प्रहार, रविवार, दि. 7 जून 2015 सेवाच करायची तर पदे हवी कशाला?
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 7 जून 2015
सेवाच करायची तर पदे हवी कशाला?
सेवेची
व्याख्या म्हटले तर खूप सरळ आणि म्हटले तर खूप व्यापक आहे. इतरांच्या अडीअडचणी दूर
करण्यास मदत करणे,
त्यांना मार्गदर्शन करणे, जमल्यास आर्थिक साहाय्य
करणे म्हणजे सेवा म्हणता येईल. ही जशी वैयिक्तक स्तरावर करता येते तशीच ती अधिक व्यापक
स्तरावरही करता येते. सेवेचा मूळ गाभा इतरांना मदत करणे हाच आहे. यात आपल्या परीने
जे काही शक्य आहे ते आपण करू शकतो आणि ते करणे म्हणजेच सेवा. अशा निष्काम सेवेसाठी
ना कुठल्या पदाची गरज असते, ना मानाची, ना धनाची, गरज असते ती केवळ प्रामाणिक इच्छाशक्तीची आणि
अशी इच्छाशक्ती असेल, तर तुमच्याही नकळत तुमच्या हातून आपोआप
सेवा घडत असते.
देशातल्या कुठल्याही मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवकाला तुम्ही राजकारणात कशासाठी आले हा प्रश्न विचारला तर सगळ्यांचे उत्तर एकच असेल आणि ते म्हणजे लोकांची सेवा करायला. लोकांची सेवा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून हे लोक निवडणूक लढवतात, निवडून येतात. निवडून आल्यानंतर निरपेक्ष भावनेने ही मंडळी लोकांची सेवा करीत असतील यावर कोण विश्वास ठेवणार? पदरचे काही लाख किंवा कोटी खर्च करून निवडणूक जिंकायची आणि नंतर कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता लोकांची सेवा करायची, हे कोणत्याच तर्कशास्त्रात बसू शकत नाही. मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरात साधे नगरसेवक म्हणून निवडून यायचे तरी पाच-दहा कोटी खर्च करावे लागतात. आमदारकी हवी असेल तर किमान 25 कोटींची बेगमी करावी लागते आणि खासदारकीसाठी तर हिशेबच करता येत नाही, अशी परिस्थिती आहे. मुळात लोकांची सेवाच करायची असेल तर आमदार, खासदार, नगरसेवक होणे गरजेचे आहे का? ही बाब मान्य करावी लागेल की आमदार, खासदार वगैरे झाल्यावर सरकारच्या मदतीने किंवा सत्तेत असतील तर सरकारच्या माध्यमातून अधिक व्यापक प्रमाणात जनहिताचे प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न करता येतात, परंतु केवळ तेवढ्याचसाठी लोक राजकारणात येतात, निवडणुका लढवितात, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. निवडून आल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून निवडणुकीत झालेला खर्च दामदुपटीने कसा वसूल होईल यासाठी प्रयत्न सुरू होतात. अलीकडील काळात राजकारण हा एक धंदा झाला आहे, राजकारणात पैसे गुंतवायचे आणि संधी मिळताच कैक पटीने ते वसूल करायचे, हे या धंद्याचे सरळ गणित आहे. अर्थात माझ्या माहितीमधील खासदार संजय धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार बी.टी. देशमुख, स्व. आर.आर. पाटील, सा.रे. पाटील यांच्या सारखे काही सन्माननीय अपवाद आहेत, ते जनतेच्या सेवेला अधिक प्राधान्य देतात, राजकीय पदे किंवा त्यातून मिळणारा लाभ त्यांच्यासाठी दुय्यम असतो आणि अशा लोकांना निवडून येण्यासाठी फारसा खर्चदेखील करावा लागत नाही. त्यांच्या कामामुळेच ते वारंवार निवडून येतात, परंतु असे अपवाद खूप कमी म्हणजे अगदी नियम सिद्ध करण्यापुरते आहेत. सांगायचे तात्पर्य जनतेच्या सेवेसाठी हे राजकारण्यांचे पालूपद म्हणजे निव्वळ थोतांड आहे किंवा असते.
खरे तर सेवेची व्याख्या म्हटले तर खूप सरळ आणि म्हटले तर खूप व्यापक आहे. इतरांच्या अडीअडचणी दूर करण्यास मदत करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, जमल्यास आर्थिक साहाय्य करणे म्हणजे सेवा म्हणता येईल. ही जशी वैयिक्तक स्तरावर करता येते तशीच ती अधिक व्यापक स्तरावरही करता येते. सेवेचा मूळ गाभा इतरांना मदत करणे हाच आहे. सेवा करायची म्हटल्यावर त्याला कोणत्याही एका क्षेत्राचे किंवा एका पद्धतीचे बंधन नसते. अनेक प्रकारे, अनेक पद्धतीने, अनेक माध्यमांतून इतरांची सेवा करता येते आणि सेवेच्या संदर्भात लहान, मोठी असे परिमाण लागू शकत नाही. रामायणातील एक घटना त्या दृष्टीने खूप बोलकी आहे. लंकेवर स्वारी करण्यासाठी समुद्रात सेतू बांधण्याचे काम जेव्हा सुरू होते तेव्हा वानर सैन्य मोठमोठे दगड उचलून, झाडे उपटून समुद्रात टाकत होते, त्याचवेळी एक छोटीशी खार आपल्या तोंडात छोटेछोटे खडे घेऊन ते समुद्रात टाकून त्यांना मदत करीत होती. रामाने हे पाहिले तेव्हा त्यांनी तिच्या पाठीवरून आपला हात फिरविला, तिच्या सेवेचे कौतुक केले. असे म्हणतात की रामाने खारीच्या पाठीवरून फिरविलेली बोटे आजही खारीच्या पाठीवर दिसून येतात. यातला कथाभाग बाजूला ठेवला, तरी सेवा किंवा मदत किती मोठी आहे किंवा किती लहान आहे यावर त्या सेवेचे मूल्य अवलंबून नसते, तर ती कोणत्या भावनेने केली हे सर्वाधिक महत्त्वाचे असते, हे मूल्य अधोरेखित होते आणि तेच सत्य आहे. त्यामुळे सेवा करायचीच असेल तर कुठले तरी पद किंवा अधिकार असायलाच हवा असे नाही. घराबाहेर पाऊल टाकले, की सेवेची अनेक क्षेत्रे खुली होतात, फक्त आपली प्रामाणिक इच्छा असायला हवी. मागे एकदा मुंबईतील जे.जे. रूग्णालयात जाण्याचा योग आला. हे सरकारी रूग्णालय आहे. सरकारी रूग्णालय म्हटले, की ती एक नरकपूरीच असते, हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे आणि इतर अशा अनेक रूग्णालयांचे काम पाहिल्यावर हा अनुभव वस्तुस्थितीला धरून असल्याचे मान्य करावे लागते; परंतु जे.जे. रूग्णालय त्याला अपवाद आहे आणि ते अपवाद असण्याचे कारण तिथे निखळ सेवाभावाने काम करणारे डॉ. लहाने, डॉ. तायडे यांच्यासारखे अनेक डॉक्टर्स, अनेक धर्मांचे कायकर्ते; या कार्यकर्त्यांमुळे जे.जे. रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांची आणि त्यांच्यासोबतच्या नातेवाईकांची फरफट होत नाही. हे कार्यकर्ते रूग्णाचे कार्ड तयार करण्यापासून ते त्यांना योग्य त्या डॉक्टरांकडे नेण्याचे, रूग्णाच्या नातेवाईकांची राहण्याची, जेवण्याची सोय बघण्याचे काम करतात आणि तेदेखील निस्वार्थ भावनेने. जे. जे. रुग्णालयाला लागूनच असलेल्या गाडगे महाराज धर्मशाळेचे श्री एकनाथ ठाकूर, दादर येथील धर्मशाळेचे श्री प्रशांत देशमुख सारख्या व्यक्तींचासुद्धा उल्लेख करावाच लागेल. काही समाजसेवी संस्था तर रूग्णांना बाहेरून आणावी लागणारी औषधे निशुल्क पुरविण्याचेही काम करतात. हे कार्यकर्ते किंवा अशा संस्था कुठल्याही मोबदल्याची किंवा अगदी साध्या धन्यवादाचीही अपेक्षा न करता रूग्णांची सेवा करतात. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही जाहिरात नाही, कुठलीही अपेक्षा नाही, केवळ आपण आपल्या समाजाचे, इतरांचे काही देणे लागतो या निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्यांची संख्या या देशात कमी नाही. कोणत्याही मंत्री, आमदार, खासदारापेक्षा त्यांचे काम शतपटीने अधिक चांगले असते, कारण ते निस्वार्थ भावनेने केले जाते. तुम्ही कधी शेगावच्या गजानन महाराज मंदिराला भेट दिली, तर साधा पांढरा पैजामा, पांढराच सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी असलेले सेवेकरी तुमचे लक्ष वेधून घेतील. चेहऱ्यावर कुठलाही त्रागा नसलेले, अगदी शांतपणे नेमून दिलेले आपले काम करणारे, मवाळ आणि हळू आवाजात भक्तांना सूचना करणारे, मंदिराची शिस्त आणि स्वच्छता कसोशिने जपणारे हे सेवेकरी कुठल्या प्रलोभनाने तिथे येतात? त्यांना कशाचीच अपेक्षा नसते. मंदिरात सेवा करण्याची संधी मिळावी म्हणून पंचक्रोशीतील गावकरी अगदी सहा-सहा महिने प्रतीक्षा करीत असतात. मंदिरात येणारे भाविक कधी आस्थेने, कधी मनाला शांती मिळावी म्हणून, तर कधी संकटातून महाराज आपल्याला मार्ग दाखवतील या आशेने येत असतात. या सगळ्या भाविकांना तिथल्या सेवेकऱ्यांची निष्काम सेवा पाहून जीवनाचे खरे मर्म नक्कीच कळत असेल. तसाच अनुभव इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात येतो. तेथेसुद्धा सेवा देणारे अनेक सेवेकरी बघायला मिळतात आणि विशेष म्हणजे त्यातील काही सेवेकरी प्रत्यक्ष जीवनामध्ये अगदी करोडपती असतात. सांगायचे तात्पर्य क्षेत्र कुठलेही असो, सेवा करण्याची मनापासून इच्छा असेल, तर सेवेची संधी मिळतेच आणि त्यातून मिळणारे समाधान इतर कोणत्याही मोबदल्यापेक्षा खूप मोठे असते.
समाजाच्या अनेक क्षेत्रांत अशी सेवाकार्ये सुरू असतात. तिथल्या सेवेकऱ्यांना कोणतीही अपेक्षा नसते. कुणी गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलत असतो, तर कुणी रूग्णसेवेत आपले समाधान शोधीत असतो. एका जैन परिवारात एक मुलगी डॉक्टर झाली, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मात्र तिला अचानक विरक्ती आली आणि तिने संन्यास घेऊन साध्वी होण्याची इच्छा व्यक्त केली. साध्वी होऊन समाजासाठी सेवा करावी अशी तिची इच्छा होती. तिला समाजाची सेवा करावी असे वाटले असेल तर त्यात गैर काहीच नव्हते, उलट ते अत्यंत स्वागतार्ह होते; परंतु सेवा करण्यासाठी संन्यास घेणे खरेच गरजेचे आहे का? ती मुलगी डॉक्टर होती. तिने डॉक्टरकीचे शिक्षण घेतले नसते तर तिच्या ऐवजी अन्य कुणाला तरी डॉक्टर बनण्याची संधी मिळाली असती आणि त्याने रूग्णसेवा केली असती. ती मुलगी डॉक्टर झाली तर आता तिचे कर्तव्य रूग्णसेवा करणे हेच होते, तिला समाजसेवा करायचीच होती तर डॉक्टर म्हणूनही ती करता आली असती. खरे तर वैद्यकीय क्षेत्र हे सेवेचे खूप चांगले माध्यम आहे. अनेक गरीब रूग्ण पैशाअभावी चांगल्या डॉक्टरकडे उपचार घेऊ शकत नाही. अशा रूग्णांना मदत करणे, त्यांना योग्य तो सल्ला देणे, त्यांच्यावर योग्य उपचार करणे ही तर खूप मोठी सेवा होऊ शकते. सेवा करण्यासाठी जसे आमदार, खासदार होणे गरजेचे नसते तसेच संन्यास घेणेही गरजेचे नसते. आपला प्रपंच, आपला संसार सांभाळूनही इतरांची सेवा करता येते आणि अशी सेवा करणारे हजारो नव्हे लाखो लोक आहेत. शंकर बाबा पापळकरांसारख्या लोकांनी तर आपले आयुष्यच इतरांच्या सेवेसाठी समर्पित केले आहे. आज शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. तुम्ही कृषी क्षेत्रातले जाणकार असाल तर या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकता, कायद्याचे जाणकार असाल तर या शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी तुम्ही लढा देऊ शकता, देशोन्नतीच्या माध्यमातून अनेक सामजिक कार्यकर्ते वीज कनेक्शनसाठी ज्यामध्ये आशिष चंदाराणाचा उल्लेख करावाच लागेल, अनेक शेतकऱ्यांना मदत करतच असतात. किशोर तिवारी, प्रकाश आमटेंसारखे आदर्शसुद्धा आहेत. लेखक-कवी असाल तर साहित्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा समाजासमोर तुम्ही मांडू शकता. आपल्या परीने जे काही शक्य आहे ते आपण करू शकतो आणि ते करणे म्हणजेच सेवा. अशा निष्काम सेवेसाठी ना कुठल्या पदाची गरज असते, ना मानाची, ना धनाची, गरज असते ती केवळ प्रामाणिक इच्छाशक्तीची आणि अशी इच्छाशक्ती असेल, तर तुमच्याही नकळत तुमच्या हातून आपोआप सेवा घडत असते. अशा सेवेकऱ्यांची आणि विशेषत: अशा सेवाभावाने कार्य करणाऱ्या नेत्यांची; व्यक्तींची आज देशाला खूप गरज आहे.
Comments
Post a Comment