प्रहार, रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2014 भंडारे करणाऱ्यांच्या उत्साहाला आवरा !
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 9 नोव्हेंबर 2014
भंडारे करणाऱ्यांच्या उत्साहाला आवरा !
भंडारे, अन्नछत्र, लंगर यांच्याच पंक्तीत सरकारची अन्न सुरक्षा योजनाही बसते, उद्देश कितीही चांगला असला, तरी त्याचा जो परिणाम दिसून
येत आहे तो देशाच्या दृष्टीने घातकच म्हणायला हवा. त्यामुळे या भंडारे करणाऱ्यांच्या
उत्साहाला आवरा, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. देशाला महासत्ता
व्हायचे असेल तर श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी, कष्ट केले नाही
तर पोट भरणार नाही हा संदेश देणे गरजेचे आहे. त्यासाठी ऐतखाऊ लोकांचे फुकटात भरणपोषण
करणाऱ्या या सगळ्या व्यवस्था बंद व्हायला हव्यात.
समाजात वावरताना अशा अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात की एरवी ज्यांची दखल घ्यावी, असे आपल्याला वाटत नाही, परंतु या छोट्या-छोट्या गोष्टींतून प्रकट होणारी समाजाची मानसिकता निश्चितच गांभीर्याने विचार करायला भाग पाडणारी आहे. अलीकडील काळात सामूहिक भोजनावळी अर्थात भंडाऱ्यांचे फॅड खूपच वाढल्याचे दिसते. कोणतेही निमित्त साधून गल्लोगल्ली, रस्तोरस्ती अशा भोजनावळी होत असल्याचे दिसते. आपल्याकडे अन्नदानाला पुण्यकार्य मानण्यात आले आहे आणि ते पुण्यकार्य आहेदेखील, परंतु ज्या पद्धतीने आणि ज्या प्रमाणात हे भंडारे केले जातात, ते पाहता त्यामागे पुण्यकार्य करण्याची भावना आहे की एक `इव्हेंट' आणि त्यातून मोठेपणा मिरविण्याची संबंधितांची इच्छा असते, हा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. दानाच्या संदर्भात ते सत्पात्री असावे हा संकेत पाळल्या जाणे गरजेचे आहे. सत्पात्री याचा अर्थ योग्य व्यक्तीला आणि योग्य कारणासाठीच दान केले जावे, तरच ते पुण्यदायी ठरते. अन्नदान करायचे असेल, तर ते अशाच व्यक्तीला किंवा व्यिक्तंसाठी व्हायला हवे, की ज्यांची स्वत:च्या हिमतीवर आपले पोट भरण्याची स्थिती नाही, जे लाचार आणि अपंग आहेत. आपली भूक स्वत: भागविण्यास जे असमर्थ आहेत त्यांना अन्नदान केले तर ते समजू शकते, परंतु इथे जे चित्र दिसते ते खूपच वेगळे आहे. तरुण, हट्टीकट्टी बाया माणसे, ज्यांना आपले पोट भरण्याची कोणतीही ददात नाही त्यांचीच गर्दी भंडाऱ्यांमध्ये अधिक दिसून येते. काही ठिकाणी तर कायमची अन्नछत्रे चालविली जातात. तिथे रोज फुकटात पोटभर जेवायला मिळते. ही अन्नछत्रे चालविणाऱ्यांचा किंवा भंडारे आयोजित करणाऱ्यांचा हेतू चांगला असतो, प्रामाणिक असतो हे मान्य केले तरी त्यातून केवळ ऐतखाऊंचीच सोय होते, हेदेखील लक्षात घ्यायला हवे.
काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती भेटला, कापड मिल बंद पडल्यामुळे बेरोजगार झाला होता. त्याला सहज विचारले, की इतक्या वर्र्षांपासून कापड मिल बंद आहे, तुझे पोटापाण्याचे काय? त्यावर त्याने अगदी सहजपणे सांगितले, की आमच्या कुटुंबात मी आणि माझी आई असे दोघेच जण आहोत. या शहरात रोज कुठे ना कुठे अन्नदान होत असते, मी तिथे जातो, स्वत: पोटभर जेवतो आणि सोबत आईसाठी डब्बा घेऊन येतो. त्याच्या या उत्तराने मी अवाकच झालो. प्रश्न तो आपले पोट भरण्यासाठी काय करतो याचा नाही, तर फुकटात पोटाला खायला मिळत असेल, तर कष्ट का करायचे, ही जी मानसिकता समाजात प्रबळ झाली आहे, तो खरा चिंतेचा प्रश्न आहे. ती व्यक्ती अशा मानसिकतेचे एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणता येईल. भुकेलेल्याला अन्न देणे ही चांगली गोष्ट आहे, परंतु तो नियम बनू नये. अन्नासाठी त्याला कायम कुणावर तरी अवलंबून ठेवणारी व्यवस्था व्यापक विचार करता घातक म्हणायला हवी. इंग्रजीतल्या एका म्हणीनुसार एखाद्या उपाशी माणसाला मासे खाऊ घालण्यापेक्षा त्याला मासे पकडण्याचे कौशल्य शिकविणे अधिक श्रेयस्कर ठरते. या फुकटच्या अन्नछत्रांमुळे, भंडाऱ्यांमुळे कष्ट करून पोट भरण्याची सवयच नष्ट होत आहे.
अन्नधान्याची स्वस्ताई जी शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे तीच या अन्नछत्रांच्या माध्यमातून कष्ट करण्याच्या मानसिकतेलाही मोठा धोका ठरू पाहत आहे. लंगर हा प्रकारही असाच वेगळ्या दृष्टीने आताच्या काळात आक्षेपार्ह ठरू शकतो. गुरू गोविंदसिंगांनी आपल्या शिष्यांना लढवय्या बनविले आणि तेव्हाची परिस्थितीदेखील प्रत्येकाने लढण्यास कायम सज्ज राहावे अशीच होती. त्यामुळे जवळपास प्रत्येक घरातील कर्ता माणूस देशाच्या, समाजाच्या रक्षणासाठी बहुतेक काळात सीमेवर असायचा किंवा युद्धात मग्न असायचा, अशा परिस्थितीत त्याच्या घरच्या लोकांची चिंता त्याला सतावणे स्वाभाविक होते. त्यामुळेच सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या घरातील लोकांची जबाबदारी समाजाने स्वीकारायला हवी, त्यांच्या पोटापाण्याची काळजी इतरांनी घ्यायला हवी, या भावनेतून लंगर प्रथा सुरू झाली. त्या काळी ते योग्यच होते. घरातला कमावता पुरुष नसल्याने लंगरमध्ये जेवून आपली भूक भागविणे या लोकांसाठी अगदी स्वाभाविक होते, परंतु आज तशी परिस्थिती राहिलेली नाही. स्वत:ची आणि कुटुंबाची भूक भागविणे हे काही मोठे आव्हान आजच्या परिस्थितीत नाही. अगदी हातावर पोट असलेला साधा मजूरदेखील आपल्यासह आपल्या कुटुंबाचे भरणपोषण सहज करू शकतो. सांगायचे तात्पर्य पूर्वीच्या काळी अन्नदानाला पुण्यकार्य समजण्यामागे जी सामाजिक परिस्थिती कारणीभूत होती ती आता राहिलेली नाही. या पृष्ठभूमीवर आताचे अन्नदान, आताचे भंडारे किंवा अन्नछत्र केवळ निरूद्योगांची सोय लावणारे ठरू पाहत आहे. 120 कोटींचा हा देश आहे, काम करणारे किंवा करू शकणारे 240 कोटी हात या देशात आहे, परंतु या देशासमोरची मुख्य समस्या कोणती तर काम करायला माणसे मिळत नाही. शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर मजूर मिळविणे हे एक खूप मोठे आव्हान असते. मजूरच मिळत नाही आणि मिळाले तरी त्यांचे दर तसेच त्यांची अरेरावी इतकी असते, की शेती करण्यापेक्षा ती पडीक राहिलेली बरी, असेच शेतकऱ्यांना वाटते. हा सार्वत्रिक अनुभव आहे. ही परिस्थिती ओढवण्यामागे फुकटात पोट भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असणे हे एक महत्त्वाचे कारण आहे. सरकारची अन्न सुरक्षा योजना हीदेखील अशाच भंडाऱ्यांची विस्तारीत आवृत्ती म्हणायला हवी. भंडाऱ्यात शिजवून अन्न दिले जाते या योजनेत ते धान्याच्या रूपात मिळते, एवढाच काय तो फरक; परंतु जवळपास फुकटात मिळणाऱ्या या अन्नधान्यामुळे कष्ट करण्याची मानसिकताच नष्ट होत आहे.
भारताला लवकरच महासत्ता बनविण्याचे स्वप्न आमचे अनेक नेते पाहत असतात किंवा पाहत आहेत, परंतु कोणताही देश इतक्या सहजपणे महासत्तेचा मान मिळवू शकत नाही. दुसऱ्या महायुद्धात उद्ध्वस्त झालेला जपान आज पुन्हा दिमाखाने उभा आहे तो केवळ जपानी माणसाने अविरत कष्ट केल्यामुळेच, आपल्याकडे तसे कष्ट करण्याची मानसिकता आहे का? उलट जे हात काम करू शकतात किंवा ज्या हातांनी काम करून देशाच्या विकासात योगदान द्यावे ही अपेक्षा आहे तेच हात निरूद्योगी करण्याचे काम काही प्रमाणात जाणीवपूर्वक आणि मोठ्या प्रमाणात अजाणतेपणी केले जात आहे. भंडारे, अन्नछत्र, लंगर यांच्याच पंक्तीत सरकारची अन्न सुरक्षा योजनाही बसते, उद्देश कितीही चांगला असला, तरी त्याचा जो परिणाम दिसून येत आहे तो देशाच्या दृष्टीने घातकच म्हणायला हवा. त्यामुळे या भंडारे करणाऱ्यांच्या उत्साहाला आवरा, असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. देशाला महासत्ता व्हायचे असेल तर श्रमाला प्रतिष्ठा मिळायला हवी, कष्ट केले नाही तर पोट भरणार नाही हा संदेश देणे गरजेचे आहे. त्यासाठी ऐतखाऊ लोकांचे फुकटात भरणपोषण करणाऱ्या या सगळ्या व्यवस्था बंद व्हायला हव्यात.
Comments
Post a Comment