प्रहार, रविवार, दि. 21 डिसेंबर 2014 “मूळ कारणांचा शोध घ्या! “




आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
 रविवार, दि. 21  डिसेंबर 2014

मूळ कारणांचा शोध घ्या!

सध्या सुरू असलेले स्वच्छता अभियान स्वागतार्ह असले, तरी त्याला योग्य दिशा मिळायला हवी, अस्वच्छतेच्या मूळ कारणांपर्यंत हे अभियान जायला हवे. केवळ फोटो काढून, छापून आणण्यापर्यंत हे अभियान मर्यादित राहत असेल, तर इतर अनेक मोहिमांप्रमाणे या मोहिमेचीही वाट लागणार हे निश्चित!

कोणत्याही समस्येचा कायमस्वरूपी निपटारा करायचा असेल, तर त्या समस्येच्या मुळापर्यंत जाणे आणि तिथूनच योग्य त्या उपाययोजना करणे हाच एकमेव पर्याय असू शकतो. मुळाचा विचार करता वरवरच्या उपाययोजना केल्या, तर तात्पूरता फायदा होऊ शकतो; परंतु समस्या तशीच कायम राहते आणि संधी मिळताच ती फोफावते. गुन्हेगारीचा विचार केला, तर गुन्हेगारांना पकडून त्यांना दंड करणे, तुरूंगात डांबणे हा उपाय केवळ तात्कालिक ठरतो. गुन्हेगारांना शासन केल्यामुळे गुन्हेगारी कमी झाली असे कधीही आढळून आले नाही, कारण तो मुळात उपाय नाहीच. गुन्हेगारीचे मूळ बेरोजगारीत आणि समाजाच्या एकूणच नैतिक अध:पतनात आहे. पोटाची भूक किंवा कष्ट करता अधिक मिळविण्याची लालसा लोकांना गुन्हेगारीकडे घेऊन जाते. प्रत्येक हाताला रोजगार मिळण्याची व्यवस्था केली आणि प्रत्येकाला सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून दिली, तर गुन्हेगारीचे प्रमाण निश्चितच कमी होईल, त्याचवेळी नैतिक दृष्टीनेही समाज सशक्त होणे गरजेचे आहे. या दोन्ही बाबींकडे दुर्लक्ष करून इतर उपाययोजनांवर जोपर्यंत भर दिला जात आहे, तोपर्यंत गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता नाही. तीच बाब आजकाल सगळीकडे गाजत असलेल्या स्वच्छता अभियानाच्या बाबतीत लागू होते. भारतात स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे तो स्वच्छतेच्या बाबतीत लोक अडाणी किंवा अशिक्षित असल्यामुळेच, हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे चार लोकांनी एखाद्या ठिकाणी जमून झाडू मारायचा आणि त्याचे फोटो छापून आणायचे, असल्या प्रकारातून लोकांमध्ये स्वच्छतेच्या बाबतीत जागृती होऊ शकत नाही. स्वच्छता ही सवय व्हायला हवी आणि वैयिक्तक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीतही लोकांमध्ये स्वयंस्फूर्त जागरूकता निर्माण व्हायला हवी. हे व्हायचे असेल तर लोकांना स्वच्छतेच्या बाबतीत योग्य शिक्षण अथवा प्रशिक्षण मिळायला हवे. अस्वच्छतेचे किती भयंकर दुष्परिणाम होऊ शकतात याबाबत  लोकांना प्रभावी मार्गदर्शन होणे गरजेचे आहे.
  ग्रामीण भागात अजूनही हगणदारी अस्तित्वात आहे. या हगणदारीमुळे आरोग्याचे किती भयंकर प्रश्न निर्माण होतात, हे ग्रामीण भागातील लोकांना समजावून सांगणे गरजेचे ठरते. हगणदारीचा सगळ्यात मोठा दुष्परिणाम गर्भवती मातांवर होतो. या गर्भवती माता हगणदारीत जातात तेव्हा आजूबाजूच्या घाणीतील घातक जंतू त्यांच्या शरीरात प्रवेश करतात. त्याचा परिणाम त्यांच्या गर्भावर होतो, गर्भाच्या मेंदूवर होतो. ग्रामीण भागातील लोकांचा सरासरी बुद्ध्यांक कमी आढळून येतो यामागे हे एक मोठे कारण आहे आणि त्याला शास्त्रीय आधार आहे. कोणत्याही आई- वडिलांना आपल्या मुलाची सर्वाधिक काळजी असते, त्यामुळे थोडे भावनात्मक पातळीवर आवाहन करीत त्यांना हगणदारीमुळे त्यांच्या उद्या जगात येणाऱ्या बाळावर किती वाईट परिणाम होऊ शकतो, हे प्रभावीपणे सांगण्यात आले तर त्याचा योग्य परिणाम होईल. आजकाल प्रसारमाध्यमे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. हगणदारी किंवा स्वच्छतेच्या संदर्भात इतर अयोग्य सवयींचे दुष्परिणाम प्रभावीपणे सांगणारे छोटे छोटे माहितीपट तयार करून ग्रामीण भागात आणि शहरातील झोपडपट्ट्यांमध्येही ते नियमितपणे दाखविले तरी मोठा बदल घडून येऊ शकतो. प्रसारमाध्यमांच्या प्रभावी प्रचारामुळे किती जनजागृती होऊ शकते, याचे उदाहरण म्हणून एडस् संदर्भातील प्रचाराकडे पाहता येईल. एडस्ची भयानकता आणि तो रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहचविण्यात आल्या आणि आज त्यांचा योग्य परिणाम दिसून येतो. पोलिओच्या संदर्भातही सरकारने प्रसारमाध्यमांच्या मदतीने अशीच आक्रमक प्रचार माहीम राबवून आज देश पोलिओमुक्त केला आहे. त्याच धर्तीवर स्वच्छतेचा प्रचारही व्हायला हवा. अर्थात सगळी जबाबदारी सरकारवर ढकलणे योग्य ठरणार नाही. स्थानिक पातळीवरही योग्य नियोजन करता येईल. प्रत्येकाने वैयिक्तक स्वच्छतेसोबतच सार्वजनिक ठिकाणी आपण घाण करणार नाही, कुठेही थुंकणार नाही किंवा कुठेही मूत्र विसर्जन करणार नाही, असे आपल्यापुरते ठरविले तरी खूप काही साध्य होऊ शकते. आपल्याकडे स्वत:पूरती स्वच्छता बाळगायची आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या बाबतीत बेफिकरी दाखवायची मानसिकता मोठ्या प्रमाणात आहे. आपल्या घरात कचरा साठविण्यासाठी कचरा कुंड्या असतात, आपण घर स्वच्छ ठेवतो; मात्र बाहेर आपण कुठेही कचरा टाकतो, कुठेही घाण करतो. ही वृत्ती बदलणे गरजेचे आहे.
 स्वच्छतेचे महत्त्व लोकांना कळावे म्हणून सरकारनेही काही उपाययोजना केल्या पाहिजेत. विशेषत: प्रत्येक पाचशे फुटांवर स्वच्छतागृहे उभी व्हायला हवीत आणि ती स्वच्छ राहतील याचीही दक्षता घ्यायला हवी. अमेरिकेत ठराविक अंतरावर स्वच्छतागृहे असतात, त्यांना `रेस्ट रूम' म्हणतात. ही स्वच्छतागृहे इतकी स्वच्छ असतात, की त्यांची तुलना आपल्याकडील आधुनिक हॉस्पिटलमधील ऑपरेशन रूमसोबतच होऊ शकते. इतकी स्वच्छता तिथे असेल, तर कुणी घाण करण्याची हिंमतच करू शकत नाही. आपल्याकडे विपरित दृष्य दिसते. आपल्याकडील सार्वजनिक स्वच्छतागृहे इतकी घाण असतात, की त्यांना स्वच्छतागृहे म्हणताच येत नाही. प्लास्टिकचा कचरा हीदेखील एक खूप मोठी समस्या आहे. या प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे ठिकठिकाणी नाल्या तुंबलेल्या असतात. गाई-म्हशींनी या प्लास्टिकच्या पिशव्या खाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागण्याची अनेक उदाहरणे आहेत. हा प्लास्टिकचा भस्मासूर रोखणे आपल्याच हाती आहे. आजकाल सरकारी दट्ट्यामुळे दुकानातून प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर कमी झाला आहे, त्याऐवजी अस्तरच्या कपड्यापासून किंवा ज्यूटपासून बनविलेल्या पिशव्या वापरल्या जात आहेत. त्या बऱ्याच टिकतातही, तसेच कालांतराने त्या सहज नष्ट होऊ शकतात. अर्थात यासाठी कायद्यांची गरज भासायला नको, लोकांनाच आपण पर्यावरणाचा, आपल्या आरोग्याचा कसा विनाश करीत आहोत हे कळायला हवे. ते तसे कळत नसेल तर अत्यंत कडक कायदे, जसे दुबई, सिंगापूर सारख्या शहरांत आहेत, तसे तयार करायला हवे आणि त्यांची तितकीच कठोरपणे अंमलबजावणी व्हावी. अर्थात त्यापूर्वी सरकारने, स्थानिक प्रशासनाने स्वच्छतेच्या संदर्भात सगळ्या सुविधा लोकांना उपलब्ध करून द्याव्यात. ठिकठिकाणी  स्वच्छ असलेली आणि उच्च दर्जाची स्वच्छतागृहे, ठिकठिकाणी कचरा कुंड्या उपलब्ध करून द्याव्यात. कचरा  कुंड्यांची नियमित सफाई व्हावी, त्यातही ओला कचरा आणि सुका कचरा याकरिता वेगवेगळ्या कचरा कुंड्या असाव्यात. ओला कचरा कुजवून खत तयार करता येऊ शकते आणि कोरड्या कचऱ्याचे `रिसायकलिंग' करून विविध उत्पादने तयार करता येतील, त्यातून स्थानिक संस्थांना चांगले उत्पन्न मिळू शकते.

  तात्पर्य सध्या सुरू असलेले स्वच्छता अभियान स्वागतार्ह असले, तरी त्याला योग्य दिशा मिळायला हवी, अस्वच्छतेच्या मूळ कारणांपर्यंत हे अभियान जायला हवे. केवळ फोटो काढून, छापून आणण्यापर्यंत हे अभियान मर्यादित राहत असेल, तर इतर अनेक मोहिमांप्रमाणे या मोहिमेचीही वाट लागणार हे निश्चित!

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017