प्रहार, रविवार, दि. 31 मे 2015 कपाळकरंटेपणा,सरकारचा आणि लोकांचाही !
आपल्या प्रतिक्रियांसाठी ९८२२५९३९२१ वर sms करा किंवा इ-मेल करा - prakash.pgp@gmail.com
रविवार, दि. 31 मे 2015
कपाळकरंटेपणा,सरकारचा आणि लोकांचाही !
सगळ्या प्राण्यांची, पक्षांची शास्त्रीय पद्धतीने वाढ करणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांच्या विक्रीतून उत्पन्न प्राप्त करणे हा विदेशात मोठा उद्योग आहे, भारतातही तो उभा होऊ शकतो आणि फायदेशीर ठरू शकतो. महत्त्वाचे म्हणजे सरकारने या उद्योगाच्या वाढीसाठी पूरक कायदे करावेत, जुन्या कायद्यात योग्य ते बदल करावेत; मात्र सध्या सरकार मेनका मावशीच्या पुतणा मावशीसारख्या दांभिक प्राणीप्रेमाने प्रभावित झालेले आहे, हे मेनका मावशीचे प्रेम थोडे बाजूला ठेवून उद्योगाचे नवे क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलायला हवी.
जागतिक पर्यावरण दिनाच्या परिषदेसाठी काही दिवसांपूर्वी पुण्याला जाण्याचा योग आला. या परिषदेत अॅग्रो टुरिझमवर चर्चा झाली. आमच्या वेदनंदिनी अॅग्रो टुरिझमला महाराष्ट्रातील उत्कृष्ट केंद्र म्हणून बक्षीसही मिळाले. सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात राहून घुसमटणाऱ्या लोकांना निसर्गाचे, पर्यावरणाचे आकर्षण असते. त्यांना झाडे, शेतात डोलणारी पिके, हिरवीगार जंगले, त्या जंगलात राहणारे बहुविध पशु-पक्षी, शेतीतील नवनवे प्रयोग, प्राणी-पक्ष्यांच्या नवनव्या विकसित जाती या सगळ्यांचे प्रचंड आकर्षण असते याच आकर्षणाचा व्यावसायिक उपयोग करून पर्यटनाला मोठी चालना मिळू शकते; परंतु आपल्याकडे अजूनही `अॅग्रो टुरिझम' हा विषय फारसा गांभीर्याने घेतला जात नाही, ही खेदाची बाब म्हणावी लागेल.
पुण्याच्या या दौऱ्यादरम्यान जवळच असलेल्या उरळी-कांचनला भेट देण्याचा योग आला. उरळी-कांचनला किशोर मेमाणेंचा फॉर्म आहे. त्यांनी तिथे दोन एकर परिसरात विविध जाती-प्रजातींचे पक्षी आणि प्राणी पाळले आहेत. अर्थात हे सगळे विदेशी पक्षी आहेत कारण भारतीय पक्षी पाळण्याला बिनडोक भारतीय कायद्यानुसार बंदी आहे. मेमाणेंच्या या फॉर्म हाऊसवर अनेक जातींचे विदेशी पोपट आहेत, कबुतरे आहेत, कोंबड्या आहेत. त्यांच्यासाठी अगदी नैसर्गिक वाटावी अशी छोटी - छोटी घरटी त्यांनी तयार केली आहेत. तिथे ते अंडी देतात, त्यातून पिले बाहेेर येतात आणि ती पिले मोठी झाल्यावर ते विकतात. या एकूण व्यवसायाचे अर्थशास्त्र त्यांनी समजावून सांगितले तेव्हा मी अगदी चाटच पडलो. हे विदेशी पक्षी विकून ते दर महिन्याला अक्षरश: लाखो रुपये कमावतात. पुणे-मुंबई जवळ असल्यामुळे अर्थातच त्यांचा व्यवसाय अधिक जोमाने होतो, कारण निसर्गाची जवळीक घालवून बसलेल्या या महानगरवासियांना अशा पक्ष्यांच्या माध्यमातून निसर्गासोबत कुठेतरी जुळल्याचे समाधान मिळते. किशोर मेमाणेंच्या या फॉर्म हाऊसमध्ये कबुतरे, ससे आणि कुत्रेही पाळले जातात. कबुतराची एक जोडी हजार रुपयांना विकली जाते. विदेशी जातींच्या कुत्र्यांपासूनही त्यांना लाखोेचे उत्पन्न मिळते. त्यांचा हा व्यवसाय पाहिल्यानंतर मला आपल्या सरकारच्या आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कपाळकरंटेपणाची जाणीव झाली. किशोरभाई पाळत असलेले सगळे पक्षी आणि प्राणी अगदी जातीवंत आहेत. जातीवंत याची व्याख्या करायची झाल्यास ज्यांचा जन्म आणि वाढ निसर्गत: झालेली आहे, ज्यांचा संकर झालेला नाही अशी करता येईल. संकरीत नसलेल्या अशा जातीवंत प्राण्यांची, पक्ष्यांची विदेशात वंशावळी ठेवली जाते, थोडक्यात सांगायचे तर त्यांचा ट्रॅकरेकार्ड ठेवला जातो आणि अशा जातीवंत प्राण्यांना विदेशात प्रचंड मागणी असते. आपल्याकडे असे काहीच होत नाही. आपण आपल्याकडची सगळी जातीवंत जनावरे आपल्या करंटेपणाने गमावून बसलो आहोत. अस्सल देशी गाई आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत. एवढेच काय तर अस्सल जातीवंत गावरान कुत्रेदेखील आता नामशेष होत आले आहेत. धनगर लोकांकडे असलेली कुत्री अजूनही आपला जातीवंतपणा टिकवून आहेत, राखणदारीसाठी ही कुत्री अतिशय चांगली समजली जातात आणि त्यांना चांगली मागणीही आहे, परंतु इतर सगळ्या भारतीय जातीवंत कुत्र्यांनी आपले मूळचे वैशिष्ट्य केव्हाच गमावले आहे. आज केवळ शौकासाठी कुत्री पाळणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे आणि हे सगळे लोक देशी कुत्र्यांऐवजी विदेशी कुत्र्यांना अधिक पसंती देताना दिसतात. विदेशात मात्र प्रत्येक जातीवंत कुत्र्याचे त्याच्या वैशिष्ट्यासह जतन केले जाते. केवळ धिप्पाड दिसणारी; तर बुल्डाग सारखी भयानक दिसणारी, तर पामेरियनसारखी देखणी कुत्रीदेखील त्यांच्या त्या वैशिष्ट्यासाठी पाळली जातात. आपल्याकडेही अशी जातीवंत कुत्री पूर्वी खूप होती, शिवाजी महाराजांचा वाघ्या कुत्रा तर अगदी इतिहासप्रसिद्ध आहे, परंतु आपण आपला करंटेपणा दाखवून दिला आणि ही सगळी जातीवंत जनावरे नष्ट झाली. ``करण'' नावाची जी हुबेहुब माणसासारखा आवाज काढते, ती पोपटाची प्रजाती आपल्याकडे खूप प्रसिद्ध आहे, परंतु सध्या हे पोपट अक्षरश: हजारोंच्या संख्येने केवळ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यांना पकडून पाळण्याची, त्यांना विकण्याची परवानगी नाही. खरे तर सरकारने आपले नियम, कायदे थोडे डोळस केले किंवा त्यांना व्यावसायिक स्वरूप दिले तर एक मोठे उद्योगक्षेत्र खासकरून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी खुले होऊ शकते. त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतो आणि शेतीला एक पर्यायी उत्पन्न देणारे क्षेत्र आकारास येऊ शकते. अर्थात त्यासाठी सरकारची इच्छाशक्ती हवी, सरकारी अधिकाऱ्यांना तसा उत्साह असायला हवा. ससे, कुत्रे, पोपट, साप आणि इतर पक्षी तसेच हरणांचेही व्यावसायिकदृष्टीने पालन करता येऊ शकते. या सगळ्याच जनावरांना, पक्ष्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना या पक्षी आणि प्राण्यांच्या पालनाची शास्त्रीय माहिती दिली, त्यांना योग्य प्रशिक्षण दिले, तर नक्कीच एक मोठा उद्योग त्यांच्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
खरे तर वन्यप्राण्यांच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी म्हणून सरकारने जे काही कायदे केले आहेत, त्या कायद्यांमध्येच मोठ्या त्रुटी आहेत. या कायद्यांमुळे जंगलांचे, जंगलांतील प्राणी-पक्ष्यांचे संवर्धन, रक्षण करणाऱ्या आदिवासींना जंगलांतून विस्थापित व्हावे लागले. त्यांना मोहफुले गोळा करता येत नाही, डिंक गोळा करता येत नाही, रोजगाराची परंपरागत साधने त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेली आणि जंगलांच्या `इको सिस्टिम'मधील एक महत्त्वाचा घटक असलेला आदिवासी समाज जंगलांतून हद्दपार झाला. त्यामुळे नुकसान केवळ आदिवासींचेच झाले नाही, तर जंगलांचेही झाले आहे. मी एका अशा व्यक्तीला पाहिले आहे, की जो कावळ्याचा हुबेहुब आवाज काढून शेकडो कावळ्यांना बोलावतो आणि कावळे येतात देखील. सांगायचे तात्पर्य जंगलांशी एकरूप झालेल्या लोकांना जंगलांपासून विस्थापित करणाऱ्या कायद्यांनी खूप मोठे नुकसान तर केले आहेच शिवाय रोजगाराचे एक मोठे क्षेत्र हिरावल्या गेले.
केवळ विविध प्राणी आणि पक्ष्यांच्या पालनातून, संवर्धनातून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे नाही, तर अगदी सापांचीही शेती केली जाऊ शकते. सापाच्या विषाला विदेशी बाजारपेठेत मोठी मागणी आहे आणि त्यातून प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळू शकते. या सगळ्या प्राण्यांची, पक्षांची शास्त्रीय पद्धतीने वाढ करणे, त्यांचे जतन करणे आणि त्यांच्या विक्रीतून उत्पन्न प्राप्त करणे हा विदेशात मोठा उद्योग आहे, भारतातही तो उभा होऊ शकतो आणि तो किती फायदेशीर ठरू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण ``उरळी कांचन'' जवळचा किशोर मेमाणेंचा फॉर्म आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी त्या फॉर्म हाऊसला भेट द्यावी, अशा प्रकारच्या उद्योगात रूची असणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांनीही त्या फॉर्म हाऊसला अवश्य भेट द्यावी, त्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे सरकारने या उद्योगाच्या वाढीसाठी पूरक कायदे करावेत, जुन्या कायद्यात योग्य ते बदल करावेत. पूर्वी आपल्याकडे शंकरपटाचे खेळ व्हायचे, त्यासाठी खिल्लारी जातीच्या बैलांचा वापर व्हायचा. शेतकरी केवळ या खेळासाठी खिल्लारी जातीचे बैल पाळायचे, त्यांची योग्य निगा राखायचे; परंतु आता शंकरपटावरच बंदी घातल्या गेली. त्याचा परिणाम म्हणून खिल्लारी जातीच्या बैलांकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष झाले आणि आता ही प्रजातीही आपला अस्सलपणा गमाविण्याच्या मार्गावर आहे.
सध्या सरकार मेनका मावशीच्या पुतणा मावशीसारख्या दांभिक प्राणीप्रेमाने प्रभावित झालेले आहे, हे मेनका मावशीचे प्रेम थोडे बाजूला ठेवून उद्योगाचे नवे क्षेत्र उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सरकारने पावले उचलायला हवी. त्यासोबतच भारतातील शिल्लक राहिलेल्या जातीवंत प्रजातींच्या संवर्धनाचे, त्यांच्या वाढीचे प्रयत्न करायला हवे.
Comments
Post a Comment