‘कोरोना आवडतो कुणाला?'

 ‘प्रहार’ रविवार, दि. ३० मे २०२१

‘कोरोना आवडतो कुणाला?'

(लेखक : प्रकाश पोहरे, मुख्य संपादक, ‘दै.देशोन्नती’)

'इनफ इज इनफ'अशी इंग्रजीत एक म्हण आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी लोकांना सांगू इच्छितो की जगात आजूबाजूला काय चाललेय ते बघा आणि त्या दृष्टीकोनातून वागायला लागा, अन्यथा तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही...


     देशात जगभरात कोरोनाच्या नावाखाली नंगानाच सुरू आहे, अनेक देश, कुटुंब, उद्योग उद्ध्वस्त झालेत; मात्र या काळात

     पंतप्रधानांनी संपूर्ण पगार घेतला.

     खासदारांनी संपूर्ण पगार घेतला.

     मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण पगार घेतला.

     मंत्र्यांनी संपूर्ण पगार घेतला.

     आमदारांनी संपूर्ण पगार घेतला.

     महापौरांनी संपूर्ण पगार घेतला.

     नगराध्यक्षांनी संपूर्ण पगार घेतला.

     नगरसेवकांनी संपूर्ण पगार घेतला.

     सरपंचांनी संपूर्ण मानधन घेतले.

     ग्रामसेवकांनी संपूर्ण पगार घेतला.

     एवढेच नाही तर केंद्रीय आणि राज्य सरकारी कर्मचारी, झेड पी, नगरपालिका कर्मचारी आणि सर्व सरकारी शिक्षक, प्राध्यापक, कोर्टातील कर्मचारी यांनीसुद्धा घरी बसून फुकटचा संपूर्ण पगार घेतला, एवढेच नव्हे, तर भत्ते व इतर सर्व सोयी- सवलतीसुद्धा घेतल्यात.

     बँकांनी व्याज, दंड व्याज, चेक बाऊंस चार्जेस सर्व लावून हप्ते वसुली केली. वीज वितरण कंपन्यांनी व्याजासकट जास्त दराने वीज वसुली केली. मोठ्या कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे भाव वाढवून दरवाढ केली. काहींची चांदी होते आणि या मेडिकल, लॅब, डॉक्टर, हॉस्पिटल यांचे तर सोने झाले. काही मोजक्या डॉक्टरांनी लाखा लाखात बिलेसुद्धा घेतली आणि एका पवित्र क्षेत्राला काळिमा फासला.

     पेट्रोल, डिझेल दीडपट झाले; पण भरडला गेला सर्वसामान्य माणूस, शेतकरी, छोटा व्यापारी, ज्याचा खरोखर धंदा बंद होता. या बंद उत्पन्नाची त्याला कोणतीच भरपाई नाही. सरकारला भरपाई देता येत नाही; पण पगार मात्र सगळे दाबून घेतात. फक्त सामान्य माणसाची पिळवणूक झाली. तरीही तोंड दाबून पोलिसांच्या काठ्या खात खात भरडला गेला सर्वसामान्य माणूस.

     सगळे कर व्याज, दंडा सकट भरायचे सर्वसामान्यांनी आणि या कोरोनाशी लढायचे; ते पण फक्त उद्योजकांनी, शेतकर्‍यांनी, सर्वसामांन्यानीच.

     त्यामुळे कोरोना वाढतोय कुणामुळे आणि आवडतो कोणाला?

     याचे उत्तर सोपे आहे.

१) शाळा, कॉलेज, कोर्ट बंद, पगार सुरू; मात्र नोकरीवर जाण्याची गरज नसलेल्या शिक्षक, प्राध्यापक, न्यायालयातील कर्मचार्‍यांना,

२) जनतेच्या समस्यांकडे डोळेझाक करीत कोठलेही आश्वासन पूर्ण न केलेल्या अपयशाचे धनी, समाजहितभान हरविलेल्या राजकारण्यांना,

३) कोरोना उपचाराच्या नावाखाली चुकीची औषधे देऊन लाखोंची लूट करणारी खासगी रुग्णालये जी पैशाकरिता मृतदेहसुद्धा देण्यास अडथळा करीत लुटारूपणाचे व्रत स्वीकारलेल्यांना,

४) भरमसाठ औषधविक्रीतून तट्ट खिसे फुगलेल्या आणि कधीच येवढी कमाई न झालेल्यांना,

५) कोरोनाच्या नावाने व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी, मजूर, फेरीवाले, विद्यार्थी, नागरिकांकरिता घराचा कोंडवाडा करणार्‍या नियोजकांना,

६) सामान्यांना छळण्याचा अमर्याद अधिकार मिळालेल्या पोलिसांना,

७) बेलगामपणे वागण्याचा परवाना मिळालेल्या महसूल विभागातील अधिकार्‍यांना.

           समाजातील या विविध घटकांनी सर्दी पडशासारख्या या सामान्य आजाराबाबत दूरचित्रवाहिन्यांनी पसरविलेल्या भीतीचा अगडबंब फायदा घेत देशाचाच नव्हे, तर जगाचा सत्यानाश केलाय. त्याची भीती पसरविण्यासाठी आणि ती कायम ठेवण्यासाठी अनेक निष्पाप माणसांचे हॉस्पिटलमध्ये चुकीचे उपचार देऊन पैसेही लुटले आणि जीवही घेतले.

           'असूनी खास मालक घरचा, म्हणती चोर त्याला, परवशता पाश दैवी ज्याच्या गळा लागला', असे एक नाट्यगीत आहे. कोरोनाची भीती दाखवीत दुकानाचा, उद्योगाचा मालक असलेल्याच्या गळ्याभोवती परवशतेचा पाश घट्ट आवळला गेला आहे. बळीराजा असा ज्या शेतकर्‍याचा उल्लेख होतो, त्याच राजा म्हणून एकीकडे गौरव केलेल्याचाच बळी दिला गेला आहे.

           'सावध ऐका पुढल्या हाका', असे सांगायची वेळ आली आहे. तुमचे हात बांधले जात आहेत. पीपीई किटमधील भुते तुमच्या भोवती काल्पनिक आजाराच्या नावाने कधी वावरतील, याची खात्री राहिलेली नाही. रोज नवे आदेश, नवे प्रोटोकॉल, रोज नवे जीवघेणे उपचार, आधी कोरोना मग हायपरकापनिया म्हणजे ऑक्सिजन कमी पडतोय त्यानंतर म्युकरमायकोसिस म्हणजे काळी फंगस, अशा रोज नवीन आजाराची भीती, याच्या सावटात मरण्याची भीती आणि जगण्याची प्रिती, या चिमटीत अडकलेला घरोघरचा माणूस जीव मुठीत घेऊन वावरतो आहे आणि ५जी चे टेस्टिंग गुपचूप सुरू ठेवून कोरोनाच्या नावाखाली तथ्य दडपून टाकल्या जात आहे.

           भीतीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू, पेट्रोल, डिझेल वर २६५टक्के इतका भरमसाठ कर वाढवून सरकारी महसुलात वाढ केल्या गेली आहे. 'न्यू वर्ड ऑर्डरची' अंमलबजावणी सुरू झाली आहे. पंतप्रधानांनी संसदेत त्याची घोषणा करून एकदाची त्यासंदर्भातील कुजबुज संपविली आहे.

           माणसाची प्रतिकार शक्ती न वाढविता, कोरोनावरील प्रतिजैविकांसह स्टिरॉईड औषधाचा बेसुमार वापर केल्यामुळे कोरोनाचा व्हायरस अधिक सक्षम होत आहे आणि शरिरातील सक्षम अवयव निकामी केले जात आहेत किंवा गायब केले जात आहेत.

           पहिली लाट, दुसरी लाट, कोरोना गेल्यानंतरचे दुष्परिणाम, टेस्टिंग, अनिवार्य लसीकरण आणि त्यानंतरचे दुष्परिणाम आणि मृत्यू अशा चढत्या श्रेणीचा दहशतनामा नागरिकांच्या मनात घट्ट बसविणे सुरू आहे. त्यातून नागरिकांनी बाहेर पडूच नये, याची काळजी गोदी मीडियाच्या माध्यमातून कटाक्षाने घेतली जात आहे.

           पगारदारांचे पगार सुरू, शिवार ओस, दुकाने बंद, व्यवसाय ठप्प, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा, अच्छे दिनचे स्वप्न दाखवत बर्‍या दिवसाचेही केव्हाच तीनतेरा वाजविल्यानंतर सर्वच अर्थव्यवस्था संकटात आणून सामान्य माणसाला जगणेच कठीण वाटू लागावे, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

           तुमचा उद्योग, दुकाने कधी सुरू करायची, कधी बंद करायची, याचा हुकूम दुसरा देतो, याला पारतंत्र्य नाही तर काय म्हणायचे, त्यांनी म्हटले तेव्हा तुमची दुकाने सुरू, त्यांनी म्हटले तेव्हा बंद, आवक बंद, जावक सुरू, मग हाच नियम नोकरदारांना का नाही?

           भरमसाठ शुल्क आकारून खासगी दवाखाने चालविणार्‍या आणि नियमबाह्यपणे आकारलेल्या भरमसाठ शुल्काची रक्कम देऊ न शकणार्‍या कुटुंबातील सदस्यांचा मृतदेह अडविणार्‍या माणसाच्या शरिरात वावरणार्‍या नरराक्षसांची कोरोनाने चलती केली आहे.

           पाहा काय नियोजन आहे, कोरोनाची दहशत पसरविली की बेरोजगारी, शेतमालाचे भाव, दिल्लीच्या सीमेवरील सहा महिन्यांपासूनचे शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्याच्या मागणीकरिताचे शेतकरी आंदोलन, विद्यार्थ्यांचे भवितव्य, जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव पडले असताना देशात केलेली पेट्रोल-डिझेलवर २६५टक्के कर लावून केलेली भरमसाठ दरवाढ, असे सारेच विषय कोरोनाच्या भीतीने दुय्यम करून टाकले आहेत.

           त्यामुळे कोरोना वाढवत आहेत आणि आवडत आहे, माणसा माणसात अंतर निर्माण करण्यात यश मिळविलेल्या या वर्गातील हे लोकांना, ज्या दिवशी सामान्यांना कळेल तो क्रांती दिन असेल.

           बँकेतील नोकरदार वातानुकूलित कक्षात, कर्ज मागायला गेलेला अन्नदाता उन्हात मंडपात, याचे नियोजन केलेल्यांना कोरोना आवडतो.

           कोरोनाच्या उपचाराकरिता काही खासगी रुग्णालयांतल्या डॉक्टरांनी भरमसाठ औषध लिहून द्यावे, त्यातील शिल्लक औषध पुन्हा त्यांनीच लावलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये पाठवावे, त्यांना कोरोना आवडतो. आजीबाईचा प्रभावी बटवा विस्मरणात टाकून इम्युनिटीच्या नावाने मनात येईल त्या दराने औषध व इंजेक्शन विकणार्‍यांना कोरोना आवडतो.

           तुमच्या मनोधैर्याचे, सकारात्मक विचारसरणीचे पुरते खच्चीकरण कोरोनाच्या दहशतीने केल्यानंतर आता सकारात्मक विचारसरणी ठेवण्याचा बोध देणारे वर्ग सुरू होतील.

           वर्षानुवर्षे नापिकी सहन करून पुन्हा नव्या मनोधैर्याने शेती करणार्‍या, बँकेत, बाजारपेठेत वारंवार अपमान सहन करून शेतीत राबण्याची जिद्द न सोडणार्‍या शेतकर्‍यांना हे काय सकारात्मकता शिकविणार?

           केवळ बुद्धीभ्रम पसरवून स्मृतिलोप करून बुद्धिबंद स्वामिनिष्ठ समाज उभा करणार्‍यांना कोरोना आवडतो.

           हे साधे कारस्थान नाही, म्हणून मागील १५ महिन्यांत आम्ही नागरिकांना वारंवार सावध केले आहे. अन्यायाविरुद्ध दाद मागण्याची संधीच काढून घेत मश्गुलतेत सत्तेचा स्वार्थाकरिता उपभोग घेणार्‍यांना  कोरोना आवडणार नाही तर काय?

           औषध मार्केटिंगचा भयानक विळखा पडला आहे. किराणा दुकानापेक्षा औषधाच्या दुकानात गर्दी असते.

           मंदिरांतील गर्दी, औषधाच्या दुकानांतील गर्दी, कोर्टात गर्दी, तुरुंगात गर्दी, नेत्यांच्या दरबारातील गर्दी, हे आजारी समाजव्यवस्थेचे लक्षण आहे, हे मी वारंवार सांगितले आहे.

           अच्छे दिन आले नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा! वेळेवर कर्ज मिळत नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण आहे कोरोनाचा बागुलबुवा!, पेट्रोल, डिझेल, खतांची भाव वाढ झाली, बियाण्यांचे भाव वाढले, शेतमालाला भाव मिळत नाही, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा!

           औषधांचे भाव वाढले, इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा! कोरोनाने नोकरीची दालने बंद केली, पोटाचे प्रश्न उभे केले, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण आहे कोरोनाचा बागुलबुवा. शेतमालाचे भाव पडलेले मात्र खाद्यतेलाचे भाव कल्पनेच्या बाहेर वाढले, तुम्ही दाद मागू शकता? उत्तर आहे नाही, कारण कोरोनाचा बागुलबुवा!

           समाजाच्या लुटीला कोरोनाने मुक्तहस्ते परवानगी दिली. समस्यांच्या मांडणीकरिता होणार्‍या आंदोलनाचा नेत्यांच्या, राज्यकर्त्यांच्या डोक्याचा तापच कोरोनाने दूर केला. मग कोरोना कोणाला आवडेल, हे काय वेगळे सांगायचे.

           कोरोनाच्या नावाचे हे भयानक कारस्थान आहे. माणसाने माणसापासून अंतर राखून राहावे, याचे नियोजन कोरोनाने केले. त्याला नाव दिले सोशल डिस्टन्सिंग, शाहू, फुले, आंबेडकरांच्या राज्यात सोशल डिस्टन्सिंग कसे, फार तर ते फिजिकल डिस्टन्स असावे, शाहू, फुले, डॉ.आंबेडकर, गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांनी सोशल डिस्टन्सिंग दूर करण्याकरिता जीवन खर्ची घातले. कोरोनाने पुन्हा सोशल डिस्टन्सिंग शब्द आणला. हे नवे कारस्थान नाही काय, कोणी पुन्हा आणला सोशल डिस्टन्सिंग शब्द?

           कोरोनाची दहशत पद्धतशीर पसरवून या दहशतीने जगणे हैराण करून टाकले. ही दहशत निर्माण केली गेली. 'कोरोनाने किती जण दगावले, हे स्पष्टपणे सांगा, जे दगावले ते कोरोनाच्या दहशतीनेच दगावले आहेत किंवा चुकीच्या औषधोपचारामुळे, या संदर्भात डॉ. तरुण कोठारी, डॉ. विश्वरूप चौधरी यांनी दिलेली आवाहने मुद्दाम हेतुपूर्वक दुर्लक्षित केली जातात.'

           पगारदारांची चंगळ सुरू आहे, जनसामान्यांचे अमंगळ सुरू आहे. 'नवा राजा सांगतो, ताटे वाजवा, लाईट विझवा', आम्ही रोबोटसारखे वागतो. ताटे वाजवितो, लाईट विझवितो, त्यांनी दिलेल्या धान्यावर जगतो, तुमच्या माइंड कंट्रोलचे नियोजन केले गेले आहे तेही एका सर्दी- पडशासारख्या आजाराच्या मोठ्या भावाने.

           केवढी दहशत माजविली आहे कोरोनाने, मग कोरोना आवडतो कोणाला, याचा विचार करा, भानावर या, स्वतंत्र भारतात जगताना पारतंत्र्य स्वीकारू नका. कोरोना आवडतो कोणाला, हे स्पष्ट झालेच असेल.

           एकांगी व अचानक लॉकडाऊन करणे मुळातच चुकीचे होते व आहे, त्यामुळे करोडो लोकांना हजारो किलोमीटर पायपीट करावी लागली, कित्येक मेले. ज्यांना खरंच पोटापाण्याची सोय करण्याची गरज आहे त्या लोकांना बाहेर पडणे गरजेचे असते. अशा लोकांनी घरात राहून त्यांच्या कुटुंबाला कसे पोसायचे?कोरोनापेक्षा उपासमार होण्याची शक्यता जास्त बळावली आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा जीव प्रिय असतो. म्हणून प्रत्येक जण स्वतःची काळजी घेणार हे ठरलेले आहे. त्यामुळे पूर्वी जसे होते तसेच सर्व व्यवहार चालू ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लॉकडाऊन केल्यामुळे कोरोना कमी होण्यासाठी काही फरक पडत नाही हे वारंवार सिद्ध झाले आहे. लहान मुलांच्या शाळा कॉलेज बंद ठेवल्यामुळे त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे चालू व्हायला हवे. ज्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे तो काळजी घेणारच आहेत. उगाच लॉकडाऊन करून काहीच उपयोग होणार नाही. उलट यामध्ये देशाचे आणि देशातील जनतेचे प्रचंड नुकसान झाले आहे आणि होत आहे. प्रत्येकजण स्वतःची काळजी घेण्यासाठी समर्थ आहे. जनावरांसारखे त्यांना घरात कोंडून ठेवण्याची गरज नसते. प्रत्येकाला आपापले भले समजते.

           जगातील बहुतेक देशांतील माणसे आता शहाणी झाली आहेत आणि त्यांना कोरोनाच्या नावाखाली हे  कट-कारस्थान कोणी आणि का रचले याची जाणीव झाली आहे आणि त्यांनी हे सर्व झुगारून देऊन ते रस्त्यावर आले आहेत. भारतात मात्र यासंदर्भात अजूनही लोक भीतीच्या सावटाखाली आहेत आणि ते तसे राहावे याची तरतूद पहिली लाट, दुसरी लाट, आणि आता लहान मुलेसुद्धा बळी पडतील, असे सांगत वातावरण निर्मिती केली जात आहे.

           'इनफ इज इनफ'अशी इंग्रजीत एक म्हण आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी लोकांना सांगू इच्छितो की जगात आजूबाजूला काय चाललेय ते बघा आणि त्या दृष्टीकोनातून वागायला लागा, अन्यथा तुमची पुढची पिढी तुम्हाला माफ करणार नाही.


फेसबुकवर प्रहार वाचण्यासाठी: PraharbyPrakashPohare  

आणि ब्लॉगवर भेट देण्यासाठी Prakashpoharedeshonnati.blogspot.in  टाईप करा.

प्रतिक्रियांकरिता: Email: pohareofdeshonnati@gmail.com

Mobile No. +९१-९८२२५९३९२१

प्रहारच्या प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव, गाव लिहा.

Comments

Popular posts from this blog

‘प्रहार’ - वाचा आणि निर्णय घ्या!

कृषिविषयक ब्रिटिशकालीन कायदे कृषकांसाठी घातक!