टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!

‘प्रहार’ रविवार, दि. ४  एप्रिल २०२१

टाळेबंदीचे तुणतुणे आणि भीती पसरवणे बंद करा...!  

(लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, दै.देशोन्नती तथा दै.राष्ट्रप्रकाश) 

लोकांचे मनोधैर्य कायम राखायचे असेल, तर सरकारने सकारात्मक पाऊल उचलायला हवे. अनेक आजार केवळ मानसिक दौर्बल्यातूनही बळावत असतात. सध्या तर साधा खोकला, सर्दी, ताप असलेला माणूसही कोरोनाच्या धास्तीने अर्धमेला होत आहे. लोकांच्या मनातील ही भीती काढणे गरजेचे आहे, ही भीती काढण्याऐवजी छाती दडपणारे आकडे आणि कठोर टाळेबंदीच्या धमक्या देऊन सामान्य लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरच सरकार प्रहार करीत असल्याचे दिसते.

      राज्यावर किंवा देशावर एखादे संकट कोसळले किंवा कोसळू पाहत असेल, तर राज्यकर्त्यांचे पहिले कर्तव्य राज्यातील जनतेला धीर देणे, सरकार लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याबाबत लोकांना आश्वस्त करणे हेच असते; परंतु इथे सगळे उलटेच पाहायला मिळत आहे. दर दिवशी आकडेवारीचा बागूलबुवा उभा करीत आधीच भेदरलेल्या लोकांना अधिक घाबरविण्याचे काम सरकार करीत आहे. त्यात अजून भर घालीत निर्बंध, कठोर निर्बंध, मर्यादित टाळेबंदी, कठोर टाळेबंदी असे शब्दप्रयोग राज्याचे मंत्री, मुख्यमंत्री सातत्याने वापरीत आहेत. 'भीक नको कुत्रे आवर' या प्रमाणे सामान्य लोक कोरोनापेक्षा कधीही मानगुटीवर बसू शकणार्‍या टाळेबंदीच्या धाकालाच अधिक घाबरत असल्याचे दिसते.

      या देशात, राज्यात हातावर पोट असलेल्यांची संख्या खूप प्रचंड आहे. एक दिवस काम मिळाले नाही तर दुसर्‍या दिवशी काय खायचे हा प्रश्न या लोकांसमोर आ वासून उभा असतो, त्यामुळे टाळेबंदी हा शब्द जरी कानी पडला तरी बिचार्‍यांचा जीव टांगणीला लागतो. पहिल्या टाळेबंदीच्या वेळी या लोकांचे किती प्रचंड हाल झाले, हा अनुभव अगदी ताजा असताना पुन्हा टाळेबंदीची भाषा करण्याचे धाडस सरकार करूच कसे शकते? फाळणीनंतरचे सर्वात मोठे स्थलांतर या देशाने मागच्या टाळेबंदीत अनुभवले आहे. हजारो, लाखो नव्हे, तर करोडो मजूर, कामगार मिळेल त्या वाहनाने, नाहीच मिळाले तर पैदल आपापल्या गावाकडे परत गेले, उपासमारीने मरायचेच आहे तर इथे मरण्यापेक्षा आपल्या गावात, आपल्या माणसांसोबत मरू, अशा अत्यंत तीव्र निराशावादी मानसिकतेतून हे स्थलांतर झाले होते. उद्योग, कारखाने, व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने देशाची अर्थव्यवस्था जवळपास कोलमडण्याच्या बेतात आली होती, शिवाय इतकी प्रचंड किंमत मोजून हाती काय लागले, तर शून्य.

      या कठोर टाळेबंदीने कोरोना नियंत्रणात आला असे कुठेच दिसले नाही, उलट आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. मागच्या पेक्षाही अधिक संख्येने कोरोना रुग्ण वाढत आहेत. शिवाय त्यात कोड्यात टाकणारी बाब ही आहे की महाराष्ट्र, पंजाब सारख्या पुढारलेल्या राज्यांमध्येच कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत आणि तिकडे उत्तरप्रदेश, बिहार सारख्या राज्यांत, ज्या राज्यांमध्ये साधी प्राथमिक आरोग्य सुविधादेखील कायम आजारी असते त्या राज्यांत कोरोनाची चर्चादेखील नाही. बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होऊन गेली, प्रचारसभांमध्ये मोठी गर्दी झाली, सोशल डिस्टन्सिंगची पार वाट लागली; परंतु एवढे होऊनही बिहारमध्ये कोरोनाचा फारसा उपद्रव दिसत नाही. सध्या प.बंगालमध्ये निवडणूक सुरू आहे, तिथेही लाखोंच्या प्रचारसभा होत आहेत, रोड शोमध्ये प्रचंड गर्दी होत आहे, कार्यकर्त्यांच्या झुंडीच्या झुंडी प्रचार करताना दिसत आहेत; परंतु तिथेही कोरोनाची चर्चा नाही, इकडे महाराष्ट्रात मात्र सातत्याने निर्बंध, कडक निर्बंध, लॉकडाऊन, मर्यादित लॉकडाऊनचा डोस दिला जात असूनही महाराष्ट्रात कोरोनाचा प्रचंड वेगाने प्रसार होत आहे, हे गणित समजण्यापलीकडचे आहे. कोरोनाने काही विशिष्ट राज्ये दत्तक तर घेतली नाही ना, अशी शंका आता येऊ लागली आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या इथल्या सरकारसाठी 'आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास' ठरत आहे. सरकारमध्ये सामील असलेल्या तिन्ही पक्षांची सगळी ताकद एकमेकांची उणीदुणी काढणे, टोमणे मारणे, पोलीस आणि प्रशासनातील बड्या अधिकार्‍यांचे प्रताप निस्तरणे, यातच खर्च होत असल्याचे दिसते. त्यामुळे कोरोनाला अटकाव करायचा तर काय करायचे, याचे एकच उत्तर सरकारकडे आहे आणि ते म्हणजे टाळेबंदी. आम्ही घराच्या बाहेर पडत नाही, लोकांनीही पडू नये, असाच एकूण सूर मुख्यमंत्री लावताना दिसतात. तुम्ही घरात बसून राहिल्याने तुमचे काहीच बिघडत नाही, तुम्हाला सगळे घरपोच मिळते, तुमचे पगार चालूच आहेत; परंतु सामान्य लोकांना घरी बसून पोटाची आग कशी विझवता येईल? कोरोनाचे संकट आहे हे मान्य केले तरी ते निस्तरण्यासाठी योग्य आणि तार्किक निर्णय सरकारकडून अपेक्षित आहेत; परंतु सरकारची तर्कबुद्धी, खरे तर सरकारची म्हणण्यापेक्षा सरकारने ज्या प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती सगळी सूत्रे सोपविली आहेत त्या अधिकार्‍यांची तर्कबुद्धी इतकी अचाट आहे, की अनेक शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रात्रीची संचारबंदी लागू करण्यामागे नेमके कोणते तर्क आहेत, हे ते अधिकारीच सांगू शकतील. कदाचित कोरोनाचे विषाणू निशाचर असावेत आणि रात्रीच्या वेळेस कुणी बाहेर दिसले, की त्यांची शिकार करीत असावेत किंवा दिवसा कोरोना बिचारा पोटापाण्यासाठी नोकरी करत असेल आणि म्हणून तो सायंकाळपासून हे रिकामे उद्योग करत असेल. काही शहरांत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाचपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवागनी आहे, काही ठिकाणी ती संध्याकाळी सातपर्यंत आहे. ज्या शहरात सातपर्यंत व्यवहार सुरू असतात त्या शहरांमध्ये कोरोनाचे विषाणू सातनंतर सक्रिय होत असतील आणि काही शहरांमध्ये कदाचित ते ओव्हरटाईम करीत असल्यामुळे संध्याकाळी पाच वाजताच बाहेर निघत असतील. सरकारने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍याला निर्बंधाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार देऊन टाकले आहेत. ही मंडळी मग आपले प्रशासकीय कौशल्य(?) दाखविण्यासाठी असले चित्रविचित्र प्रयोग करीत आहेत, त्यामागे कुठलेही लॉजिक नाही. साधी गोष्ट आहे, एखाद्या दुकानात दिवसभरात सरासरी शंभर ग्राहक येत असतील, तर एरवी दहा-बारा तासांमध्ये येणारे हे ग्राहक दुकान पाच तास उघडे राहत असेल तर तेवढ्याच वेळात येतील, म्हणजे निर्बंधामुळे गर्दी अधिक होण्याचाच धोका आहे. दुकानाची वेळ अर्धी केली म्हणून ग्राहकांची संख्या अर्धी होत नाही, फक्त दुकानातली गर्दी तेवढी वाढेल.

      मुळात लॉकडाऊन, निर्बंध वगैरे गोष्टींनी काहीही साध्य होत नाही आणि हे आधीदेखील सिद्ध झालेले आहे. कोरोनावर मात करायची असेल तर केवळ एकच उपाय आहे आणि तो म्हणजे इतर राज्यांत जशी टेस्टिंग बंद आहे, तशी महाराष्ट्रातसुद्धा टेस्टिंग बंद करणे म्हणजे 'ना रहेगा बास ना बजेगी बांसुरी'. सरकारने लॉकडाऊनचा धाक लोकांना दाखविण्याऐवजी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय करावे या बाबत व्यापक प्रचार मोहीम हाती घ्यावी. राज्यात सेंद्रिय शेतीचा प्रचार आणि प्रसार करणे याबाबत मागे बैठक झाली होती; मात्र त्यावर अजून काहीच ठोस असा निर्णय घेण्यात आलेला नाही. रोगप्रतिकार शक्ती वाढली की कोरोनाचे संकट हळूहळू कमी होत जाईल. कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी टाळेबंदी हा उपाय नाही, टाळेबंदीने कोरोनाचे काहीच बिघडत नाही, उलट सामान्य लोकांचे जगणे मात्र दुष्कर होते, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकारने योग्य दिशेने आणि योग्य गतीने प्रयत्न करणे गरजेचे आहे.

      भारतामध्ये कोरोना लसींचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे; मात्र त्याबाबत वेगवेगळे मत प्रवाह आहेत. लसीकरण झाल्यानंतरसुद्धा कोरोना होणारच नाही याची कुणीच हमी घेत नाही. सोबतच कोरोना बाधितांची आकडेवारी देणे सरकारने थांबवावे, त्यामुळे विनाकारण दहशत निर्माण होत आहे. दररोज फक्त कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सरकारने जाहीर करावी. लोकांचे मनोधैर्य कायम राखायचे असेल, तर सरकारने हे सकारात्मक पाऊल उचलायला हवे. अनेक आजार केवळ मानसिक दौर्बल्यातूनही बळावत असतात. सध्या तर साधा खोकला, सर्दी, ताप असलेला माणूसही कोरोनाच्या धास्तीने अर्धमेला होत आहे. लोकांच्या मनातील ही भीती काढणे गरजेचे आहे, ही भीती काढण्याऐवजी छाती दडपणारे आकडे आणि कठोर टाळेबंदीच्या धमक्या देऊन सामान्य लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवरच सरकार प्रहार करीत असल्याचे दिसते. तात्पर्य सरकारने हे टाळेबंदीचे तुणतुणे वाजविणे आता थांबवावे, टाळेबंदीने काहीही साध्य होत नाही हे मान्य करावे आणि रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काय काय करावे यावर जास्त भर द्यावा. हँड सॅनिटाइझर ऐवजी निलगिरी तेल हे कितीतरी उपयोगी आहे त्याचा प्रचार- प्रसार करावा, आजीबाईच्या बटव्यातील उपायांचा वापर वाढवा, काढे योग्य पद्धतीने घेतले जावेत यासाठी प्रचार करावा, आयुर्वेद आणि योगा वर्ग वाढविण्यासाठी काही अनुदान द्यावे, सायकल चालवणे किती आरोग्यदायी आहे याचा प्रचार करावा, गिअरच्या सायकलीवरील कर बंद करून वरून त्यावर अनुदान द्यावे. दिल्ली सरकारचे अनुकरण करावे, शाळा, मोहल्यातील सुविधा, क्लिनिक, वीज, पाणी, या मूलभूत गोष्टींrवर भर द्यावा. शेतकरी आता सेंद्रिय भाजीपाला व फळे मोठ्या प्रमाणावर पिकवत आहेत, ती लोकांपर्यंत कशी पोहचतील याकरिता प्रयत्न करावेत. त्यामुळे दोन बाबी घडतील, एक म्हणजे शेतकर्‍यांना आर्थिक बळ मिळेल आणि दुसरे म्हणजे लोकांना विषमुक्त फळे व भाजीपाला मिळाल्याने त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढेल.

      ही विषमुक्त फळे व भाजीपाला विदेशात पाठविण्याकरिता जर वाहतूक आणि पॅकिंगकरिता मदत केली, तर शेतकरी समृद्ध होईल.

      कोरोनाच्या केवळ चर्चा आणि चर्चा करून काहीच साध्य होत नाही. भय केवळ वाढत राहणार आहे. कोरोना काही नवीन नाही, तर तो पूर्वीही होता आणि पुढेही राहणार आहे त्यामुळे त्याच्यासोबत दोन हात करत कसे जगायचे याचे प्रशिक्षण द्या. कोरोनाचा इलाज हा अ‍ॅलोपॅथी नाही तर आयुष मध्ये आहे म्हणून आयुष संदर्भात महाराष्ट्र केरळप्रमाणे कसे पुढे जाईल याकरिता प्रयत्न केला पाहिजे.

      आयुष आणि त्यातही आयुर्वेदातच कोरोना नियंत्रणाची क्षमता आहे हे सिध्द झाले आहे. आयुर्वेदिक पद्धतीने लाखो रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत आणि त्यांचा मृत्युदर शून्य आहे. डब्ल्यूएचओच्या प्रोटोकॉलमध्येच उणीवा आहेत आणि अ‍ॅलोपॅथीच्या औषधोपचारामुळेच रुग्ण दगावत आहेत हेसुद्धा सिद्ध झाले आहे.

      जागतिक पातळीवर कोरोनाबाधितांचा मृत्युदर पाहता विकसित देशांमध्ये गरीब देशांच्या तुलनेत मृत्यू अधिक होत आहेत. भारत प्रगतिशील देश असून कोरोना मृत्युसंख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे हा दोष कोरोनाचा आहे की, उपचारांचा आहे?

        एक 'मादागास्कर' नावाचा गरीब देश आहे. तेथे कोरोनावर स्थानिक जडी-बुटीने उपचार करण्यात येत आहेत. तेथे कोरोनामुळे एकही मृत्यू नाही असे तो देश सांगतो. जगातील सर्वांत विकसित देश अमेरिका मानला जातो. तेथे डब्ल्यूएचओचे दिशानिर्देश व प्रोटोकॉलचे पूर्ण पालन केले जात आहे, अद्ययावत हॉस्पिटल्स आहेत, तरीही तेथे जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांचे मृत्यू होत आहेत.

        याप्रमाणेच भारतातही डब्ल्यूएचओच्या दिशानिर्देश आणि प्रोटोकॉलचे व्यवस्थित पालन करण्यात येत आहे; परंतु एवढी भीती निर्माण केली जात आहे की, लोकं पॉझिटिव्ह रिपोर्ट ऐकूनच मृत्यूच्या दारात पोहोचत आहेत. असे का होत आहे, हा संशोधनाचा विषय आहे. या संदर्भात पुढील एक उदाहरण पुरेसे आहे. साप चावून मृत्यू पावलेल्या १०० लोकांचे पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पाहिले तेव्हा असे लक्षात आले की त्यापैकी ८० लोकांच्या शरीरात सापाचे विष नव्हतेच. मग हे लोक मृत्यू पावले कसे, तर कारण स्पष्ट आहे की केवळ साप चावला या भीतीनेच ते मरण पावले.     

        युरोपमधील लहानसा देश 'बेलारूस' आहे. तेथे कोरोनाच्या बातम्या दाखविण्यावर प्रतिबंध लावण्यात आला आहे. तेथील राष्ट्रपतीचे म्हणणे आहे की, बातम्या दाखविल्याने लोकांमध्ये भीती पसरू शकते. तेव्हा गोंधळ कोरोनात की, डब्ल्यूएचओच्या प्रोटोकॉलमध्ये आहे हे पाहणे जरुरी आहे.

        भारतातही काही समाजसेवक आयुर्वेद वा नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने कोरोनावर नि:शुल्क उपचार करीत आहेत. त्यामध्ये कित्येक गंभीर रुग्णांवर उपचारानंतर मृत्यू झालेला नाही. आम्हाला त्यावर विश्वास करावाच लागेल. भाभा अणुऊर्जा केंद्राच्या सेवानिवृत्त वैज्ञानिक डॉ. अकल्पिता परांजपे (मो. नं.: ९३२२२६४८१५) यांनी आजपर्यंत शेकडो कोरोना रुग्णांवर आयुर्वेद तथा होमिओपॅथी औषधींच्या मदतीने नि:शुल्क उपचार केला आहे. त्यात एकही मृत्यू झालेला नाही. डॉ. विश्वरूप राय चौधरी यांची नाईस कोरोना हेल्पलाइन (८५८७० ५९१६९ biswaroop.com/nice) आहे. त्यांनी आतापर्यंत ६० हजारांपेक्षा अधिक रुग्णांवर नैसर्गिक चिकित्सा पद्धतीने नि:शुल्क उपचार केले आहेत. त्यात कित्येक गंभीर रुग्ण बरे झाले असून एकही मृत्यू झालेला नाही. आम्हाला कोरोनाची लक्षणे आढळल्यावर त्यांच्याशी संपर्क केला पाहिजे. सर्वांनी कोरोनाचा धोका आणि मृत्यूची भीती मनातून काढून टाकली पाहिजे. हे सर्वात महत्त्वाचे आहे.

-----------------------------

फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी: PraharbyPrakashPohare आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी

Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.

 प्रतिक्रियांकरिता:  Email: pohareofdeshonnati@gmail.com

Mobile No +९१-९८२२५९३९२१

 प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!

कृषिविषयक ब्रिटिशकालीन कायदे कृषकांसाठी घातक!