प्रहार, रविवार, दि. 14 जून 2015 संधी आहेत, कष्टाची तयारी हवी!

         रविवार, दि.  14 जून  2015
संधी आहेत, कष्टाची तयारी हवी!

जिद्द, कष्ट करायची तयारी आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्याला नेमक्या कोणत्या क्षेत्रात गती आहे, आवड आहे हे ओळखून त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न, या थोडक्या भांडवलावरच यशस्वी आयुष्याची इमारत उभी राहू शकते. जिथे आधीपासूनच खूप गर्दी आहे तिथे जाऊन गर्दी अधिक वाढविण्यापेक्षा नव्या खिडक्या शोधा, नवे झरोके शोधा, थोडे आजूबाजूला पाहा आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे नोकरी म्हणजे सुखी आयुष्याची हमी या मानसिकतेतून बाहेर पडा.

नुकतेच बारावी आणि दहावीचे निकाल लागले. हे दोन्ही वर्षे विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक आयुष्याला निर्णायक वळण देणारे असतात. त्यामुळे यापुढचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे किंवा ज्यात आपण पुढचा पल्ला गाठू शकू असा त्यांना विश्वास आहे, असे क्षेत्र निवडावे लागते; परंतु ही खेदाची बाब म्हणावी लागेल, की करिअरच्या संदर्भात पूर्वीपासून काही ठोकताळे आपण निश्चित केलेले असतात आणि त्याच तुडवून तुडवून बेकार झालेल्या वाटेवर आपण आपल्या मुलांना ढकलत असतो. अगदी लहान मुलांना सहज गंमत म्हणून मोठे झाल्यावर तू काय होणार हे कुणी विचारले, तर डॉक्टर किंवा इंजिनिअर हे दोनच पर्याय आपण सांगून ठेवलेले असतात आणि तेच त्या मुलांच्या डोक्यात घट्ट बसतात. त्यामुळे आपण डॉक्टर किंवा इंजिनिअर झालो नाही, तर आपले आयुष्य वाया गेले असा त्यांचा ग्रह होण्याची शक्यता असते. बरेचदा त्यांची बुद्धिमत्ता वेगळ्या विषयात, वेगळ्या क्षेत्रात गतिमान असते, त्यांच्या मनाचा कल इतर विषयांकडे असतो, परंतु आपण डॉक्टर, इंजिनिअर झालो नाही, तर आपल्या आई-बाबांचा स्वप्नभंग होईल, त्यांना खूप वाईट वाटेल म्हणूनदेखील मुले मन मारून या शाखेकडे वळतात. मुळातच त्या विषयांमध्ये गती नसल्याने किंवा मनातून ते विषय आवडत नसल्याने जबरदस्तीने या शाखांकडे ढकलले गेलेले अनेक विद्यार्थी मध्येच कुठेतरी घरंगळतात आणि त्यांचे एकूण शैक्षणिक आयुष्यच उद्ध्वस्त होते. शिक्षणाचा संबंध कमाईशी आणि कमाईचा प्रतिष्ठेशी जोडल्या गेल्याने हा सगळा प्रकार होत असतो.
  शिक्षणाला महत्त्व आहे, चांगल्या दर्जाचे शिक्षण चांगल्या दर्जाची संधी उपलब्ध करून देणारे असते, हे मान्य असले तरी अमूक एक पदवी किंवा पदविका घेतली म्हणजे तुमच्या आयुष्याचा प्रश्न सुटला अशी ग्वाही कुणी देऊ शकत नाही. नोकरी हाच एक कमाईचा मार्ग नाही, परंतु दुर्दैवाने आपल्या समाजात हा ग्रह मोठ्या प्रमाणात पसरला आहे. चांगले शिकून कुठेतरी नोकरी मिळवायची, हे आयुष्याच्या यशस्वीतेचे सूत्र मानल्या जाते. आता शिक्षित युवकांची संख्या आणि खासगी किंवा सरकारी क्षेत्र मिळून असलेल्या नोकऱ्यांची उपलब्धता बघता प्रत्येकाला नोकरी मिळणे जवळपास अशक्य आहे. दहा पैकी एकाला नोकरी मिळू शकते; परंतु याचा अर्थ इतर नऊ जणांचे आयुष्य वाया गेले असा होत नाही किमान त्यांनी तसे समजणे गैर आहे, कारण नोकरीच्या व्यतिरिक्तही पैसा कमाविण्याचे अनेक पर्याय आणि अनेक साधने उपलब्ध आहेत, फक्त थोडे डोळे उघडून आजूबाजूला बघण्याची आणि थोडे कष्ट करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही कामात अगदी सुरुवातीपासून तुम्हाला भरपूर पैसा मिळेल ही अपेक्षा ठेवू नका, तशी अपेक्षा ठेवणे मुळातच गैर आहे. अनेक यशस्वी लोकांच्या आत्मकथा जर तुम्ही वाचल्यात, तर तुमच्या लक्षात येईल त्यातील बहुतेक सगळ्यांनी आपले पूर्वायुष्य अतिशय गरिबीत आणि हलाखीत काढलेले होते. अतिशय तुटपूंज्या भांडवलावर त्यांनी आपला उद्योग किंवा व्यवसाय सुरू केला आणि सुरुवातीला अनेक वर्षे त्यांना आर्थिक नुकसानच सहन करावे लागले; परंतु जिद्दीने त्यावर मात करीत आपले यशस्वी विश्व निर्माण केलेले असते. धिरूभाई अंबानी आपल्या तारुण्यात एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचे काम करीत होते. सांगायचे तात्पर्य नोकऱ्यांच्या मागे धावणे आणि नोकरी म्हणजेच आयुष्याचे सर्वस्व आहे, ही मानसिकता थोडी बाजूला सारून आजूबाजूला पाहिले तर इतर अनेक संधी आपल्याला खुणावत असल्याचे तुम्हाला दिसून येईल. बेरोजगारी ही फार मोठी समस्या वाटत असली, तरी आपल्या आवडीचे काम नाही आणि अपेक्षेइतका पैसा मिळत नाही म्हणून हातावर हात देऊन बसणाऱ्या युवकांमुळेही ही समस्या अधिक गंभीर भासत आहे. खरे तर प्रत्येकामध्ये कोणती तरी एक खास कला किंवा एखादा गुण असतो, बरेचदा तो त्याच्या लक्षातही येत नाही. त्या कलेचा किंवा गुणाचा योग्य वापर करून त्याने वाटचाल सुरू केली, तर निश्चितच आपले आयुष्य सुखाने जगण्याइतपत पैसा त्याला मिळू शकतो. तशी कोणतीच कला नसेल किंवा तसे कोणतेच गुण नसतील तर प्रयत्नपूर्वक ते प्राप्त केले जाऊ शकतात. साधे ड्रायव्हिंग जरी तुम्ही शिकले तरी तुमच्या पोट भरण्याची सोय होऊ शकते. आज हजारो प्रकारच्या लाखो गाड्या रस्त्यावर धावत आहेत, गाड्या आहेत, परंतु ड्रायव्हर नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही ड्रायव्हिंग शिकला आणि त्यात चांगले कौशल्य प्राप्त केले, तर तुमच्या जगण्याला आधार मिळेल आणि त्या जोरावर पुढे तुम्ही तुमच्यातील इतर गुणांना वाव देऊ शकतात. खास व्यावसायिक भाषेत बोलायचे झाल्यास एकवेळ तुम्ही 'मार्केट'मध्ये आला, की मग तुमच्या प्रगतीसाठी अनेक वाटा खुल्या होतात, मग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात उतरला तरी हरकत नाही. असे नाही की तुम्ही ड्रायव्हरच व्हायला हवे, तुम्ही फोटोग्राफर होऊ शकता, तुम्ही मोबाईल, संगणकाच्या क्षेत्रात काम करू शकता, यात तर इतके विविध पर्याय आहेत, की कोणत्याही एका प्रकारात प्राविण्य मिळविले, तरी तुमच्या पोटापाण्याची सोय सहज लागू शकते आणि एकदा 'मार्केट'मध्ये आल्यानंतर आपोआप तुमच्या ओळखी वाढत जातात, तुम्हाला ओळखणारे वाढतात, त्यात जर तुम्ही तुमच्या कामात कौशल्य प्राप्त केले, तर तुम्हाला अधिक कमाईची संधी सहज मिळू शकते.
  आता जग पूर्वीसारखे राहिलेले नाही. आता प्रगतीसाठी अनेक क्षेत्र उपलब्ध झाली आहेत. पूर्वी एकच डॉक्टर सगळ्या रोगावर उपचार करायचा, आता तसे नाही. शरीरातील प्रत्येक अवयवासाठी स्पेशालिस्ट डॉक्टर्स तयार झाले आहेत आणि ही स्पेशालिटी इतकी टोकाची झाली आहे, की एखादा डॉक्टर उजव्या डोळ्याचा स्पेशालिस्ट असेल, तर त्याला डाव्या डोळ्याबद्दल काहीही माहीत असणार नाही. हे थोडे अतिशयोक्त वाटत असले, तरी काही दिवसांनी प्रत्येक डोळ्याचा वेगळा स्पेशालिस्ट डॉक्टर आणि प्रत्येक दातासाठी वेगळा स्पेशालिस्ट डॉक्टर निर्माण होण्याचे दिवस दूर नाही. त्यामुळे अर्थातच कमाईची क्षेत्रे विस्तारली आहेत आणि ही विविधता केवळ डॉक्टरी व्यवसायात आहे असे नाही तर कोणत्याही क्षेत्रात अशीच प्रचंड विभागणी दिसून येते. साध्या संगणकामध्ये इतकी अप्लिकेशन्स असतात, की प्रत्येक अप्लिकेशनसाठी वेगळा तज्ज्ञ निर्माण होऊ शकतो आणि त्याला अगदी सहज काम मिळू शकते. फोटोग्राफीच्या व्यवसायातही अशीच विविधता आढळून येते. या सगळ्या गोष्टी शाळा-महाविद्यालयांत जाऊनच शिकाव्या लागतात असे नाही किंवा शाळा-महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर या गोष्टी शिकू नये, असेही काही नाही. तुम्ही रिकामे असाल तर काही तरी काम करा, प्रत्येक काम तुमच्या क्षमतेत, अनुभवात मोठी भर घालणारे असते आणि भविष्यात ते तुमच्या खूप उपयोगी पडते. साधी भेळेची, वडापावची गाडी लावली तरी चांगली कमाई होते, रस्त्याच्या कडेला ज्यूसची गाडी लावली तरी हजार-पाचशे दिवसाला तुम्ही कमावू शकता आणि हे काम करताना व्यावसायिक चढ-उताराचा येणारा अनुभव तुमच्या पुढील आयुष्यात खूपच कामी येऊ शकतो. आजकाल छोट्या पडद्यावर अनेक प्रकारचे टॅलेण्ट हंट शो सुरू असतात. नृत्य, अभिनय, वादन, गायन अशा अनेक प्रकारांत कितीतरी गुणवान कलाकार या कार्यक्रमांतून जगासमोर येत आहेत. त्यांच्यातील हे कलागुणच त्यांच्या भावी आयुष्याचा आधार ठरणार आहेत. सांगायचे तात्पर्य हेच की मिळेल ती संधी स्वीकारणे, संधी मिळत नसेल तर मिळविण्याचा प्रयत्न करणे, नुसते बसून राहाण्यापेक्षा काही तरी काम करणे आणि त्या कामातून नव्या संधी शोधणे आणि जेव्हा कुठलेच काम नसेल तेव्हा काहीतरी नवे शिकणे, हा बेरोजगारीवरचा एक रामबाण उपाय ठरू शकतो.

  आपल्याकडे नेमके काय झाले आहे की पालक चाकोरीबद्ध विचारातून बाहेर पडायला तयार नाहीत. बारावी झाली की मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळविण्याचा प्रयत्न करायचा आणि तो साध्य झाला नाही तर बीए, बिकॉम, बिएस्सीला प्रवेश घ्यायचा, कुठली तरी पदवी पदरात पडली की कुठेतरी नोकरीसाठी प्रयत्न करायचा, मनासारखी नोकरी मिळाली नाही तर कुंठत कुंठत आयुष्य जगायचे, या मानसिकतेतून आता पालकांनी आणि पाल्यांनीही बाहेर पडायला हवे. उच्च शिक्षणाच्या संदर्भात आपण वर उल्लेख केलेल्या चार-पाच पदव्यांच्या पलीकडे विचारच करत नाही. खरे तर इतक्या विविध प्रकारच्या शाखा, उपशाखा उच्च शिक्षणासाठी उपलब्ध आहेत की त्यातून तुम्हाला तुमच्या आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी तर मिळेलच शिवाय चांगली कमाईदेखील तुम्ही करू शकाल, परंतु त्यासाठी झापडबंद विचारातून बाहेर पडायला हवे आणि ही खूणगाठ मनाशी बांधायला हवी, की कोणतेही काम हलक्या दर्जाचे नसते आणि कोणतीही कमाई कधी कमी नसते. सुरुवात नेहमी छोट्या गोष्टीपासूनच होते, परंतु जिद्द, कष्ट करायची तयारी आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्याला नेमक्या कोणत्या क्षेत्रात गती आहे, आवड आहे हे ओळखून त्या क्षेत्राशी संबंधित ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न या थोडक्या भांडवलावरच तुमच्या यशस्वी आयुष्याची इमारत उभी राहू शकते. जिथे आधीपासूनच खूप गर्दी आहे तिथे जाऊन गर्दी अधिक वाढविण्यापेक्षा नव्या खिडक्या शोधा, नवे झरोके शोधा, थोडे आजूबाजूला पाहा आणि सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे नोकरी म्हणजे सुखी आयुष्याची हमी या मानसिकतेतून बाहेर पडा. कामे भरपूर आहेत, कमाईची संधी भरपूर आहे, गरज आहे ती फक्त उघड्या डोळ्यांनी पाहायची!

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017