प्रहार, रविवार, दि. 17 मे 2015 `भूषण' महाराष्ट्राचे की......?
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 17 मे 2015
`भूषण' महाराष्ट्राचे
की......?
सरकारने हे लक्षात घ्यायला हवे, की एखाद्या व्यक्तीला जेव्हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार सरकारकडून दिला जातो तेव्हा तो सन्मान केवळ त्या व्यक्तीचा नसतो, तर त्या व्यक्तीने ज्या विचारांचा पुरस्कार केला असतो त्या विचारांनाही सरकारची मान्यता आहे, हे स्पष्ट करणारा असतो. त्यामुळे असे कोणतेही पुरस्कार देताना प्रचंड काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, ती घेतली जात नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते.
दोन-चार दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने शासकीय जाहिरातीतील नेत्यांच्या छायाचित्रांवर बंदी आणण्याचा आदेश दिला. जनतेच्या पैशाचा वापर करून आपला उदोउदो करण्याच्या सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या चमकोगिरीला त्यामुळे आळा बसेल, त्याच धर्तीवर आता सर्वोच्च न्यायालयाने अजून एका गोष्टीची दखल घेणे गरजेचे झाले आहे. सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांसाठीही सर्वोच्च न्यायालयाने पुढाकार घेऊन काही निकष निश्चित करावे आणि पुरस्कारांचा हा बाजार थांबवावा. केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे पद्म पुरस्कार, `भारत रत्न'सारखे सर्वोच्च नागरी पुरस्कार कायम वादग्रस्त ठरत आले आहेत, कारण हे पुरस्कार देताना त्या व्यक्तीची योग्यता बघण्याऐवजी त्याची निष्ठा अधिक तपासली जाते.
सरकारतर्फे विविध क्षेत्रांत पद्म पुरस्कार दिले जातात आणि प्रत्येक वेळी हे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर ज्यांना पुरस्कार मिळाले त्यापेक्षा जे पुरस्कारांपासून वंचित राहिले त्यांची योग्यता कशी अधिक आहे, याचीच चर्चा अधिक होते. जे केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या बाबतीत होते तेच राज्यांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांच्या बाबतीतही होताना दिसत आहे. महाराष्ट्र सरकारने नुकताच `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर केला. बाबासाहेब पुरंदरेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाबासाहेब पुरंदरेंचा गड-कोटांचा अभ्यास, त्याबद्दलची कळकळ, शिवाजी महाराजांविषयी त्यांनी केलेले विपुल लिखाण, `जाणता राजा' सारख्या महानाट्यातून शिवचरित्र लोकांसमोर मांडण्याचा त्यांनी केलेला स्तुत्य प्रयत्न हे सगळे मान्य असले, तरी त्यांना हा पुरस्कार याच कारणांसाठी दिला, की एक शिवचरित्राचा इतिहासकार म्हणून दिला, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात शिवप्रेमींची काही कमतरता नाही, खरे तर प्रत्येक मराठी माणूस हा जन्मताच शिवप्रेमी असतो आणि त्यांच्यापैकी अनेक जण आपापल्या परीने शिवाजी महाराजांचा इतिहास नाटक, चित्रपट, भाषण, लेखन, छायाचित्रे अशा अनेक माध्यमांतून लोकांसमोर मांडत असतात. असे करताना अनेकदा शिवाजी महाराजांविषयीच्या आत्यंतिक प्रेमापोटी, आदरापोटी आपले मत, विचार मांडताना किंवा आपण जे काही सादर करीत आहोत त्यातील रंजकता वाढविण्यासाठी काल्पनिक कथानकांचा आधार ते घेत असतात; परंतु तो खरा इतिहास नसतो आणि तसा दावादेखील हे लोक करीत नाहीत. बाबासाहेब पुरंदरेंनीही शिवचरित्र लिहिले आणि त्यांच्या या ग्रंथाची विक्रमी विक्रीदेखील झाली आहे; परंतु इथे महत्त्वाचा फरक हा आहे, की इतर अनेकांप्रमाणे बाबासाहेबांनी इतिहासात पुरावा नसलेल्या अनेक कथानकांचा या शिवचरित्रात उल्लेख तर केला, परंतु तो काल्पनिक आहे असे कधीही म्हटले नाही, उलट आपण लिहिले तेच अस्सल शिवचरित्र आहे, असा त्यांचा अप्रत्यक्ष दावा राहिला. या पृष्ठभूमीवर त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्रातील अनेक प्रसंगांची चिकित्सा होणे अपरिहार्य होते आणि अनेक शिवप्रेमींनी तशी चिकित्सा करून पुरंदरेंच्या शिवचरित्रातील अनेक प्रसंगांना, घटनांना आणि त्यात आलेल्या संवादांना कुठलाही ऐतिहासिक आधार नसल्याचे वेळोवेळी दाखवून दिले. अशा परिस्थितीत पुरंदरेंनी स्वत: समोर येऊन आपण लिहिलेल्या शिवचरित्रातील अनेक प्रसंग केवळ पुस्तकाची रंजकता वाढविण्यासाठी कल्पनेतून साकारले आहेत, त्याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही आणि या प्रसंगातील वर्णनामुळे किंवा संवादामुळे कुणाच्या भावना दुखावल्या जात असतील तर आपण त्यांची बिनशर्त माफी मागतो, पुस्तकाच्या पुढील आवृत्तीतून ते वर्णन वगळण्याची ग्वाही देतो, असे म्हणायला हवे होते; परंतु तसे काहीही झालेले नाही. पुस्तकाच्या आवृत्ती मागून आवृत्त्या निघत गेल्या आणि कुठलाही ऐतिहासिक आधार नसलेले प्रसंग, संवाद त्या पुस्तकात तसेच कायम राहिले किंवा बाबासाहेबांनी कधीही हे पुस्तक पूर्णपणे ऐतिहासिक पुराव्यावर आधारित नाही, असेही कधी म्हटले नाही, मान्य केले नाही. ही त्यांची लबाडी आहे, या पुस्तकात काही गं्रथांचा, बखरींचा हवाला देत त्यांनी अनेक असे प्रसंग घुसडले आहेत, की ज्याला इतिहासाची आपल्या सोईनुसार किंवा विचारांनुसार मोडतोड म्हटले जाऊ शकते. मुळात त्यांनी ज्या बखरींचा वगैरे आधार घेतला आहे त्या बखरींचीच सत्यता सिद्ध झालेली नाही आणि त्यातील अनेक प्रसंगांचा मागचे-पुढचे संदर्भ छाटून आपल्या विचारांशी अनुकूल तेवढाच भाग त्यांनी वापरल्याचे दिसते. या पुस्तकातील काही उल्लेख तर अत्यंत आक्षेपार्ह, जातीय विद्वेष प्रकट करणारे आणि अगदी ढळढळीत असत्य असे आहेत. त्यावर अनेकांनी सप्रमाण आक्षेप घेतल्यानंतरही ते उल्लेख किंवा प्रसंग पुस्तकातून वगळण्यात आलेले नाही. यावरून हेच दिसून येते, की बाबासाहेबांना शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासापेक्षा एका विशिष्ट चष्म्यातून पाहिला जाणारा इतिहास अधिक महत्त्वाचा वाटला आणि तोच सगळ्यांनी स्वीकारावा, असा त्यांचा प्रयत्न राहिला. आता इथे प्रश्न हा निर्माण होतो, की महाराष्ट्र सरकारने `महाराष्ट्र भूषण' पुरस्कारासाठी त्यांचे नाव निश्चित करताना त्यांच्या नेमक्या कोणत्या कार्याची दखल घेतली. वर उल्लेख केल्याप्रमाणे त्यांच्या बाबतीत गड-कोटांचा अभ्यास, `जाणता राजा' या नाटकाची निर्मिती आणि त्यांनी लिहिलेले तथाकथित शिवचरित्र या तीनच गोष्टींचा संदर्भ जोडला जातो. यापैकी नेमक्या कोणत्या कार्याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली, याचा खुलासा व्हायला हवा. गड-कोटांचा अभ्यास हा निकष असेल, तर त्यांच्या इतकाच किंवा त्यांच्यापेक्षाही अधिक वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे अनेक इतिहासतज्ज्ञ महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनी या गड-कोटांचा खराखुरा इतिहास लोकांसमोर मांडण्याचे काम केले आहे. `जाणता राजा' या नाटकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला असेल, तर त्यांच्या तुलनेत अधिक अभ्यासू, श्रेष्ठ आणि अजरामर नाट्य कलाकृती निर्माण करणारे अनेक नाट्यनिर्माते, दिग्दर्शक आजही महाराष्ट्रात आहेत. वस्तुस्थिती ही आहे, की त्यांना यासाठी हा पुरस्कार दिलेलाच नाही, हा पुरस्कार त्यांना एक शिवचरित्रकार आणि इतिहासकार म्हणून देण्यात आला आहे, सरकार तसे स्पष्टपणे मान्य करणार नाही, परंतु सत्य हेच आहे आणि त्यामुळेच पुरस्कारांच्या बाबतीत होत असलेल्या राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुरंदरेंना राज्य सरकारने `महाराष्ट्र भूषण' पुरस्कार देऊन गौरविणे याचा अर्थ त्यांनी लिहिलेल्या शिवचरित्राला राजमान्यता देणे असाच होतो आणि तो तसा असेल, तर ही एक अत्यंत दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. पुरंदरेंच्या शिवचरित्रावर अधिकृततेचा ठप्पा मारून खरे शिवचरित्र समोर येण्याचे मार्ग सरकार बंद करू पाहत आहे. खरे तर सरकारनेच पुढाकार घेऊन राज्यातील ज्येष्ठ आणि लायक इतिहासकारांची एक समिती बनवावी आणि या समितीकडे शिवाजी महाराजांचा अस्सल, सप्रमाण, ज्यातील घटना, प्रसंग आणि संवादाबद्दल वाद निर्माण होणार नाही असा इतिहास लिहिण्याची जबाबदारी द्यावी आणि तो इतिहास, ते शिवचरित्र अस्सल म्हणून त्याला राजमान्यता द्यावी, जेणेकरून अजून दोन-पाचशे वर्षांनी जेव्हा शिवाजी महाराजांचा अभ्यास केला जाईल तेव्हा त्यासाठी एक सप्रमाण शिवचरित्र उपलब्ध असेल आणि त्यातून शिवाजी महाराजांचे खरे स्वरूप त्या काळच्या लोकांना कळेल. पुरंदरेंचे शिवचरित्र अधिकृत मानल्या गेले, तर भविष्यात शिवाजी महाराजांची जी काही प्रतिमा साकारली जाईल ती एका विशिष्ट विचारधारेला पोषक आणि म्हणूनच अतिशय संकुचित स्वरूपाची, एका महानायकाला खुजे करून दाखविणारी असेल.
सरकारने इथे हे लक्षात घ्यायला हवे, की एखाद्या व्यक्तीला जेव्हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार सरकारकडून दिला जातो तेव्हा तो सन्मान केवळ त्या व्यक्तीचा नसतो, तर त्या व्यक्तीने ज्या विचारांचा पुरस्कार केला असतो त्या विचारांनाही सरकारची मान्यता आहे, हे स्पष्ट करणारा असतो. त्यामुळे असे कोणतेही पुरस्कार देताना प्रचंड काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, ती यावेळी घेतल्या गेली नाही किंवा कधीच घेतली जात नाही, असे खेदाने म्हणावेसे वाटते. त्यासाठी वर म्हटल्याप्रमाणे आता सर्वोच्च न्यायालयाने अशा पुरस्कारांच्या बाबतीतही पुढाकार घेऊन काही निकष निश्चित करणे गरजेचे झाले आहे.
Comments
Post a Comment