाचे सरकार या लोकांच्या पाठिंब्यावर उभे नाही किंवा या लोकांनी हे सरकार निवडून दिलेले नाही. हे सरकार सामान्य लोकांनी आणि विशेष म्हणजे सगळ्याच धर्मांतील सामान्य लोकांनी निवडून दिले आहे. ज्या मतदारसंघात मुस्लीम मतदारांची संख्या निर्णायक आहे, अशा मतदारसंघांतूनही भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. याचा अर्थ मुस्लीम समाजानेही मोदी सरकारला मोठ्या आशेने निवडून दिले आहे आणि ते केवळ एवढ्याचसाठी, की मोदी सरकार देशाचा विकास घडवून आणेल, त्या माध्यमातून सामान्य लोकांसमोरच्या अगदी सामान्य समस्या सुटतील, रोजी-रोटीचा प्रश्न निकालात निघेल; परंतु केवळ अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांना या वस्तुस्थितीची जाणीव नाही. हिंदू कट्टरवाद्यांचा, मुस्लीम कट्टरवाद्यांचा आणि दलितांच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्यांचा वेगळाच अजेंडा आहे. त्यांना सामान्य लोकांच्या सुख-दु:खाशी काहीही देणे-घेणे नाही. रस्ते, वीज, पाणी हे त्यांचे प्रश्नच नाही. शेतकरी जगतो आहे की मरतो, गरिबांच्या घरची चूल दोन वेळेला पेटते की नाही, याची त्यांना काळजी नाही. नुकताच राष्ट्रीय पातळीवरील एका अग्रगण्य इंग्रजी दैनिकाने महानगरांमध्ये एक सर्व्हे केला, त्यात '5जी'ची मागणी करणाऱ्या संघटना आणि परिवार मोदींच्या मार्गात अडचणी उभ्या करीत आहेत का, असे लोकांना विचारण्यात आले आणि जवळपास 62 टक्के लोकांनी या संघटना मोदींना अडचणीत आणित असल्याचे मत नोंदविले. गेल्या निवडणुकीत महानगरांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले, हे लक्षात घेता लोकांचा हा कौल खूप बोलका ठरावा असा आहे. लोकांना विकास हवा आहे, एकविसाव्या शतकात धार्मिक अस्मितेचे राजकारण कालबाह्य ठरले आहे. लोकांसमोरचे प्रश्न वेगळे आहेत आणि त्याची उत्तरेही वेगळी आहेत. त्यांना अस्मितेपेक्षा आपल्या पोटाची, आपल्या रोजगाराची अधिक काळजी आहे, त्यांचे प्रश्न केवळ विकासाच्या माध्यमातूनच सुटू शकतात. या प्रश्नावर सार्वमत घेतले तर 99 टक्के लोक विकासालाच प्राधान्य देतील; परंतु उरलेल्या एक टक्का लोकांची उपद्रवक्षमता मोठी आहे. तिला कसे तोंड द्यायचे हाच मोदी सरकार समोरचा मोठा प्रश्न आहे. मोदींनी या लोकांना बाजूला सारून आपले विकासाचे आश्वासन पूर्ण करावे, हीच देशवासियांची अपेक्षा आहे. लोकांना '4जी' हवे आहे, त्यांना '5जी'मध्ये काडीचाही रस नाही.
मोदी या लोकांना बाजूला सारून, जर विकासाच्या दिशेने देशातील धोरणे राबविण्यात पुढाकार घेत नाहीत, असे जर जनतेला दिसले, तर मग सत्ता ताब्यात घेण्यासाठी भाजपाने लबाड आश्वासने दिलीत, अशी लोकांची होत चाललेली भावना खरी ठरेल, हे निश्चित.
Comments
Post a Comment