प्रहार, रविवार, दि. 10 मे 2015 `हिट अॅण्ड रन' नो `हेट अॅण्ड क्लोज'!

आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com

         रविवार, दि.  10 मे 2015
`हिट अॅण्ड रन' नो `हेट अॅण्ड क्लोज'!
सलमानसाठी दोन दिवस खर्ची घालणारा मीडिया शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी एका वाक्यात संपवतो, त्यावर कधी चर्चासत्रे होत नाही, सरकारला धारेवर धरले जात नाही. असे इतर अनेक विषय आहेत की ज्यांचा संबंध सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याशी असतो, परंतु मीडियात या विषयांची चर्चा कधी होत नाही. हा मीडिया सर्वसामान्यांचा नाही, तो भारताचा नाही, त्याला केवळ `इंडिया'तील चटपटीत बातम्या हव्या आहेत.

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून एकाचा बळी घेणाऱ्या आणि इतर चार-पाच लोकांना गंभीर जखमी करणाऱ्या सलमान खानला सत्र न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. खरे तर ही एक साधी घटना होती, देशभरात दररोज असे शेकडो निवाडे येतात, शेकडो गुन्हेगारांना शिक्षा होते किंवा शेकडो लोक निर्दोष सोडले जातात, न्यायदानाची ही एक कायम चालणारी प्रक्रिया आहे, परंतु सलमानच्या बाबतीत या देशातील मीडियाने आणि सोशल मीडियाने जो उतावळेपणा आणि उच्छृंखलपणा दाखविला तो खरोखरच शिसारी आणणारा होता. अगदी सकाळपासून सगळ्या वाहिन्यांचे कॅमेरे सलमानच्या घरासमोर आणि न्यायालयासमोर तैनात होते, वाहिन्यांच्या पत्रकारांना त्या दिवशी दुसरे कोणतेच काम नव्हते. सलमान घरून केव्हा निघाला, कोणत्या गाडीने निघाला, त्याच्या सोबत कोण होते, गाडी कोणती होती, सलमानच्या चेहऱ्यावर कोणते भाव होते, त्याची दाढी वाढली होती की नाही, त्याचे कुटुंबीय किती भावूक होते याचे अगदी बारीकसारीक तपशीलवार वर्णन वाहिन्यांद्वारे केले जात होते. सकाळी सलमानसोबत हा सगळा मीडियाचा ताफा न्यायालयात पोहचल्यावर तिथे काय काय होत आहे, याचे साद्यंत वर्णन वाहिन्यांच्या प्रेक्षकांना कळविले जात होते. न्यायालयाने सलमानला दोषी घोषित केल्यानंतर तर या वर्षभरातील सर्वात मोठी बातमी हाती लागल्यागत मीडियावाले चेकाळले आणि मग ते संपूर्ण प्रकरण काय आहे, कोण साक्षीदार होते, कोणते साक्षीदार फितुर झाले, आता सलमानला किती शिक्षा होईल, किती होऊ शकते किंवा कोणती शिक्षा व्हायला हवी इथपासून तर न्यायालयाच्या कठड्यात सलमान कसा उभा होता, कुठे पाहत होता, काय पुटपुटत होता, वकिलांनी कोणते प्रश्न विचारले, न्यायाधिशांनी काय विचारले, सलमान काय म्हणाला हे सगळे दळण दळले जात होते, अक्षरश: प्रत्येक सेकंदाचे वर्णन केले जात होते. अकरा वाजता न्यायालयाने सलमान या प्रकरणात दोषी असल्याचा निवाडा दिला आणि त्याला किती शिक्षा द्यावी यासाठी दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तीवाद सुरू झाला, त्यानंतर शिक्षेसंदर्भात निर्णय दुपारी एक वाजता देण्यात येईल असे न्यायालयाने सांगितल्यावर मधले दोन तास देशभरातील मीडियावर केवळ तोच एक विषय आणि त्या संदर्भातीलच चर्चा सुरू होती. दुपारी न्यायालयाने शिक्षा घोषित केल्यानंतर तर मीडिया अजूनच चेकाळला. सलमानला कोणत्या तुरूंगात ठेवणार, त्याला उच्च न्यायालयातून जामीन मिळणार की नाही, त्याच्या तुरूंगात जाण्याने बॉलिवूडचे किती कोटींचे नुकसान होऊ शकते, त्याच्यावर 2 हजार कोटींचा (20000000000)सट्टा कसा लागला आहे, तो निर्दोष सुटेल की  त्याला शिक्षा होईल, झाली तर ती किती होईल, अशाप्रकारे वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळे सट्टे कसे लागले आहेत, किती लागले आहेत इथपासून ते न्यायालयात उपस्थित असलेले त्याचे नातेवाईक कसे भावनावश झाले, त्याची बहीण किती रडली, अगदी किती मिलीलिटर आसवे गाळले इथपासूनचा तपशील मीडियात येऊ लागला. त्यानंतर दुपारी सलमानचे वकील तातडीने कसे उच्च न्यायालयात दाखल झाले आणि उच्च न्यायालयाने त्याला कसा तात्पूरता दिलासा दिला, पुढे काय होईल, उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य आहे की नाही, इतर प्रकरणात उच्च न्यायालय अशीच तत्परता दाखवते का, सलमानसाठी ज्येष्ठ वकील हरिश साळवे लगोलग दिल्लीहून मुंबईत कसे दाखल झाले आणि त्यांनी उच्च न्यायालयात कसा युक्तीवाद केला याचाही बारीकसारीक तपशील पुरविला जात होता. शेवटी सलमानला तात्पूरता जामीन मिळाल्यानंतर तो घरी कसा गेला, त्याच्यासोबत कोण होते, त्याच्या चेहऱ्यावर काय भाव होते, याची पुन्हा उजळणी करण्यात आली. त्याच्या घराबाहेर कशी लोकांची गर्दी जमली होती, हा विषय सुरू झाला. रात्री उशिरादेखील वाहिन्यांवर सलमान प्रकरणावरच चर्चा झडत होत्या, दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला कोणकोणते नट-नट्या आल्या, कोणते राजकीय नेते सलमानचे सांत्वन करायला त्याच्या घरी गेले, हेच दाखविले जात होते. हा सगळा प्रकार अत्यंत उबग आणणारा, किळसवाणा होता. जणू काही त्या दोन दिवसांपुरते देशाचे सगळे प्रश्न संपले होते. देशात दुसरी कोणती घटनाच घडली नव्हती. याआधी संजय दत्तच्या प्रकरणातही हेच पाहायला मिळाले होते.
 सलमान खानला `हिट अॅण्ड रन' प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली, या एका ओळीच्या बातमीने हे प्रकरण संपायला हवे होते. सलमान सेलिबे्रटी असल्याने फार तर त्या प्रकरणाचा इतिहास दहा मिनिटात सांगता आला असता, परंतु दिवसभर नव्हे, तर दुसऱ्या दिवशीही तेच तेच दळण दळल्या जात होते. सलमानला शिक्षा होणे ही देशातले इतर सगळेच प्रश्न गौण ठरावे इतकी मोठी घटना होती का?  या देशातले लोक जितके विचित्र आहेत तितकाच मीडियादेखील विचित्र आहे. सलमानला शिक्षा होताच सगळे बॉलिवूड हळहळले, अनेक राजकीय नेत्यांचा कंठ दाटून आला, शेकडो बावळट चाहते त्याच्या घरासमोर दु:ख व्यक्त करण्याकरता गोळा झाले, कुणी प्रार्थना करत होता तर कुणी पूजापाठ करत होता, जणू काही सलमान म्हणजे एक महान देशभक्त, थोर समाजसेवक असून त्याला खोट्या प्रकरणात अडकवून शिक्षा ठोठावण्यात आली, असाच सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा भाव होता. त्याने दारू पिऊन बेदरकारपणे गाडी चालविली आणि एका निष्पाप मजुराचा बळी घेतला, हे लक्षात घ्यायला कुणीच तयार नव्हते. सलमानप्रती सहानुभूती व्यक्त करण्याची जी काही लाट त्या दोन दिवसांत दिसून आली तीच मुळी या देशातल्या लोकांच्या विवेक आणि विचारशक्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. त्याला सहानुभूती दाखविण्यासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार आणि राज ठाकरेंसारखे अनेक नेते त्याच्या घरी गेले, यातून काय अर्थ ध्वनित होतो. सलमानला चूक नसताना शिक्षा झाली किंवा त्याच्या अपराधाच्या तुलनेत त्याला झालेली शिक्षा खूप मोठी आहे, असेच तर सगळ्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचे नाही ना? एकप्रकारचा `पब्लिक क्राय' निर्माण करून न्यायपालिकेवर दडपण आणण्याचा तर हा प्रकार नाही? सलमानला न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षा सुनावली याचा अर्थ तो गुन्हेगार आहे, एका गुन्हेगाराची अशी पाठराखण कितपत समर्थनीय ठरू शकते? मीडियादेखील सलमानला `बिच्चारा' ठरवून अप्रत्यक्षपणे त्याची पाठराखणच करीत होता. वर म्हटल्याप्रमाणे हे एका वाक्यात संपणाऱ्या बातमीचे प्रकरण होते, फार तर दहा मिनिटे त्यासाठी द्यायला हवे होते; परंतु अख्खे दोन दिवस मीडिया तोच एक विषय चघळत बसला.

  सलमानसाठी दोन दिवस खर्ची घालणारा हाच मीडिया शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी एका वाक्यात संपवतो, त्यावर कधी चर्चासत्रे होत नाही, सरकारला धारेवर धरले जात नाही. असे इतर अनेक विषय आहेत की ज्यांचा संबंध सर्वसामान्यांच्या जगण्यामरण्याशी असतो, परंतु मीडियात या विषयांची चर्चा कधी होत नाही. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, बायाबापड्यांना मैलोनगणती पायपीट करून हंडाभर पाणी मिळवावे लागत आहे, त्याची कधी बातमी होत नाही. राज्यात अतिरिक्त वीज असूनही ग्रामीण भागात भारनियमन केले जात आहे, शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरविली जात नाही, यवतमाळ जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्यावर वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचा खोटा आरोप केला आणि त्या मानसिक धक्क्यामुळे त्या शेतकऱ्याचा जीव गेला, या विषयावर रान माजविण्याची गरज कधी मीडियाला वाटली नाही. हवा, पाणी आणि अन्न पदार्थांचे प्रदूषण सामान्य लोकांच्या जीवावर उठले आहे, त्याचे महत्त्व मीडियाला नाही. केंद्र सरकार आणू पाहत असलेला भूसंपादन कायदा कसा शेतकऱ्यांचा गळा घोटणारा आहे, यावर कोणतीही चर्चा मीडियातून होताना दिसत नाही. हा मीडिया सर्वसामान्यांचा नाही, तो भारताचा नाही, त्याला केवळ `इंडिया'तील चटपटीत बातम्या हव्या आहेत, शेकडो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षा एका दारूड्या सलमानला शिक्षा होणे या मीडियासाठी मोठी बातमी ठरते. या पक्षपाती आणि विवेक गमावून बसलेल्या मीडियाचा आता लोकांनीच तिरस्कार करावा, `हिट अॅण्ड रन'ला अवास्तव महत्त्व देणाऱ्या मीडियाला लोकांनीच `हेट अॅण्ड क्लोज' म्हणावे!

Comments

Popular posts from this blog

प्रहार, रविवार, दि. 19 ऑक्टोबर 2014 “लोकप्रतिनिधींचेही सरकारी कार्यालय असावे”

प्रहार,रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2014 अनेकांची औकात आणि कुवत स्पष्ट करणारी निवडणूक!

शेतकऱ्यांप्रती कळवळा खरा असेल तर ...ही हिंमत दाखवा! प्रहार रविवार, दि. 28 मे 2017