प्रहार, रविवार, दि. 15 मार्च 2015 इतर खेळांना सापत्न वागणूक का?

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

  रविवार, दि. 15 मार्च 2015

इतर खेळांना सापत्न वागणूक का?


भारतात केवळ एकाच खेळाला राजमान्यता, लोकमान्यता आणि मीडियामान्यता लाभली आहे आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट, इतर कोणत्याही खेळात भारतीय खेळाडूंनी कितीही देदिप्यमान कामगिरी केली, तरी त्याची साधी दखलही घेतली जात नाही. वास्तविक भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, परंतु या राष्ट्रीय खेळाची भारतात पार दयनिय अवस्था झालेली आहे. भारतात ठिकठिकाणी, अगदी खेड्यापाड्यात क्रिकेटसाठी मैदाने उपलब्ध असतात, परंतु इतर खेळांसाठी कुठलीही सुविधा नसते. बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे काय खेळ नव्हेत का? परंतु या खेळांसाठी साध्या प्राथमिक स्तरावरच्या सुविधादेखील उपलब्ध नसतात.

काही दिवसांपूर्वी एक छायाचित्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. त्या छायाचित्रात कबड्डीचा विश्वचषक जिंकलेल्या महिला खेळाडू भारतात परतल्यावर विमानतळाबाहेर हातात तो विश्वचषक घेऊन टॅक्सीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दाखविण्यात आल्या होत्या. हे छायाचित्र खूप बोलके होते. विश्वचषक विजेत्या त्या खेळाडूंच्या स्वागताला विमानतळावर गर्दी तर नव्हतीच, शिवाय त्यांना आपल्या गंतव्यस्थानी पोहचविण्यासाठी कबड्डी महासंघाने कोणतीही व्यवस्थादेखील केलेली नव्हती. क्रिकेटच्या बाबतीत असे झाले असते का? उद्या जर भारतीय खेळाडू विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकून परतले, तर त्यांच्या स्वागताला विमानतळावर अलोट गर्दी होईल, त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या पुरस्कारांचा वर्षाव होईल, सजविलेल्या बसेसमधून त्यांची भव्य मिरवणूक काढली जाईल आणि पुढचा किमान महिनाभर मीडियामध्ये केवळ त्यांच्याच आरत्या ओवळल्या जातील.
  भारतात केवळ एकाच खेळाला राजमान्यता, लोकमान्यता आणि मीडियामान्यता लाभली आहे आणि तो खेळ म्हणजे क्रिकेट, इतर कोणत्याही खेळात भारतीय खेळाडूंनी कितीही देदिप्यमान कामगिरी केली, तरी त्याची साधी दखलही घेतली जात नाही. वास्तविक भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे, परंतु या राष्ट्रीय खेळाची भारतात पार दयनिय अवस्था झालेली आहे. भारतात ठिकठिकाणी, अगदी खेड्यापाड्यात क्रिकेटसाठी मैदाने उपलब्ध असतात, परंतु इतर खेळांसाठी कुठलीही सुविधा नसते. बॅडमिंटन, हॉकी, फुटबॉल, कबड्डी, खो-खो हे काय खेळ नव्हेत का? परंतु या खेळांसाठी साध्या प्राथमिक स्तरावरच्या सुविधादेखील उपलब्ध नसतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीमध्ये आपली कामगिरी फारशी चांगली होत नाही, याचे कारण आंतरराष्ट्रीय हॉकी कृत्रिम हिरवळ अर्थात `अॅस्ट्रो टर्फ'वर खेळली जाते. आपल्याकडे महानगरातील दोन-चार मैदानात असलेले `अॅस्ट्रो टर्फ' वगळले तर इतर कोणत्याही शहरात तशी व्यवस्था नाही. आपली मुले साध्याच मातीच्या मैदानात सराव करतात आणि मग राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळताना त्यांना `अॅस्ट्रो टर्फ'वर अचानक खेळावे लागते आणि तिथे त्यांच्या उणीवा उघड्या पडतात. अशा परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किमान एक `अॅस्ट्रो टर्फ' निर्माण करणे फार अवघड आहे का? अवघड निश्चितच आहे, कारण बाकी खेळांसाठी मैदानच उपलब्ध नाही. सगळी मैदाने क्रिकेट संघटनांनी काबिज करून ठेवली आहेत.  नागपुरात आधी व्हीसीएचे एक स्टेडियम होते, आता जामठ्याला दुसरे अत्याधुनिक स्टेडियम उभे करण्यात आले आहे, गरज भासल्यास तिसरेही स्टेडियम उभे होईल; परंतु हॉकी, फुटबॉलसाठी मात्र मैदाने नाहीत. क्रिकेटमध्ये पैशाची जितकी उलाढाल होते त्याच्या एक शतांश उलाढाल इतर खेळांसाठी झाली, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले खेळाडू भारताची शान वाढवू शकतात, परंतु त्यांना प्राथमिक सुविधा तर मिळायला हव्या.
  भारतात क्रिकेटचे हे स्तोम माजविण्याचे काम मीडियाने किंवा मीडियाला हाताशी धरून या खेळाच्या माध्यमातून हजारो कोटींचा जुगार खेळणाऱ्या बड्या धेंडांनी केले आहे. ही बाब आता लपून राहिलेली नाही, की हा खेळ जुगाऱ्यांच्या हातात गेला आहे. कुणी जिंकावे, कुणी हरावे, कुणी किती धावा काढाव्या हे बाहेर बसलेले सट्टेबाज ठरवितात आणि त्यांच्या इशाऱ्यावर मैदानातील घडामोडी घडतात.
 सांगायचे तात्पर्य हा खेळ आता खेळ राहिलाच नाही, तो एक जुगार झाला आहे आणि भारतात जुगारावर बंदी आहे. त्यामुळे या खेळावरही बंदी यायला हवी. सध्या विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या देशांचा विचार केला, तर सर्वाधिक दरडोई उत्पन्न असलेला देश संयुक्त अरब अमिरात आहे. त्या देशाचे दरडोई उत्पन्न जवळपास 65 हजार रुपये आहे आणि भारताचे दरडोई उत्पन्न 5700 रुपये आहे. भारतापेक्षा कमी दरडोई उत्पन्न केवळ पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानचे आहे. श्रीलंकेचेही दरडोई उत्पन्न भारताच्या दुप्पट आहे, परंतु भारतीय क्रिकेट महामंडळाच्या उत्पन्नाचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, युएई, न्युझीलंड या सगळ्या पुढारलेल्या देशांच्या मंडळांना एकाच बैठकीत विकत घेण्याइतकी श्रीमंती भारतीय क्रिकेट महामंडळाकडे आहे. हा इतका पैसा आला कुठून, याचा विचार केला तर लोकसंख्येचे गणित समजावून घ्यावे लागेल. सध्या विश्वचषक स्पर्धेत 14 संघ सहभागी झाले आहेत. त्यापैकी भारत वगळता उर्वरित तेरा देशांची लोकसंख्या एकत्रित केली तरी एकट्या भारताची लोकसंख्या त्यांच्या तिप्पट अधिक असल्याचे दिसून येते. क्रिकेटच्या नशेत धुंद असलेले इतके प्रचंड ग्राहक असल्यावर क्रिकेटचा जुगार मांडणाऱ्या दुकानदाराकडे प्रचंड संपत्ती असणे स्वाभाविकच आहे. हे जुगाराचे दुकान असेच चालू राहावे म्हणून अनेक स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जातात. सचिन तेंडुलकरला काहीही गरज आणि तशी योग्यता नसताना दिलेले `भारतरत्न' हा अशाच प्रयत्नांचा एक भाग होता. भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार, हॉकीचा जादुगार ध्यानचंद कधीच `भारतरत्न' होऊ शकला नाही, पाच वेळा विश्वविजेतेपदावर आपली मोहोर उमटविणारा विश्वनाथन आनंदला कधी ते भाग्य लाभले नाही, मिल्खासिंग अजूनही प्रतीक्षेत आहे, या लोकांच्या कर्तृत्वाची दखल योग्य प्रकारे घेण्यात आली नाही कारण ते ज्या खेळांचे प्रतिनिधीत्व करतात त्या खेळामध्ये जुगाराला वाव नाही किंवा ते खेळ लोकप्रिय नाहीत. अर्थात कोणता खेळ लोकप्रिय करायचा आणि कोणता नाही, हेदेखील सट्टेबाजच ठरवितात. हेच लोक मीडियाला हाताशी धरून एखाद्या खेळाची लोकप्रियता वाढवितात किंवा एखाद्या खेळाची उपेक्षा करतात.

 विश्वचषक स्पर्धा संपल्यानंतर लगेच भारतात `आयपीएल'ची सर्कस सुरू होईल आणि पुन्हा करोडो लोक क्रिकेटच्या धुंदीत बेहोश होतील. क्रिकेटच्या धर्तीवरच फुटबॉल, हॉकी, कबड्डी आणि बॅडमिंटनच्याही `आयपीएल' स्पर्धा झाल्या, परंतु त्या कधी सुरू झाल्या आणि कधी संपल्या हे कुणालाच कळले नाही. क्रिकेटला स्पर्धा निर्माण करण्याचा एक केविलवाणा प्रयत्न या इतर खेळांनी करून पाहिला, परंतु तो साफ फसला कारण सध्या तरी जुगारी धेंडांचे प्राधान्य क्रिकेटला आहे. उद्या अन्य एखाद्या खेळात त्यांना रूची निर्माण झाली किंवा अधिक पैसा मिळण्याची शाश्वती वाटली तर अगदी रातोरात त्या खेळाची लोकप्रियता वाढू शकते आणि क्रिकेट बाजूला फेकल्या जाऊ शकते. शेवटी एखाद्या खेळाची लोकप्रियता वाढविण्याचे आणि ती टिकवून ठेवण्याचे काम प्रभावीरित्या मीडियाच करीत असते आणि मीडिया या लोकांच्याच हाती आहे, परंतु सध्या तरी तसे काही होईल असे वाटत नाही. सध्या सट्टेबाजांसाठी क्रिकेट म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे आणि ती जोपर्यंत अंडे देत आहे तोपर्यंत इतर खेळांच्या नशिबी फाटके दारिद्र्य कायम राहणार आहे. विश्वचषक जिंकून आलेल्या त्या महिला खेळाडूंना टॅक्सीचे भाडे स्वत:च्या खिशातून द्यावे लागले, की कबड्डी महासंघाने तो खर्च उचलला, याची माहिती घ्यावी लागेल. कबड्डी महासंघाने तो खर्च उचलला असेल, तर त्या खेळाडूंचे ते अहोभाग्यच म्हणावे लागेल. किमान तितके पैसे तरी महासंघाकडे आहेत, हे त्या महासंघाचेही भाग्य म्हणायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017